चलो मछिंदर गोरख आया।* – किशोर पौनीकर

हिन्दी भाषिक पट्ट्यातील नाथपंथी व महाराष्ट्रात *नवनाथ भक्तीसार* या प्रासादिक ग्रंथाचे पारायण करणाऱ्यांना “चलो मछिंदर गोरख आया” हि कथा नक्की माहित आहे.

भारताच्या पुर्वभागात स्त्रीराज्य असतं. त्या राज्यात नावालाही पुरूष नसतो. नवनाथांपैकी आद्यनाथ “मछिंद्रनाथ” हनुमंताच्या आज्ञेनी देशाटन करत करत तिथे पोहचतो व  तिथली राणी तिलोत्तमा मैनाकिनीला तो आवडून ती त्याला स्त्री राज्यात ठेवून घेते.मैनाकिनीला मछिंद्रनाथापासून मीननाथ नावाचा मुलगा होतो.

शैली, श्रृंगी धारण केलेल्या नाथपंथीय कधीही कुठे स्थिर राहात नाही.कैलास पर्वतावरील अनेक वर्षांचे तप आटोपल्यावर मछिंद्रनाथ कुठे न दिसल्याने त्याचा शिष्य गोरक्षनाथ त्याला शोधत शोधत स्त्रीराज्यात पोहचतो.राणी तिलोत्तमाला मच्छिंद्राने पहिलेच सांगितलेले असते की माझा शिष्य गोरक्षनाथ मला बोलवायला आल्यावर मला जावेच लागेल. त्यामुळे तिल्लोत्तमा मैनाकिनी मछिंद्रनाथा पर्यंत कोणालाही पोहचू देत नाही.

ऐहिक उपभोगवादात गुंतलेला मच्छिंद्रनाथ बघून त्याला त्यातून बाहेर काढून पुन्हा समाजोध्दारक कार्यात लावायला गोरक्षनाथ एक युक्ती करतो.गोरक्षनाथ स्त्रीवेश घेवून राजगायिकेचा सहकलाकार म्हणून मृदंगवादन करतो.राजगायिकेचे गायन ऐन रंगात आले असता सर्वजण त्या गायनाच्या रंगात रंगले असतांना गोरक्षनाथाच्या मृदंगातून *चलो मछिंदर गोरख आया…. चलो मछिंदर गोरख आया….* असे बोल ऐकू येतात.मछिंद्रनाथाला कळून चुकते की गोरक्षनाथ त्याला घ्यायला आलेला आहे .तो किलोतळा मैनाकिनीला हे सांगतो व तेथील उपभोगात्मक अधिवास आटोपता घेवून गोरक्षनाथासमवेत पुन्हा अध्यात्मिक व सामाजिक कार्याद्वारे भरतखंडाची विस्कळीत घडी वसवायला देशाटनाला निघतो.

हि कथा केवळ रूपक कथा आहे असे नव्हे.

आपल्या ऐन तारूण्याच्या काळात जेंव्हा अनेक तरूण तरूणी श्रृंगाररसात झोकून देण्यातच स्वतःच्या तारूण्याचे गमक समजतात, अशा स्थितीत काही तरूण तरूणी या लालसांना लात मारून कुठलातरी समाजपुरक, देशभक्तीपर आदर्श स्वतःच्या जीवनात उतरवायला निघतात उच्च शिक्षण, उज्ज्वल करिअर व घरावर तुळशीपत्र ठेवून खांद्यावर झोळी घेवून.आपापल्या क्षमतेनुसार क्षेत्र निवडुन झोकून देतात आपल्याला गवसलेला आदर्श तिथे प्रस्थापित करायला. लोकसंग्रहाशिवाय इतर कुठलाही संग्रह न करता तारुण्यातील उमेदीची अनेकवर्ष त्या आदर्शाला प्रस्थापित करण्यात घालवतात.

मछिंद्रनाथाने शाबरी मंत्रातील मंत्रदेवतेद्वारा समाजाला सुखी ठेवून आत्मोन्नतीच्या मार्गावर अग्रेशित केले होते तर हे आधुनिक मछिंद्रनाथ नागरीमंत्राद्वारे (देशभक्तीने भारावून) व्यक्तीतील एकल भावना विस्तारित करून त्याला *”मै नहीं हम”* या भुमिकेवर पोहचवून समाज जीवन सुकर करत हळूहळू त्याला वैश्विक बनवतात.विशिष्ट काळ गेल्यावर तो हे काम आपल्या नवसहकाऱ्यावर सोपवून त्याला समाज तपःश्चर्येला बसवून आपण गृहस्थाश्रम धारण करतो. त्याच्याही जीवनात एक तिलोत्तमा येते व त्याचे सांसारिक उपभोगात्मक आयुष्य सुरू होते.

या गृहस्थाश्रमातील स्पर्धात्मक आह्वाने सांभाळतांना तो त्यात इतका गुंतत जातो की ज्या आदर्शांसाठी त्याने आपली तारूण्यातील उमेदीचे वर्षें दिलेली होती त्या आदर्शांची चळवळ आज कुठे व कोणत्या स्थितीत आहे हे बघायचीही आठवण त्याला होत नाही.ज्या व्यक्ती जीवनाला त्याने “मै वरून हम” वर आणलेले होते त्याच्या उलटे याचे “हम वरून मै” झालेले असते. व्यक्तीगत जीवनाच्या घसरत्या आलेखाकडे याचे लक्षच नसते.अशावेळी काही वर्ष हिमालयात तप केलेला गोरक्षनाथ समाज जीवनातून व्यक्तीगत जीवनात गेलेल्या या मछिंद्राचा शोध घेत फिरतो.

*”राष्ट्राय स्वाहा इदं न मम”* या भुमिकेतून एक तप (बारा वर्षे) तो आपले आदर्श भारताच्या पश्चिमेकडील भागात रूजवतो. तिथे त्या आदर्शांची फळे दिसायला लागल्यावर तेच आदर्श संपुर्ण भारतात पसरवायला तो त्या भागातून बाहेर पडतो.छोट्या भागात केलेल्या कामांचा अनुभव त्याला संपुर्ण भारतभर आपले आदर्श प्रस्थापित करायला सहाय्यक होतो.”पायाला चक्र, तोंडात साखर, डोक्यावर बर्फ व ह्रदयात राष्ट्रभक्तीची धगधगती आग”* घेवून तो भारताच्या नवयुगातील पुनरूत्थानात स्वतःला भुक, तहान व झोप यांच्या पलिकडे पोहचवून अहर्निश कार्यरत राहतो. *India व भारताचा सुरेख समन्वय त्याने घडवलेला असतो.*

आजवर त्याने हे सर्व कामं केवळ स्वतःच्या क्षमतेवर केलेली असतात. पण India ला मागे सारून भारताचा गौरव वाढवायला त्याला आणखी वेळ व साथ हवी असते.

* अयोध्येला प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मभूमीवर भव्य मंदीर बांधणे,

*जम्मू कश्मीरला भारतात पुर्णतः सामावून घ्यायला तेथील कलम 35 A व कलम 370 रद्द करवणे.

* प्रत्येकाने प्रथमतः भारताचा नागरिक व्हावे व नंतर त्याने आपली उपासना पद्धती सांभाळावी यास्तव देशात सर्वत्र “समान नागरी कायदा” स्थापित करणे.

*माणुसकीला ग्रासू पाहणाऱ्या आतंकवादाचे उच्चाटन करणे ….

आदी सर्व कामांसाठी त्याला समाज जीवनाचा अनुभव असणाऱ्या मछिंद्रनाथांची गरज आहे.

शाबरी मंत्रा ऐवजी नागरीमंत्र फुंकण्यासाठी ज्यांची फुप्फुसे शक्तीशाली आहेत पण तिलोत्तमेच्या प्रेमपाशात व व्यक्तीगत उपभोगांमध्ये जे गुंतलेले आहेत अशा मछिंद्रनाथांना शोधायला तो निघालेला आहे. शैली, श्रृंगी, कंथा, झोली व भस्म सध्या त्याने बाजूला ठेवून युगानुकूल वेश धारण केलेला आहे.प्रत्येकाच्या गृहसभेत जावून “चलो मछिंदर गोरख आया” हे तो करत बसला तर कामाची वेळ निघून जाईल, विचारशत्रू मुसंडी मारून वरती येतील.

त्याने ढोल पिटलेला आहे….. मृदंगावर थाप मारलेली आहे…. आसमंतात स्वर गुंजत आहे…… “चलो मछिंदर गोरख आया,

चलो मछिंदर गोरख आया”.

तिलोत्तमेच्या प्रेमात अडकूनही ज्यांची फुप्फुसे नागरी मंत्र फुंकायला ताकतवान आहेत त्या सर्व मछिंदरनाथांनी स्वतःला व्यक्तीगत जीवनातून वेळ काढून पुन्हा समाज जीवनात झोकून द्यायचे आहे.केवळ या गोरक्षनाथाचीच नव्हे तर भारताला विश्वगुरूपदावर बसवायला काळाचीही हिच हाक आहे.

भारतात नुकत्याच सुरू असलेल्या निवडणुकांमधील मतदान प्रतिशत समाज जीवनातील शैथिल्य व निराशाच दर्शवित आहेत. मोठ्या मुष्किलीने सरासरी 50 % मतदान होते. म्हणजे लोकांना समाज जीवनात अग्रेशित करायला मोठ्या प्रमाणावर नागरीमंत्र फुकणाऱ्या मछिंद्रनाथांची गरज आहे.

आजच्या परिस्थितीत या मछिंद्रनाथांना घर, बायको, मुले, व्यवसाय यांना सोडून निघायचे नाहीये. यातून वेळ काढून निघायचे आहे. आपल्या परिसरातच आपापल्या क्षमतांनी कामाला लागायचे आहे.आपल्या सोबत काम केलेल्या अन्य मछिंद्रांना जर गोरक्षनाथाच्या ढोलाचा आवाज पोहचलेला नसेल तर आपल्याला स्वतःहून त्यांच्या दरवाजा बाहेर उभे राहून जोरात श्रृंगी वाजवायची आहे जेणेकरून व्यक्तीगत कार्यातून वेळ काढायला त्याला गोरक्षनाथाचे आवाहन ऐकू जाईल. किती मछिंद्रांच्या फुफ्फुसात ही श्रृंगी व नागरीमंत्र फुंकण्याचे बळ अजूनही आहे?

चलो मछिंदर गोरख आया…. चलो मछिंदर गोरख आया…..

 

किशोर पौनीकर, नागपूर.