shriramancha vijay aso – p barve

|| श्रीरामांचा विजय असो ||

इंग्रजाच्या दास्यातून ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. तब्बल शंभर वर्षाहून अधिक काळ त्यांनी आपल्यावर राज्य केलं . त्यापूर्वी भारत हा अनेक राजा आणि राजवटींचा देश होता .अनेक मुस्लिम शासक देशात राज्य करते होते. अनेक हिंदू शासक उदाहरण द्यायचे झाल्यास नागपूरचे भोसले, काश्मिरचे राजा गुलाबसिंह. म्हैसूरचे वाडियार .  त्यापूर्वीचा म्हणजे साधारण 500 -700 वर्षे भारताचा इतिहास हा मुस्लीम अतिरेकी आक्रमकांचा म्हणता येईल. हे आक्रमण विशिष्ठ उद्देशासाठी अर्थात प्रचंड लूट करणे , प्रचंड विध्वंस , सामुहिक कत्तली करणे आणि त्यांना समजलेल्या इस्लामचा तलवारीच्या जोरावर बळजबरीने प्रसार करणे . मानवतेला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना या कालखंडात भारतात घडल्या. स्त्रियांची बेअब्रू ,त्यांना पळवून नेऊन इतरत्र विकणे , गुलाम झालेल्या प्रदेशातील लहान मुले स्त्रिया यांचा व्यापार करणे . ते युद्ध नव्हतेच. त्या टोळधाडीला जिथे जिथे अटकाव झाला ,संघर्ष झाला तो हिंदू प्रदेश त्याकालापुरता जिवंत राहायचा इतकेच. पुन्हा नवा सुलतान नवी टोळधाड . अनेक छोट्या छोट्या राज्यात विभागलेल्या , धर्माच्या जाचक रुढींनी , प्रथा दुर्गुणांनी युक्त , जाती पातीत  विभागलेला हिंदुस्थान हे targeted आक्रमण झेलूच शकला नाही .परिणाम अनेक शतकांची गुलामगिरी .

सुसंस्कृत  भारत –

त्यापूर्वी साधारण 1000 वर्षे अगोदरच्या इतिहासात डोकावल्यास एका संपन्न , संस्कृत , शालीन भारताचे दर्शन घडते .  आद्य शंकराचार्य आणि त्यापूर्वीचा  काळ . श्रीसमर्थाच्या शब्दात सांगायचे झाल्यास “ आनंद भुवनी ” . शांतता ,सुबत्ता , निर्भयता , आपलेपणा  यांचा देश. लौकिकाबरोबर ज्ञानाची ही श्रीमंती. नालंदा , तक्षशीला, शारदा यासारखी ज्ञानाची विद्यापिठे जगभर प्रसिद्ध होती.  ज्ञान –विज्ञान यांचा शास्त्रार्थ मनमोकळेपणे चालणारा काळ. पवित्र प्रयाग राज , नाशिक आदी तीर्थक्षेत्री बारा वर्षातून होणारे महाकुंभ, त्याठिकाणी अनेक गोष्टींचे घडणारे आदानप्रदान,  पायदळ तीर्थयात्रा करणारे प्रवासी यात्री . अगदी केरळ पासून ते बंगाल , आसाम , गुजरात, सिंध , गांधार आदी प्रदेशातील यात्री बिनदिक्कत हे देशाटन तीर्थाटन करीत असत . पांतस्थाना वाटेत राहण्याची सोय केली असे , धर्मशाळा होत्या, अन्नदानाची व्यवस्था होती. या व्यतिरिक्त भिक्षेकरी म्हणून आलेल्या व्यक्तीस कोणतेही गाव , घर विन्मुख पाठवीत नसे. कोणी वाटसरू उपाशी तर राहिला नाही याची काळजी घेण्यासाठी राज्याचे प्रशासन दक्ष असे.  मंदिर हे गावाचे केंद्र स्थान असे. गावे स्वयंपूर्ण होती . विद्यालय म्हणा किंवा सांस्कृतिक-धार्मिक केंद्र असे गावाचे हृदयाचे ठिकाण . आणि गावाबाहेरून वाहणारी नदी म्हणजे गावाची पवित्र गंगा हिच भावना . हे जलस्त्रोत, हा निसर्ग हे आपल्याला उपकारक आहेत आणि म्हणून याचे शोषण नाही तर दोहन करायचे अर्थात उपयोगापुरते वापरायचे ते हि त्याची परवानगी घेऊन अगदी ताकातून लोणी काढावे अशा सहजतेने .पृथ्वी हि माता आणी म्हणून झोपेतून उठल्यावर भूमीवर पाय ठेवण्याअगोदर तिची माफी मागावी इथपर्यंत

.                             समुद्र वसने देवि , पर्वत: स्तन मंडिते

विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पाद स्पर्शम क्षमस्व मे |

कलाकलाने विकसित झालेला हा हिंदू धर्म , हि संस्कृती जपणारा भारत . विविध मत पंथाचा आदर हि स्वस्थ समाजलक्षणांनी युक्त असा भारत  .

आर्यावर्त –

त्याही पूर्वी आपण मागे गेल्यास चक्रवर्ती सम्राट दिसतात . विशाल भू प्रदेशावर अनभिषिक्त राज्य करणारे प्रचंड पराक्रमी , प्रतापी राज्ये आणि राजे यांचा काळ .  अश्वमेध यज्ञ , राजसूय यज्ञ करीत आपला भू प्रदेश वाढवणे , इतर राज्यांना पराभूत करणे आणि स्वराज्य स्थापन करणे अर्थात ते मानवीय हिंदू मापदंडाचे पालन करत .  भारताचा हा इतिहास हा गोष्टी ,कथा, काव्य, चरित्रात्मक पोथ्या  यातून आढळतो . विविध पुराणे या इतिहासाच्या बखरी असाव्यात. राज वंशावळी , घडलेल्या घटना , खगोलीय काल निर्देश , समाज जीवन , पद्धती , आचार , परिवार व्यवस्था , कर्तव्ये , सण , उत्सव, धार्मिक कार्ये,  अर्थ कारण , सामाजिक दायित्वे , सामाजिक व्यवस्था यांचा अभ्यास ढोबळ मानाने करता येऊ शकेल .

देवर्षी नारद या सारख्या व्यक्तिरेखा अनेक कालखंडात आढळतात . catalist ,binder याप्रमाणे समाजातील अनेक घटकांना जोडणारा , अगदी तळागाळातील व्यक्तिपासून ते थेट राजप्रासादातील चक्रवर्ती साम्राटापर्यंत प्रत्यक्ष संवाद साधणारे नारद .  राजाची कर्तव्ये , कार्य , व्यवस्था , शत्रू-मित्र बोध आदी उपदेश करून समाजातील घडामोडींवर त्याचे लक्ष वेधणारे नारद आणि त्यासारखी अनेक व्यक्तिमत्वे आढळतात . ज्ञानोपदेश करणारे ऋषि मुनी किवां सन्यासी समूह किवां भक्तांच्या टोळ्या, श्रीज्ञानदेवांच्या भाषेत “ ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भू मंडळी भेटतु भूता “ . संपर्काची साधने नसलेल्या प्रचंड विस्तार असलेल्या भारताला जागृत जीवंत ठेवण्याचे काम अव्याहतपणे शतकानुशतके चालत राहिले ती अशी सुंदर व्यवस्था जगात अन्यत्र दिसेल काय ?

उत्तुंग आदर्श – श्रीराम

भारताचा इतिहासातील सामाजिक , राजकिय आणि व्यक्तिगत व्यवहारातील व्यवस्थेचा अत्युच्य  आदर्श म्हणजे दशरथनंदन श्रीरामचंद्र . सर्वकालिक, सर्वमान्य अशी श्रीरामकथा भारतीय जीवनातील आदर्शाचे मानक मानावे असे आहे . मनुष्याने व्यवहारात किती पारदर्शी राहावे , सबंध, नातीगोती , स्त्री दाक्षिण्य , मित्र –मित्रता, गुरुजानाचा आदर , गुरुकुलातील शिक्षण , विद्या ग्रहण , सर्वोच अस्त्र शस्त्रांचे विद्या ग्रहण करून मिळवलेली शस्त्र सज्जता-संपन्नता , प्रजेवर पुत्रवत प्रेम करण्याची मानसिकता आपल्याला ठळकपणे दिसते . ग्रामीण, वनवासी, दुर्बलांचा स्नेह तेवढ्याच आत्मीयतेने स्वीकारणे , आपल्या सोबतीने त्यांना समर्थ करणे आणि यातून अशक्य प्राय वाटणारी गोष्ट म्हणजे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेना उभारणे , मार्गात अडथळा ठरणाऱ्या सागरावर त्यासाठी रामसेतू उभारणे हि काही दशकापूर्वी कपोल -कल्पना वाटणारे पण नासाने वैज्ञानिक आधाराने सिद्ध केलेले वास्तव/ सत्य आजही रामकथेचा इतिहास जगाला मान्य करायला भाग पाडते .

रावण हा जरी जन्माने ब्राम्हण असला तरी आपल्या भोगवादी कर्माने असुर झाला . विषयांचा अतिरेकी उपभोग घेणे , भारतावर आक्रमण करून आर्य संस्कृतीला नष्ट करण्याचे प्रयत्न करणे . शांतपणे वनात ,ग्रामात राहणाऱ्या यज्ञ -याग ,वेद पालन करणाऱ्या ऋषि समूहांना आणि साधारण ग्रामस्थांचा छळ करणे , त्यांना शांततामय सहजीवनास अडथळा आणणे , कार्य करण्यापासून रोखणे  आणि त्यांना प्रदेश सोडून पलायन करण्यास भाग पाडणे . दक्षिण भारतातवर छुपे आक्रमण करून मारीच ,तारका यासारखे असुर प्रवृत्तीचे लोक नेमणे यासारखे अपराध या असुर रावणावर होतेच . माता सीतेचे अपहरण हे पाप असुर संस्कृतीच्या विनाशाचे कारण ठरले .

आक्रमण –

श्रीरामाने लंकेवर केलेले आक्रमण हे शत्रू प्रदेशात घुसून केलेला प्रचंड मोठा सर्जिकल strike होता . गिरीजन , वनवासी असलेल्या सुग्रीवासारख्या हतप्रभ समाजाची सेना उभारून त्यांना शक्ती संपन्न करणे हे मोठे अद्वितीय असे कार्य होते . परमभक्त झालेल्या वीर हनुमंता आपलंसं करून त्याकरवी अनेक कठीण कार्य करवण्याचे आणि बंधु लक्ष्मणाच्या पराक्रमाचा यथोचित सन्मान करीत लंका विजयाचे श्रेष्ठ कार्य करून तेथे बिभीषणाच्या रूपाने आर्य संस्कृतीच्या प्रस्थापनाचे अलौकिक कार्य श्रीरामचंद्रांनी करून दाखविले .

भारताच्या इतिहासातील हे सर्वोत्तम कार्य ठरते . दुष्टांचा समूळ विनाश होणे अत्यंत गरजेचे आहे . त्यांना माफ करून, तह करून सोडून देणे म्हणजे विषवल्ली वरवर नष्ट करून पुन्हा जिवंत होऊन आपल्यालाच  धोका झाल्याची  अनेक उदाहरणे भारतीय इतिहासात पृथ्वीराज चौहानच्या रुपात अनेक आढळतात . दुष्टांचा समूळ विनाश हे धर्म कार्य आहे हे श्रीरामकथा आपल्यास सांगते . आणि म्हणून आजही श्रीराम तेवढेच प्रासंगिक आहेत . आपला धर्म आपली संस्कृती वाचवायची असेल तर श्रीरामासरखेच कार्य करावे लागेल आणि म्हणून असुर कुलाच्या रावणाचा विध्वंस करणाऱ्या अयोध्यापती श्रीरामाच्या रामराज्याचा आदर्शाचा आग्रह हा करावाच लागेल आणि त्यासाठी श्रीरामचंद्राच्या विग्रहाचा आग्रह !

वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं , राघवं रावणारिम |

  • प्रसाद अनंत बरवे ,नागपूर

72760 51697