saryu tirawar – s tijare

सरयू तीरावरी….
अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका| पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायीका|
अयोध्यायै नमस्तेस्तु राममूर्ती नमो नमः| आद्यायैच नमस्तुभ्यम् सत्यायै ते नमो नमः||
हे आहे स्कन्दपुराणातील अयोध्या महात्म्य. त्रिकालाबाधित आराध्य अशा अयोध्या नगरीला आमचे शत शत प्रणाम. कारण या पवित्र नगरीत कधीही पापरूपी शत्रू, स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. म्हणूनच तर ती आहे आदिपुरी अयोध्या|
अयोध्या महात्म्य म्हटलं की शरयू नदी चे महत्व आलच. शरयू नदीत पापांचा नाश होतो. श्री विष्णूचे अवतार भगवान श्रीरामाचे जन्मस्थान म्हणजे अयोध्या. शरयू तीरावरील मनुनिर्मित नगरी म्हणजे अयोध्या. ग.दि.मांनी आपल्या गीतरामायणातील अगदी दुसऱ्याच गीतांमध्ये अयोध्येचे वर्णन फार सुंदर असं केलेल आहे. “सरयू तीरावरी अयोध्या, मनू निर्मित नगरी..”. गीत रामायण हे काव्य अजरामर आहे, ते त्यातील उत्कट प्रसंग आणि प्रसंगा अनुरूप बदलत जाणारे भाव यामुळे. राम म्हणजे स्वतः आनंदी असणारा आणि दुसर्यांणना आनंदी करणारे, पात्र. “अवधपुरी के प्यारे राम, दशरथ राज दुलारे राम, श्रीराम जय राम जय जय राम…” असं म्हटल जात ते उगाच नव्हे.
यावत स्थांस्यती गिरीय:, सरीतश्च महीतले| तावत रामायण कथा, लोकेशु पचरिष्यती ||
जोपर्यंत पृथ्वीवर पर्वत व नद्या आहेत तोपर्यंत या जगात रामायण कथा जीवंत राहील असं ब्रह्मदेवांनी महर्षी वाल्मिकीना दिलेलं हे आश्वासन. गेली 2000 वर्षे हे वचन खर ठरल  आहे. लोकांच्या मनावर धार्मिक आणि नैतिक मूल्ये रुजीत करण्यासाठी सर्वच संप्रदायात, रामायणातील दाखले दिले जातात. रामायणातील राम, सीता, लक्ष्मण, हनुमंत, आम्हा भारतीयांची आराध्य आहेत, आणि याच भगवान श्रीरामाचा निवासस्थान म्हणजे आपली अयोध्यानगरी. आधी याला कौशलपुरी किंवा कौशलदेश असं म्हटलं जायचं. अयोध्या नगरी ओळखली जाते ती महापराक्रमी आणि बुद्धिमान राजा दशरथाच्या नावानं. सरयू नदीच्या परिसरात असलेला धनधान्याने समृद्ध आणि संतुष्ट, सुंदर प्रदेश म्हणजे कौशलदेश. रामायणात या प्रदेशाचे वर्णन “कोसलो नाम मुदित:, स्फितो जनपद महान|  निविष्ट शरयू तीरे, प्रभूत धनधान्यवान|| असं केलं आहे. याच प्रदेशात आदीराजा, ब्राह्माजींचे मांनसपुत्र, वैवस्वत, “मनू” यांनी अयोध्या नगरीची रचना केली.
ही अयोध्या नगरी काही साधीसुधी नव्हती. वैभव संपन्न आणि विशाल, विस्तीर्ण अशा या नगरीच वर्णन महर्षी वाल्मिकीनी फार सुंदर शब्दात केलं आहे. सातपूरी पैकी पहिलं स्थान म्हणजे अयोध्यापुरी. “अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, अवंतिका”. अथर्ववेदात अयोध्येला ईश्वराची नगरी म्हटल आहे. स्कंदपुराणात अयोध्येला अ-म्हणजे अकार-ब्रम्हा, या-म्हणजे यकार-विष्णू आणि ध-म्हणजे ध-धकार-महेश यांचे रूप, असं वर्णन केल आहे.
“आयता दशच द्वेच, योजनांनी महापुरी| श्रीमती त्रिणी विस्तीर्णा, सुविभक्ता महापथा||. नऊ मैल परिसरात पसरलेल्या या सुंदर नगरीतील रस्ते विस्तीर्ण, रुंद आणि लांबलचक होते. अयोध्येतील रस्त्यावर नेहमी फुलांचा सडा पडलेला असायचा. इंद्राच्या स्वर्गाचे वर्णन केलं जातं, तसंच वैभव राजा दशरथ अयोध्या नगरीत उपभोगीत होते. या सुंदर आणि भव्यदिव्य नगरीच्या संरक्षणासाठी विशेष अशा सुशोभित यंत्र सज्ज द्वाराची योजना, राजा दशरथ यांनी करून ठेवली होती. तटबंदीय भिंतीवर तोफा दिमाखानं राज्याच्या संरक्षणासाठी विराजमान होत्या. रामायणातील बालकांडातील पाच ते अठराव्या सर्गात याचा उल्लेख आहे. या पवित्र अयोध्या नगरीत अनेक उद्याने होती. आंब्याच्या झाडांनी हे शहर हिरवकंच दिसत होतं. त्यामुळे या नगरीच्या सौंदर्यात अधिकच भर पडायची. इथल्या विहिरींना अतिशय गोड अशा पाण्याची चव होती. असं म्हणतात, त्या मार्गावरून पायी चालणाऱ्या नागरिकांची रथांची घोडेस्वारांची आणि हत्तींची वर्दळ सदैव अगदी दिमाखात चालू असायची. “घराघरावर रत्नतोरणे, अवती भवती रम्य उपवने, त्यात रंगती नृत्य गायने, मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी| अयोध्या…”, हे अयोध्यानगर इतके वैभव संपन्न होते की घराच्या प्रवेशद्वारावर तोरण दिसायची तीसुद्धा रत्नांची. सगळीकडे मधून नृत्य-गायन रंगायची त्या समृद्ध नगराच्या नागरिकांबद्दल काय बोलायचं? महिलांना योग्य तो मानसन्मान तेव्हापासूनच या नगरीत मिळायचा. इथल्या स्त्रिया पतिव्रता होत्या, तर पुरुष वृत्तीने अत्यंत धार्मिक होते. पृथ्वीतलावर अयोध्ये सारखे विशाल, अर्थसंपन्न, सुंदर शहरच नव्हतं. ईथे गरीबी नव्हतीच मुळी. सगळ्यांकडे धनसंपत्ती, पशुधन यांची रेलचेल होती. हीच तर खरी देण आहे या पवित्र भूमीची|.
अयोध्या नगरीत अनेक महान योद्धे ऋषीमुनी आणि अवतारी पुरुषांनी जन्म घेतला. जैन धर्मातील पाच तीर्थंकरांची जन्मभूमी म्हणजे अयोध्या. भगवान बुद्धांनी सुद्धा सोळा वर्ष याच पवित्र भूमीत वास्तव्य केलं होतं. अशा या नगरीत भगवान श्री रामाचा जन्म झाला.
अयोध्या ही वेगवेगळ्या घाट आणि मंदिरांचे शहर आहे. शरयू नदीच्या तीरावर एकंदर 14 मुख्य असे घाट आहेत. यात गुप्तद्वार घाट, कैकयी घाट, कौशल्या घाट, पापमोचन घाट, लक्ष्मण घाट, अशा विविध घाटांचा उल्लेख केला जातो. मंदिरांमध्ये “कनक भवन” मंदिर अत्यंत सुंदर आहे. लोकमान्य ते नुसार माता कैकयी ने सीता मातेला “सुन्मुख” म्हणून भेट दिला होता. हनुमान गढी हे सुद्धा अयोध्येतील एक आकर्षणाचं केंद्र. राम जन्मभूमी वरील मंदिर हे विक्रमादित्य यांनी बनवलेलं होतं अशी मान्यता आहे
याच अयोध्या नगरीत तुलसी चौरा हेसुद्धा एक ठिकाण आहे. ज्या ठिकाणी तुलसीदासांनी रामचरितमानसाची रचना केली तो प्रल्हाद घाट. गुरुनानदेवांनी सुद्धा अयोध्येत वास्तव्य केलेले आहे. हीच अयोध्या नगरी जैन धर्मियांसाठी एक तीर्थस्थान आहे. अयोध्या राम जन्मभूमी यासारख्या विषयांवर सखोल चर्चा होत असताना हे सुद्धा आपल्या लक्षात येतं की आपली हीच अयोध्या नगरी, पुरातन काळी एक मोठं व्यापारी केंद्र सुद्धा होतं. या शरयू नदीतून जलमार्ग द्वारे व्यापार केला जायचा.
अयोध्या| आपल्या सगळ्यांच्या हृदयात विराजमान दशरथनंदन श्रीरामचंद्राचं जन्मस्थान| प्रभू रामचंद्रांनी आपल्या जन्म भूमीच वर्ण केलं ते असं..
सूनु कपीस, अंगद, लंकेशा| पावन पुरी रुचिर यह देसा||
जद्यपी सब बैकुन्ठ बखाना| वेद पुराण विदित जगुजाना||
अवधपुरी संम प्रिय नही सोऊ| यह प्रसंग जनी कोऊ कोऊ||.
 
                                  “अपि स्वर्णमयी लंका न में लक्ष्मण रोचते। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी।”
 आपल्या जन्मभूमी बद्दल केवढ हे प्रेम, केवढी ही आस्था|    हेच तर श्रीरामांनी लक्ष्मणास सांगितल आहे.
मधल्या कालखंडांत आमच्या या आराध्यावर आक्रमण झालं आणि… पुढे त्यातून विवाद. परकीय गुलामगीरीने जोखंडलेल्या त्या पाशवी, तुघलकी मनोवृत्तीचा परिणाम आमच्या अनेक पिढ्या अनुभवत असतांना, “श्रीरामा, घनशामा, येशील कधी तू रे..” असा टाहो “अयोध्या नगरी“ आजतागायत फोडीत होती. “मंगल भवन अमंगल हारी, द्रवहुंसु दशरथ अजीर बिहारी…” ही चौपाई म्हणत आपण सारे प्रार्थना करतो आहोत.
आता आशेचा किरण दिसायला लागला. आज ती सुंदर घडी, सुन्दर योग, आपल्या समोर चालून आलेला आहे. या रामजन्मभूमीचं पावित्र्य असंच राखलं जावं तिथे श्री रामाचं भव्य दिव्य मन्दिर स्थापन व्हावं, आपल्या या पवित्र अयोध्या नगरीला तीचं गत वैभव प्राप्त व्हावं, यासाठी चाललेल्या प्रयत्नांना आता यश यायला लागल आहे. आणि ते यश आपल्या दृष्टीपथात सुद्धा आहे. चला तर सारे मिळून पुन्हा गर्जुया…
“त्रिवार जयजयकार, रामा त्रिवार जयजयकार | पुष्पक यानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार | त्रिवार जयजयकार ||
श्रीकांत भास्कर तिजारे
९४२३३८३९६६