जागृत होत आहे तो जुना भारतच आहे!

कोरोना महामारीशी भारताचा लढा सुरू असतानाच, चीनने लडाखमध्ये अतिक्रमण केले आणि गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षात सीमेचे रक्षण करताना 20 भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली. या क्षतीची मीडियात खूप चर्चा होत आहे आणि सोबत हेही सांगितले जात आहे की, 1962 नंतर चीनसोबत असा रक्तरंजित संघर्ष प्रथमच झाला आहे. भारतीय सेनेचे शौर्य व पराक्रम तसेच भारताच्या नेतृत्वाची दृढता आणि सतर्कता यावर काही लोक प्रश्‍नचिन्ह लावत आहेत. असे प्रश्‍न विचारणार्‍यांचा इतिहास बघितला तर लक्षात येते की, ज्यांनी भाजपाला केंद्रात सरकार बनविण्यापासून रोखण्यासाठी तसेच नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी आकाश-पाताळ एक केले, ते हेच लोक आहेत. खरेतर, वर्तमान समस्येसह अशा सर्व प्रकारच्या समस्यांचा जन्म याच लोकांची अदूरदर्शिता व अव्यावहारिकतेमुळे तसेच नेतृत्व-क्षमता व राष्ट्र-संकल्पनेच्या अभावामुळेच झाला आहे.

ज्या प्रकारची दृढता, साहस आणि संयम भारताच्या शीर्ष नेतृत्वाने डोकलाम आणि आता गलवान खोर्‍यात दाखविला, तसे कदाचित या आधी कधीही चीनसोबत झाले नसावे. 1962 नंतरही चीनचे अतिक्रमण सुरूच राहिले, परंतु त्याला आतापर्यंत कधी ठाम विरोध झाला नाही. सेनेचे शौर्य आणि पराक्रमासोबत नेतृत्वाच्या भूमिकेचेही विशेष महत्त्व असते. 1998 च्या सफल पोखरण अणु-परीक्षणात वैज्ञानिकांसोबतच राजकीय नेतृत्वाची निर्णायक भूमिकादेखील अहम् होती, हे वास्तव आहे. भारतीय वैज्ञानिक तर 1994 पासूनच अशा प्रकारचे अणु-परीक्षण करण्यास सक्षम होते; परंतु 1998 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी जो कणखरपणा दाखविला तसा आधीच्या शीर्ष नेतृत्वाने दाखविला नव्हता. 2014 पासून राष्ट्रविरोधी, दहशतवादी उपद्रवांच्या संदर्भात पाकिस्तान तसेच चीनसोबत भारताच्या व्यवहारात एक मूलभूत परिवर्तन आलेले दिसते. उरी हवाई हल्ला, बालाकोट, डोकलाम, गलवान, काश्मिरात सुरू असलेला पाकिस्तान समर्थित दहशतवाद इत्यादींचा सफल प्रतिरोध, या सर्व घडामोडींतून हे परिवर्तन स्पष्टपणे दिसून येते. आतापर्यंत उपेक्षित असलेल्या भारतीय सीमांवर वेगाने होत असलेले विकासात्मक पायाभूत निर्माणकार्य तसेच आधी पाकिस्तानच्या आणि आता चीनच्या कबज्यात असलेला अक्साई-चीनचा भूभाग परत घेण्याची आकांक्षा, हे सर्व दृढ, साहसी आणि दूरदर्शी नेतृत्वाचेच दर्शन घडवीत आहे. चीनला चिडण्याचे हेही कारण असू शकते. अर्थात् यामुळे भारतातच राष्ट्रविरोधी उपद्रवांचे समर्थन करणारे काही तत्त्व अस्वस्थ होत आहेत.

1962 मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धात, भारतीय सेनेच्या अतुलनीय शौर्य तसेच बलिदानानंतरही आम्ही पराजित झालो. याची मुख्यत: दोन कारणे लक्षात येतात. पहिले, भारताच्या तत्कालीन शीर्ष नेतृत्वात दूरदर्शितेचा अभाव आणि दुसरे म्हणजे, युद्धाची अजिबात सिद्धता नसणे. चीनला ‘भाऊ-भाऊ’ म्हणून मिठी मारताना तो विश्‍वासघात करू शकतो, याचे संकेत चीनच्या विस्तारवादी वृत्तीची कल्पना असलेले रा. स्व. संघाचे सरसंघचालक श्री गुरुजी तसेच इतरही दूरदर्शी नेत्यांनी संकेत दिले होते. परंतु, या इशार्‍यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही सिद्धता न करता चीनशी गळाभेट सुरूच ठेवल्याचा परिणाम म्हणून आम्हाला 1962 च्या युद्धात लाजिरवाणा व दु:खद पराभव सहन करावा लागला. या घटनेनंतरच भारतीय सेनेला सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, केवळ सैन्य सुसज्ज होणे पुरेसे नव्हते. राजकीय नेतृत्वाची परिपक्वता आणि दृढता देखील अत्यावश्यक असते.

आता एवढ्यातच, माजी संरक्षण मंत्री ए. के. अ‍ॅण्टनी यांचा 6 डिसेंबर 2013 चा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात ते म्हणताना दिसतात- ‘‘भारताच्या तुलनेत, पायाभूत संरचना निर्माण क्षेत्रात चीन खूपच पुढे गेला आहे आणि त्याची गुणवत्ता देखील खूप चांगली आहे. आम्ही केवळ त्यांच्यासारखे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आता हा सर्व इतिहास आहे. काय आहे तो? स्वतंत्र भारताचे अनेक वर्षे एक धोरण होते की, सीमाक्षेत्राचा विकास न करणे हेच सर्वात चांगले संरक्षण आहे. अविकसित सीमा, विकसित सीमांच्या तुलनेत अधिक सुरक्षित असतात. म्हणून अनेक वर्षांपर्यंत सीमावर्ती क्षेत्रात आम्ही रस्ते किंवा विमानतळ बांधले नाहीत. परंतु याच काळात, चीनने मात्र त्याच्या सीमावर्ती भागात पायाभूत संरचनांचे जाळे निर्माण करणे सुरूच ठेवले. याचा परिणाम म्हणून, आता ते आमच्या खूप पुढे गेले आहेत. हे मी मान्य करतो. हा इतिहासाचा एक भाग आहे.’’

परराष्ट्र धोरणाचा विचार केला तर, भारतात उठता-बसता अलिप्ततावादाचीच चर्चा होत होती. जागतिक संदर्भात, भारत सामर्थ्यवान होईपर्यंत, एक रणनीती म्हणून अलिप्ततावादाची गोष्ट करणे समजू शकतो. परंतु, तो आमच्या परराष्ट्र धोरणाचा स्थायी आधार तर बनू शकत नाही ना! कारण, ज्या दोन महासत्तांपासून अलिप्त राहण्याची चर्चा होत होती, त्या दोन्ही महासत्तांचे राष्ट्रीय जीवन, त्यांचे वैचारिक अधिष्ठान, त्यांचा राष्ट्रीय-सामाजिक व मानवी जीवनाचा अनुभव भारताच्या राष्ट्रीय, सामाजिक, वैचारिक अधिष्ठानाहून इतका अविकसित, अपूर्ण आणि अपरिपक्व आहे की, त्या आधारावर आमची धोरणे निश्‍चित करण्याचा विचार करणे म्हणजे स्वत:ची गुलामगिरीची मानसिकताच दाखविणे आहे. या महाशक्तींचे केंद्र असलेल्या अमेरिका व त्या काळातील सोव्हिएट रशिया यांचे राष्ट्रीय जीवन 500 वर्षांचेही नाही. ज्या विचारधारेचे ते सतत गुणगान करीत होते, त्याचा त्यांना 100 वर्षांचाही अनुभव नव्हता. दुसरीकडे, भारताचा इतिहास, भारताचे राष्ट्रीय जीवन कमीतकमी 10 हजार वर्षे प्राचीन आहे.

अध्यात्म-आधारित भारतीय जीवनाचा दृष्टिकोन एकात्म, सर्वांगीण आणि वैश्‍विक राहिला आहे. म्हणूनच सामर्थ्यसंपन्न असतानाही भारताने इतर कुठल्याही देशांवर युद्ध लादले नाही. व्यापारासाठी जगाच्या कानाकोपर्‍यात गेल्यानंतरही भारताने त्या भूभागाला ना आपली वसाहत बनविली, ना त्यांचे शोषण केले, ना त्यांना लुटले, ना त्यांना कन्व्हर्ट केले आणि ना ही त्यांना गुलाम बनवून त्याचा व्यापार केला. उलट, आमच्या लोकांनी तिथल्या लोकांना संपन्न बनविले, समृद्ध बनविले, सुसंस्कृत बनविले. भारताची ही प्राचीन सर्वसमावेशक वैश्‍विक दृष्टीच जगात भारताची ओळख देखील आहे. त्याच्याच परिणामस्वरूप आमची ही दृष्टी आमच्या परराष्ट्र धोरणाचादेखील आधार व्हायला हवी होती.

परंतु, भारताच्या पहिल्या पंतप्रधानांवर साम्यवादाचा प्रभाव होता. म्हणून भारताच्या अध्यात्म आधारित वैश्‍विक, सर्वांगीण आणि एकात्म दृष्टिकोनाच्या विशिष्ट ओळखीला नाकारून, आधुनिकतेच्या नावावर एक आकर्षक पाश्‍चात्त्य शब्दावलीच्या मोहात भारताच्या धोरणांची दिशाच बदलविण्यात आली. नंतर काँग्रेस पक्षात साम्यवाद्यांचा प्रभाव वाढत गेला आणि अंतत: काँग्रेस पक्ष पूर्णपणे साम्यवाद्यांच्या कह्यात गेला. याचा परिणाम ‘भारता’ची ‘भारता’पासून दूरता वाढण्यात झाला. शतकांपासून सार्‍या जगाला माहीत असलेला भारत तसेच भारताचे जे स्वत्व होते, त्याला नाकारणे म्हणजे स्वत:ला प्रगतिशील, लिबरल आणि बुद्धिवंत मानण्याचे एक प्रकारे चलन सुरू झाले. परंतु, समाजात सतत सुरू असलेल्या सामाजिक व राष्ट्रीय जागरणामुळे 2014 च्या निवडणुकीत एक गैरकाँग्रेसी पक्ष, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पूर्ण बहुमताने सत्तेत आला. एवढेच नाही, तर आपल्या मुळाशी जोडले राहून, आपल्या सांस्कृतिक परंपरेला वर्तमान संदर्भात परिभाषित करीत, देशव्यापी पुनर्जागरण करणार्‍या तसेच प्रगतिशील विचाराच्या नावावर वसाहतवादी विचार भारतीय समाजावर थोपणार्‍यांना नाकारणार्‍या या सक्रिय समाजाचाही हा विजय होता. 2019 मध्ये अधिक जनसमर्थनासह याची पुनरावृत्ती होणे, हा 2014च्या पुढील परिवर्तनाचा बिंदू होता.

16 मे 2014 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित झाला आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला पूर्ण बहुमताचे रालोआचे सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळाले.  या संदर्भात 18 मे च्या ‘संडे गार्डियन’च्या संपादकीयात लिहिले होते- ‘आज 18 मे 2014. आज खर्या अर्थाने ब्रिटिशांनी भारत सोडला, म्हणून या दिवसाची इतिहासात नोंद होइल. या उपखंडावर ब्रिटिशांच्या राज्यकारभाराहून फारश्या वेगळ्या नसलेल्या प्रदीर्घ युगाच्या अंतावर, निवडणुकीतील नरेंद्र मोदी यांच्या या विजयाने शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेसच्या राजवटीतील भारत अनेक अर्थाने ब्रिटिश शासनाचाच एक प्रकारे विस्तार होता.’ संपादकीयाची ही सुरवातच या परिवर्तनाचे नेमके वर्णन आहे.

त्याच काळात शिव विश्वनाथन् यांचा ‘माझ्यासारख्या लिबरलला मोदींनी कसे पराभूत केले!’ नावाचा एक लेख प्रकाशित झाला. याचे शीर्षकच सर्व काही सांगून जाते. या लेखात शिव विश्वनाथन् स्पष्ट करत लिहितात- सेक्युलॅरिझमने काय केले? त्याने केलेल्या जबरीच्या विरोधामुळे मध्यमवर्गीयांना आपल्या श्रद्धा, आपल्या दृष्टिकोनाबाबत लाज आणि अविश्वास वाटू लागला. सेक्युलॅरिझम म्हणजे, उच्च स्तराचा परिवर्तनशील परंतु, दिवाणखान्यातच चर्चिला जाणारा एक विचार, असेच चित्र रंगविण्यात आले आणि जो मध्यमवर्गीयाला अनुपयुक्त वाटला.

काशी विश्वनाथ मंदिरातील पूजेत सहभागी होण्यासाठी 17 मे रोजी नरेंद्र मोदी पुन्हा काशीला गेले. मंदिरातील पूजाअर्चेनंतर ते गंगेची आरती करण्यास दशाश्वमेघ घाटावर गेले. ही आरती डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. या धार्मिक क्रियेतून या शहराच्या महान परंपराच प्रतिध्वनित होत होत्या आणि त्याचा परिणाम नवचैतन्य निर्माण करणारा होता.

हा सर्व प्रसंग टेलीव्हिजनवर प्रसारित होत असताना, लोकांनी तो पूर्ण दाखवावा अन् तोही कुठलेही धावते वर्णन न करता, असे मेसेज केले. काही लोकांनी तर, अशा प्रकारचे अनुष्ठान प्रथमच जाहीर रीत्या दाखविले गेल्याचे नमूद केले. मोदींच्या तिथल्या उपस्थितीवरून एका मेसेजमध्ये म्हटले होते- ‘‘आम्हाला आमच्या धर्माची लाज वाटण्याची काहीएक गरज नाही. हे या आधीही घडू शकले असते.’’

प्रथम तर मला या मेसेजने अस्वस्थ केले, परंतु नंतर मी विचार करू लागलो : माझ्या एका सहकार्‍याने मला म्हटलेही. ‘‘तुम्ही इंग्रजाळलेले सेक्युलरवादी निव्वळ दमनकारी असता, बहुसंख्य लोकांना जे नैसर्गिक आहे त्याची लाज उत्पन्न करता.’’ हा शेरा कटू व झणझणीत असला तरी निष्पक्ष होता. मला त्या क्षणी जाणवले की, माझ्यासारखे लिबरल्स एखाद्या गंभीर गुन्हाचे दोषी असावे.

हा नवीन भारत आहे. याचा अनुभव सर्व भारतीय तसेच सार्‍या जगाला येत आहे. परंतु, खरे म्हणजे हा अजिबात नवा नाही. उलट, आतापर्यंत झिडकारलेला, मिथ्या प्रचाराने दडपून टाकलेला, शतकानुशतके प्राचीन परंतु नित्यनूतन व चिरपुरातन ओळख जोपासत, स्वाभिमान व ताकदीने पुन्हा पुन्हा उभा राहणारा ‘आपला’ भारत आहे. आणि कारण, भारताचा विचारच ‘वसुधैव कुटुंबकम्’ तसेच ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’ राहिला असल्यामुळे, त्याच्या स्वत्वाच्या जागरणाने तसेच आत्मनिर्भरतेच्या आधारावर शक्तिसंपन्न बनण्याने कुणालाही कुठलेच भय बाळगण्याचे कारण नाही. कारण जो जागृत होत आहे तो भारतच आहे.

कोरोना महामारीसारख्या संकटाशी संपूर्ण देश सफलतापूर्वक लढत असतानाच, विस्तारवादी आणि एकाधिकारवादी चीनने उभ्या केलेल्या आव्हानाच्या समयी, संपूर्ण भारतीय समाजाने आपल्या एकतेचा परिचय दिला पाहिजे आणि तो देतही आहे. राष्ट्रीय सुरक्षा व रणनीतीसाठी सेना व सरकारच्या निर्णयक्षमतेवर विश्‍वास ठेवून, सर्व लोक तसेच राजकीय पक्षांनी राजकीय परिपक्वतेचा परिचय देणे गरजेचे आहे. ही वेळ राजकीय नफा-तोटा अथवा एक-दुसर्‍याचा जय-पराजय निश्‍चित करण्याची नाही आहे.