hindusamrajyadin-2010

हिन्दू साम्राज्य दिन उत्सव

२०१०मध्ये नागपूर येथे हिन्दू साम्राज्य दिनानिमित्त  परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन जी भागवत यांचे मार्गदर्शन

 

हिंदूसाम्राज्य दिनोत्सवाचे दरवर्षीप्रमाणेच आजही विशेष आयोजन करण्यात आले आहे. आपल्या संघकार्याला 84 वर्ष सरून आता85 वे वर्ष सुरू झालंय. दोन पिढ्या खपुन तिसरी पिढी एखादे कार्य करता करता एवढा दीर्घकाळ परिश्रम करत असते तेव्हा हे कार्य करताना करावयाचे आचरण, त्यामागची वैचारिक प्रेरणा यांचे पुनःस्मरण करणे आवश्यक असते. विचारशुन्यत्वाने कर्मकांडवत परिश्रम करून केलेले कार्य निष्फळच ठरते.  अनेक विषयांबद्दलची माहिती कालौघात लुप्त होते व  मनात अनेक प्रश्न व शंका उद्भवायला लागतात आणि अशा प्रश्नांचे उत्तर न मिळाल्यास तत्संबंधी आचरणाविषयी अश्रद्धेची भावना उत्पन्न होऊ शकते.

हिंदू साम्राज्य दिवस म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. आज ज्यांना संघानी हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय का घेतला ही माहिती नसेल त्यांच्या मनात अनेक प्रश्न येऊ शकतात. आपल्या देशात असंख्य राजे महाराजे होऊन गेलेत, मातृभूमीच्या उद्धारार्थ युद्ध करून विजय मिळवणारे राजेसुद्धा अनेक झालेत. तरीही केवळ नागपुरात संघस्थापना झाली, प्रारंभीचे सर्व स्वयंसेवक महाराष्ट्रातील होते एवढ्याचसाठी संघाने छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी हिंदू साम्राज्य दिनोत्सव साजरा करायचे ठरवले असे अजिबात नाही. जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील परिस्थिती बघितली तर आपली आजची परिस्थिती बहुतांशी तेव्हाच्या  परिस्थितीसारखीच आहे हे आपल्या लक्षात येईल.  तेव्हा चोहीकडून संकटे आ वासुन उभी होती समाजावर अनेक अत्याचार होत होते, समाज पिडल्या जात होता. आजसुद्धा केवळ परकिय सैन्यशक्तींचे नव्हे तर इतरही तऱ्हेतऱ्हेची संकटे  घोंघावत आहेत.  मात्र सर्वात मोठे संकट हे, तेव्हाचा समाज या अशाच संकंटांमुळे आत्मविश्वास गमाऊन हतबल होऊन गेला होता, होते. संकटांच्या या मालिकेची सुरूवात मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासुन होते. आपण अशा आक्रमणांना प्रतिकार केला, पण युद्धात वारंवार मार खाल्ला, प्रसंगी जीवही गमावला. विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर समाजात आज दिसते तशीच नैराश्याची भावना पसरली. आज आपण समाजिक चिंतन करणाऱ्यांजवळ गेलो तर जवळपास सर्वच जन निराश दिसतील. कोठेही आशेचा किरण दिसणार नाही. निराशेमुळे आत्मविश्वास गमाऊन बसतो तसा तो गमावलाच आहे.

नुकतेच कोलकात्याच्या उच्चभ्रू हिंदू वसतीमध्ये धर्मांध समाजकंटकांनी मस्जिद बांधायला सुरूवात केली त्यावर हिंदू समाजाची प्रथम प्रतिक्रिया, “अरे देवा, इथे मस्जिद बनतेय, चला ही वसती सोडून देऊया” अशी होती. तिथे रहाणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांनी सर्वांची समजुत काढली. त्यानंतर तिथे या बांधकामास विरोध सुरू झाला ही बाब अलाहिदा ! मात्र  हिंदू समाजाची प्रथम प्रतिक्रिया ” ते आले आले, पळा पळा” अशीच असते.   शिवपूर्व काळातही हिंदूंची परिस्थिती अशीच होती. आपली विजिगुषू वृत्ती विसरून हिंदू हतवीर्य होऊन गेले होते. परकियांची चाकरी करणेच आपले प्राक्तन आहे अशीच धारणा झाली होती हिंदूंची. राम गणेश गडकऱ्यांनी त्यांच्या ‘शिवसंभव’ नाटकात ही कचखाऊ मनोवृत्तीचे वास्तवदर्शी वर्णन केले आहे.  शिवाजी महाराजांची जन्मकथा आहे,  जिजाबाई गरोदर असतात, गर्भार स्त्रीला वेगवेगळे पदार्थ खाण्यापिण्याच्या इच्छा  होत असतात. त्या इच्छांना डोहाळे म्हणतात. पुढे जन्माला येऊ घातलेल्या बाळाच्या स्वभावानुसारच त्या गर्भिणीला डोहाळे लागतात असे म्हणतात. त्या गर्भिणीच्या मैत्रिणी, नातेवाईक स्त्रीया तिला तिच्या डोहाळ्यांविषयी विचारून  ते डोहाळे पूर्ण करण्याचे प्रयत्न करतात.  नाटकातील एका प्रसंगात जिजाबाईंच्या सख्या त्यांना डोहाळ्यांविषयी विचारतात तेव्हा जिजाबाई सांगतात की त्यांना सिंहावर बसावेसे वाटतं आहे, असं वाटतं आहे की त्यांना दोनऐवजी अठरा हात असावेत, प्रत्येक हातात एक एक शस्त्र धरून पृथ्वीतलावर जेथे जेथे राक्षस आहेत तिथे तिथे जाऊन त्यांचे निर्दाळन करावे, सिंहासनावर बसुन छत्रचामरं धारण करून आपल्या नावाचा जयघोष जगभरात दुमदुमवावा असे डोहाळे लागल्याचे सांगतात.सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला येणारे बाळ असे  विजिगीषू वृत्तीचे असेल हे ऐकुन किती उत्साह वाटेल ना ! परंतू जिजाबाईंच्या सख्या, ‘हे काय आहे?  असा विचार कसा करू शकतेस ? मागे एका राजाने असे केले होते, त्याचा परिणाम काय झाला ? आपण हिंदू, सिंहासनावर बसणार ?” हे तर जणू ‘भिकेचेच डोहाळे’. म्हणजेच हिंदूंनी हाती शस्त्र घेऊन  पराक्रम गाजवायची इच्छा करणे किंवा सिंहासनावर बसण्याची  इच्छा करणे हे तर सर्वनाशाचेच लक्षण आहे. अशीच धारणा बनली होती हिंदूंची. आत्मविश्वास हरवला की  सर्व प्रकारचे दुर्गुण बळावतात. स्वार्थ, आपापसात कलह वाढतो. या दुर्गुणांचा फायदा घेऊन परकिय शक्ती बळावतात व सामान्यांचे जगणे दुरापास्त होते.

 

“अन्न नही, वस्त्र नही, सौख्य नाही जनामध्ये,

आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका,

माणसा खावया अन्न नाही, अंथरूण पांघरूण ते ही नाही,

घर कराया सामग्री नाही, अखंड चिंतेच्या प्रवाही पडिले लोक,”

 

समर्थ रामदास स्वामींनी तत्कालिन परिस्थितीचं असं यथार्थ वर्णन केलंय.  समाज असा विजिगीषाशून्य, दीनवाणा झाला होता. भारतीय इतिहासात अशा वेळी शिवाजी महाराजांनी प्रदीर्घकाळ व अहर्निश परकियांविरूद्ध संघर्ष करून प्रथमच हिंदूंच्या विधीसंमंत स्वतंत्र सार्वभौम सिंहासनाची स्थापना केली.

 

यथार्थ संदेश

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ शिवाजी महाराजांचा  विजय नसुन काबूल-जाबूलवर आक्रमण झाले तेव्हापासुन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत या देशाच्या धर्म, संस्कृती व समाजाचे  संरक्षण करून हिंदुराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीचे वेळोवेळी झालेले सर्व प्रयत्न वारंवार निष्फळ झाले होते. अनेक प्रयत्न झालेत, राजांनी वारंवार युद्ध केले, वेगवेगळी रणनीती वापरत, संत समाजात एकता आणुन समाजाला एकत्र ठेवायचा, त्यांची श्रद्धा टिकवून ठेवण्याचे अनेक प्रयत्न सुरू होते.  त्यातील काही  यशस्वी झालेत तर काही पूर्णपणे निष्फळ.मात्र समाजाला हवे होते तसे यश कुठे दृष्टीक्षेपात येत नव्हते. अशा सर्व प्रयत्नांचे सफळ फलित शिवरायांचा राज्याभिषेक होय. हा राज्याभिषेक केवळ शिवरायांचाच  विजय नव्हे. युद्धमान हिंदू राष्ट्रानी आपल्या शत्रूंवर मिळवलेला विजय आहे तो ! केवळ सत्ता व संपत्तीची लूटच नव्हे तर मनुष्यासच अंतर्बाह्य बदलून टाकणारं व जे बदलणार नाहीत त्यांचा सर्वनाश करणारं,एक नवीन परचक्र आलं, अशा  समाज विध्वसंक, धर्म विध्वंसक परकीय आक्रामकांपासुन आपले सहिष्णुतेचे शांती व अहिंसेचे , सर्वांना आपले मानणारे  तत्वज्ञान अबाधित ठेवत,त्याच्या संरक्षणासाठी लढून त्यांच्यावर कसा विजय मिळवावा, पाचशे वर्षांपासुन समाजाला भेडसावणाऱ्या या समस्येचे निदान महाराजांच्या राज्याभिषेकाने झाले. यामुळेच राज्याभिषेक अत्यंत महत्वाचा आहे.

 

शिवरायांचे यशस्वी प्रयत्न बघुन सर्वांना “याचे उत्तर शोधुन, हिंदूंचे धर्म संस्कृती व राष्ट्र प्रगतीपथावर अग्रेसर नेणारे जर कोणी असेल तर ते शिवरायच” असा विश्वास वाटायला लागला. आणि यामुळेच औरंगजेबाच्या चाकरीला लाथ मारून भूषण कवी दक्षिणेत आला व त्याने शिवरायांसमोर शिवबावणीचे गायन केले. भूषणास मान सन्मानाची व धनाची लालसा नव्हती. तो तर औरंगजेबाच्या दरबारचा कवी होता. परंतू तो हिंदू होता, देशभक्त होता. देशभरात अन्याय अत्याचारांचा उच्छाद माजवणाऱ्या अधर्मी लोकांचे स्तुतीस्तोत्र गाणे हे त्याच्या स्वाभिमानी मनाला मानवणारे नव्हते. श्रृंगारादी रसाचे फुटकळ कवित्व करून तो वेळ मारून नेत होता. औरंगजेबाने  एकदा त्याचे स्वतःचे गुणवर्णन करणारे काव्य करायची भूषणाला आज्ञा दिली. औरंगजेबाने खुप धाकदपटशा केला तरी भूषण बधला नाही. कवी विकल्या जात नसतो असेही तो बाणेदारपणे उत्तरला. कवी फक्त जे जे उदात्त व उन्नत आहे त्याचीच स्तुती करत असतो, तुमची स्तुती करावी असे तुमच्यामध्ये काहीही उदात्त नाही, मला तुमची चाकरीही नको असे सांगुन नोकरी सोडून तो निघुन आला. शिवरायांचा राज्याभिषेक व्हावा ही केवळ मराठी लोकांचीच इच्छा नव्हती तर इथल्या संतांनादेखील धर्मसंस्थापनेसाठी राजांचा राज्याभिषेक व्हावा असे वाटत होते. जिजाबाईंनापण आपला पुत्र हिंदूचे नेतृत्व करू शकेल याचा विश्वास होता. मात्र काशीला काशी विश्वेश्वराच्या देवालयाचा विध्वंस बघणाऱ्या, विश्वेवराच्या वंश परंपरागत पुजाऱ्यांच्या कुळातील गागाभट्टांनासुद्धा आपल्या देशात मंदीरांचा होणारा असा विध्वंस कोण थांबवू शकेल हा प्रश्न पडला. त्यांनी याविषयी चौकशी केली तर त्यांना शिवाजी महाराजांचे नाव कळले. राजांचे नाव ऐकुन ते महाराष्ट्रात आले. नाशिकवरून महाराजांना भेटावयास जाण्याच्या प्रवासादरम्यान त्यांनी शिवरायांविषयी पूर्ण माहिती ऐकली व प्रत्यक्ष अनुभवलीसुद्धा. व भेटीअंती शिवरायांना म्हणाले की आपण तख्ती बसावे. यामुळेच राज्याभिषेकाचे परिणाम महाराष्ट्रात  सिंहासन स्थापन झाले व शिवराय राजे बनले इतपतच मर्यादीत राहिले नाहीत. शिवराय जेव्हा औरंगजेबास भेटण्यासाठी आग्र्यास गेले तेव्हा समस्त हिंदू व सगळे जग बघत होते. हिंदू जगत तर डोळ्यात तेल घालून बघत होते. ही अंतिम परिक्षेची घडी आहे असेच त्यांना वाटत होते. शिवरायांचा प्रयत्न यशस्वी होतो की नाही ? सर्वच लोक लढवय्ये होते, त्यांना हिंदवी स्वराज्य हवे होते. शब्द वेगवेगळे असतील, परंतू शिवरायांनी अंगिकारलेला उपक्रम यशस्वी होतो की नाही याचा निर्णय आता होणार होता. आणि यामुळे शिवराय औरंगजेबाच्या हाती तुरी देऊन महाराष्ट्रात परतलेत व अनेक श्रम साहस करून सिंहासनाधीश्वर बनलेत त्याचे परिणाम काय आहेत?

 

राजस्थानातील राजपूत राजे आपापसातील कलह थांबवून दुर्गादास राठोडच्या नेतृत्वात एकत्र आलेत व  शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अल्पावधीतच  राजस्थानातुन सगळ्या परकिय आक्रमकांना पळता भूई थोडी करून टाकले. त्यानंतर कधीही कोणी मुगल वा तुर्क  राजस्थानात राजा म्हणुन पाय टाकू शकला नाही,कदाचित नोकर म्हणुन आला असेल तर असेल. छत्रसालनी तर प्रत्यक्ष शिवाजी महाराजांपासुन प्रेरणा घेतली. छात्रसालाचे वडिल चंपतराय यांच्या  काळापर्यंत संषर्घ सुरू होता. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची कार्यशैली बघुन  छत्रसाल इथुन  बुंदेलखंडात परत गेलेत व अंततः विजयी होऊन तिथे स्वधर्माचे एक साम्राज्य निर्माण केले. आसामचा राजा चक्रध्वजसिंह म्हणत असे ‘जसे शिवाजी महाराज तिकडे करत आहेत त्याच नीतीचा वापर करून आसाममध्ये कोणाही आक्रमकाला पायसुद्धा टाकू देणार नाही.’ सर्वांना ब्रह्मपुत्रेपासुनच परतावे लागेल. आसामला कधीही मुगलांची, इस्लामची गुलामी करावी लागली नाही. पण चक्रध्वजसिंह म्हणतो व लिहीतो की  शिवरायांसारखीच नीती वापरून आपण  मुगलांना पिटाळून लावायला हवे. व असे झाले तेव्हा कुच-बिहारचा राजा रूद्रसिंहसुद्धा युद्धात विजयी झालेत. ‘आपणसुद्धा असेच या पाखंड्यांना बंगालच्या उपसागरात बुडवले पाहिजे’ ही प्रेरणा शिवाजी महाराजांपासुन मिळाली. हा इतिहास आहे.शिवाजी महाराजांचा  राज्याभिषेक संपूर्ण हिंदूराष्ट्रासाठी एक संदेश होता की हा विजयाचा मार्ग आहे,हा मार्ग स्वीकारा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे  प्रयोजनही हेच होते. आणि हे शिवाजी महाराजांच्या सगळ्या परिश्रमांचे प्रयोजन होते. त्यांचे प्रयत्न स्वतःसाठी नव्हतेच. शिवाजी महाराजांनी व्यक्तिगत कीर्ती, मानसन्मानासाठी  सत्ता संपादन केले नाही. त्यांचा तो स्वभावच नव्हता. दक्षिणेत कुतुबशहास भेटण्यासाठी गेलेत तेव्हा परतीच्या प्रवासात राजे श्रीशैल मल्लीकार्जुनाच्या दर्शनासाठी गेले. तिथल्या प्रचलित कथेनुसार, तिथल्या शिवपिंडीच्या दर्शनानी महाराज इतके भावव्याकुळ झालेत की शिवपिंडीवर महाराज आपले शिरकमल वहाण्यासाठी तयार झाले. त्या दिवशी त्यांचे अंगरक्षक व अमात्य सोबतीस होते, त्यांनी राजांना यापासुन परावृत्त केले. स्वार्थ तर दूरच, राजांना तर आपल्या प्राणांचाही मोह नव्हता. स्वार्थ असता राजांचा, तर देशकार्यासाठी सेवेची संधी मागायला आलेल्या छत्रसालास मांडलिक बनवले असते. महाराजांनी असे नाही केले. त्यांनी छत्रसालास उपदेश केला की,” तुम्ही नोकर बनुन जगणार का? क्षत्रिय कुळात जन्म घेऊन दुसऱ्या राजाची नोकरी करणार? स्वतःचे राज्य बनवा.” “स्वतःचे राज्य बनवुन माझ्या राज्यासोबत जोडाल किंवा माझे मांडलिकत्व पत्कराल तरच मी मदत करेल” असेही ते म्हणाले नाहीत कारण त्यांना असे कधी करायचेच नव्हते. त्यांचे उद्दिष्ट स्वतःची लहानशी जहागीर, राज्य सर्व राजांमध्ये सर्वाधीक प्रभावशाली राजा बनणे हे नव्हतेच.

 

लिस्बनच्या पोर्तुगीज आर्काइव्हज् मध्ये  गोव्याच्या तत्कालीन गव्हर्नरचे एक पत्र आहे. गोव्याच्या  गव्हर्नरचा एक नोकर शिवाजी महाराजांचे एक किल्लेदार रावजी सोमनाथ पतकी याचा नातेवाईक होता. त्याने रावजीस  शिवाजी महाराज एवढा सगळा खटाटोप कशासाठी करत आहेत? सुखाने जगू शकतात, परंतू तसे करत नाहीत. उद्दिष्ट काय आहे त्यांचे?  पतकीने शिवाजी महाराजांना विचारले  “महाराज आपण एवढे कष्ट सहन करून सगळे कार्य करतो आहे , आता तर  स्वराज्यही मोठे झाले. आपली पुण्याची जहागीर तर फारच लहान होती, आता तर खुप विस्तारली. नेमके काय करायचेय? कुठवर जायचे आहे?” शिवाजी महाराजांनी  उत्तर दिले  ‘सिंधू नदीच्या उगमापासुन कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंतची  भूमी आपली आहे हे ऐकत आलोय. या भूमीतुन सर्व परकिय आक्रमकांना बाहेर घालवून देणे व त्यांनी उध्वस्त केलेल्या आपल्या तीर्थक्षेत्रांची पुनर्स्थापना करण्याचा मानस आहे’    है।’ त्यांचे हे उत्तर पोर्तुगीज आर्काइव्हमध्ये आहे. हे उत्तर रावजी सोमनाथाने आपल्या नातेवाइकास सांगितले, त्याने गव्हर्नरला सांगितले, गव्हर्नरने लिस्बनला पत्र लिहून कळवले. हे पत्र आजही आर्काइव्हजमध्ये उपलब्ध आहे. शिवाजी महाराजांजवळ एवढी दूरदृष्टी होती. आजच्या भाषेत आपण म्हणतो, आपल्या पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाजाचे संरक्षण करून हिंदू राष्ट्राचा सर्वांगीण विकास.  शिवाजी महाराजांचे हे लक्ष्य होते. त्यांना स्वतःसाठी काहीही नको होते. त्यांना स्वतःच्या कीर्तीचादेखील मोह नव्हता. जर कीर्तीचा मोह असता तर त्यांनी अपकीर्ती सहनच नसती केली.  अफझलखान चालून आला तेव्हा मैदानी युद्धात त्याला हरवणे अवघड आहे हे लक्षात घेऊन महाराजांनी प्रतापगडाचा आश्रय घेतला. खानाने  तुळजाभवानीचे मंदिर भ्रष्टविले, पंढरपुरचे मंदिर अपवित्र केले, लोकांना पिटाळून लावले, त्यांच्या शेतातले पीकं कापुन नेले. गावागावात जाळपोळ केली. गोहत्या केल्या, लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली की मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे  शिवाजी कुठे आहेत?   शिवाजी महाराजांनी बदनामीची तमा बाळगली नाही कारण त्यांना स्वतःच्या कीर्तीचा मोहच नव्हता.राजे एका नीतीनुसार वागत होते त्यामुळे त्यांनी आगीत तुप ओतल्यासारख्या अफवा पसरवल्या की शिवाजी खरोखर घाबरलाय. ही तर कुटनीती होती. अफजलखानास भुलवून जंगलात आणुन त्याचा सर्वनाश केला. ज्यांना स्वतःच्या कीर्ती अपकीर्तीची चिंता असते ते अशा नीतीचा अवलंब करू शकत नाहीत. त्यांना येनकेन प्रकारेन लोकांना खुश करायचे असते. ज्यामुळे लोक खुश होतील, तसेच त्यांचे वागणे असते. लोकापवाद कधीही सहन करणार नाही. महाराजांच्या आयुष्यात हा विचारच नव्हता. स्वतःचा विचारच नव्हता.

 

शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास

शिवाजी महाराज देश धर्माचा विचार करायचे. त्यांनी त्यासाठीच श्रमसाहस केले. त्यांचा आत्मविश्वास तो केवढा ! पूजनीय श्री गुरुजींच्या बौद्धिक वर्गात आलंय.

देशासाठी  शहीद होऊत असा विचार लोक करतात असे आपण वाचलेच असेल. देव ‘तथास्तु’ म्हणतात! देशासाठी शहीद व्हा! ते शहीद होतात हेसुद्धा महत्वपूर्ण आहे.   मात्र पराक्रमी व विजिगीषू वृत्तीचे  मन म्हणते की देशासाठी मी लढेल व सर्व शत्रूंना मारून विजयी होईल. परिस्थिती कशी होती?उत्तरेत बादशाहाचे राज्य आहे, तर दक्षिणेत पाच सुलतान आहेत. शक्तिशाली विजयनगर साम्राज्य लुप्त झाले. परंतू शिवाजी महाराज म्हणतात की मी येथे  हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल आणि म्हणतात ‘हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा ’ आपले कार्य हे ईश्वरीय कार्य आहे त्यात यश मिळणार हे निश्चित आहे.  आपल्याला श्रम साहस करायचे आहे.  त्यांनी पूर्वीच्या सगळ्या संघर्षांच्या इतिहासाचा अभ्यास केला असेल, ऐकला असेल.मी जेव्हा म्हणतो की शिवाजी महाराजांचा प्रयत्न यापूर्वीच्या सर्वच प्रयत्नांचे फलित आहे, ते यामुळे की शिवरायांनी जे अष्टप्रधान मंडळ बनवले ती तर भारताची प्राचिन कालीन परंपरा होती, मध्यंतरी लोप पावली होती.  विजयनगर साम्राज्याचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही हिंदू राजाजवळ अष्टप्रधान मंडळ नव्हते. ती प्रथाच लोपली होती. शिवाजी महाराजांनी ही प्रथा कुठून आणली? महाराज प्रवासात निरीक्षण करत. सर्वांच्या गोष्टी विचारून शिकून घेत, इतिहास शिकत, तुकाराम महाराज, रामदास स्वामी अशा संताच्या भेटी घेत.समर्थ रामदासांनी  देशभ्रमण केले होते. हम्पीला गेल्यावर रामदास स्वामी तीन दिवस तिथे राहिलेत. तिथे त्यांनी स्थापन केलेला मारोतीदेखील आहे.

विजिगीषा मृतप्राय झालेली दिसत होती.परंतू समाजास विस्मरण होत नाही. समाजाचे नेतृत्व आत्मविश्वासहीन बनेल परंतू समाजाच्या अंतर्मनात सदैव ज्योत प्रज्वलित असते.

 

समाजात काय सुरू आहे याचा बोध घेऊन अनुभवांचा वापर करून चुका सुधरवत निर्धारपूर्वक राज्यसाधनाची लगबग करण्याचा संकल्प करून महाराजांनी पुढचे पाऊल टाकले. मी जिंकेलच, मला जिंकायचेच आहे असा आत्मविश्वास.हे कार्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. यामुळे त्यांनी सर्वप्रथम समाजाचा आत्मविश्वास जागवण्याचे काम केले. एकदम युद्धास प्रारंभ केला नाही. आपली  भेटलेली जहागीर संभाळण्यासाठी पुण्याला आलेत.पूर्वी शहाजी राजे तिथे बसुन जहागीर बघत. त्यांनी  निजामाला हाती धरून स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला होता. गठबंधन करून बघितले. त्यात अपयश आले व  शहाजी राजांच्या  नेतृत्वात लढणाऱ्या हिंदूंना धडा शिकवण्यासाठी  पुणे जाळण्यात आले. पुण्यावरून गाढवांचा नांगर फिरवला. लोखंडी पहार ठोकून त्यावर उलटी वहाण लटकवली. पुण्याचे रहिवाशी घराचा दरवाजा किलकिला करून ती पहार बघत निराश होऊन जात की देश व धर्मासाठी लढणाऱ्यांची अशी परिस्थिती होईल. शिवाजी महाराजांनी येताच पहिले काम, आपल्ये परंपरा, संस्कृतीच्या गौरवाचे प्रतिक असलेले गणेशाचे मंदिर शोधुन काढले. गणेशाची प्रतिष्ठापना करून पुण्याच्या भूमीवर सोन्याचा नांगर फिरवला.त्याच  हिंदूसमाजानी लोखंडी पहारेवर उलटी वहाण लटकवलेल्या ठिकाणी एक पराक्रमी युवक येतो व सोन्याच्या नांगरानी जमीन नांगरतो हे बघितले. दिवस बदलतात. किती आत्मविश्वास जागृत झाला असेल ? आपल्या जहागीरीत सुशासन राबवुन प्रथम लोकांना सक्षम बनवले व काहीएक कार्य करण्यासाठी एकत्र संघटीत केले.

रणनीती धुरंधर शिवाजी महाराज

एक नेता,एक सत्ता समाजाचे भाग्य कायमचे बदलवू शकत नाहीत हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. क्षणिक विजयानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होईल. त्यामुळे समाजामध्ये विजिगीषू भावना चेतवावी लागेल. त्यांचा आत्मविश्वाह जागवावा लागेल. समाजाला संघटित करावे लागेल. त्यांनी सर्वांना एकत्र आणले. अठरा पगड जातींचे सर्व लोक त्यांनी जोडलेत. अठरा प्रकारच्या पगड्या बांधणाऱ्या समाजातील अठरा वर्गांतील लोक, मोठ-मोठ्या सरदार, पुरोहितांपासुन तर समाजातील सर्वात लहान, ज्यांना हीन क्षुद्र मानले जायचे अशा जातीपातींमधील लोक महाराजांचे ‘जीवश्च कंठश्च’ मित्र होते. त्यांच्यासाठीच नव्हे तर स्वराज्य व स्वधर्मासाठी प्राणांची कुरवंडी करून टाकण्यासाठी तयार होते. महाराजांजवळ तेव्हा शस्त्रास्त्रांची कमतरता होती, साधनसामग्रीची उणीव होती. पुरेसे अश्वदळ व गजदळ नव्हते. त्यांनी पुढे आणलेल्या एक एक वीर, एक एका गाथेचा नायक बनलाय. समाजात एक लोककथा महाराजांविषयी प्रचलित आहे..

कुतुबशहाने  त्यांना भेटीच्या वेळी उपहासपूर्वक विचारले की त्यांच्याजवळ किती हत्ती आहेत? त्याला, महाराज जवळ हत्ती बाळगत नाहीत हे माहिती होते.

महाराज उत्तरलेत -” आमच्याजवळ अनेक हत्ती आहेत.”

सोबत आणले नाहीत का?

आणलेत तर !

कुठे आहेत?

मागे त्यांचे मावळे सैनिक उभे होते. कुतुबशहाने खोचकपणे विचारले की , ”हे आमच्या हत्तीविरूद्ध झुंजतील का?”

महाराज उत्तरलेत की ”उद्या मैदानातच बघुया !”

गोवळकुंड्यात दुसऱ्या दिवशी कुतुबशहाने सर्वाधीक उग्रप्रकृती हत्ती मैदानात उतरवला. महाराजांनी येसाजी कंकांना हत्तीविरूद्ध झुंजायला सांगितले. आपलं कांबळं जमिनीवर टाकुन, हाती नागवी तलवार घेऊन येसाजी मैदानात उतरलेत आणि हत्तीची सोंड कापून त्यास मारले.

 

महारांजी सर्व समाजास उत्साहाने भारून देश-धर्माच्या प्रतिष्ठा रक्षणासाठी मस्तवाल हत्तीविरूद्धही झुंजणाऱ्या वीरांची फौजच उभी केली. यामुळेच तर शिवरायांच्या माघारी रामराजांना दक्षिणेत जाऊन जिंजीत अटकून पडावे लागले, तेव्हा छत्रपती राजा  नाही, खजिना,सैन्य, सेनापती काहीही नाही अशा परिस्थितीत मराठी रयत हाती येईल ते कुदळ फावडे वीळा कोयता घेऊन स्वराज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाविरूद्ध वीस पंचवीस वर्ष प्राणपणाने लढली व शेवटी त्यास त्याच्या सैन्यासह महाराष्ट्राच्या मातीत गाडूनच श्वास घेतला. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या प्राणांची लेशमात्रही तमा न बाळगता समाजात शक्तीचे स्फुल्लिंग चेतवले. आपल्या पन्नास वर्षांच्या जीवनकाळात महाराजांनी अथक परिश्रम केले. ‘मी आदेश देतो, तुम्ही लढा’ असा त्यांचा स्वभावच नव्हता. स्वतः रणी उतरून पराक्रम गाजवतील व मगच काही सांगतील असे कृतीशिल नेतृत्व होते राजांचे. शाहिस्तेखानास शास्त (दंड) करण्यास राजे स्वतः चालून गेलेत. कारतलबखानास चारी मुंड्या चीत करून शरण आणले तेव्हा  महाराज स्वतः रणवेश घालून उपस्थित होते. स्वतः पुढाकार घेत शौर्याचा परिचय करवून देत. अनुयायी उत्साहाने भारून जात असत. विवेकशीलही होते. ‘धृति उत्साह समन्वित’ ही नीती होती महाराजांची. धृती, उत्साह व साहस यामुळेच अफजलखानाविरूद्ध राजांना यश लाभले. अफजलखान चालून आला तेव्हा लोकनिंदा सहन करून प्रतापगडीच थांबले. खानास भेटावयास गेलेत. धीर धरून उचित संधी मिळताच खानाचा पुरता फडशाच पाडला. त्यानंतर निरंतर मोहिमा मारून चारच महिन्यात वीजापूरच्या वेशीवर स्वराज्याचे सैन्य धडकवले. धाडस कधी करायचे? कधी संयम बाळगायचा? कधी  शांत रहायचे? महाराजांजवळ याचा विवेक होता.

तोवर भारतभर आपली युद्धनीती धार्मिक म्हणजे धर्मयुद्धाची असे. आपण सरळ धर्मयुद्ध करत असू. महाराजांनी या नीतीची व्याख्याच बदलली. समोरचा शत्रू छलकपट करणार असेल तर आपणासही जशास तसेच उत्तर द्यावे लागेल. धर्माच्या विजयासाठी, कृष्णानी महाभारतात ज्या नीतीचा अवलंब केला, आपणही तीच नीतीचा अंगीकार करू. यामुळेच वीजापर दरबाराने शहाजी राजास कैद करताच महाराजांनी चक्क औरंगजेबासच पत्र लिहुन स्वतःस त्यांचे प्रामाणिक चाकर  असून मुगल सीमेचे रक्षक असल्याचे सांगितले. आदिलशाही त्रास देते आहे हे सांगितले. आदिलशाहीची कान उघाडणी करण्यास सांगितले. हे पत्र बघुन तिकडून आदिलशहास पत्र गेले. शहाजी राजांची सुटका झाली. मात्र दरम्यानच्या काळात महाराजांनी मुघलांच्या हद्दीतील दोन गाव लुटले.

महाराजांनी आपल्या शत्रूंना कधी मैत्रीचा बहाणा करून तर कधी शस्त्राचे बळाने सदैव नियंत्रणात ठेवले. याला फारसा प्रामाणिकपणा म्हणता येणार नाही. परंतू बेईमान शत्रूविरूद्ध प्रामाणिकपणे लढून उपयोग नाही. अफजल वधानंतर कुजबूज झाली असेल. शिवरायांवर विश्वासघाताचा आरोप लागला असेल की हाती तळशीपत्र बेलभंडारा घेऊन शपथक्रिया केली व अफजलखानास दग्याने मारले. खानाचा विश्वासघात केला. महाराज उत्तरले की होय मी विश्वासघात केला. खान मला जीवंत व मृत पकडण्याची प्रतिज्ञा करून आला होता. मग मी काय करू?

मला  स्वतःच्या प्राणांचा मोह नाही. नवजात स्वराज्य वाढून त्याचा वटवृक्ष बनण्यापूर्वीच त्यावर कोणी घाला घालायला आले तर काय मी त्याला तसे करू देऊ का? तो मनी दगा धरून आला होता, कपट धरून आला होता मी त्याला दग्यानेच उत्तर दिले. माझ्या मित्रांना दगा दिल्याचे एक तरी उदाहरण दाखवा. हिंदूस्थानाच्या आक्रमणास प्रत्युत्तर देण्याची नुतन नीती महाराजांनीच आखली. अचूक योजना कौशल्याच्या बळावर महाराजांनी एका मागे एक विजय मिळवलेत. क्षणिक पराभवांचेही विजयात परिवर्तन केले.

औरंगजेबास भेटावयास गेले तेव्हा राजस्थानच्या राजपुतांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले. त्यांचा आत्मविश्वास जागवला. ते आग्र्याहुन केवळ सुखरूप निसुटन आले नाहीत तर ठिकठिकाणच्या लोकांना त्यांनी आपलेसे केले. आग्र्याहुन परतल्यावर लवकरच आपले गमावलेले धन वैभव परत मिळवून राज्यविस्तार केला. आरमार घोडदळ व पायदळाचा एकत्र व्युहरचनात्मक उपयोग करणारे महाराज तत्कालीन भारतवर्षातील एकमेव राजे होत. शिवरायांसारखा धाडशी व दूरदृष्टीचा रणनीतीकार केवळ सत्तेसाठी राजा बनले नाहीत. त्यांच्यासमोर सुरक्षित हिंदू धरम, हिंदू संस्कृती, हिंदू समाज व विजिगीषू परम वैभव संपन्न हिंदू राष्ट्राचे लक्ष्य होते.

 

सद्य परिस्थितीत अनुकरणीय संदेश

आजही तशीच परिस्थिती आहे. आजही काळाची गरज तशीच आहे.आजही समाजमनात  विजिगीषा व  आत्मविश्वास जागवायची आवश्यकता आहे. आजही प्रत्येकाला शिवाजी महाराजांचे  चरित्र व गुणांचे अनुकरण करत हिंदुसमाजाचे, हिंदुसमाजाससोबत राहुन, स्वतःसाठी नव्हे तर, आपल्या हिंदूराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी  समाजाचे नेतृत्व करण्यास सक्षम बनायचे आहे, व सगळ्या समाजाचा आत्मविश्वास उंचावणारा  एक हिंदू म्हणजे प्रजाहितदक्ष, सहृदयी, सर्वत्र समभावी, नीतीकठोर असे शासन समाजाकडूनच स्थापन करवायचे आहे.

सद्य परिस्थितील हा उपाय, समाज संघटित बनला तरच यशस्वी होणार आहे. समाजाची गुणवत्ता, उद्यमशीलता  व आत्मविश्वासाच्या आधारेच यशस्वी होणार आहे. भूतकाळातील अशाच परिस्थितीमधील जीवंत उदाहरण शिवचरित्रात बघायला मिळते. तत्कालीन सर्व लोकांना ते प्रेरणास्थानच होते. तत्पूर्वीच्या सर्व लोकांनी मिळून जे प्रयत्न केलेत त्यातील उणीवा दूर करत करत झालेला अंतिम यशस्वी प्रयत्न शिवरायांचा आहे, यामुळे त्यांचा राज्याभिषेक दिन अत्यंत महत्वाचा आहे.संघात आपण शिव जयंती किंवा पुण्यतिथी उत्सव  साजरा करत नसतो. कारण असंख्य लोक जन्माला येतात व मरतात…परंतू त्यांनी जीवनकाळात जगात काय कार्य केले ते महत्वाचे असते.शिवाजी महाराजांनी  संपूर्ण राष्ट्रासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचे फलित हा राज्याभिषेक आहे व यामुळेच आपण याला शिवसाम्राज्य दिन न म्हणता  हिंदू साम्राज्य दिवस म्हणतो.

आणि यामुळेच आपल्या प्रथम तीन सरसंघचालक वारंवार म्हणत, डाॅक्टरसाहेब तर सांगतच, गुरूजीही म्हणत व बाळासाहेबही भगवा ध्वज हा आपला आदर्श आहे.  मात्र अनेकदा सामान्यांना निर्गुण निराकार फारसा पचनी पडत नाही. त्यांना सगुण साकार रूप लागतं. व्यक्तीरूपात सगुण आदर्श म्हणुन  शिवचरित्रातील प्रत्येक अंश आपल्येसाठी मार्गदर्शक आहे. आज त्या उदात्त शिवचरित्राची, त्यांच्या नीतीची, कौशल्याची, पवित्र उद्दिष्टांची खुप आवश्यकता आहे. हे ध्यानी घेऊनच संघाने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शिवरायांचा राज्याभिषेक दिन, हिंदू साम्राज्य दिन म्हणुन साजरा करायचे ठरवले आहे. व  सद्य परिस्थितीत सर्व भारतभर आपण तो साजरा करतो. शिवचरित्रातील राजांचं अमोघ कर्तृत्व व त्यांचे गुण आजही तितकेच प्रेरणादायी व अनुकरणीय आहेत.हिंदू साम्राज्य दिवसाचे हे महत्व लक्षात घेऊन आपण प्रत्येक वर्षी तो दिवस साजरा केल्यास स्वयंसेवकांमध्येच नव्हे तर संपूर्ण समाजात हा संदेश जाईल. त्यांच्या बुद्धीत उतरेल, तिथुन त्यांच्या हृदयात व तिथुन त्यांच्या आचरणात प्रकट होईल. संघकार्याचा विस्तार वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण हे समजून उमजून सहभागी होऊयात.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

(मूळ हिन्दी भाषणाचा मराठीत अनुवाद)