ramnavami 2020

रामनवमी 2020

चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामाचे नवरात्र सुरु होते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामराया आसनस्थ झाले की नित्य पूजाअर्चा, आरती, रामरक्षा घरोघरी सुरू होतेच मात्र सामाजिक कार्यक्रमांची देखील नऊ दिवस रेलचेल असते. रामनवमीला रामजन्मोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होतो. चैत्र महिना तसाही उत्साह सोबतच घेऊन येतो त्यातच या महिन्यात सर्वांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मदिन असल्यामुळे दुग्धशर्करा योग जुळून येतो. अमरावती शहरात देखील गीतरामायण, श्रीराम शोभायात्रा, भजन, रामकथा, रामरक्षा सामुहिक पठण असे अनेक एकत्रीकरण घडवून आणणारे सामाजिक उपक्रम याच कालावधीत होतात. यावर्षी मात्र हा चैत्र महिना कोरोनाच्या काळजीत घरातच सुरू झाला व घरातच समाप्त होणार आहे. उत्सवांच्या निमित्याने होणारे एकत्रीकरण समाजातील एकोपा वाढविण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरते आणि अश्या सामाजिक कार्यक्रमांची कमी यावेळी आपल्या सर्वांनाच जाणवते आहे. अनेक लोक या सर्व उपक्रमात सक्रिय सहभागी असतात त्यांच्याकरिता तर 2020 एक वेगळाच अनुभव घेऊन आले आहे.

यावर्षी रामजन्मभूमी अयोध्या येथे भव्य राममंदिर निर्माणाची बातमी आली, इतक्या वर्षांपासून आपल्या सर्वांना ज्या क्षणाची वाट होती तो क्षण आला. यावर्षी कोरोनाचे संकट आले नसते तर रामनवमीचे पर्व अत्यंत उत्साहात साजरे झाले असते. परिस्थिती सांगून येत नसते मात्र आपली संस्कृती ही आपल्याला परिस्थितीवर मात करून पुढे जाण्यास शिकविणारी आहे. म्हणूनच घरात आहोत तरी आपल्याला रामजन्मदिन उत्साहात साजरा करायचा आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आपल्या सर्वांचे आराध्य आहेत त्यामुळे जिथे आहात तिथेच राहून, आपला खारीचा वाटा उचला व रामनवमी उत्साहात साजरी करा.

संचारबंदीच्या निमित्याने आपल्या सगळ्यांना स्वतःच्या वेळेचे मूल्यमापन करण्याची ही उत्तम संधी आहे त्यासाठी प्रत्येकाने आहे त्या ठिकाणी रामनवमीचे शुभपर्व छोट्या छोट्या वैविध्यपूर्ण उपक्रमातून साजरे करावे असे वाटते.

श्रीरामाचे जीवनचरित्र संपूर्ण भारतवर्षात सगळ्यांना परिचित आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असे आपण नेहमीच संबोधतो, काय आहे ही मर्यादा? “आपली क्षमता ओळखून स्वतःच्या वागणुकीवर स्वतःच लावलेला अंकुश म्हणजे मर्यादा!” माणसाने स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा स्वतः अभ्यास करून आपल्या व्यक्तीमत्वातील गुण व अवगुणांचे परिक्षण केले तर त्याला स्वतःला मर्यादा घालता येतात. या जगात प्रत्येक व्यक्तीला देवाने काहीतरी विशेष देऊन पाठविले आहे, आपल्यातील विशेष ओळखून काम करणे ही आज काळाची गरज आहे. मर्यादा आखणे ह्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता तपासून त्यानुसार निकष बांधणे योग्य आहे. स्वतः स्वतःच्या मर्यादा आखल्या व त्यानुसार कार्य केलं तर निश्चितच या परिस्थितीवर आपण मिळून मात करणार याची खात्री आहे. यावर्षी बाहेर गीतरामायण कार्यक्रमास नाही गेलात तरी घरी गीतरामायण नक्की एका. घराचे अंगण रांगोळीने सुशोभित करा व संध्याकाळी दिवे लावून दिवाळीसारखा परिसर उजळून काढा. अश्या अनेक छोट्या सकारात्मक उपक्रमातून दिनवैशिष्ट समाजात पोहोचविणे हेही संस्कृतीरक्षनाचेच कार्य आहे यासाठी आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागाची गरज आहे आणि आपण हे करणार ही खात्रीदेखील आहे.

सध्या रामानंद सागर यांचे लोकप्रिय रामायण आपल्याला एकदा पुन्हा पाहायला मिळते आहे. आपण बघतो आहोत श्रीराम हे आज्ञाकारी होते, त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांनी आपल्याला हे ठळकपणे जाणवते. शास्त्र व शस्त्र पारंगत झाल्यावर जेंव्हा गुरूंनी यज्ञकार्य रक्षणासाठी सोबत चला असे म्हंटले तेव्हा काहीही प्रतिप्रश्न न करता राम, लक्ष्मण दोघेही निघाले. दुसऱ्या प्रसंगी श्रीरामांना आपला राज्याभिषेक होणार असे कळले होते पण पित्याने आज्ञा केली की वनवासाला जा, तेव्हा राम वल्कले धारण करून काहीही न विचारता लक्ष्मण व जानकीसह वनवासाला गेले. पित्याच्या वचनपूर्तीसाठी राजवैभवात राहिलेले श्रीराम पत्नी व भावासोबत वनात राहिले, अनेक कष्टांचा सामना केला पण कधीही कोणावर दोषारोपण केले नाही. १४ वर्षाचा वनवास थोडा नव्हता पण केवळ पित्याची आज्ञा म्हणून रामाने तो वनवास देखील आनंदाने व्यतीत केला. डोळसपणे पाहिल्यास लक्षात येते की आजही समाजात असे अनेक लोक आहेत जे राष्ट्रहितासाठी सतत जागृत असतात, प्रसंगी स्वतःच्या सुखाचा विचार न करता सतत कार्यमग्न असतात. त्यांना आपण श्रीरामांच्या सद्गुणांचे अनुयायी म्हणू शकतो मात्र यांच्या कार्याचा प्रचार प्रसार समाजात आवश्यक आहे जेणेकरून ही संख्या वाढेल व देशकार्य अधिक प्रमाणात घडेल.

राष्ट्रपुरुषांचे जीवन विशिष्ट हेतूने प्रेरित असते आणि त्यावेळी स्वतःच्या सामर्थ्याने उन्मत्त झालेल्या रावणाचा वध ह्यासाठी श्रीरामाचा जन्म झाला हे सत्य असले तरी फक्त रावणवध हेच लक्ष नव्हते. रामायणाच्या अध्ययनातून लक्षात येते की त्यावेळी रावणाच्या वैभवाने, सोन्याच्या लंकेने सर्वांना आकर्षित केले होते. पण लंकेतील या वैभवासोबत रावणाच्या अत्याचाराच्या गाथाही सर्वत्र पसरल्या होत्या. श्रीराम ईश्वरीय अवतार असल्यामुळे समाजाला योग्य दिशा देणे, सत्य व असत्यातील फरक सांगणे तितकेच आवश्यक होते म्हणून त्यांची प्रत्येक कृती ही समाजाला दिशादर्शक होती. केवळ भौतिक सामर्थ्याने जग जिंकता येत नाही तर त्यासाठी व्यक्तीमध्ये सद्गुणांचे अधिष्ठान हवे हे सिद्ध करून श्रीरामांनी रावणवध केला.

शालीनता  हा प्रभू  श्रीरामांचा अजून एक महत्वाचा गुण. रामाच्या संपूर्ण जीवनचरित्रात शालीनता ओतप्रोत भरलेली दिसते. कधीही कुणाला उच्च स्वरात काहीही बोलल्याचा उल्लेख आढळत नाही. स्वतःच्या सामर्थ्याचा गर्व तसूभरही नसलेले प्रभू श्रीराम आपले आराध्य आहेत, तेंव्हा त्यांचे हे सर्व सद्गुण धारण करण्याची क्षमता आपण वाढवायला पाहिजे. अतिशय नम्रतेने आपल्याजवळील शक्ती व शस्त्र वापरण्याची त्यांना सवय होती. आज तंत्रज्ञान इतके प्रगत झाले व प्रचंड क्षमतेचे शस्त्र विकसित झाली आहे, पण शालीनतेच्या अभावामुळे त्यांच्या जोरावर उद्दामपणा करणारे अनेक राष्ट्रप्रमुख आपण पाहतो आहे. भारतवर्षात मात्र अनेक राष्ट्रपुरुषांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे व त्यामुळे आजपर्यंत भारताने फक्त स्वसंरक्षण करण्यासाठी युद्ध केले हे त्रिवार सत्य आहे.

राष्ट्रधर्म हेच जीवन, जनतेचे कल्याण हाच ध्यास, त्यासाठी अविरत कष्ट घेणारे असे अनेक हात एकजुटीने कार्यसिद्धी होण्यासाठी झटले म्हणून रामराज्य आले. त्यावेळी “जैसा राजा, तैसी प्रजा” ही म्हणही सत्य ठरली. प्रभू श्रीराम हे कुशल संघटक होते. स्वतःच्या राज्यात सैन्य असणे व लढाई करणे ही बाब निराळी परंतु हातात काहीही साधने नसतांना केवळ दृढनिश्चयाच्या बळावर वानरसेनेची निर्मिती ही श्रीरामाचे नेतृत्वगुण दर्शविते. सहज समजेल अश्या सोप्या भाषेत चर्चा करून अनेक समस्यांचे निराकरण सहज करण्याची श्रीरामांची सवय रामकथेतील अनेक कठीण प्रसंगात प्रकर्षाने लक्षात येते. सध्यस्थितीत देशांतर्गत सतत चाललेले वाद व त्यावरील चर्चा ऐकल्या की सारासार विवेकबुद्धीचा ऱ्हास झाला आहे असे वाटते. देशप्रेम, देशनिष्ठा ठेऊन काम करणारे व्यक्ती देखील अश्या स्वतःला बुद्धीजीवी म्हणवून घेणाऱ्या मुठभर लोकांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतात. मीही चांगले करणार नाही व करूही देणार नाही ही वृत्ती वाढत जाते आहे, याला आळा घालायचा असेल तर एकच उपाय रामाची फक्त पूजा न करता त्यांच्यातील सद्गुण अंगी बाळगावे लागतील. दुहेरी भूमिका घेऊन समाजात वावरणारे लोक समाजातील विकृती आहे, त्यांचा वेळीच बंदोबस्त राष्ट्रासाठी नक्कीच हितकारक ठरेल.

श्रीरामाच्या सद्गुणांची आठवण करून आपण आपला सामाजिक संयम देखील वाढविला पाहिजे, समाजात अतिशय छोट्या गोष्टींवरून शत्रुत्व व सूड या भावना वाढण्याचे कारण क्रोध आहे. भारतात परकीय आक्रमणांमुळे इतिहास विकृतीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. योग्य इतिहासाच्या अध्ययनाने प्रत्येक प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. रामनवमीच्या शुभपर्वावर श्रीरामांच्या सद्गुणांची मनामनात स्थापना व्हायला हवी. मर्यादा सांभाळून कार्यरत राहणे, संयम व शालीनता वाढविणे, स्वतःतील नेतृत्वगुण विकसित करणे, राष्ट्रकार्यासाठी थोडा वेळ देणे या संकल्पांसह रामनवमीचे हे शुभपर्व  घरातच साजरे करूया.“जय श्रीराम”

सौ. प्राची श्रीकांत पालकर