asmitecha manbindu -shriramjanmbhumi -pro hardas

भारतीय अस्मितेचा मानबिंदू-श्रीरामजन्मभूमी

अयोध्या! भारतीय इतिहासातील प्राचीन मोक्षदायिनी सप्तपूरी मधील एक ऐतिहासिक नगरी. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाची जन्मभूमी, भगवान बुद्ध यांची तपोभूमी, जैन मतानुसार पांच तीर्थंकरांची जन्मभूमी, गुरू नानकदेव, गुरू तेगबहादूर आणि गुरू गोविंदसिंगजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून विख्यात असलेली शरयू तीरावरील अयोध्या आज न्यायासाठी शेकडो वर्षांपासून प्रतीक्षेत आहे. भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीतदेखील मर्यादापुरुषोत्तम श्रीराम ,माता सीता आणि लक्ष्मण यांचे रेखाचित्र अंकित केले आहे. त्याअर्थाने श्रीराम हे संवैधानिक , सांस्कृतिक आणि अवतारी महापुरुष आहेत. इसवी सन १५२६ मधे मुघल आक्रमक बाबर भारतावर चाल करून आला. भारतीय मान मर्यादा ,मंदीरे यांची अक्षरश धूळधाण करीत बाबराचा वरवंटा फिरत फिरत १५२८ मधे अयोध्येतील श्रीजन्मभूमीवर फिरला. इतिहासकार कनींघम याने लिहून ठेवले आहे की बाबराचा सेनापती मीर बाकी याने श्रीराम जन्मभूमीवर तोफ गोळे डागुन भारतीय अस्मितेचा मानभंग केला.सुमारे १५ दिवस सतत चाललेल्या या धर्मांध धुमाकुळाने १ लाख ७४ हजार हिंदु साधु संत,बैरागी आणि सामान्य नागरिक यांची कत्तल अयोध्येत घडवली गेली. श्रीरामजन्मभूमीचा विध्वंस केल्यानंतर मंदिराच्या मलब्यातील अवशेषांचा उपयोग करून त्याच जागेवर मीर बाकीने एक मशीद सदृश्य ढाचा निर्माण केला, मात्र अजानसाठी मिनार आणि वजू साठी पाण्याची कोणतेही व्यवस्था नसलेला हा ढाचा कोणीही मशीद म्हणून स्वीकारले माही.किंबहुना अनेक शतके जन्मभूमी स्थान असल्याने हिंदू भाविक या ढाच्याभोवताली प्रदक्षिणा मारून मानसपूजन करीत. मात्र बाबर आणि मीर बाकी यांच्या बर्बर दहशतवादी कृत्यामुळे कोणी जिला युद्धात जिंकू शकत नाही म्हणून विख्यात असलेल्या अयोध्या या जनपदाने शरयू तीरावर तेव्हा टाहो फोडला असेल.

१५२८ ते १९४९ पर्यंत जन्मभूमी मुक्तीसाठी अनेक आंदोलने झालीत. एकूण ७६ आंदोलने/युद्ध झाले आणि लाखो रामभक्तांनी बलिदान दिले.हिंदु परंपरेत स्थान महात्म्य आहे त्यामुळे श्रीराम जन्मस्थान हा समस्त हिंदूंच्या आस्थेचा आणि अस्मितेचा विषय आहे.

विवादित मशीद सदृश्य ढाचा हे मुळात जन्मभूमी स्थान असल्याने वाद वाढत असल्याचे पाहून तत्कालीन प्रशासनाने या स्थळी कुलूप लावले.

*श्रीरामलला विराजमान*

२३ डिसेंबर १९४९ रोजी या स्थळी तैनात सुरक्षा रक्षकाला जे प्रत्यक्ष दिसले ते अत्यंत आश्चर्यजनक घडले.सुरक्षा रक्षक म्हणतो मध्यरात्री नंतर आकाशातून एक दिव्यप्रकाश त्या भवनात जाताना दिसला आणि अचानक बालरूपातील श्रीरामलला तिथे प्रगट झाले.पहाटे पहाटे ही वार्ता कानोकानी पसरली आणि आबालवृद्ध नागरिक माता भगिनीचे लोंढे रामलला दर्शनासाठी येऊ लागले.

*न्यायालयात रामलला*

सत्य आणि न्याय यांचा आजन्म पुरस्कार करणाऱ्या धर्मधुरंधर श्रीरामाला न्यायालयीन वादात ओढले गेले. सन १९५० मधे काही श्रद्धाळू रामभक्त न्यायालयात गेले आणि प्रगट झालेल्या श्रीरामलला विराजमान यांची पूजा अर्चना आम्हाला करू द्यावी अशी याचिका दाखल केली.

याच दरम्यान मुस्लिम समाजातील १३ नागरिकांनी शपथपत्र दाखल करून विवादित जागी मंदिराचा विध्वंस करून ढाचा उभारला असल्याने हे स्थान हिंदु समाजाकडे राहायला मुस्लिम समाजाची आपत्ती नाही असे नमूद केले.

१९५९ मधे बैरागी निर्मोही आखड्याने प्रशासनाचा रिसीवर हटवून त्याजागी महंत जगन्नाथदास यांची नेमणूक करून मंदिराची जागा निर्मोही आखाड्यास द्यावी अशी मागणी केली.

१९६१ मधे सुन्नी वक्फ बोर्डाने मंदीरातील मूर्ती हटवून विवादित स्थळास सार्वजनिक मशीद घोषित करण्यात यावे यासाठी याचिका दाखल केली.

पुढे मीनाक्षीपुरम प्रकरणानंतर १९८३ मधे उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे विराट हिंदु संमेलन झाले.ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलजारीलाल नंदा आणि उत्तर प्रदेश सरकार मधील मंत्री दाउदयाल खन्ना या संमेलनात उपस्थित होते. समस्त हिंदु जनतेसाठी प्रातःस्मरणीय असलेल्या अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि वाराणसी येथील काशी विश्वनाथ या तीन श्रद्धास्थानांच्या मुक्तीचा प्रस्ताव या संमेलनात एकमताने मंजुर करण्यात आला. श्रीराम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीचे गठन करण्यात आले ज्याचे गोरक्षपीठाधिश्वर महंत अवैद्यनाथ अध्यक्ष तर दाउदयाल खन्ना महामंत्री झाले. विश्व हिंदु परिषदेचे प्रचारक अशोकजी सिंघल यांच्या नेतृत्वाखाली १९८४ मधे राम जानकी रथयात्रा देशभर काढण्यात आल्या.१९८५ च्या उडुपी येथील धर्मसंसदेत कुलूपबंद असलेल्या रामजन्मभूमीचे टाळे उघडून हिंदूंना पूजा अर्चना करु देण्यात यावी असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. १९८५ मधे रामजन्मभूमी आंदोलनाला गती मिळावी यासाठी श्रीरामजन्मभूमी मुक्ती न्यास स्थापन करण्यात आला. जगद्गुरू रामानंदाचार्य शिवरामाचार्याजी महाराज यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या या न्यासात वरिष्ठ शंकराचार्य ज्योतिषपीठाधिपती जगद्गुरु शांतानंद (प्रयाग) महाराज, महंत अवैद्यनाथ महाराज, परमहंस रामचंद्रदास महाराज, महंत नृत्य गोपालदास महाराज आणि महंत रामसेवकदास महाराज, प्रभुदत्त ब्रम्हचारी महाराज यांचेसोबत दाउदयाल खन्ना, विष्णू हरी डालमिया आणि अशोकजी सिंघल सदस्य म्हणून होते. अशातच १९८६ मध्ये फैजाबाद न्यायालयाने रामलला चे कुलुप उघडण्याचा आदेश दिला.१९८९ मध्ये पूज्य देवराहा बाबा यांच्या निर्देशानुसार देशभरात रामशिलापूजन झाले. विश्व हिंदु परिषदेने घेतलेल्या या कार्यक्रमात करोडो नागरिकांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन होऊन पूजित झालेल्या लाखो शिला अयोध्येत पोहोचल्या. १९८९ आणि १९९२ मध्ये झालेल्या कारसेवेत हिंदू समाजाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन जननायक श्रीराम हे मनामनात कायमस्वरूपी आहेत याची प्रचिती दिली.

*हिंदु जागृतीचा विस्फोट*

६ डिसेंबर १९९२ गीता जयंती दिनी लाखो रामसेवक कारसेवेकरीता अयोध्येत दाखल झाले. अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था असूनही होई है सोइ जो राम रची राखा या वचनावर विश्वास ठेवून ठरल्याप्रमाणे कारसेवेला प्रारंभ झाला. शरयू तीरावरील एक मूठभर रेती आणि ओंजळीभर पाणी शिलान्यासस्थळी टाकण्याचा साधा कार्यक्रम ठरला होता, मात्र जमलेल्या लाखो रामसेवकांच्या डोळ्यात हिंदू समाजावर बाबराने केलेला अनन्वित अत्याचार आणि त्या क्रूरकरम्याचे प्रतीक असलेला तो ढाचा सलत होता. संतांच्या शांततेच्या आवाहनानंतरही हजारो वर्षांचा अपमानास्पद डाग पुसून काढण्यासाठी जनतेचा रेटा ढाच्याजवळ गेला आणि भारतमातेच्या मानचित्रावर लागलेला कंलक पुसला गेला.

पुरातत्व सर्वेक्षण, उत्खनन, आध्यात्मिक पुरावे आणि परंपरा या योगे श्रीराम जन्मभूमी चे स्थान आणि त्याखाली पुरातन हिंदू मंदिराचे अवशेष ही बाब आता सिद्ध झाले आहे.सतत चालढकल , तारीख पे तारीख या गर्तेतुन बाहेर पडुन श्रीराम जन्मभूमीवर भव्य राममंदिर निर्माण झालेच पाहीजे.श्रीरामलला आज तंबुमधे विराजमान आहेत, त्रिभुवनपालक श्रीराम आता यापुढे तंबूत नको. श्रीरामलला विराजमान यांची भव्य मंदिरात पुनः प्रतिष्ठापना हीच भारत भाग्योदयाची नांदी असणार आहे.

 

प्रा भालचंद्र माधव हरदास

९६५७७२०२४२