रामायणातील भावविश्व

श्री रामायण हा आपल्या देशातील संस्कृतीचा तसेच आपल्या दैदिप्यमान इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. अनेक वर्षांपासून हे रामायण आपण नुसते जपले नाही तर आपण ते जगलो आहोत. रामायणासारखे जीवनाचा मतितार्थ शिकविणारे महाकाव्य, भारतीय संस्कृतीचे युगानुयुगापासून  मार्गदर्शक ठरले आहे. वाल्मिकी रामायणातून जिवंत झालेली रामकथा ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या, त्यातील जे रामायण जगले त्यांना अनेक अलौकिक अनुभव देखील आले. श्रीराम हे हिंदू संस्कृतीचे मूळ आहे व हे मूळ जगात खोलवर रुजले असून आज जगभरात श्रीरामावरील आस्थेत वृद्धीच होते आहे.

 

श्रीरामांचे जीवनकार्य सर्वांना सदैव मार्गदर्शक असून त्यातून श्रीरामांचा संयम हा गुण सदैव ठळकपणे समोर येतो व हाच संयम समस्त हिंदू समाजाने इतके वर्ष जपला. ज्याप्रमाणे  वृक्षाच्या मुळावर आघात केला की त्याचे जगणे कठीण असते त्याप्रमाणे हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या सर्वच आक्रमणकर्त्यांनी हिंदुस्थानातील मूळ हिंदू धर्मावर वारंवार आघात केला. हिंदू समाजाची मंदिरे, तीर्थक्षेत्रे तोडल्या गेली, देवाला बेघर केल्या गेले. मात्र हिंदू धर्माची मूळे या मातीत इतक्या खोलवर रुजली आहेत की त्याला मिटविणे इतके सोपे नाही हे आतातरी त्यांना कळायला हवे. अयोध्या ही श्रीरामजन्मभूमी असून तेथे भव्य मंदिर असावे ही मागणी हिंदुराष्ट्रात अवास्तव नव्हती पण या मागणीला राजकीय वळण दिल्या गेल्याने वाद चिघळला. हिंदू समाजाच्या प्रत्येक मागणीला ठोस आधार होता, हिंदू मंदिरे हे केवळ प्रार्थनास्थळे  नसून, तेथे इष्टदेवतेची प्राणप्रतिष्ठा झाली की ते त्या देवतेचे निवासस्थान होते. अयोध्येवर तर अयोध्येच्या राजाचा मुळातच अधिकार आहे आणि म्हणूनच तिथे भव्य मंदिर होणार ही आशा अनेक वर्षांपासून समस्त हिंदू जनतेने जिवंत ठेवली आहे.

 

श्रीरामचंद्र हे विष्णूचे अवतार होते हे सर्वपरिचित असले तरी श्री विष्णूंच्या या अवतारात महत्वाची बाब ही की प्रभूंचा हा जन्म मनुष्याच्या जीवनासारखा अत्यंत सामान्य पद्धतीने व्यतीत झाला. शरयू नदीच्या तीरावरील अत्यंत रमणीय अयोध्या नगरीत, अयोध्यानरेश दशरथ यांच्या राजवाड्यात श्रीरामाच्या जन्माने आनंदीआनंद झाला. चारही भावंडात ज्येष्ठ व अत्यंत तेजस्वी राजपुत्र श्रीराम, वडील दशरथ व तिन्ही माता कौसल्या, सुमित्रा व कैकयीचा अत्यंत लाडका होता. असे म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, श्रीरामांचे बालपण देखील असेच होते. आपल्या तिन्ही भावांवर जीवापाड प्रेम करणारे श्रीराम त्यांच्या संपूर्ण चरित्रात कोणालाही अंतर देतांना दिसत नाही. रामायणातील प्रत्येक महत्वाच्या प्रसंगात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर व प्रजेवर श्रीराम एकसमान प्रेम करतांना दिसतात. रामायण ऐकत रहावेसे वाटते कारण त्यातील प्रत्येक प्रसंगातून जीवन जगण्याचा आधार प्राप्त होतो. सदैव न्याय्य बाजूचा विचार करून निर्णय घेतांना दिसणारे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे सदैव आपले आदर्श आहेत म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला आदर्श जीवनाचा मूलमंत्र सापडतो.

 

प्रत्येक व्यक्तीचे भावविश्व हे त्यांच्या सभोवताली असलेल्या नात्यांमधून निर्माण होते. रामायण ऐकतांना श्रीरामांच्या भावविश्वाचे देखील अत्यंत देखणे दर्शन घडते व त्यामुळे आपले भावविश्व अधिक समृद्ध होते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक नात्याची एक सुरेख गुंफण रामायणातून अनुभवायला मिळते. रामायणातील प्रसंगातून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्व, त्याचे त्यांच्या आयुष्यातील स्थान याचे समर्पक वर्णन आपण वाचले, ऐकले व पाहिलेही आहे. रामायण मालिकेतून या प्रसंगांचे जिवंत चित्रण पाहतांना मिळालेला अत्याधिक आनंद व त्या मालिकेची ओढ आपण सर्वांनी अनुभवली आहे. ग. दि. माडगुळकर यांनी शब्दबद्ध केलेले गीत रामायण ऐकतांना प्रत्येक प्रसंगाचे यतार्थ वर्णन व त्याला संगीतबद्ध करतांना सुधीर फडकेंनी जपलेल्या विविध प्रसंगातील भावना, हे दोन्हीही केवळ दैवी आशीर्वादाने शक्य झाले आहे, याची प्रचीती गीत रामायणातील प्रत्येक गीतातून रसिकांना कायम होत राहते. आधुनिक वाल्मिकी या पदवीने सन्मानित माडगुळकरांची ही दैवी रचना ऐकतांना, त्यातील शब्दांचे रसग्रहण करतांना कधीही तोचतोचपणा वाटत नाही तर ते अधिकाधिक श्रवणीय होत जाते. रामायण हे त्या त्या वेळी आपल्या मनात उसळलेल्या भावनांशी साधर्म्य साधणारे वाटते, तात्पर्य हेच की अनेक रूपातून आजपर्यंत आपल्या समोर आलेली रामकथा ही प्रत्येक वेळी तितकीच आवडते कारण  राम आपल्या रोमरोमात वसलेला आहे. राम कधी मूर्त स्वरूपात तर कधी कल्पनेत, कधी आपल्या वागण्यात तर कधी आपल्या बोलण्यात सतत आपल्या सोबत आहे, सतत आपल्या हृदयात विराजमान आहे.

 

मनुष्यजन्मातील सर्वात महत्वाचे नाते ममतेचे, आईच्या गर्भातून जन्म घेतांना बाळाचे आईशी असलेले अनामिक नाते रामायणाचा गाभा आहे. आई व मुलाच्या नात्याचे अत्यंत सुंदर रूप रामायणातून अनुभवता येते, “सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो” हे ऐकतांना रामाला घास भरवणारी कौसल्यामाता डोळ्यासमोर येते. दैवी अवतार असला तरी आईकरिता तिचे तान्हे बाळ हे तिचे विश्व असते व अनेक वर्षांनी पुत्रसुख अनुभवलेल्या कौसल्येचा रामजन्मानंतरचा आनंद अवर्णनीय असणारच मात्र त्याला शब्दरूप देऊन अनेक दिग्गजांनी साहित्य समृद्ध केले. कौसल्येच्या पोटी जन्म घेतलेल्या श्रीरामांनी मात्र कौसल्या, सुमित्रा व कैकयी या तिघींना मातेचा समान हक्क व प्रेम दिले. श्रीरामांच्या जीवनातून कुटुंबव्यवस्थेत अत्यंत आवश्यक असलेली समानता आपल्याला शिकता येते. भेदाभेद हा आपल्या माणसाला परका करतो व असे करून मिळविलेला हक्क पाप आहे याची जाणीव रामायण आपल्याला करून देतं. कौसल्येचा श्रीराम हा लहानपणापासून तिच्या वाट्याला फारच कमी आला कारण तो सर्वांचा प्रिय होता व सर्वांना हवाहवासा देखील होता, आईमुलाच्या नात्यातील प्रेमाचे अव्यक्त भाव या नात्यातून प्रगट होतात. विशिष्ट कार्यासाठी जन्म झालेल्या व्यक्तीच्या आयुष्यात कर्मयोग महत्वाचा असतो, कर्तव्यापुढे नात्यांची व स्वतःच्या सुखाची पर्वा करायची नसते ह्या रामायणातील शिकवणीतून हिंदुस्थानातील अनेक राष्ट्रपुरुष घडले. जिजाबाईंनी रामायणातील गोष्टी सांगून शिवाजी घडविला, ज्याने धर्मरक्षणाकरिता आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. त्याकाळी देखील मुघल आक्रमणाने अनेक हिंदू मंदिरांची विटंबना झाली, धर्मावर झालेला आघात सहन न झालेले अनेक सकारात्मक हात एकत्र आले व स्वराज्य निर्मितीचे अवघड कार्य पूर्ण झाले. रामायणाने प्रत्येक काळात परिस्थितीनुरूप मार्गदर्शन केले व जो रामायणातून शिकला त्याने इतिहास घडविला.

 

राजा दशरथ व श्रीराम यांचे प्रेम देखील पितापुत्र नात्यातील महत्वाचे बंध अनुभवण्यास मार्गदर्शक ठरते. प्रजेचे रक्षण हे प्रथम कर्तव्य समजूण आपल्या कोवळ्या सुकुमार राजपुत्रांना वनात पाठविणारा राजा दशरथ राजाच्या कर्तव्यापुढे पुत्रप्रेम बाजूला ठेवतो. पुढे पित्याचे अनुकरण करून श्रीरामदेखील अनेक प्रसंगात प्रजेला महत्व देतांना दिसतात. ज्येष्ठांचे अनुकरण ही आपली संस्कृती व राष्ट्र प्रथम ही हृदयात वसलेली भावना श्री रामायणातून ठळकपणे समोर येते. आपल्या प्रिय व कर्तृत्ववान पुत्राचा राज्याभिषेक करण्याची तयारी करत असलेला राजा दशरथ  कैकयीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी जेंव्हा त्याला चौदा वर्षे वनवासाला जाण्याची आज्ञा करतो तेंव्हा पित्याच्या हृदयातील वेदना अनुभवतांना अंगावर शहारे येतात. कर्तव्यकठोर श्रीराम पित्याचे वचन पूर्ण करण्यास राजत्याग करून वनात जाण्याचा निर्णय घेतात व वल्कले परिधान करून माता, पिता तथा प्रजेचा निरोप घेतात त्या प्रसंगाचे वर्णन ऐकतांना आजही पाणावलेले डोळे शब्दांना निशब्द करणारे असतात. अनेकांना हा रामावरील अन्याय वाटतो मात्र हे व्यक्तीचे कर्मयोग असतात, जे जीवनातील अश्या कठीण प्रसंगांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

कैकयी हे रामायणातील आपल्यासाठी असलेले नकारात्मक पात्र श्रीरामांच्या भावविश्वातील महत्वाचे पात्र म्हणून रामायणात समोर येते. लहानपणापासून श्रीरामांवर स्वतःच्या मुलांपेक्षा अधिक स्नेह करणारी कैकयी मंथरा दासीच्या बोलण्यात येऊन जेंव्हा कठोर निर्णय घेते त्यावेळी क्षणभर राग येणे साहजिक, मात्र थोडा वेगळा विचार कैकयीच्या सकारात्मक बाजूंचा विचार करण्यास आपल्याला बाध्य करतो. रामायणात रणरागिणी कैकयी दशरथाच्या इतर दोन राण्यांपेक्षा जरा वेगळी भासते, युद्धाच्या वेळी राजा दशरथ अडचणीत असतांना त्याच्या मदतीला धावून जाते व दोन वर मिळवते. पुढे कैकयीला तिच्या सकारात्मक कर्तुत्वाचा विसर पडतो व ते दोन वर रामाला वनवास तसेच भरताचा राज्याभिषेक मागण्यास ती वापरते, यातून समाजातील कळलावी प्रवृत्ती चांगल्या व्यक्तीचा देखील बुद्धीभेद करू शकते हे दिसून येते. राजा दशरथ तिचे मनोरथ पूर्ण करतो पण त्यानंतर तिच्या नशिबी केवळ अवहेलना येणार याची कल्पना असून देखील, श्रीरामांचा जन्म ज्या कार्यासाठी झाला त्या कार्याचा मार्ग प्रशस्त करण्याचे कार्य करणारी, प्रेमळ मात्र कर्तव्यकठोर माता कैकयीने साकारली आहे, असे दुसऱ्या बाजूने विचार केल्यास आपल्याला नक्कीच जाणवेल. कौसल्या व सुमित्रा या दोन्ही माता कैकयीपेक्षा वेगळ्या आहेत त्या कठोर निर्णय घेण्यास नक्कीच पात्र वाटत नाही. सुमित्रेचे रामाच्या जीवनातील स्थान मात्र श्रीरामांच्या साथीला सदैव सावलीसारखा सोबत असणारा सुमित्रानंदन लक्ष्मण ठळकपणे अधोरेखित करतो.

 

शेषनागाचा अवतार लक्ष्मण हा रामाहून अगदी निराळा, राम शांत तर लक्ष्मण शीघ्रकोपी मात्र रामासारखाच आज्ञाधारी व सदैव ज्येष्ठ भावाची साथ देणारा म्हणून सगळ्यांना प्रिय आहे. रामाला वनवास हे समजल्यावर प्रथम चिडलेला, मात्र रामाचा निग्रह ऐकून राज्यसुख सोडून भावासाठी वनात निघालेला लक्ष्मण बंधूप्रेमाचे प्रतिक आहे. राम लक्ष्मणाचे नाते म्हणजे एक प्राण व दोन देह, रामाची प्रत्येक प्रसंगात अखेरपर्यंत साथ देणारा लक्ष्मण आदर्श भावाचे उत्तम उदाहरण आहे म्हणून आजही दोन भावांना राम लक्ष्मणासारखे राहा असा आशीर्वाद दिला जातो. भरताचे बंधुप्रेम त्याहून निराळे आहे, त्याची रामावर भक्ती आहे. त्याला जेंव्हा आपल्या मातेमुळे राम वनवासाला निघाले हे कळते, तेंव्हा तो राज्य नाकारून त्यांना परत आणण्यास जातो. रामाने नकार दिल्यावर चौदा वर्षे त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य सांभाळणारा भरत निष्ठेचे श्रेष्ठ उदाहरण आहे. प्रत्येक प्रसंगातून अत्यंत समर्पक शिक्षा देणाऱ्या रामायणाला काल्पनिक ठरवून प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काही भारतीय नागरिकांना जे सिद्ध करायचे होते त्यात ते कदापि यशस्वी होणार नाही कारण रामावताराच्या अगणित खुणा आजही अस्तित्वात आहे. रामसेतूच्या अस्तित्वाबद्दल प्रसार माध्यमांनी प्रसारित केलेले अनेक तथ्य सगळ्या प्रश्नांचे स्पष्ट उत्तर आहे.

 

राम वनवासाला निघाल्यावर नदी पार करणारा केवट असो की प्रेमाने रामाला उष्टे बोरे भरविणारी शबरी असो, असे रामायणातील अनेक उदाहरणे सामाजिक समरसतेची पूर्वापार चालत आलेली रचना स्पष्ट करतात. मध्य काळात हिंदुस्थानात जाणीवपूर्वक निर्माण केल्या गेलेला जातीभेद हा केवळ राज्यकर्त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी होता हेही यावरून सिद्ध होते. आपल्या सुजलाम सुफलाम भूमीचा गैरवापर करणाऱ्या या आक्रमणकर्त्यांनी येथील मूळ धर्मावर केलेले आघात इतके भयंकर आहेत की आजही त्याचे परिणाम समाजात दिसून येतात. केवटाचा धर्म होता नदी पार करविणे आणि प्रत्यक्ष रघुराजाला पार नेतांना त्याच्या मनाची अवस्था काय असेल, त्या अवस्थेत देखील त्याला त्याच्या कामाचा योग्य मोबदला द्यावा हा भाव श्रीरामांच्या मनात निर्माण होणे हे उत्तम नेतृत्वाचे प्रतिक आहे. आज टोलनाक्यावर अतिविशेष व्यक्ती म्हणून लाभ घेणारे अनेक नेते व पदाधिकारी यांना असे नेतृत्व जमले पाहिजे. जनतेचे सेवक म्हणून काम मिळाल्यावर जो आपल्या अधिकाराचा वापर केवळ स्वार्थासाठी करतो असे राज्यकर्ते असेपर्यंत रामराज्य येणार तरी कसे? वैयक्तिक स्वार्थापेक्षा जेंव्हा राष्ट्र महत्वाचे वाटायला लागते तेंव्हाच मर्यादेत राहणे शक्य होते. आज अनेक ठिकाणी तर ही वृत्ती बळावली आहे की, मी नसेल तर देशाचे काय करायचे, हे वाक्य हास्यास्पद वाटत असले तरी आजच्या काळात हे अनेकांचे मत आहे. रामायणातून देशावर, धर्मावर प्रेम करण्याची, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते म्हणून वाल्मिल्की रामायण हे हिंदू समाजाकरिता मार्गदर्शक ग्रंथ आहे.

 

जनकनंदिनी सीता व श्रीरामांचे भावविश्व उलगडतांना तर कायम पती पत्नी या नात्यातील संयम, त्याग, प्रेम, समर्पण व विश्वास या महत्वाच्या पंचसूत्रीचे दर्शन घडते. श्रीरामाच्या गळ्यात वरमाला घालण्यास आतुर झालेली अल्लड जानकी ते राज्याच्या हितासाठी धरणीच्या गर्भात विसावा शोधणाऱ्या विरक्त सीतेचा प्रवास थक्क करणारा आहे. नववधू सीतेने क्षणभरही सुखाचा विचार न करता रामासंगे वनवासात जाण्याचा घेतलेला निर्णय धैर्याचा होता. दंडकारण्यात आहे त्या परीस्थितीत जीवन व्यतीत करणारी सीता कधीही रामाकडे तक्रार करीत नाही यावरून आहे त्या परिस्थितीत आनंदाने संसार करणाऱ्या स्त्रियांमधील सीता अनुभवता येते. समाधानी वृत्ती माणसाला कायम आनंदात ठेवते तर लोभ अधोगतीकडे घेऊन जातो. रावणाने सीताहरण केले मात्र पतिव्रता सीता कधीही सोन्याच्या लंकेवर भाळली नाही. एकवचनी, एकपत्नी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने रावणवध करून सीतेला सन्मानाने अयोध्येस परत आणले. श्रीरामाला देखील सोन्याच्या लंकेहून जन्मभूमी अयोध्या प्रिय होती, हिंदूंनी कधीही दुसऱ्या भूमीवर आपला अधिकार दाखविला नाही हे रामायणातील हा प्रसंग दाखवून देतो. रावणाचा भाऊ बिभिषण रावणाच्या लंकेत राहून देखील स्वच्छ मनाचा होता त्याने श्रीरामांना मदत केली कारण त्यांची बाजू बरोबर आहे हे त्याने जाणले होते. पुढे युद्ध संपल्यावर बिभिषणाचा राज्याभिषेक करून श्रीराम अयोध्येत परत आले यावरून श्रीरामाची परक्याच्या संपत्तीबद्दलची विरक्ती दिसून येते.

 

लंकेतून परत आल्यावर सीतेने अग्निपरीक्षा दिली तरीही समाधान न झालेल्या समाजातून निर्माण झालेले प्रश्न श्रीरामांच्या भावविश्वाला तडा देणारे ठरले. प्रजेसाठी स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा पुन्हा एकदा त्याग करावा लागणारे श्रीराम सीतेला वनात पाठविले म्हणून अजूनही प्रश्नचिन्ह सहन करतात आहेत. राजमहालात राहून सीतेसाठी जमिनीवर झोपणारे श्रीराम, सर्व सुख त्यागून सीतेच्या विरहात व्याकूळ झालेले श्रीराम, कर्तव्यपूर्तीसाठी घ्यावा लागलेला कठोर निर्णय एकटे सहन करणारे श्रीराम, आपल्या पुत्रांच्या मुखातून प्रत्यक्ष आपले चरित्र श्री रामायण ऐकतांना भावूक झालेले श्रीराम आणि अजूनही अनेक अनुत्तरीत प्रश्नांचा निरर्थक प्रहार झेलणारे श्रीराम जेंव्हा आपल्याला कळतील तेंव्हा असे निरर्थक प्रश्न निर्माण होणेच बंद होईल. त्यासाठी प्रथम आपल्याला मनाच्या अगदी आतल्या कुपीतून समजदारीचे अत्तर बाहेर काढून मन व हृदयासह सर्वांग सुगंधित करावे लागेल.

 

रामायणातील अहिल्या, उर्मिला, मंदोदरी हे स्त्रीपात्रे देखील सहनशीलता व त्यागाचे प्रतिक आहे. श्रीरामाने अहिल्येचा उद्धार केला ही कथा सर्वश्रुत आहे मात्र यातून असा बोध होतो की कुठल्याही चुकीला झालेली शिक्षा ही चिरकाल टिकणारी नसते. शिक्षेचा अंत होऊन त्या व्यक्तीला सामान्य जीवन जगण्याचा हक्क रामायण काळापासून अस्तित्वात आहे. उर्मिलेने स्वेच्छेने जे जीवन स्वीकार केले, जे जीवन ती जगली त्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याइतका तिचा त्याग लहान नव्हता. ऐहिक सुखाच्या मागे धावणाऱ्या आपल्या बुद्धीला जो अन्याय वाटतो तो त्यावेळी अन्याय नसून प्रत्येकाचे कर्तव्य होते. अजूनही राष्ट्रासाठी स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा त्याग करणारे अनेक लोक समाजात आहेत, त्यांनी अगदी जाणीवपूर्वक हे आयुष्य स्वीकारले असते. प्रत्येकाचे आयुष्य हे तराजूच्या एकाच पारड्यात टाकून मोजीत बसलो तर गल्लत होणारच, जे लोक कर्तव्यमार्गावर चालण्यासाठी बाध्य असतात त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट वेगळे असते इतके समजून घेतले तरी पुरे झाले.

 

मंदोदरी तर अत्यंत हुशार व महापराक्रमी रावणाची पत्नी होती, सोन्याच्या महालात राहत होती तरी ती सुखी होती का? अहंकार हा आपल्या पतीचा नाश करणार आहे हे ज्या स्त्रीला डोळ्यासमोर दिसत होते ती आनंदात कशी असणार मग त्याहून उर्मिला व जानकीची परिस्थिती ठीक होती. सन्मार्गाने चालणारे दोन राजकुमारांच्या या दोघी पत्नी होत्या त्यामुळे त्यांच्यावरही अनामिक जबाबदारी विवाहासोबतच आली होती. रामायणातील प्रत्येक व्यक्तीरेखेसह श्रीरामांचे भावविश्व समृद्ध होते मात्र मनुष्यजन्म असल्यामुळे यातील चढावउतार स्वाभाविक होते. धोब्याचे ऐकून सीतेसारख्या महापतीव्रतेचा त्याग करणे ही रामाची चूक होती या आशयाचे लिखाण सध्या समाजात प्रशंसा मिळवितांना दिसते, मात्र अत्यंत नम्रतेने रामाचा निर्णय स्वीकार करणारी सीता व मातृत्वाची जबाबदारी चोख पार पाडणारी सीता तुमच्यामाझ्यासारखी असती तर ती रामाची सीता नसती असाही विचार करायला हवा. रामायणातील प्रत्येक पात्राच्या जीवनाचे एक उद्दिष्ट होते असे रामकथा ऐकतांना जाणवते व त्या त्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी त्यांनी जो मार्ग स्वीकारला तो पुढे समाजासाठी दिशादर्शक ठरला. एकवचनी, एकपत्नी श्रीरामाचे सीतेवर असलेले प्रेम जाणून घेण्यास प्रथम आपल्या मनातील राम जागृत व्हायला हवा.

 

आपल्या प्रिय व्यक्तीवर अन्याय होतो आहे असे अनेकदा आपल्याला वाटत असते. रामभक्त हनुमानाला देखील अनेकदा हे जाणवले मात्र रामाच्या संयमाने प्रत्येकाच्या प्रश्नांची समयोचित उत्तरे त्यांना योग्य वेळी मिळाली. सीतेच्या शोधासाठी समुद्रपार करून लंकेत गेलेला पवनपुत्र हनुमान, राम रावण युद्धात लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणणारा हनुमान हा कठीण प्रसंगात सखा म्हणून सदैव साथीला होता. श्रीरामांचा हनुमानावर सर्वाधिक विश्वास होता व हनुमंताने देखील आयुष्यभर रामभक्ती केली आणि श्रीरामांच्या हृदयात विराजमान झाले. वानरसेनेतील प्रत्येकाच्या कौशल्याचा योग्य उपयोग करून घेणे हे श्रीरामांच्या उत्तम नेतृत्वाचे अजून एक उदाहरण आहे. महापराक्रमी रावण जेंव्हा युद्धात परास्त झाला तेंव्हा त्यालाही मृत्युशय्येवर असतांना श्रीरामांचे महत्व कळले व स्वतःच्या चुकांची जाणीव झाली. सुग्रीव व वाली यांच्या मधील वादाचे निराकरण करतांना देखील रामांनी जी न्याय्य भूमिका घेतली ती दोघांमधील वादात तिसऱ्याने पडतांना आपल्याला मार्गदर्शक ठरते. स्वकर्तुत्वावर वानरसेना निर्मिती व रावणाला परास्त करणारे प्रभू श्रीराम हे आपल्यातील प्रत्येकाला कर्तृत्वाचे महत्व पटवून देतात. कर्म व्यक्तीला मोठे करतो कोणीही फक्त जन्माने मोठा होत नाही ही शिकवण देणारे रामायण हे महाकाव्य जीवन जगण्यासाठी दिशादर्शक आहे. हे असे का व हे असे नको होते अशे प्रश्न निर्माण करणे, रामायणातील न्याय व अन्यायाची चर्चा करणे, कोण कसे चुकले याचे विश्लेषण मांडणे वरवर बघता अत्यंत सोपे वाटत असले तरी जेंव्हा अंतःकरणातून रामायणाचा विचार केल्या जातो तेंव्हा हेच प्रश्न निरर्थक ठरतात. श्रीरामचरित्र पूर्वीपासून आजपावेतो आपल्याला प्रिय व वंदनीय आहे. हिंदुस्थानातील रामाचे अस्तित्व हे निर्विवाद सत्य असून कोटी कोटी हृदयात विराजमान असलेले मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आपले आराध्य दैवत आहे. करोडो लोकांच्या भावविश्वाला समृद्ध करणारी रामकथा आपल्या संस्कृतीला मिळालेली अमूल्य देणगी आहे व ही अमूल्य संपत्ती सांभाळण्याची जबाबदारी आज प्रत्येक व्यक्तीवर आहे.

 

संपूर्ण जगात वंदनीय असलेले श्रीरामचंद्र त्यांच्या जन्मभूमीच्या विवादात सुद्धा संयमित भूमिका घेण्याची बुद्धी आजपावेतो आपल्याला देत आले असे म्हणता येईल. संपूर्ण हिंदू समाजाने श्रीरामचंद्र यांचा आदर्श समोर ठेवून अत्यंत धीराने अनेक वर्षे अयोध्या प्रकरणात न्यायालयाची साथ दिली. स्वतंत्र भारतात हा विवाद व त्यावरील निर्णय इतका प्रलंबित होण्याचे तसे कारण नव्हते पण मतांच्या राजकारणात सत्य नाकारण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा मोडून काढणे कोणालाही शक्य होत नव्हते. सत्य स्वीकारण्याची आज जी आशा पल्लवित झाली आहे त्याचा सकारात्मक परिणाम सर्वांना अनुभवता यावा यासाठी अजूनही श्रीरामांप्रमाणे संयमित वागण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीचे आचरण आनंद व्यक्त करतांना संयमित असेल तर आपल्याला अनेक वर्षांनी मिळणारा आनंद निश्चितच द्विगुणीत होईल. श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य मंदिर ही हिंदुस्थानातील करोडो हिंदूंची इच्छा लवकरच पूर्ण होवो ह्या सदिच्छा! जय श्रीराम !

सौ. प्राची पालकर

९८२३०४९१९८