vatpornima-c naik

वटपौर्णिमा आणि आम्ही

वटपौर्णिमा उद्यावर आली आणि आपल्या परंपरांची, विचारधारेची आणि कर्मकांडांची खिल्ली उडवण्याची प्रसार माध्यमांवर गडबड सुरु झाली. अशा पोस्टना ऊतच आला म्हणाना! मग त्यात काही विचार आहे का? तो आपल्याला पटतो का? तो योग्य आहे का? —– छे छे! आम्ही न वाचताच, न विचारकरताच कॉपी पेस्ट करतो. फॉरवर्ड करतो. आणि मग नटून थटून भारी भारी साड्या आणि दागदागीन्यांना मिरवायला वडावरही जातो. वड जवळ नसेल तर त्याची कोणीतरी पैसे कमावण्याच्या उद्देशाने तोडून आणलेली फांदी (अशा अनेक फांद्या अनेक जण तोडून आणून विकतात.) विकत घेऊन तिची पूजा करतो. एकीकडे पूजा करतो आणि दुसरीकडे “काय करायचाय एकच एक नवरा सात जन्म” असेही मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये आपले पुरोगामित्व सिद्ध करायला आणि हशा व टाळ्या मिळवायला बडबडतो.

आज मला आठवतोय वंदनीय मावशी केळकर (राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका व पहिल्या प्रमुख संचालिका) यांच्याशी झालेला आम्हा तरुणींचा एक संवाद. त्यावेळी बाहेर वाहणारे स्त्रीपुरुष समानतेचे वारे आमच्याही कानात भरत असे. त्यामुळे या आपल्या प्रमुख संचालिका आहेत, आपल्याला त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानायला हवी असले कोणतेही दडपण येऊ न देता आम्ही त्यांच्याशी बोलत असू. “पुरुष तर कोणतेही व्रत करत नाहीत. त्यांना, ही एकच बायको जन्मोजन्मी हवी आहे का? मग त्यांना नको असेल तर आम्ही अशी व्रत वैकल्ये करून त्यांना जबरदस्तीने कशाला बांधून ठेवायचे?” असे त्याकाळात “आचरट” वाटणारे प्रश्न आम्ही मावशींना बिनधास्त विचारत असू. आम्ही म्हणण्यापेक्षा “मी” म्हणायला हवे. करण माझ्या इतकी बिनधास्त दुसरी कोणी नसावी.

आता यापुढे मी जे लिहिणार आहे, ते वंदनीय मावशींचे विचार आहेत. भाषा माझी असली तरी. आज पन्नास वर्षांचा काल उलटून गेला आहे. त्यामुळे त्याच शब्दात मी सांगू शकणार नाही. पण अजून स्मरणशक्ती साथ देतेय तोवर हे लिहून काढावेच असे मनात आले, म्हणून हा लेखन प्रपंच.

“समितीची स्थापना करण्यापूर्वी मी महात्मा गांधींची प्रवचने ऐकायला जात असे.” मावशी तेव्हा वर्ध्याला होत्या. त्यामुळे सेवाग्रामला गांधीजींच्या आश्रमात जात असत.

त्या म्हणाल्या, “एकदा मी त्यांना विचारले, ‘तुम्ही महिलांना सीतेचा आदर्श ठेवायला सांगता, मग पुरुषांना रामाचा आदर्श ठेवायला का सांगत नाही?’ त्यावर ते म्हणाले, ‘पत्नी जर सीतेसारखी असेल तर पुरुष आपोआप राम बनेल.’ तेव्हापासून मी आपल्या व्रत वैकल्यांचा विचार वेगळ्या अंगाने करू लागले”

स्त्री ही राष्ट्राची आधाराशाक्ती हे संघटनेचे सूत्र त्यातूनच त्यांना गवसले.

एकदा त्या म्हणाल्या, “आपण सीता स्वयंवर, द्रौपदीचे स्वयंवर असे म्हणतो. पण या दोघींच्या विवाहासाठी त्यांच्या पित्यांनी पण ठेवले होते. शिव धनुष्याला रामा ऐवजी दुसऱ्या कोणी बाण लावला असता, तर सीतेला त्याच्याशी विवाह करावा लागला असता. अर्जुनाने मात्स्यभेद न करता दुसऱ्या कोणी केला असता, तर द्रौपदीला त्याच्याशी विवाह करावा लागला असता. पण आपल्याकडे खऱ्या अर्थाने प्राचीन काळी दोनच स्वयंवरे झाली. एक नळाच्या दमयंतीचे व दुसरे सावित्रीचे. दमयंतीच्या वडिलांनी देशोदेशीचे राजे बोलावून त्यातून तिला आपल्या पतीची निवड करायला सांगितली. पण सावित्रीच्या वडिलांनी तिच्या बरोबर काही प्रतिष्ठित नागरिक देऊन तिलाच वरसंशोधन करायला पाठवले. का पाठवले असेल, तिला त्यांनी असे? करण आहे सावित्रीची बुद्धिमत्ता. ती अतिशय बुद्धिमान स्त्री होती. आपल्याला काय हवे आहे, हे तिला नक्की माहित होते. आणि तिने सत्यवानाला निवडले. जो राजपुत्र असून वनात आपल्या अंध मातापित्यांबरोबर राहतोय, कारण त्याचे राज्य दुसऱ्याने बळकावले आहे, अशा मुलाबरोबर आपल्या कन्येने विवाह करावा, हे सावित्रीच्या वडिलांना आवडले असेल का? तिचा विवाह त्यांनी सत्यावानाशी करून दिला याचा एक अर्थ निश्चित आहे की त्यांचा आपल्या लेकीच्या बुद्धिमत्तेवर विश्वास होता.

आपण ऐकले आहे की त्याच्या वडिलांचे राज्य हिरावून घेण्यात आले होते आणि ते अंध होते. “अंध होते” याला सांकेतिक अर्थ आहे. शत्रूने पराजित केल्यावर ते वनवासात एकांतात रहात होते. आपल्या राजधर्मापासून, कर्तव्यापासून च्युत झाले होते. म्हणजे प्रजेवर होणाऱ्या अत्याचारांकडे न पाहता, त्यांनी डोळ्यांवर कातडे ओढून घेतले होते.

सत्यवान अल्पायुषी आहे . म्हणजे काय? त्याने त्याचे आयुष्य आपल्या माता-पित्याच्या सेवेपुरते मर्यादित करून घेतले होते. एका शूर वीर राजपुत्राचे हे मर्यादित जगणे, म्हणजे त्याची मृत्यूच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल होती.

सत्यवान सावित्रीच्या या आगळ्या वेगळ्या सहजीवनाबद्दल आपली पुराणे मूक आहेत. आपल्याला एकदम सत्यवान वडाच्या झाडाखाली मृत होऊन पडला. सावित्रीने यमाशी वादविवाद केला व आपल्या पतीचे प्राण परत मागितले इतकेच माहित आहे. यमाने सावित्रीला वर मागायला सांगितले. काय मागितले तिने? सर्वप्रथम आपल्या सासू-सासऱ्यांचे डोळे मागितले. डोळे म्हणजे काय? दृष्टी. त्यांना आधी दृष्टी मिळणे आवश्यक होते. तर त्यांचे राज्य परत मिळेल. मग मागितले १०० पुत्र! त्यासाठी सत्यवान जिवंत होणे आवश्यक होते. म्हणजे काय? शंभर पुत्र कसे होणार? हे पुत्र म्हणजे शंभर शूर वीर योद्धे, जे त्यांचेच प्रजाजन होते.

आता थोडा विचार करू. सत्यवान मृतवत झाला होता. लग्नानंतर वर्षभरात सावित्रीने जे काही व्रत केले ते हे होते. त्याला तो कोण आहे याची जाणीव करून दिली. संघटन करायला लावले. लोक एकत्र केले. जनजागृती केली. आणि आपल्या श्वशुरांचे गेलेले राज्य परत मिळवले, फक्त मृतवत झालेला आपला पतीच नाही तर सर्व प्रजेमध्ये प्राण फुंकले. म्हणू तिची आठवण करायची. वडाचे झाड हे सुद्धा प्रतीकच. त्याचे बीज पाहिले आहे? सूक्ष्म बीजातून इतका प्रचंड मोठा वृक्ष निर्माण होतो. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोचतात, जमिनीत जातात आणि त्यातून नवीन वृक्ष निर्माण होतो, पण तोही आधीच्या मूळ वृक्षाला धरूनच. भारतीय संस्कृतीचे इतके चांगले प्रतिक कुठे सापडेल? पिढ्यानपिढ्या एकमेकांना धरून राहणारी माणसे इथेच आहेत. म्हणून त्या वटवृक्षाची पूजा पूजा करायची.”

वंदनीय मावशींनी हे सगळे सांगितले.

वडाची पूजा करायची म्हणजे वडाची झाडे लावायची. त्याच्या शीतल सावलीचा अनुभव घ्यायचा. आपण काय करतो? असलेल्या वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून त्याला जीर्ण करतो.

आमच्या कॉलनीत नुकतेच एक सुंदर गणेश मंदीर बांधण्यात आले. त्याच्या प्रांगणात वडाचे झाड लावण्यात आले. आता अनेक महिला त्या झाडाच्या भोवती दोरे गुंडाळतात. पूर्वी कापसाचे सूत असे. ते कालांतराने विरत असे. पण आता नायलॉन मिश्रित पक्के धागे असतात. गेल्या ३-४ वर्षातले गुंडाळलेले सूत अजून तसेच आहे. त्यावर पक्क्या दोऱ्याचे नवीन थर चढत आहेत. झाडाच्या खोडाची वाढ थांबून आता ते विचित्र होऊ लागले आहे. असे वटवृक्ष या पद्धतीने पूजणे म्हणजे आपल्या व्रतांची खिल्ली उडवणे आहे, असे मला वाटते. मुळात वडाची झाडे लाऊन प्राणवायूचा पुरवठा जपणे हा उद्देश होता. परवाच्या निसर्ग चक्री वादळात अनेक मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले. पण माझी खात्री आहे की ज्याच्या पारंब्या जमिनीत रुजल्या आहेत असे वटवृक्ष डौलाने उभे असतील. वादळवाऱ्याला तोंड देत ठामपणे उभे राहणे हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. वटवृक्ष हे त्याचे प्रतिक. या सांस्कृतिक वारशाची आठवण म्हणून विविध व्रतवैकल्ये. अंध, मृतवत कुटुंबाला समर्थपणे उभे करायचे काम सत्यवानाच्या सावित्रीने केले. आज कोरोनारूपी वादळाचा सामना आपल्याला करायचा आहे. माझा नवरा, माझे कुटुंब, माझा समाज, माझे राष्ट्र येथून माझी वसुंधरा येथपर्यंत आपल्याला पोचायचे आहे. हे सगळे, माझे, माझे म्हणजे विश्वरूपी वटवृक्षाच्या पारंब्या आहेत. त्यांचे जतन करायचे म्हणजेच वटसावित्रीचे व्रत करायचे. ते सगळ्या करूया.

शुभं भवतु.

डॉ. छाया नाईक

नागपूर