व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण : विवेकानंद केंद्र विद्यालय

आज ११ सप्टेंबर शिकागो येथील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा स्मृतीदिन! शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी परमपवित्र भारतभूमीचे प्रतिनिधित्व केले. संपूर्ण भारतवर्षातील सनातन हिंदू वैदिक धर्माचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होतांना स्वामीजींच्या मनातील धर्माबद्दलची संकल्पना अत्यंत स्पष्ट होती व म्हणूनच त्यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. अमेरिकेतील माझ्या बंधू व भगिनींनो या आत्मीय शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने सर्वांची मने जिंकली. ११ सप्टेंबर १८९३ रोजी दिलेले हे भाषण ऐतिहासिक ठरले कारण स्वामीजींची अस्खलित वाणी, स्पष्ट विचार व आपल्या धर्मावर असलेली नितांत श्रद्धा! हिंदुस्थान ही पुण्यभूमी आहे, माझी मातृभूमी आहे व मला अभिमान आहे की संपूर्ण जगात परधर्माबद्दल सहिष्णुता तसेच जिव्हाळा याच भूमीत अनुभवता येतो, असे ठामपणे सांगून त्यांनी हिंदू धर्माची महती अत्यंत समर्पक शब्दात जगासमोर मांडली. म्हणूनच कुठल्याही धर्माची निंदा न करता अत्यंत प्रभावी शब्दात स्वधर्माची महती मांडणारे स्वामी विवेकानंद आपले प्रेरणास्थान आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेकांनी आपले जीवन राष्ट्रकार्याला समर्पित केले व आजही असे सेवाव्रती समाजात आहेत ज्यांनी परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण केले. श्री. एकनाथजी रानडे यांनी कन्याकुमारी येथील शिलास्मारकासाठी दिलेला प्रदीर्घ लढा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. अमरावती जिल्यातील टिमटाला या गावी मा. एकनाथजी रानडे यांचा जन्म झाला, पुढे नागपूर येथे शिक्षण सुरु असतांना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागले. मा. एकनाथजी रानडे हे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांने प्रेरित होऊनच संघकार्यात सहभागी झाले व ते नेहमी म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचाच विस्तार आहे. सेवेचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे राष्ट्र उभारणीत मदत करणे, धर्माधिष्टीत समाजाची रचना करणे कारण धर्म हा राष्ट्राचा आत्मा आहे. पुढे प्रचारकीय जीवन व संघाच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत असतांना त्यांच्यावर स्वामी विवेकानंद शीलास्मारकाची जबाबदारी आली. कन्याकुमारीतील मिशनरींचा विरोध, मार्गातील अनंत अडचणी यातून मार्ग काढत एकनाथजींनी अशक्य ते शक्य करून दाखविले. आज ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले त्या शिलाखंडावर बांधलेले भव्य स्मारक भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे स्मारक उभारायला तीन वर्षाचा कालावधी लागला व एक विशेष म्हणजे शेवटी या विवेकानंद शीलास्मारकासाठी संपूर्ण देश एकत्र आला.
स्मारक निर्माणाचे कार्य झाल्यावर मा. एकनाथजी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील नवभारत कसा निर्माण करता येईल यावर लक्ष केंद्रित केले. एकनाथजी यांच्या विचारातून व नियोजनबद्ध कामातून विवेकानंद केंद्राची १९७२ साली, स्वामी विवेकानंद यांच्या १०८ व्या जयंतीदिनी स्थापना झाली. स्वामी विवेकानंद यांचे स्वप्न एकनाथजींच्या माध्यमातून साकार होण्यास प्रारंभ झाला. विवेकानंद केंद्र हे प्रामुख्याने वैचारिक स्वरूपाचे आंदोलन असून याचा जन्म स्वामीजींच्या विचारातून झाला आहे हे केंद्राच्या कार्यातून स्पष्ट होते. पुढे मातृभूमीच्या सेवेसाठी जीवन समर्पित करण्यास तयार असलेल्या युवक – युवतींचे एकत्रीकरण करून त्यांना जीवनव्रती म्हणून प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. व्यक्तीनिर्माणातून सशक्त राष्ट्रनिर्माण अश्या संकल्पनेतून केंद्राचे शिस्तबद्ध काम सुरु झाले व आजही अविरत सुरु आहे. ज्यांच्या अंगी कर्तृत्व आहे असे स्त्री पुरुष आपल्या नियोजनबद्ध कामातून राष्ट्रनिर्माणाचे कार्य करू शकतात या विश्वासातून असे कार्यकर्ते जोडण्यात आले. आज अरुणाचल, आसाम, नागालँड, अंदमान, तामिळनाडू या भागात विवेकानंद केंद्राने एका बहुआयामी संघटनेचे रूप धारण केले आहे. “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हे विवेकानंद केंद्राचे बोधवाक्य आहे आणि याला अनुसरून केंद्राचे काम सर्वत्र सुरु आहे.
हिंदुस्थानातील उत्तर पूर्वांचल हा सीमाभाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे मात्र शिक्षणाच्या अभावाने विकसित होत नव्हता. तो सर्वार्थाने विकसित व्हावा यासाठी १९७७ साली या भागात विवेकानंद केंद्रातर्फे सात विवेकानंद केंद्र विद्यालये सुरु करण्यात आली. मा. एकनाथजी यांना वाटत असे की कुठल्याही राष्ट्राला प्रगती करायची असेल तर त्यातील अर्ध्या जनतेने म्हणजेच महिलांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. देशकार्यात हातभार लावण्यास स्त्रियाही सक्षम असतात मात्र त्यांना तशी संधी देणे आवश्यक आहे. वेदकाळात स्त्रियांना बंधने नव्हती तर देशावर झालेल्या सततच्या आक्रमणांमुळे स्त्रियांची सुरक्षा धोक्यात आली व त्यांचे क्षेत्र कुटुंबापुरते मर्यादित झाले. मात्र आता स्वतंत्र हिंदुस्थानात तसे होणे नाही, समर्पित स्त्री कार्यकर्ती, स्थानिक महिला व लहान मुलांमध्ये जास्त प्रभावीपणे काम करू शकते. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने कार्य सुरु केले. स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या विचाराने प्रेरित होऊन जे काम उभे झाले, त्या कार्याला मा. एकनाथजी रानडे यांनी सर्वदूर नेले व अशी समर्पित माणसे तयार झाली. अमरावतीतून सुरेखा वैद्य व अपर्णा पालकर या दोघींचे केंद्राच्या जीवनव्रती म्हणून कार्य उल्लेखनीय आहे व आता विवेकानंद केंद्राचे काम इतके वाढले आहे की विवेकानंद केंद्र विद्यालयात शिकणे हे प्रतिष्ठेचे समजल्या जाते. शाळांची संख्या देखील वाढती आहे, सध्या ७० पेक्षा जास्त शाळा त्या भागात झाल्या आहेत. अमरावतीसाठी सन्मानाची गोष्ट आहे की अमरावतीतील डॉ. अरुण शनवारे, श्री. रवींद्र मांडवेकर व मीनाताई पाळेकर यांनी या विवेकानंद केंद्र विद्यालयात सेवा दिली आहे. विवेकानंद केंद्र विद्यालयात शिकलेले विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर व सरकारी उच्चपदस्थ अधिकारी झाले आहेत. आसाम व अरुणाचल प्रदेश येथे विवेकानंद केंद्राच्या कामाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
आज शिकागो भाषणाच्या स्मृतीदिनाच्या निमित्याने अशाच एका समर्पित जीवनाचा परिचय आपण करून घेणार आहोत. विवेकानंद केंद्र विद्यालयात पूर्वी कार्यरत असलेल्या, अमरावतीच्या मीनाताई पाळेकर यांच्याशी संवाद साधण्याची मला सुवर्णसंधी लाभली. मीनाताईंनी १९८१ ते २००४ आसाम व अरुणाचल प्रदेश येथील विवेकानंद केंद्र विद्यालयात शिक्षिका म्हणून सेवा दिली. आपल्या अगदी आसपास राष्ट्रकार्याला समर्पित असे सेवाव्रती लोक राहतात व त्यांच्याशी बोलतांना जे अनुभव येतात ते या कार्याविषयीचा आदरभाव अधिक वाढविणारे असतात. मीनाताईंचे शिक्षण अमरावतीतील समर्थ विद्यालय व विदर्भ महाविद्यालय येथून झाले. वडील शिक्षक असल्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण होते व स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा साथीला होती. त्यांना आसाम व अरुणाचल प्रदेश येथील परिस्थितीची माहिती विवेकानंद केंद्राची जीवनव्रती म्हणून कार्यरत असलेल्या त्यांच्या मैत्रिणीकडून मिळाली. विवेकानंद केंद्र विद्यालयात सेवा देण्याची त्यांची इच्छा त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला बोलून दाखवली. पुढे त्या १९८१ मध्ये आसाम येथील तीनसुखिया येथील शाळेत रुजू झाल्या, तेंव्हा त्या अवघ्या २६ वर्षाच्या होत्या. त्यावेळी अमरावतीपासून तब्बल ४ दिवसांचा खडतर प्रवास करून आसाम, अरुणाचल येथील दुर्गम गावात पोहोचता येत होते. मीनाताई आठवणी सांगतांना म्हणाल्या एकाच प्रवासात बस, ट्रेन, ट्रक, रिक्षा, होडी यांचा त्यावेळी उपयोग करावा लागत असे व प्रसंगी कित्येक किलोमीटर पायी देखील चालावे लागत असे. १९८३ पर्यंत त्या तीनसुखिया येथे होत्या व नंतर त्यांना अरुणाचल प्रदेश येथील तापरागाव, जिल्हा लोहीत येथील शाळेत पाठविण्यात आले. त्यानंतर मात्र १९८३ ते १९९४ असा प्रदीर्घ काळ एकाच शाळेत असल्यामुळे त्यांचा आसपासच्या लोकांशी देखील उत्तम संवाद निर्माण झाला. तेथील लोक साधे, पटकन आपलेसे करून घेणारे व स्वभावाने गोड आहेत असे म्हणून त्यांनी तेथील लोकांच्या आदरातिथ्याचे व गोड भाषेचे आवर्जून वर्णन केले. मीनाताईंशी बोलतांना मीही शाळेच्या परिसरात आहे असे वाटत होते. प्रत्यक्ष कार्याचा अनुभव असलेले असे लोक समाजासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असतात. मीनाताई यांचा अनुभव बघून पुढे त्यांना केंद्रातर्फे पूर्व कामेंग जिल्यातील, सेजुसा येथे पाठविण्यात आले. विवेकानंद केंद्र विद्यालय, निवेदिता विहार ह्या सेजुसा येथील मुलींच्या शाळेत नेहमीच्या विषयांसोबत अनौपचारिक शिक्षण हा एक वेगळा प्रयोग मीनाताई यांनी यशस्वी केला. येथे मुलींनी आत्मनिर्भर व्हावे यादृष्टीने केनचे समान बनविणे, लोकरीपासून कारपेट तयार करणे, टायपिंग असे उपयोगी प्रशिक्षण देखील अभ्यासासोबत दिल्या जात होते. पुढे तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी वर्षभर सुट्टी घेतली मात्र अरुणाचल व आसाम मधील आठ महिने पावसाळी वातावरणाने मीनाताईंच्या तब्येतीवर थोडा विपरीत परिणाम झाला होता. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना पाहिजे तसे काम करणे शक्य होत नव्हते व म्हणून २००४ मध्ये त्यांना अमरावतीत परत यावे लागले. मीनाताई मुख्यतः इंग्रजी विषय शिकवायच्या व आतादेखील त्या अमरावतीत संस्कृत तसेच इंग्रजीचे वर्ग घेतात. या निमित्याने मी मुलांच्या संपर्कात राहते असे त्यांचे म्हणणे होते व हे ऐकून चटकन मनात विचार आला की एकदा समाजासाठी काहीतरी करण्याची आवड निर्माण झाली की व्यक्ती सातत्याने समाजकार्यात रममाण होतो. अजून एक महत्वाची गोष्ट मीनाताई यांच्याशी संवाद साधतांना जाणवली की अश्या सेवाकार्यात असणाऱ्या व्यक्ती कधीच प्रसिद्धीच्या मागे नसतात, संपूर्ण संभाषण झाल्यावर त्या मला म्हणाल्या तुमच्या लेखात माझे काही जास्त लिहू नका तर केंद्राचे काम मोठे आहे त्याबद्दल विस्तृत लिहा. ज्यांनी स्वतःच्या सुखाची पर्वा न करता दुर्गम भागात विद्यादानाचे पवित्र कार्य केले व व्यक्तीनिर्माणाच्या या राष्ट्रकार्यात आपल्या सेवेच्या समिधा अर्पण केल्या, अश्या मीनाताई पाळेकरांशी बोलतांना आसाम व अरुणाचल प्रदेश येथील केंद्राच्या कार्याची प्रचीती आली. जनता जनार्दनाची सेवा हे स्वामीजींचे आवाहन विवेकानंद केंद्राच्या कार्यातून पूर्णत्वास जाते आहे.
स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की आम्हाला अश्या हजारो युवक व युवतींची गरज आहे, जे जंगलातील वणव्याप्रमाणे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, उत्तरध्रुवापासून दक्षिणध्रुवापर्यंत सर्व जगभर पसरतील. चला उठा! एखाद्या वणव्याप्रमाणे जग व्यापून टाका. त्याग हा पूर्वी जीवनाचा नियमच होता व येणाऱ्या युगातही तो तसाच राहणार आहे. जगात जे सर्वात धाडसी आणि उत्तम असतात त्यांना सदैव दुसऱ्यासाठी त्यागच करावा लागतो. इतर अनेकांच्या सुखासाठी आणि कल्याणासाठी हा त्याग आवश्यकच आहे.
स्वामीजींचे ह्या विचारांनी प्रभावित होऊन समाजासाठी स्वतःच्या ऐहिक सुखाचा त्याग करून कार्यरत असणाऱ्या व्यक्ती सदैव सन्माननीय आहेत. आज स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रभावित होऊन समाजासाठी व राष्ट्रासाठी तन, मन, धनाने कार्य करणाऱ्या व्यक्ती हेच स्वामीजींच्या कार्याचे जिवंत रूप आहे. शिकागो येथील ऐतिहासिक भाषणात ज्या हिंदुभूमीचे वर्णन स्वामी विवेकानंद यांनी केले तिच्या निर्माणासाठी जीवन समर्पित करणाऱ्या सर्वांना त्रिवार वंदन!
सौ. प्राची पालकर
९८२३०४९१९८