sarvepi sukhinh santu -a tapase

सर्वेपि सुखिन: सन्तु

 

सर्वेपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय: ।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दु:खमाप्नुयात ।

सर्वजन सुखी होवोत. सर्वजन निरोगी राहोत. सर्वजन कल्याणमय आणि मंगलमय गोष्टी पाहोत. कोणालाही दु:खप्राप्ती न होवो. हे सर्वव्यापी सुखाचे ध्येय सदैव अंतकरणात जागृत करुण त्यासाठी अविरत प्रयन्त करीत राहणे तोच खरा सुखी मनुष्य आहे. अंत:करणाची विशालता आणि विचाराची व्यापकता जेथे असते तिथेच समस्त मानव जातीलाच नव्हे तर संपूर्ण सजीव जगाला सुखी करण्याची सदप्रवृत्ती निर्माण होते. आपल्या भारतवर्षात अनेक साधु संतांनी, महापुरुषांनी नेहमी जगत कल्याणाची चिंता केली आहे.त्यांनी मानवी कल्याणाचे हित डोळयासमोर ठेवून मानवी जीवनाला सुखी करण्याची वृत्ती बाळगली आहे. स्वामी विवेकानंदांच्या अमेरीकेतील वास्तव्यात एकदा एका अमेरीकन गहस्थाने स्वामीजींना विचारणा केली, ‘महाराज, आपण भारताची एवढी महती गाता, पण भारतवर्षाने आजपर्यत कोणत्या मोठया लढाया मारल्या आहेत. कोणते देश जिंकले आहेत, सांगा बरे!’ यावर स्वामीजी म्हणाले,‘अहो , हयातच तर भारताचा गौरव आहे. आमच्या भारताने कधीही कोणावर आक्रमण केले नाही. कधीही कोणाची श्रध्दा स्थाने फोडली नाही की भंडारे लुटली नाहीत. जर जिंकायचेच असेल तर लोकांची अंत:करणे जिंका हा आमचा धर्माचा आदेश आहे.’ हेच सर्वव्यापी सुखाचे ध्येय आहे.

किंबहुना सर्वसुखीं  पूर्ण होऊनी  तिहीं लोकीं 

भजिजो आदिपुरुखीं  अखंडित ।।

श्री ज्ञानदेवांनी विश्वेश्वराला केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान. हे पसायदान जगातल्या लोकांनी सर्व सुखाने परिपूर्ण व्हावे अशी आहे. केवळ सुख म्हटले तर थोडेफार सर्वांनाच जीवनात मिळत असते. पण त्याने माणूस काही तप्त होत नाही. कारण सुख असते पण समाधान नसते. पुन्हा त्या सुखाला दु:खही चिकटून असते. तेही माणसाला नको असते. त्याचा सतत दु:ख कमी करण्याचा प्रयन्त असतो. मग तो सुखासाठी जे करता येईल साम,दाम,दंड,भेद या सर्व नितीचा वापर करुन सुख मिळविण्याचा सतत खटाटोप करतो. जीवनाची झोळी ही फाटकी असते त्यात कितीही सुख घातले की ते निघुन जाते. सुखाच्या प्राप्तीसाठी सतत धावाधाव करुन आयुष्य ही निघुन जाते. तसे हे सुख केवळ जड प्रवत्ती , इंद्रियांच्या संयोगातून निर्माण झालेले आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात.

ये हि संस्पर्शजा भोगा दुखयोनय एव ते 

आधन्तवन्त: कोन्तेय न तेषु रमते बुध: ।। (गीता 5.22)

‘विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न  होणारे भोग हे दु:खालाच कारण होतात. (कारण) त्यांना आदि व अंत आहे. हे अर्जुना, ज्ञानी पुरुष त्यात रमत नाही .’

अश्या विषय भोगी, इंद्रियाच्या संयोगातून मिळविलेल्या सुखाने काही काळ पोट भरल्याचे सुख जरी मिळत असल्यासारखे वाटत असले तरी सुख मिळत नाही. अशा भ्रामक सुखाच्या अपेक्षेने विषय भोगां कडे जावे लागते पण त्या विषयाकडून सुखा ऐवजी दु:खच हाती येते. परत सुखाच्या प्राप्तीसाठी  धावाधाव सुरु होते म्हणजे मनुष्याला विषय भोग सुखासाठी फसवे आहे. म्हणूनच श्री ज्ञानदेव म्हणतात, ‘ म्हणोनि विषय भोगी जें सुख । तें सांधेतिचि जाण दु:ख । परि काय करिती मुर्ख । न सेवितां न सरे ।। ’

या जगामध्ये तीन पदार्थ मानले जातात. जीव, जग व परमेश्व्‍र. त्यापैकी जग हे भौतिक म्हणजेच जड असते. तेथे अंत:करण नसल्यामुळे ज्ञानवृत्तीचा अभाव असतो. त्यामुळे तिथे सुख्‍-दु:ख , बरेवाईट इत्यादी संवेदनाच नसतात. परमेश्व्‍र स्व्‍त:च सुखरुप आहे. सत्य , ज्ञान व त्याचे स्वरूप आहे. आता जीव हा अंत:करण धर्माने युक्त्‍ आहे, ज्ञाता, भोक्ता, कर्ता आहे. जीवाला सुखाची गरज आहे. जीवमात्रा हा तामस,राजस,प्रवृत्तीने बांधला गेला असल्यामुळे अज्ञानतेच्या सुखाने स्वाभाविकत: दु:खमय झाला आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेव आपल्याला सुखाचे खरे स्वरुप सांगतात आहे.

आता यावरी सुख ।  तें एवंविध देख ।

जेणें एकेंचि अशेष ।  विसरे जीवु ।।

मना वाचे काये  ।  जें आपुली आण वाये ।

देहस्मृतीची त्राये ।  मोडित जें ये ।।

जयाचेनि जालेपणें । पांगुळा होईजे प्राणें ।

सात्विकासी दुणें । वरीही  लाभू ।।

कां आधवियाचि इंद्रियवृत्ती  ।  हदयांचा एकांती ।

थापटूनि सुषुप्ती । आणी जें गा ।।

किंबहुना सोये । जीव आत्मयाची लाहे  ।।

तेथ जें होये । तया नाम सुख  ।।   (ज्ञा. 13.127-31)

या ओव्यांचा अर्थ असा की, ज्या योगाने जी अन्य्‍ सर्व दु:ख विसरुन जातो, मनाने, वाचेचे व सर्व इंद्रियांचे बहिर्मुख व्यवहार जेव्हा बंद होतात. देहस्मृती  नष्ट होते, जेथे जीवाने असंग, अक्रिय स्थितीत प्रवेश केल्यामुळे क्रियाशक्ती पांगळी बनते, सात्विक वृत्तीची वाढ होते. सर्व इंद्रियवृत्तींना हदयाच्या एकांत स्थळात आणुन त्याला अंर्तमुख केले जाते. थोडक्यात जीवाला आत्म्याचा लाभ जेथे होतो त्याला सुख असे म्हणावे आणि ही अवस्था प्राप्त्‍ न होताच जगणे ते दु:ख होय.

मनुष्य्‍ जीव हा जन्माला आला म्हणजे सोबत दु:ख घेवूनच आला. त्याचा देह म्हणजेच दु:खाने भरलेली गोणी आहे. खरे सुख मिळविण्यासाठी विषय वासनेने लिप्त्‍ वृत्ती, अश्रध्द, चंचलबुध्दी, आळशी, दृष्टदृष्टी, उध्दट, स्वैराचारी, व्यसनी, झोपाळू यासारखे दुगुर्ण वृत्तीमध्ये सदैव भरलेले दिसेल. तिथे सुखाचा लवलेश ही दिसणार नाही. जगामध्ये भौतिक विज्ञानाने मोठे-मोठे शोध लावून मानवी जीवन सुखी झाल्याचा असत्य्‍ दावा केला जात आहे.भौतिक सुख केवळ क्षणाचे सुख आहे. हे देखील निर्विवाद सत्य्‍ आहे. मानवी जीवनात आत्मीक सुख देणारी  फक्त्‍ एकमेव संस्कृति प्राचिन भारतीय सभ्यतेच्या तत्वज्ञानात मानवी सुखी कसे याचा यथासांग विचार करण्यात आला आहे. आपल्याला गीता सांगते आहे. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ सतत कर्मयोग करीत रहा फळाची अपेक्षा ठेवू नकोस. फळाची अपेक्षा ठेवणे हेच दु:खाला कारण आहे. मन जीवनाच्या रथाचा सारथी असून मनाने खंबीर असलेली माणसे श्रेष्टत्व्‍ प्राप्त्‍ करतात. संत तुकोबाराय म्हणतात. ‘मन करा रे प्रसन्न्‍, सर्व सिध्दिचे कारण’ मनाना कोणत्याही वाईट प्रवृत्तीची घाण लागता कामा नये. अस्थिरता, चांचल्य्,भ्र्मण्‍शीलता, नको त्या विषयात रमणे असे अनेक मनाचे खास दोष सांगितले आहे. मनाना एखादया गोष्टीची चटक लागली की तिथेच मन चिकटून बसते. मग उठता उठत नाही.

मन हे परोपकारी वळणास लागले म्हणजे त्याला सर्वश्रेष्ट सुख मिळाल्याचा आनंद लाभतो.  जीवनात ध्येय असावे, ध्येय श्रेष्ठ असावे, ते लोककल्याणकारी असले पाहिजे. ते तात्कालिक, दैहिक, दिखावु असू नये. मला त्याचे कायॽ हि खलवृत्ती बहिष्कृत केली पाहीजे. माणसाने नेहमी कोणत्या ना कोणत्या परोपकारी परमार्थी उदयोगात मग्न्‍ असावे. रिकाम्या मनात राक्षस धुमाकूळ घालतो. सज्जना बरोबर राहावे. सदविचारात मन गुंतविणे, देशकल्याणाचा सदैव विचार करावा.अशाने मनाच्या वाईट, दुखी खोडी, लबाडी  करण्याची वृत्ती नाहीशी होते आणि मनाला चांगले वळण लागते. हीच माणसं जगाला सुखी करण्याच्या सत्कारणी लागतात. आत्मीक सुखाच्या प्रगतीने अंतकरणात देवत्वाची  तेजवृत्ती निर्माण होवून सर्वाना सुखी करण्याची भावना उत्पन्न्‍ होते. हिच तेजवृत्तीचे रुप विशाल मन होय त्यामध्ये सर्वांच्या हिताच- सुखाचे ध्येय आहे. हिच धारणा श्री ज्ञानदेवांनी  ‘किंबहुना सर्वसुखी पुर्ण होउनी तिन्ही लोकीं ’  विश्वेशराला पसायदान मागतांना त्यांना हिच अपेक्षा ठेवली. स्वामी विवेकानंद तेच सांगतात आहे, ‘जग जिंकायचेय तर अंतकरण जिंका’ हिच सुखीवृत्ती जगाच्या कल्याणासाठी उपकारक आहे.

 

  • अमोल तपासे

सीताबर्डी, नागपूर