भारतीय कम्युनिस्टांचे गुरु- प्रशांत पोळ

भारतीय कम्युनिस्टांचे गुरु

एकीकडे या वर्षी १७  ऑक्टोबर ला १००  वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात भारतीय कम्युनिस्ट पार्टी जल्लोष करीत आहे तर दुसरीकडे त्यांचा गुरु, त्यांचे प्रेरणास्थान, त्यांचा मार्गदर्शक चीन, भारतावर डोळे वटारत आहे, सीमेवर बखेडा करीत आहे.

 

या कम्युनिस्ट लोकांचे सर्वच काही अजब आणि विचित्रच असतं.  ज्या पक्षाचे नाव, “भारतीय कम्युनिस्ट पार्टी” आहे तिची स्थापना कुठे व्हावी,  तर तत्कालीन सोव्हिएत रशिया मधील ताश्कंद शहरात.  होय, हे तेच ताश्कंद जिथे भारताचे द्वितीय प्रधान मंत्री, लाल बहादूर शास्त्री यांचा विवादास्पद आणि गूढ रित्या मृत्यू झाला होता. ( आज मात्र, ताश्कंद रशियाचा भाग नसून, उझबेकीस्तान ची राजधानी आहे.

“कम्युनिस्ट इंटरनॅशनल″ चे १९२० मध्ये मॉस्को ला दुसरे अधिवेशन झाले होते.  त्यानंतर दोनच महिन्यांनी म्हणजे १७ ऑक्टोबर १९२० ला मानवेंद्र नाथ रॉय ( M N Roy), त्यांची पत्नी एवलीन ट्रेंट, अबानी मुखर्जी , रोझा फिटिंगोव, मोहम्मद अली, मोहम्मद शरीफ आणि आचार्य या सात सदस्यांनी मिळून भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली.  सचिव म्हणून मोहम्मद शरीफ यांची निवड झाली.  आणि अध्यक्ष म्हणून आचार्य यांनी त्या मिटींगच्या दस्तावेजांवर सह्या केल्यात.

एक विचित्र गोष्ट पाहा की परदेशात जन्म झालेल्या या भारतीय कम्युनिस्ट पार्टीमध्ये सामील करण्यासाठी मुसलमान लोकांनाच कार्यकर्ता म्हणून घ्यावे असे या मंडळींचे आग्रही मत होते.  सी पी आय (एम) च्या अधिकृत आंतर जालावर (वेब साईट)  स्पष्टच लिहिले आहे की, ” पार्टीचे प्रमुख उद्गाते, एम एन रॉय, यांचा पूर्वाश्रमीच्या मुहाजिरांना सामील करून घेण्यावर विशेष जोर होता त्याप्रमाणे ते कार्य यशस्वीपणे पार पडलेही.  ( मुहाजिर म्हणजे फाळणीनंतर ज्या भारतीयांनी स्थायिक होण्याकरता पाकिस्तान हा देश निवडला, त्यांना मूळ पाकिस्तानी लोकांनी “मुहाजिर” असे वेगळे संबोधन दिले).   त्यांनी पूर्वाश्रमीच्या भारतीय विद्यार्थी मुहाजिरांना पार्टीत सामील करून घेण्यास प्राधान्य दिले.  या नवजात कम्युनिस्ट पार्टीमध्ये, मो. शफिक, मो. अली आणि इतर पूर्वाश्रमीच्या मुहाजीरांना सामील करून घेण्यासाठी प्रमुख भूमिका रॉय आणि त्यांची कॉम्रेड पत्नी एवलिन रॉय- ट्रेंट यांचीच होती.  (या संदर्भातील लिंक टिप्पणी मध्ये दिली आहे.)

 

अजुन एक गमतीची बाब अशी की भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना नेमकी केंव्हा झाली यावरही पार्टीच्या कॉम्रेडस मध्ये एकमत नाही.  अनेक, विशेषतः सी पी आय चे कम्युनिस्ट,  पार्टीचा स्थापना दिन २६ डिसेंबर १९२५ हा शनिवारचा दिवस मानतात.  तेव्हां, कम्युनिस्ट पार्टीचे प्रथम अधिवेशन कानपूर येथे ठेवले होते.  याच अधिवेशनात पार्टीची अधिकृत घोषणा करण्यात आली, असे काही कम्युनिस्ट मानतात.  या अधिवेशनात मुंबईचे सच्चिदानंद विष्णु घाटे याची सचिवपदी निवड झाली.

 

सी पी आय अधिकृत वेब साईट वर मात्र १७ ऑक्टोबर १९२० रोजी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाल्याचा उल्लेख आहे.  या हिशेबाने भारतातील साम्यवादाला १०० वर्ष पूर्ण झाली असे आपण म्हणू शकतो.

 

येथील कम्युनिस्ट, भारताच्या स्वातंत्र्याला खरे स्वातंत्र्य मानतच नाहीत.  कारण त्यांच्या कम्युनिस्ट मत प्रणालिनुसार क्रांतिशिवाय कुठलेही परिवर्तन होऊच शकत नाही.  आणि क्रांती ही रक्तरंजितच असली पाहिजे.  त्यामुळे भारतातील तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात सशस्त्र क्रांती करावी की कसे याबद्दल मतभेद वाढत गेलेत.   पक्षाच्या “आंध्र” विचारप्रवाहाचे लोक सशस्त्र विद्रोहाच्या मताचे होते, तर “रणदिवे” मत प्रवाह सशस्त्र विद्रोहाच्या विरोधात होता.

 

या सर्वांवर कडी म्हणून की काय,  हा वाद सोडवण्याकरता पक्षाचे वरिष्ठ नेते चक्क मॉस्कोलाच गेलेत.  मॉस्को मधील यांच्या नेत्यांनी समज दिल्यावर भारतीय कम्युनिस्ट पार्टीने तीन दस्तावेज प्रकाशित केलेत.  आणि त्यात भारताच्या स्वातंत्र्याला मान्यता देणे, पार्टीला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणै इत्यादी गोष्टी उधृत केल्या होत्या.  हे तर स्पष्टच आहे की भारतीय स्वातंत्र्यास मान्यता, या पार्टीने, त्यांच्या रशियन बोलवित्या धन्याची परवानगी मिळाल्यावरच दिली.   १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत सहभाग घेणे कम्युनिस्ट पार्टीला फायद्याचे ठरले.  कारण निवडून आलेल्या फक्त १६ खासदारांच्या बळावर  देशाच्या पहिल्या विरोधी पक्ष्याचे स्थान त्यांनी पटकावले.

 

अजुन एक विशेष घटना केरळमध्ये घडली.  १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये इ एम एस नंबुदरिपाद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शासन आले.  हे जगातील कम्युनिस्टांचे पहिलेच आणि एकमेव ” निवडून” आलेले सरकार होते.  या पूर्वी अनेक देशांमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, रक्तरंजित क्रांतीच्या मार्गानेच स्थापित झाली होती.   पुढे,  प्रधान मंत्री जवाहरलाल नेहरूंनी, दोनच वर्षात म्हणजे १९५९ मध्ये हे सरकार बरखास्त केले.  निवडून आलेल्या सरकारला बरखास्त करणे ही घटना एक अत्यंत चुकीची व लोकशाही तत्वांच्या विरुद्ध होती.  या नवीनच उद्भवलेल्या समस्येमुळे, तेथील कम्युनिस्ट, नेहरू सरकारचा प्रखर विरोध करू लागलेत. त्या काळात रशिया, भारतीय कम्युनीस्टांच्या गुरुस्थानी होते आणि गुरूंचा आदेश होता की, सध्या नेहरूंना विरोध करू नका.  त्यामुळे पार्टीच्या नेतृत्वाने मॉस्कोला धाव घेतली.  तिथून स्पष्टच सुचनावजा आदेश मिळाले की एखादे राज्य हातून जाणे काही मोठी गोष्ट नाही कारण त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे, नेहरू आमच्या जाळ्यात हळूहळू गुंतत चालले आहेत.  आम्ही सांगितलेले ऐकत आहेत.  इतकेच नव्हे तर आमच्याच पाऊलांवर पाऊलही ठेवत आहेत.  त्यामुळे नेहरू सरकारचे समर्थनच करावे.

 

आणि आज्ञा म्हणजे आज्ञा! ती ही गुरूंची आणि ती सुद्धा मॉस्को च्या गुरूंची!  मग काय, तिचे अक्षरशः पालन झाले.  केरळचे कम्युनिस्ट सरकार बरखास्त केल्यावर सुद्धा कम्युनीस्टांनी नेहरूंना विरोध केला नाही.

 

आता मात्र आधुनिक काळातील कम्युनिस्टांचा गुरु आणि आदर्श, चीन आहे.  पहिले ते स्थान रशियाला दिले होते.  पुढे १९४९ च्या चिनी क्रांती नंतर रशिया व चीन हे दोघेही कम्युनिस्टांचे आदर्श व  गुरु होते.  पण पुढे नव्वदच्या दशकात रशियाचे विघटन झाले आणि चीन एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येऊ लागला, त्यामुळे गुरु बदलला आणि ते स्थान आता फक्त चीन कडेच आहे.  बघा ना, कम्युनिस्ट पार्टीमध्ये मार्क्सवादी, लेनीनवादी असे वेगवेगळे गट असलेत तरी ते सर्व जण स्वतःला माओवादी म्हणवतात.  आणि चीन तर या प्रत्येक गटाला वेगवेगळे मार्गदर्शन आणि उपदेश करीत असतो.

 

कम्युनीझम येण्या आधी चीन भारताचा कधीच शत्रू नव्हता.  इतिहासात भारतीय राजांचा चिनी सत्ते बरोबर कधीही सत्तासंघर्ष झाल्याचे उदाहरण नाही.  चीनने आक्रमकांपासून संरक्षण म्हणून चीनची भिंत उभारली हे खरे, पण हे आक्रमक भारतीय नव्हते तर आज जे देश उझबेकीस्तान, कझाकस्तान, किरगीझस्तान, अझरबाइजान म्हणून ओळखले जातात येथील वेगवेगळ्या रानटी टोळ्या होत्या.  आपण त्यांना , “हुण” म्हणतो.  भारताने त्यांच्याशी युद्ध करून त्यांना पळवून लावले.  पण चीनने मात्र चीनची भिंत उभारून स्वरक्षणाचा एक अयशस्वी प्रयत्न केला.

बऱ्याच जणांना ठाऊक नसेल की बीजिंग शहराची नगर रचना एका हिंदूने केली आहे.  त्याचे नाव  “बलबाहू” असून चीन मध्ये तो “अर्निको” नावाने प्रसिद्ध आहे.  नेपाळ मधील पाटण शहरातुन, चीनच्या राजाने, बाराव्या शतकात काही प्रख्यात शिल्पकार, भगवान बुद्ध तसेच इतर हिंदू देवदेवतांच्या मूर्ती घडविण्याकरता आमंत्रित केले होते.  बलबाहू त्यापैकीच एक शिल्पकार होता.  चीनचा राजा, बलबाहुचे काम बघून एवढा खुश झाला की त्याने राजमहालाच्या कामाची जबाबदारीही बलबाहुकडे सोपवली.  पुढे त्याच्यातील कलाकार आणि कल्पकता निदर्शनास आल्यावर राजाने, त्यावेळी बीजिंग शहर आकारास येत होते, तर शहराची नगर रचना करण्यासाठी बलबाहुलाच नियुक्त केले.  चीन मधील घरांची, उतरत्या छपरांची रचना, जी आज चीनची ओळख बनली आहे, ती वास्तविक बलबाहुचीच देणगी आहे.  बीजिंगच्या प्रमुख चौकात, १ मे २००२ रोजी चीनने, बलबाहु उर्फ आर्निको चा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे आणि त्यावर बलबाहूने केलेल्या अप्रतीम नगर रचनेच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 

चीन खरा बदलला तो, कम्युनिस्ट झाल्यावर.  १ ऑक्टोबर १९४९ रोजी माओ त्से तुंग ने ” पीपल्स रिपब्लीक ऑफ चायना” ची स्थापना केली आणि देशाला कम्युनिस्ट म्हणून अधिकृतपणे घोषित केले.

चीन मध्ये सी सी पी म्हणजेच “चायनीज कम्युनिस्ट पार्टी” हा एकमेव राजकीय पक्ष आहे.  जगातील जवळ जवळ सर्वच देशांच्या सैन्यदलांच्या नावात त्या त्या देशाचे नाव असतेच.  उदाहरणार्थ, भारतीय थळ सेना, भारतीय वायु सेना, युनायटेड स्टेट्स आर्म्ड फोर्सेस, फ्रेंच आर्मी इत्यादि, याला अपवाद फक्त चीनचा.  त्यांच्या सैन्यदलाचे नाव, ” पीपल्स लीबरेशन आर्मी”.  ह्यावरून एक लक्ष्यात येईल की सैन्याला देशापेक्षा पक्षाशी एकनिष्ठ ठेवण्याचे धोरण आहे.  पक्ष कोणता तर (CCP) चायनीज कम्युनिस्ट पार्टी.  १  ऑक्टोबर १९४८ पूर्वी हे सैन्यदल “रेड आर्मी” नावानी विख्यात होतं.  

 

सत्ता हस्तगत केल्याबरोबर माओ त्से तुंग ने ताबडतोब स्वतःचे विस्तारवादी धोरण घोषित केले होते.  त्याच धोरणाला अनुसरून चीनने तिबेट अलगद गिळंकृत केला.  तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू, “दलाई लामा” यांना भारतात लपत छपत येऊन आश्रय घ्यावा लागला.  १९६२ मध्ये याच विस्तारवादी धोरणानुसार चीनने भारतावर आक्रमण केले होते.  या वेळेपर्यंत भारतीय कम्युनिस्ट पार्टीला ४० वर्षे झाली होती.  सी पी आय ने या चिनी आक्रमणाचा अवाक्षरही विरोध न करता उलट भारत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे चीनला भारतावर आक्रमण करणे भाग पडले असा आरोप केला होता.

 

जेंव्हा भारतातील कम्युनिस्ट पार्टीने (सी पी आय) ने उघड उघड चीन धार्जिणेपणा दाखवला तेंव्हा मात्र सरकारला कारवाई करणे भाग पडले आणि परिणामी भारतातील कम्युनिस्ट पार्टीचे संपूर्ण नेतृत्व चीन युद्धाच्या वेळी गजाआड झाले.

 

वी एस अच्युतानंदन हे त्यावेळी इतर प्रमुख कम्युनिस्ट नेत्यांसमवेत त्रिवेंद्रम मधील, “पुजापुरा जेल” मध्ये कारावासात होते.  या सर्व घटनाक्रमामुळे, एक देशद्रोही पार्टी म्हणून, कम्युनिस्ट पार्टीचे चित्र लोकांसमोर तयार झाले आहे, आणि ते बदलणे फार गरजेचे आहे हे  त्यांच्या लक्षात आले.  त्यासाठी त्यांनी जेलमध्येच जवानांसाठी रक्तदानाचे आयोजन केले.  परंतु ही गोष्ट त्यांच्या इतर सहकाऱ्यांना अजिबातच पटली नाही.  त्यांनी हा कार्यक्रमचं बंद पाडला.  पुढे युद्ध संपल्यावर ही सर्व मंडळी कारावासातून मुक्त झाली.  त्यांनी अच्युतानंदन यांची तक्रार पॉलिट ब्यूरो कडे केली.  ज्योती बसुंच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती बसवण्यात आली.  समितीने चौकशी अंती हा निर्णय घेतला की, पार्टीने भारतीय जवानांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घेणे हे एक पार्टिविरोधी कृत्य आहे.  शिक्षा म्हणून त्यांना पॉलिट ब्यूरो मधून निलंबित करण्यात आले.  आता ही गोष्ट तेवढीच खरी की पुढे हेच अच्युतानंदन केरळ चे मुख्यमंत्री झालेत.

 

( सी आय ए या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने १९६२ च्या युद्धावर एक गुप्त अहवाल तयार केला होता.  खाली टिप्पणी मध्ये याची लिंक संदर्भाखातर दिली आहे.  या गोपनीय अहवालात, चीनशी झालेल्या युद्धकाळातील या पार्टीच्या सर्व देशद्रोही कारवाया किती भयंकर होत्या आणि कोणत्या थराला गेल्या होत्या, अगदि सी आय ए ने अतिशयोक्तीपूर्ण लिहीले असे गृहित धरुनही, त्याचे स्वरूप लक्ष्यात येते.  त्या काळात कम्युनिस्टांनी भारतीय सैन्यदलात चंचुप्रवेश करून सैन्यात बंड घडवून आणण्याचा प्रयत्न चालवला होता. )

 

याच सुमारास बरीच आंतरराष्ट्रीय समीकरणे बदलली. सोव्हिएत रशिया आणि चीन मधील कम्युनिस्ट पार्टीचे मतभेद अधिक तीव्र झालेत.  बिचाऱ्या भारतीय कम्युनिस्टांची अवस्था तेंव्हा फारच केविलवाणी झाली.  त्यांच्या दोन्ही गुरुंमध्येच भांडणे लागलीत.  मग काय विचारता, परदेशी विचारधारा आणि मलिद्यावर पोसलेली ही कम्युनिस्ट पार्टी पण दुभंगली आणि १९६४ मध्ये मार्क्स वादी कम्युनिस्ट पार्टी अस्तित्वात आली.

 

विदेशी पोशिंदे असलेल्या भारतीय कम्युनिस्टांनी ना भारताला आपला देश मानले, ना भारतीय सेनेला आपले मानले .

 

चीनचा नुसता उल्लेख झाला की खरा कम्युनिस्ट नतमस्तक झालाच पाहिजे.  सर्व कॉम्रेड्सचा चीन हा परम आदर्श आहे.  या संदर्भात एक पुस्तक फारच महत्त्वाचे आणि उल्लेखनीय आहे. ” ब्लॅक बुक ऑन कम्यूनिझम”.  या पुस्तकात जगभरात कम्युनिस्टांनी जो अनिर्बंध उधम, आतंकवाद, अत्याचार, शोषण माजवले आहे याचा पुराव्यानिशी उल्लेख आहे.  हे  पुस्तक लिहिणारे जुन्या जमान्याचे काही कम्युनिस्टच आहेत.  यातील आकडेवारीनुसार कम्युनिस्टांनी जगभरात १० कोटीपेक्षा अधिक हत्या केल्या आहेत.  यातील साडे सहा कोटीचा प्रमुख वाटा हा एकट्या चीनचाच आहे.

गुरु तसा शिष्य या न्यायाने चीनच्या कम्युनिस्ट गुरूचे एकनिष्ठ भारतीय कम्युनिस्ट शिष्य आतंकवादात तेवढेच रुळलेले असणे एकदम स्वाभाविकच आहे.   भारतीय नक्षलवाद्यांनी माओवादाच्या   नावाखाली किती प्रचंड हत्याकांड केले आहे हे समजणे तर अवघड आहेच,  पण राजनैतिक पक्षाच्या झेंड्याखाली सी पी आय आणि सी पी आय (एम) च्या कार्यकर्त्यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपल्या विरोधकांचे हत्याकांड करण्यात काही कसर सोडली नाही.  सध्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे स्वतःच संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या आरोपाखाली ६ महीने तुरूंगात होते.

 

चीनबद्दल असलेले आपले प्रगाढ प्रेम भारतीय कम्युनिस्टांनी अनेकदा उघडपणे व्यक्त केले आहे.  अगदी आत्ता आत्ता २०१७ मध्ये ( चीन ने डोकलाम येथे घुसखोरी केली होती) चीनच्या घुसखोरीला भारतीय सैन्य मागे हटवित असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र, “पीपल्स डेमोक्रॅसी”  ने लिहिले की, डोकलाम भूतानचे आहे, तर भुताननेच या प्रश्नाचा समाचार घेणे योग्य ठरेल.  आपण तिथे ढवळाढवळ करणे चुकीचे आहे.  मुळात हा प्रश्न डोकलामचा नसून  मोदि सरकारचा आहे. ”

 

हे सामान्य माणसांचे कैवारी म्हणवून घेणारे कम्युनिस्ट, भारतात जेंव्हा कोविड १९ चा कहर चालला होता, संपूर्ण देश त्यातून उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर अनेक स्वयंसेवी संघटना, गरीब, मजूर वर्गाला शिधा सामग्री, अन्न धान्य पोहोचविणे, कोरोनाची लागण झालेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी करणे, इत्यादी कामात जीवाची पर्वा न करता सेवा देत होते, तेंव्हा हे स्वयं घोषित कैवारी कुठे तोंड लपवून बसले होते?  यांचे एक तरी छायाचित्र पाहिले का कोणी? उलट या काळात ही कम्युनिस्ट मंडळी तोंड पाटिलक्या करून बुद्धिभेद करायच्या प्रयत्नात होती.  प्रवासी मजुरांच्या पलायनाला सर्वस्वी हे सरकारच जबाबदार आहे, त्यामुळे सर्व मजूर वर्गाने रस्त्यावर येऊन सरकारविरुद्ध आंदोलन छेडले पाहिजे,   ही यांची  मुक्ताफळे!

 

अगदी परवा परवा लडाख मध्ये झालेल्या चीनच्या घुसखोरीवर, सी पी आय चे महासचिव, डी राजा, अनाहुत आणि “महत्वाचा” सल्ला देत होते की दोन्ही पक्षांनी समजुतीचे धोरण स्वीकारणे जरुरी आहे.

 

कम्युनीस्टांच्या मते भारत ना त्यांचा पक्ष आहे ना त्यांनी भारताला कधी आपला देश मानले.  यांचा जीव त्यांच्या रशिया आणि चीन या दोन प्रेरणास्थानांवर आहे.  जेंव्हा जेंव्हा भारत संकटात होता, आक्रमणाखाली होता, तेंव्हा कधीही भारतीय कम्युनीस्टांनी भारताला, स्वतःचा देशाला साथ दिली नाही.

 

मग, यांना देश द्रोही म्हटले तर?

 

  • प्रशांत पोळ

 

स्वैर अनुवाद