धन्यवाद, डॉ. प्रणबदा!

आपल्याच लोकांच्या तीव्र विरोधानंतरही माजी राष्ट्रपती डॉ. प्रणब मुखर्जी संघाच्या कार्यक्रमासाठी नागपूरला आलेत आणि संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झालेत, यासाठी त्यांचे विशेष अभिनंदन आणि धन्यवाद!

ते डॉ. केशवराव बळिराम हेडगेवार यांच्या घरीही गेलेत आणि तिथे त्यांनी आपल्या भावना अगदी स्पष्ट शब्दात लिहून व्यक्त केल्यात. स्मृतिमंदिरात जाऊन डॉ. हेडगेवार आणि श्री गुरुजी यांच्या समाधीला अभिवादन केले आणि कार्यक्रमात आपल्या मनातील विचार स्पष्टपणे मांडलेत. या सर्व कार्यक्रमात ते अत्यंत मोकळेपणाने वावरलेत. कार्यक्रमाच्या आधी संघाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांशी तसेच  इतर विशेष अतिथींशी परिचयाचा कार्यक्रम होता. नागपूरचे संघचालक विशेष अतिथींचा परिचय करून देणारच होते, तेवढ्यात प्रणबदांनी म्हटले की प्रत्येक जण आपापला परिचय देतील आणि स्वत: उभे राहून सांगितले- ‘‘मी प्रणब मुखर्जी.’’ त्यांचा हा मोकळेपणा सर्वांना खूप भावला.

प्रणबदांनी आपले भाषण इंग्रजीत लिहून आणले होते. सरसंघचालक श्री. मोहनराव भागवत यांचे भाषण हिंदीत होते. दोन्ही भाषणे म्हणजे ‘एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति।’चे उत्कृष्ट उदाहरण होते. दोघांनी वेगवेगळ्या शब्दांत जवळपास एकच विचार मांडला. प्रणबदांनी हे स्पष्ट केले की, पश्‍चिमेकडील राज्याधारित राष्ट्राची संकल्पना आणि भारतीय जीवनदृष्टीवर आधारित राष्ट्राची भारतीय संकल्पना वेगवेगळ्या आहेत.

त्यांनी 5000 वर्षांच्या अविरत सांस्कृतिक प्रवाहाचा उल्लेख केला. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आणि ‘सर्वे भवन्तु सुखिन:’च्या परंपरेच्या विचारांचा पुनरुच्चार केला आणि सहिष्णुता, विविधता, सेक्युलॅरिझम (पंथनिरपेक्ष समानता) आणि संविधानाबाबत आपली मते मांडली.

मोहनराव भागवत यांच्या भाषणाचाही हाच भाव होता; परंतु शब्द जरा वेगळे होते. त्यांनी सहिष्णुता (Tolerance) शब्दाऐवजी सर्वांच्या समावेशाचा विचार ठेवला. त्यांनी म्हटले, कुठल्याही भारतीयाला कुठलाही इतर भारतीय परका होऊ शकत नाही. कारण, सर्वांचे पूर्वज समान आहेत. रिलिजन, भाषा किंवा वंश या आधारावर नाही, तर जीवनदृष्टी आणि जीवनमूल्यांच्या आधारावरच भारताचे राष्ट्रजीवन विकसित झाले आहे आणि हाच भारतीय राष्ट्रजीवनाचा आधार आहे- हे दोघांनीही सांगितले.

मोहनराव भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले- संघ संघच राहील आणि प्रणबदा प्रणबदाच राहतील.

प्रणबदा आणि मोहनराव भागवत या दोघांच्या भाषणात भारताच्या 5 हजार वर्षांपासूनच्या प्राचीन सर्वसमावेशक (plural), वैविध्यपूर्ण (diverse) आणि जगाला परिवार मानणार्‍या जीवनदृष्टीचा व परंपरांचा गौरवपूर्ण उल्लेख झाला आहे. हीच जीवनदृष्टी आणि मूल्ये आपल्या भारताच्या संविधानातही अभिव्यक्त झाली आहेत. म्हणून हे संविधान आमचा वारसा आहे. पाकिस्तानचे (जो कधी काळी भारताचाच एक भाग होता) संविधानही भारताच्या संविधानासोबतच तयार झाले. परंतु, त्यांच्या संविधानात या उदारतेची, सर्वांना सामावून घेणारी, विविधतेचा उत्सव साजरा करणारी बाबनाही. आता प्रश्‍न असा आहे की, दोन्ही एकाच समाजाचे आणि देशाचे भाग होते, मग असे का झाले? याचे कारण, भारताच्या अध्यात्मावर आधारित एकात्म व सर्वांगीण जीवनदृष्टीत दडले आहे. या जीवनदृष्टीला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् आणि गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी हिंदू जीवन दृष्टी (Hindu View of Life) असे म्हटले आहे. पाकिस्तानने या जीवनदृष्टीला नाकारले; भारताने मात्र स्वीकारले.

ही उदार जीवनमूल्ये आमच्या प्राचीन एकात्म व सर्वांगीण जीवन दृष्टीचा परिणाम आहेत. ही मूल्ये आम्हाला संविधानामुळे नाही, तर संविधानाद्वारे मिळाली आहेत. These liberal, plural values have not come us from our constitution, but through our constitution.

खलिल जिब्रानची ‘तुमची मुले’ नावाची एक कविता आहे. त्यात ते म्हणतात-

तुमची मुले, तुमची मुले नाहीत.

ती जीवन जगण्याच्या अदम्य इच्छेची अभिव्यक्ती आहेत.

ती तुमच्यातून आलेली नाहीत, उलट तुमच्या माध्यमातून आली आहेत.

आणि ती तुमच्याजवळ आहेत, पण तुमची त्यांच्यावर मालकी नाही.

आमचे संविधान असे आहे म्हणून आम्ही असे आहोत, असे नाही. उलट, आम्ही शतकानुशतके असे राहात आलोत म्हणून आमचे संविधान असे आहे. त्याचा सन्मान आणि पालन सर्वांना करायचे आहे. संघाने हे नेहमीच केले आहे. स्वतंत्र भारतात घोर अन्यायपूर्वक लादण्यात आलेल्या दोन्ही बंदींच्या काळात, संविधानसंमत मार्गाने जे सत्याग्रह झालेत, ते स्वतंत्र भारताच्या इतिहासात अभूतपूर्व, देशव्यापी, शांतिपूर्ण आणि अनुशासित होते. असा इतर कुठल्याही पक्षाचा अथवा संघटनेचा इतिहास नाही. संघाला संविधानविरोधी, लोकशाहीविरोधी, हिंसक म्हणत तसा प्रचार करणार्‍या कुठल्याही संघटनेचे किंवा पक्षाचे, संविधान लागू झाल्यानंतर संघाच्या सत्याग्रहासारखे व्यापक, शांतिपूर्ण आणि अनुशासित असे आजपर्यंत एकही उदाहरण नाही. याच्या उलट, संविधानाला पायदळी तुडवत हिंसेचा मार्ग स्वीकारणारे, आपल्याच सुरक्षा दलांवर भ्याड सशस्त्र हल्ला करणार्‍यांची बाजू घेणारे, त्यांना समर्थन देणारे लोक, संघालाच संविधानाचा उपदेश देताना दिसून येतात.

गेल्या 2 एप्रिलला विशिष्ट हेतून केवळ भाजपाशासित सहा राज्यांमध्येच घडवून आणलेल्या ‘भारत बंद’च्या काळात, विना कुणाच्या भडकविण्याने झालेल्या अनपेक्षित हिंसेच्या समर्थनार्थ राहुल गांधीसहित सर्व सेक्युलर-लिबरल नेते उघडपणे उभे होते. ही आहे यांची संविधाननिष्ठा!

प्रणबदांच्या भाषणानंतर, संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याला विरोध करणार्‍यांच्या प्रतिक्रिया देखील खासच होत्या. या प्रतिक्रिया, भारताच्या राजकीय व वैचारिक क्षेत्रात कम्युनिस्टांच्या प्रभावाचे तसेच त्यांच्या वर्चस्वाचे स्मरण करून देणार्‍या होत्या. त्यांची विचारधाराच अभारतीय असल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेतही उदारता आणि सहिष्णुतेचा अभाव असणे स्वाभाविकच होते. त्यांनी म्हटले- प्रणबदांनी संघाला आरसा दाखवला. संघाच्या मंचावरून सेक्युलॅरिझम आणि नेहरूंच्या नावाचा उच्चार केला, इत्यादी… इत्यादी… परंतु, लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, प्रणबदांच्या नागपूरला येण्याला विरोध करणार्‍यांपैकी कुणीही मोहनराव भागवतांच्या भाषणावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. असेही असेल की, त्यांनी ते भाषण ऐकलेच नसावे. कदाचित त्यांना ते ऐकण्यास लायकही वाटले नसावे. कारण त्यांची वृत्तीच मुळात जड (Dogmatic) आहे.

आम्ही कुठलाही नवा विचार ऐकणार नाही!

आम्ही जे म्हणून तेच खरे!

आम्ही बरोबर, तुम्ही चूक!

या विचारांचा हा वर्ग आहे. कदाचित या लोकांसाठीच, जॉर्ज ऑरवेलने (कम्युनिस्टांची एकाधिकारशाही आणि दांभिकता उघड करणार्‍या) आपल्या अ‍ॅनिमल फॉर्म या कादंबरीत म्हटले आहे- ‘चार पाय चांगले; दोन पाय वाईट. (Four legs good, two legs bad). अशात ‘दोन पाय’वाल्यांचे विचार ऐकणेही ईशनिंदाच (Blasphemy) झाली की!

लक्षात घ्या, सर्वसमावेशकतेत सहिष्णुता अंतर्निहित आहे आणि त्यात असहिष्णू आचरण करणार्‍यांचाही समावेश आहे. परंतु, हे त्यांना समजत नाही. हिंदुत्व ‘वसुंधरा परिवार हमारा’ हे मानतो. परंतु, हे ‘चार पायच चांगले’ मानणारे स्वत:च्या अज्ञानरूपी अंधारातच राहू इच्छितात. यांच्या सार्‍या नकारात्मक लेखनात कुणीही आपले स्वत:चे अनुभव मांडत नाहीत. कारण हेच की, संघाच्या जवळ जाणेही यांच्या दृष्टीने परंपरेशी बंड, महापराध, ईशनिंदे प्रमाणे आहे. अशात, सरसंघचालक काय म्हणत आहेत, हे ऐकण्याचा तर प्रश्‍नच उद्भवत नाही.

काही महिन्यांपूर्वी माझी आगर्‍यातील एका ख्रिश्‍चन कुटुंबाशी भेट झाली. त्यांनी संघाबाबत खूप प्रश्‍न विचारले. संघाच्या निकट येऊन अनुभव घेतला. आता एखादा ख्रिश्‍चन संघाला ख्रिश्‍चनविरोधी म्हणत असेल तर, हे दाम्पत्य त्यांना तीन प्रश्‍न विचारतात-

-हा तुमचा स्वत:चा अनुभव आहे का?

-तुम्ही कधी संघाच्या एखाद्या प्रमुख व्यक्तीला भेटलात का?

-तुम्ही संघाचे एखादे साहित्य वाचले का?

सर्व प्रश्‍नांची उत्तरे नकारात्मक येतात. आगर्‍याला माझा प्रवास असताना, या कुटुंबाने माझा मुक्काम आग्रहाने त्यांच्या घरी ठेवला होता. स्थानिक बिशपसोबत माझी अनौपचारिक भेटही करवून दिली. आम्ही बिशपांच्या कार्यालयात गेलो. छान चर्चा झाली. परंतु, असा मोकळेपणा आणि स्वच्छ मन या संघविरोधकांजवळ कुठे आहे?

आणिबाणीच्या काळात एक मराठी कविता वाचली होती.

सरावाच्या नकाराला होकाराचे भान नसते

सरावाच्या होकारात नकाराला स्थान नसते…

याच धर्तीवर असे म्हणता येईल-

आमच्या सर्वसमावेशकतेत या असहिष्णूंना तर स्थान आहे,

परंतु, या असहिष्णूंची सहिष्णुता सर्वसमावेशकतेला सहन करू शकत नाही.

सरसंघचालक आपल्या प्रवासात समाजातील प्रभावशाली लोकांना भेटत असतात. एका सुप्रसिद्ध उद्योगपतीने एका भेटीत, हिंदू ऐवजी भारतीय शब्द वापरण्याची सूचना केली. तेव्हा श्री. मोहनराव भागवत यांनी म्हटले की, आमच्या दृष्टीने दोन्ही शब्दांमध्ये फार काही गुणात्मक फरक नाही. परंतु, भारत शब्दासोबत एक प्रादेशिक संदर्भ येतो, उलट हिंदू शब्द पूर्णत: गुणात्मक आहे. म्हणून पाकिस्तानात जन्मलेले तारेक फतेह देखील स्वत:ला हिंदू म्हणू शकतात आणि ते म्हणतातही. म्हणून तुम्ही भारतीय म्हणा, आम्ही हिंदू म्हणू, कुणी इंडिक म्हणतील. आम्ही हे समजून घेतले पाहिजे की आपण सर्व एकच मत मांडत आहोत. हेच आहे ‘एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति।’

परंतु ही बाब जडवादी आणि फॅसिस्ट कम्युनिस्टांना मान्य नाही. यांच्या टोळीत तुम्ही टॉलरन्स, सेक्युलर, नेहरू, मार्क्स या शब्दांचा वापर केला नाही आणि हिंदुत्वावर टीका केली नाही तर, तुम्हाला जगण्याचाही अधिकार नसतो. तेव्हा तर तुम्ही सहन करण्याजोगेही नसता. म्हणून कम्युनिस्टांच्या स्वर्गसमान केरळात, संघाचे काम करता म्हणून मार्च 1965 ते मे 2017 पर्यंत 233 संघ कार्यकर्त्यांच्या हत्या या कम्युनिस्टांनी केल्या आहेत आणि यात 60 टक्के कार्यकर्ते असे आहेत जे कम्युनिस्ट पक्ष सोडून संघात आले होते.

हिंदू राष्ट्राची सर्वसमावेशक सांस्कृतिक संकल्पना तुम्ही कितीही वेळा समजावून सांगितली तरी, कम्युनिस्ट आणि त्यांचे सहचर त्या संकल्पनेला संकुचित, विभाजक आणि विभेदकच (narrow, divisive, exclusive) म्हणणार. कारण तुम्ही तसेच आहात हे त्यांनी ठरविले आहे. ही मंडळी अनेक वर्षांपूर्वीचे एखादे जुने पत्र, एखादा लेख, एखादी प्रतिक्रिया निवडून (selective) काढून संदर्भाशिवायच त्यावर लिहितील. संघाच्या विविध पदाधिकार्‍यांनी या सर्व वर्षांमध्ये काय म्हटले आहे, ते कधीही ऐकणार नाहीत. कारण एकच आहे, ‘दोन पाय वाईट असतात’.

परंतु, त्यांनी डोळे झाकले असले तरी, आजही संघात मुस्लिम व  ख्रिश्‍चन स्वयंसेवक, प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत, हे वास्तव काही बदलणार नाही. हिंदू असल्यामुळे आम्ही मतांतरणावर (धर्मांतर) विश्‍वास ठेवत नाही. म्हणून हे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षांपासून स्वयंसेवक असूनही, आपापल्या ख्रिश्‍चन किंवा मुस्लिम उपासनेचेच अनुसरण करत आहेत. 1998 साली विदर्भ प्रांताचे महाशिबिर झाले. तीन दिवसांसाठी 30 हजार स्वयंसेवक पूर्ण गणवेषात तंबूंमध्ये राहिले. असे शिबिर साधारणत: शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशीच होतात. शनिवारी उपवास असणार्‍या कार्यकर्त्यांची उपवासाची वेगळी व्यवस्था करण्यासाठी त्यांची संख्या घेतली गेली. तेव्हा लक्षात आले की, तो रमजानचा महिना होता आणि काही स्वयंसेवक रोजा ठेवणार आहेत. रोजा सोडण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांची संख्या गोळा करण्यात आली. रोजा ठेवणार्‍या त्या 122 स्वयंसेवकांसाठी उशिरा रात्री रोजा सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी रमजान महिना नसता तर, शिबिरात रोजा ठेवणारे कुणी स्वयंसेवक आहेत, याचा पताच लागला नसता.

या उदार, लिबरल, सेक्युलर नेत्यांची वक्तव्ये लक्षपूर्वक वाचाल तर यांचे भारताच्या परंपरागत स्वभावाच्या अगदी विपरीत असे लोकशाहीविरोधी, संकुचित, कट्टर, सांप्रदायिक, क्षुद्र व्यक्तिमत्त्व तुमच्या लगेच लक्षात येईल. प्रणबदा संघाच्या कार्यक्रमात आल्यामुळे यांचा बुरखा पुन्हा एकदा उतरला आहे. हे म्हणतात की, प्रणबदांनी संघाला आरसा दाखविला. संघ तर प्रत्येक वर्षी चिंतन बैठकीत आणि प्रतिनिधी सभेत स्वत:ला आरशात बघत असतो. आपल्या कार्याचे, मार्गाचे, कार्यपद्धतीचे सिंहावलोकन, आत्मावलोकन, मूल्यांकन करतच असतो. सोबतच आवश्यक परिवर्तनही करत पुढे मार्गक्रमण करीत असतो. आता एवढ्यातच एप्रिल महिन्यात पुण्यात अशीच एक चिंतन बैठक झाली. परंतु, स्वत:ला प्रगतिशील म्हणवणारे परंतु मुळात रूढीवादी असलेले, तसेच स्वत:ला उदार म्हणविणारे परंतु मुळात कट्टर असहिष्णू असणार्‍या या लोकांच्या डाव्या-सेक्युलर संघटना स्वत:चा चेहरा आरशात कधी बघणार? जर बघतील तर त्यांच्या लक्षात येईल की, त्यांचा बुरखा अनेक जागी फाटला आहे आणि त्यातून त्यांनी लपवलेला त्यांचा सांप्रदायिक, संकुचित, कट्टर, असहिष्णू मूळ चेहरा सर्वांना दिसत आहे. लोक हे सर्व बघत आहेत आणि म्हणून जनता यांना सर्व प्रकारे नाकारतही आहे.

एक गंमत म्हणून सांगतो- प्रणबदांच्या संघाच्या कार्यक्रमात येण्याला जो अलोकतांत्रिक पद्धतीने कडाडून विरोध झाल्या, त्यामुळे देश-विदेशातील सर्व वृत्तवाहिन्यांनी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले. त्यातून संघाला केवळ समजून घेण्याचीच नाही तर, प्रत्यक्ष बघण्याचीही संधी जगभरातील दर्शकांना मिळाली. यासाठी तरी या विरोध करणार्‍यांना धन्यवादच द्यायला हवेत. 1 ते 6 जूनपर्यंत संघाच्या वेबसाईटवर ‘जॉईन आरएसएस’च्या दररोज सरासरी 378 रिक्वेस्ट येत होत्या. 7 जूनच्या कार्यक्रमाच्या दिवशी ही संख्या 1779 इतकी होती. यासाठी देखील या सर्वांना धन्यवादच द्यायला हवेत.

… … …