संघ शिक्षा वर्ग प्रथम वर्षाचा शुभारंभ

शारिरीक व बौद्धीक क्षमता वाढविण्यासाठी वर्ग – क्षेत्रीय व्यवस्था प्रमुख पटेल यांचे प्रतिपादन

अमरावती, 17 मे

समाजासाठी उत्तम व्यक्ती घडविण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या 90 वर्षापासून करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघ शिक्षा वर्ग दरवर्षी घेतले जातात. या वर्गात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांची शारिरीक व बौद्धीक क्षमता वाढविली जाते आणि जबाबदारी स्विकारणारा स्वयंसेवक घडविला जातो, असे प्रतिपादन रा. स्व. संघाच्या पश्‍चिम क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्था प्रमुख हसमुखभाई पटेल यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत संघ शिक्षा वर्ग प्रथम वर्षाचा शुभारंभ बुधवार 16 मे रोजी सकाळी 10 वाजता दिपप्रज्वलन, भारतमाता पूजन व हसमुखभाई पटेल यांच्या उद्बोधनाने झाला. यावेळी विदर्भ प्रांत संघ चालक दादाराव भडके, वर्गाधिकारी प्रदीप वडनेरकर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. जुन्या बायपास मार्गावरील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालीत टायटन पब्लीक स्कूलमध्ये 20 दिवसाचा हा वर्ग आयोजिण्यात आला आहे. आपल्या उद्बोधनातून क्षेत्रीय व्यवस्था प्रमुख पटेल यांनी उपस्थित स्वयंसेवकांना या वर्गाचे महत्त्व समजावून सांगितले. जीवनात स्वावलंबन व अनुषाशन महत्वाचे आहे. वर्गातून प्राप्त होणार्‍या शारिरीक व वैचारीक प्रशिक्षणाचा स्वयंसेवकांना निश्‍चितपणे फायदा होणार असून समाजातला जागृत घटक बनण्यासाठी हा वर्ग उपयुक्त ठरणार आहे. सामाजिक कार्यात सहभागी होणार्‍या प्रत्येकाचे आचरण सामान्य व्यक्ती सारखे असावे. तेव्हाच समाज आपल्या सोबत येतो आणि कार्य करणे सुलभ होते. हिंदू धर्मा समोरच्या अडचणी दूर करण्याचे सामर्थ्य या वर्गातून मिळणार आहे. समाजात संघ आणि संघ कार्याविषयी प्रचंड उत्स्कूता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तत्पुर्वी वनवासी कल्याण आश्रमासाठी संकलीत करण्यात आलेला निधी वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांत सहसचिव भाष्करराव रोकडे यांच्याकडे सुर्पूद करण्यात आला. यावेळी वनवासी कल्याण आश्रमाचे विदर्भ प्रांत प्रमुख विनायक सुरतणे, विदर्भ प्रांताचे सचिव रवींद्र संगितराव उपस्थित होते. प्रथम वर्ष वर्गात विदर्भ प्रांतातल्या 6 विभागातील 18 जिल्ह्यातले 326 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहे. प्रांत सह बौद्धीक प्रमुख गुणाकार देशपांडे यांनी वर्ग गित सादर केले.

यवतमाळचे प्रदीप वडनेरकर या वर्गाचे वर्गाधिकारी असून दर्यापूरचे कमलेश भट्ट वर्ग कार्यवाहक आहे. पांढरकवड्याचे अमीत तुळणकर वर्गाचे मुख्य शिक्षक असून अकोल्याचे मनोज भारसाकळे सहमुख्य शिक्षक आहे. बोरगाव मंजुचे सोमेश शर्मा वर्ग बौद्धीक प्रमुख असून शेगावचे विजय पुंडे सह बौद्धीक प्रमुख आहे. उमरखेडचे विनोद श्रीरामे वर्गाचे सेवा प्रमुख असून नवरगावचे प्रकाश निकोडे सहसेवा प्रमुख आहे. अमरावतीचे डॉ. दत्ता रत्नपारखी वर्ग व्यवस्थापक असून शाम निलकरी सह व्यवस्था प्रमुख आहे. नागपूरचे अनिल सांबरे वर्गाचे पालक अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहे. येत्या 6 जूनला वर्गाचा समारोप होणार आहे.