भारताला ‘आपले’, तर जगाला नवे वाटणारे परिवर्तन

जग आणि खुद्द भारतदेखील एका नव्या भारताचा अनुभव घेत आहे. कारण, भारताच्या परराष्ट्र, संरक्षण तसेच आर्थिक धोरणात एक मूलभूत परिवर्तन झाले आहे. परराष्ट्र आणि संरक्षणविषयक धोरणांमध्ये आलेल्या परिवर्तनामुळे भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि मनोबल वाढले आहे. जगात भारताचा धाक चांगलाच वाढला आहे. अधिकाधिक देश भारताचे समर्थन करीत आहेत, तसेच त्याला सहयोग करण्यास उत्सुक दिसत आहेत. भारत संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य बनण्यापेक्षाही, या प्रस्तावाला 193 देशांपैकी 184 देशांनी समर्थन देणे अधिक महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या भारताच्या प्रस्तावालादेखील संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्व सदस्यांची मान्यता मिळाली होती. सौर ऊर्जेसह अनेक विषयांवर, जगातील अधिकांश देशांना एकजूट करण्यात भारताचा पुढाकार आणि भूमिका महत्त्वाची राहिली आहे. भारताने प्रगती करणे, तसेच शक्तिशाली व समृद्ध बनणे, हे संपूर्ण मानवता आणि पर्यावरणासाठी एक वरदान म्हणून सिद्ध होईल. कारण, भारताची वैश्‍विक-दृष्टी स्पर्धा नसून संवाद, संघर्ष नसून समन्वय आणि केवळ मानवसृष्टी नाही, तर संपूर्ण चराचर जगताचा एकात्म व सर्वांगीण विचार करणारी राहिली आहे. केवळ स्वत:चाच विचार न करणारा भारत हा जगातील अनोखा देश आहे. आमची सांस्कृतिक दृष्टीच तशी नाही.

आर्थिक धोरणात बरेच परिवर्तन आवश्यक आहे. परंतु, आर्थिक चक्र गतीने फिरत ठेवत, असे मूलभूत परिवर्तन करणे सोपेही नाही. सध्या तर कोरोना महामारीमुळे आर्थिक चक्र थांबल्यासारखेच झाले आहे. ही संधी साधून आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा करण्याची भारत सरकारची इच्छा दिसत आहे. परंतु, 70 वर्षांच्या अर्थव्यवस्थेचे पुनर्गठन (Realignment) करण्यासाठी हिंमत, दूरदृष्टी आणि निर्णयक्षमतेसोबतच धीराने सतत सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये आपल्या एकात्म, सर्वांगीण, सर्वसमावेशक मूलभूत वैश्‍विक-दृष्टीच्या प्रकाशात, वर्तमानातील संदर्भांचे भान ठेवत, युगानुकूल नव्या उपक्रमांचा स्वीकार करीत, योजना बनवाव्या लागतील. भारत आता या दिशेने पावले टाकत आहे. आता भारत ‘भारत’ म्हणून अभिव्यक्त होत आहे. खंबीरपणे पुढे जात आहे. सारे जग हे बघत आहे, अनुभवत आहे. हे परिवर्तन भारताला ‘आपले’, तर जगाला नवे वाटत आहे.

ज्या राष्ट्रीय जागृतीच्या अनेक दशकांच्या प्रदीर्घ प्रयत्नांचा परिणाम म्हणून हे मूलभूत परिवर्तन आले, त्या सामाजिक चेतनेला, वामपंथी आणि त्यांच्याद्वारा प्रेरित-पोषित पत्रकार तसेच लिबरल्स-विचारवंत मंडळींनी ‘राष्ट्रवादी’ असे नाव देत सतत विरोध केला आहे. खरे म्हणजे हे ‘राष्ट्रीय’ आंदोलन आहे; ‘राष्ट्रवादी’ नाही. ना ‘राष्ट्रवाद’ शब्द भारतीय आहे, ना ही त्याची संकल्पना. तो पश्‍चिमेतील राज्याधारित राष्ट्रापासून (Nation-state) उत्पन्न झालेला शब्द आहे. म्हणून तिथे ‘Nationalism’ अर्थात् ‘राष्ट्रवाद’ आहे. पश्‍चिमेच्या या ‘राष्ट्रवादा’नेच जगाला दोन महायुद्धे दिली आहेत. तेथील ‘राष्ट्रवाद’ भांडवलशाहीची देण आहे आणि साम्यवाद हा अति-राष्ट्रवाद (Super-nationalism) या श्रेणीत येतो. रशियाने आपल्या साम्यवादी विचारांना, कुठलाही प्रदीर्घ अनुभव नसतानाही, मध्य आशिया आणि पूर्व युरोपच्या देशांमध्ये कसे बळजबरीने थोपविण्याचा प्रयत्न केला, हे सर्वांनाच माहीत आहे. त्याचप्रकारे चीन देखील आपल्या विस्तारवादी वृत्तीने हाँगकाँग आणि दक्षिण आशियातील देशांवर कशाप्रकारे बळजबरी करीत आपला साम्राज्यवादी चेहरा दाखवत आहे, हेही सार्‍या जगात आता स्पष्ट झाले आहे. असा अंदाज आहे की, सहा देशांच्या 41 लाख चौरस किमी भूभागावर चीनचा कबजा आहे आणि 27 देशांशी त्याचा वाद सुरू आहे. म्हणूनच, जगातील अधिकांश देश चीनच्या साम्राज्यवाद किंवा अतिराष्ट्रवादाविरुद्ध एकजूट होताना दिसत आहेत.

भारतीय विचारांमध्ये ‘राष्ट्रवाद’ नाही, तर ‘राष्ट्रीयते’ची भावना आहे. आम्ही ‘राष्ट्रवादी’ नाही; ‘राष्ट्रीय’ आहोत. त्यामुळेच संघाचे नाव ‘राष्ट्रवादी स्वयंसेवक संघ’ नाही, उलट ते ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ असे आहे. आम्हाला कुठलाच ‘राष्ट्रवाद’ आणावयाचा नाही. भारताची राष्ट्राची संकल्पना, भारतीय जीवनदृष्टीवर (View of life) आधारित आहे. इथे ‘राज्याला’ नाही, तर लोकांना (People) राष्ट्र म्हटले आहे. विविध भाषा बोलणारे, अनेक जातींच्या नावाने ओळखले जाणारे, विविध देवी-देवतांची उपासना करणारे भारताचे सर्व लोक या अध्यात्मआधारित एकात्म, सर्वांगीण जीवनदृष्टीला आपली मानतात. आणि त्याद्वारे संपूर्ण समाज तसेच या भूमीशी स्वत:ला जुळलेले समजतात. आपल्या प्राचीन आर्ष-दृष्टीने सत्याचे दर्शन करून त्या सत्याला वर्तमान परिदृश्यात प्रस्थापित करीत तसे आचरण करणे म्हणजेच भारताच्या राष्ट्रीयतेचे प्रकट होणे आहे. आपली ही सामायिक ओळख आणि आमच्या आपापसातील बंधुभावाच्या नात्याला उघड करत, समाजाला आपलेपणाने देण्याचा संस्कार जागृत करणे म्हणजेच राष्ट्रीय भावनेची जागृती करणे आहे. समाज-जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हे ‘राष्ट्रत्व’ प्रकट होणे, अभिव्यक्त होणे म्हणजेच राष्ट्रीय पुनर्निर्माण आहे. हेच ‘राष्ट्रा’च्या स्वत्वाचे जागरण आणि प्रकटीकरण आहे. राष्ट्राच्या ‘स्वत्वा’चे प्रकट होणे म्हणजे निश्‍चितच ‘राष्ट्रवाद’ नाही.

चीनच्या विस्तारवादी आक्रमक वागणुकीच्या एवढ्यातील काही घटनांना भारताच्या प्रत्युत्तर आणि प्रतिसादावरून, वामपंथींनी असा प्रचार केला की हा भारताचा अति-राष्ट्रवाद (Super-nationalism) आहे. खरे म्हणजे, वामपंथ भारताच्या ‘स्वत्वा’ला कधी ओळखूच शकला नाही. सध्याच्या संदर्भात जे प्रकट होत आहे तो कुठला ‘राष्ट्रवाद’ नाही, उलट आतापर्यंत नाकारलेल्या, दाबण्यात आलेल्या भारताचे ते ‘स्वत्व’ आहे. कारण, भारताचा विचारच ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’चा राहिलेला आहे. म्हणून भारताची या ‘स्वत्वा’ची जागृती व आत्मनिर्भरतेच्या आधारावर त्याच्या शक्तिसंपन्न होण्याने, कुणालाही भय बाळगण्याचे कारण नाहीय. कारण, जो जागृत होत आहे, तो ‘भारत’ आहे.

भारताच्या या स्वत्वाच्या प्रकटीकरणाला भारतातच होत असलेला विरोध काही नवी बाब नाही. स्वातंत्र्यानंतर जूनागड संस्थानाच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून भारताचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल सोमनाथला गेले. तिथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराचे भग्न अवशेष बघून त्यांना खूप वेदना झाल्यात. आता देश स्वतंत्र झाला होता. म्हणून भारताच्या या गौरवस्थळाच्या जीर्णोद्धाराचा संकल्प त्यांच्या मनात आला. या कार्याची जबाबदारी त्यांनी पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातील एक कॅबिनेट मंत्री- कन्हैयालाल मुन्शी यांच्यावर सोपविली. सरदार पटेल यांनी ही माहिती महात्मा गांधींना सांगितली तेव्हा गांधीजींनी याचे समर्थन केले, परंतु हे कार्य सरकारी निधीतून नाही, तर जनतेने गोळा केलेल्या निधीतून करण्याची सूचना केली. ती वल्लभभाईंनी तत्काळ स्वीकारली. या पुनर्स्थापित मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आले होते. या कार्यक्रमात झालेले डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे भाषण उल्लेखनीय आहे.

परंतु, पंडित नेहरूंचा मात्र याला विरोध होता. ज्या घटनेकडे सरदार पटेल, कन्हैयालाल मुन्शी, महात्मा गांधी आणि राजेंद्र प्रसादसारखे मूर्धन्य नेते भारताच्या गौरवाची पुनर्स्थापना म्हणून बघत होते, त्याच घटनेचा पंतप्रधान नेहरूंनी हिंदू पुनरुत्थानवाद (Hindu revivalism) म्हणत विरोध केला. यावरून लक्षात येईल की, भारताच्या स्वत्वाला विरोध करणे, त्याला प्रकट होण्यापासून रोखणे हे तेव्हाही होते. परंतु त्या काळात राष्ट्रीय विचारांचे लोक काँग्रेसमध्ये अधिक संख्येने होते. म्हणून हे कार्य शक्य झाले. पुढे क्रमश: योजनापूर्वक रीतीने राष्ट्रीय विचाराच्या नेतृत्वाला बाजूला सारणे सुरू झाले आणि काँग्रेसमध्ये साम्यवादाचा प्रभाव वाढत गेला. साम्यवाद तर आध्यात्मिकतेलाच मानत नाही. एवढेच नव्हे तर, साम्यवाद या ‘राष्ट्र’ संकल्पनेलाही मानत नाही. तो एकप्रकारे भांडवलशाहीसारख्याच वसाहतवादी मानसिकतेचा प्रतिनिधी आहे. आधी सोव्हिएट संघ आणि आता चीनदेखील तीच विस्तारवादी आणि एकाधिकारशाही मानसिकता दाखवत आहे. म्हणूनच भारताच्या स्वत्वाला समजण्यास वामपंथी असमर्थ आहेत किंवा हा देश एका सूत्रात बांधला जाऊन मजबूत होऊ नये, उलट तुकड्या-तुकड्यात विभाजित होऊन दुर्बळ व्हावा यासाठी ते जाणूनबुजून याला विरोध करत आहेत.

अशा परिस्थितीत आमचे कर्तव्य काय आहे? याचे स्पष्ट आणि नेमके मार्गदर्शन करणारे चित्र, गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर यांनी 1904 सालच्या ‘स्वदेशी समाज’नामक प्रदीर्घ निबंधात रेखाटले आहे. हे सत्य आहे की, गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांनी राष्ट्रवादचा विरोध केला. परंतु ते वसाहतवाद (Colonialism) आणि महायुद्धाच्या भीषण परिणामांच्या पृष्ठभूमीवर पश्‍चिमेच्या नेशन-स्टेट आधारित ‘राष्ट्रवादा’च्या (Nationalism) विरोधात होते.

भारताची राष्ट्रीयता म्हणजेच ‘स्वत्वा’चे ते कसे समर्थक होते, याचे पुरावे ‘स्वदेशी समाज’ निबंधात आहेत. यात ते लिहितात-

‘‘आपले शरीर झाकून चूपचाप एका कोपर्‍यात पडून राहण्याला आत्मरक्षा म्हणत नाही, हे आज आम्हाला चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे. आपल्या अंतर्निहित शक्तीला जागृत तसेच संचारित करणेच आत्मरक्षेचा योग्य उपाय आहे. हाच विधात्याचा नियम आहे. आम्ही जोपर्यंत जडतेचा त्याग करण्यासाठी आपल्या उद्यमशक्तीचा उपयोग करणार नाही, तोपर्यंत इंग्रज आमच्या मनाला पराभूत करीतच राहतील. प्रत्येक गोष्टीत इंग्रजांचे अनुकरण करून, मुखवटा घालून, स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करणेदेखील स्वत:ला फसविण्यासारखेच आहे. आम्ही असली इंग्रज बनू शकत नाही आणि नकली इंग्रज बनून इंग्रजांना फसवूही शकत नाही. आमची बुद्धी, अभिरुची, हृदय सर्व काही पाण्याच्या भावात विकले जात आहे. याचा प्रतिकार करण्याचा एकमात्र उपाय आहे. आधी आम्ही मुळात ‘जे’ आहोत ‘ते’ बनलो पाहिजे. ज्ञानपूर्वक, सरल तसेच सजीवभावनेने संपूर्ण रूपात आम्हाला आमचे ‘आपलेपण’ प्राप्त करावे लागेल.

…देशाच्या तपस्वींनी ज्या शक्तीचा संचय केला ती बहुमूल्य आहे. विधाता तिला निष्फळ होऊ देणार नाही. म्हणून उचित वेळी त्या शक्तीने या निश्‍चेष्ट भारताला कठोर वेदना देऊन जागृत केले आहे. अनेकतेत एकतेची प्राप्ती आणि विविधतेत ऐक्याची स्थापना, हाच भारताचा अंतर्निहित धर्म आहे. विविधता म्हणजे विरोध असे भारताने कधीच मानले नाही. विदेशी म्हणजे शत्रू अशीही भारताने कधी कल्पना केली नाही. जे आपले आहे त्याचा त्याग न करता, कुणाचा विनाश न करता, एका व्यापक व्यवस्थेत सर्वांना स्थान देण्याची भारताची इच्छा आहे. सर्व पंथांचा तो स्वीकार करतो. आपापल्या स्थानी प्रत्येकाचे महत्त्व असते, हे तो मान्य करतो. भारताचा हाच गुण आहे. म्हणून कुठल्याही समाजाला आपला विरोधी मानून आम्ही भयभीत होणार नाही. प्रत्येक नव्या संयोजनाने अंतत: आम्ही आपल्या विस्ताराचीच अपेक्षा करू. हिंदू, बौद्ध, मुसलमान तसेच ख्रिश्‍चन भारताच्या भूमीवर परस्परांशी युद्ध करून मरणार नाहीत. येथे ते एक सामंजस्य प्राप्त करतीलच. ते सामंजस्य अहिंदू नसेल, उलट ते असेल विशेषरूपे हिंदू.  त्याचे अंग-प्रत्यंग भलेही देश-विदेशाचे असोत, परंतु त्याचा प्राण, त्याचा आत्मा भारतीय असेल.

आम्ही भारताच्या या विधाता-निर्दिष्ट आदेशाला स्मरणात ठेवू, तर आमची लाज दूर होईल, लक्ष्य स्थिर होईल. भारतात जी अमर शक्ती आहे, त्याच्याशी आमचे अनुसंधान जुळेल. युरोपातील ज्ञान-विज्ञान आम्हाला प्रत्येक वेळी विद्यार्थी बनून ग्रहण करायचे नाही, ही गोष्ट आम्हाला ध्यानात ठेवावी लागेल. ज्ञान-विज्ञानाच्या सर्व पंथांना भारताची सरस्वती एकाच शतदल कमळात विकसित करेल, त्याची विभाजितावस्था दूर करेल. आमचे भारतीय मनीषी डॉक्टर जगदीशचंद्र बसू यांनी वस्तुत्व, वनस्पतित्व तसेच जन्तुत्वला एकाच क्षेत्राच्या परिधीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. कुणी सांगावे, मनस्तत्त्वालाही ते त्यात आणून उभे करतील! हे ऐक्य-साधन भारतीय प्रतिभेचे मुख्य कार्य आहे. भारत कुणाचा त्याग करण्याच्या अथवा कुणाला दूर ठेवण्याच्या बाजूचा नाही. एक दिवस तो सर्वांचा स्वीकार करून, सर्वांना ग्रहण करून, एका विराट एकतेत आपापली प्रतिष्ठा उपलब्ध होण्याचा एकतेचा मार्ग, विवाद तसेच व्यवधानांनी ग्रस्त या पृथ्वीला दाखवून देईल.

हा विलक्षण क्षण येण्याआधी तुम्ही सर्व एकदा त्याला ‘माता’ म्हणून हाक मारून तर बघा! भारत माता सर्वांना आपल्या जवळ बोलाविण्यासाठी, अनेकतेला मिटविण्यासाठी, सर्वांचे रक्षण करण्यासाठी सतत धडपडत आहे. तिने तिच्या चिरसंचित ज्ञान व धर्माला विविध रूपांनी, विविध प्रसंगी आम्हांसर्वांच्या अंत:करणात संचारित केले आहे, तसेच आमच्या मनाला पराधीनतेच्या अंधार्‍या रात्री नष्ट होण्यापासून वाचविले आहे. आपल्या अपत्यांनी फुललेल्या या यज्ञशाळेत, देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी मातेला प्रत्यक्ष प्राप्त करण्यासाठी प्राणपणाने आम्ही प्रयत्न केले पाहिजेत.’’ (स्वदेशी समाज)

भारताच्या आत्म्याला जागृत करून, भारताचे स्वत्व प्रकट करण्याची वेळ आली आहे. ही प्रक्रिया ईश्‍वराच्या योजनेने आणि आशीर्वादाने आरंभ होऊन चुकली आहे. भारताच्या या आत्म्याला नाकारणार्‍या तत्त्वांना वाटेल तितका विरोध करू दे, भारतविरोधी विदेशी शक्तींना कितीही जोर लावू दे, भारताच्या जनतेचा संकल्प आता प्रकट होऊन चुकला आहे. भारताच्या राष्ट्रीयतेला जागृत करण्याचे हे वैश्‍विक कार्य दशकांपासून निरलसपणे, प्रसिद्धीपासून दूर राहून, पिढ्यानपिढ्या करणार्‍यांचे वर्णन ‘विश्‍व मंगल साधना के हम हैं मौन पुजारी’ असे करण्यात आले आहे. जगाच्या कल्याणासाठी साधना करणार्‍या पुजार्‍यांची ही तपस्या आणि परिश्रम सफल होऊनच राहतील.

भारताच्या ‘स्वत्वा’ला शक्ती आणि गौरवाने पुनर्स्थापित करण्याच्या या ऐतिहासिक समयी, भारतातील सर्व लोकांनी आपापले राजकारण आणि इतर निहित स्वार्थ बाजूला ठेवून, एकतेचे दर्शन घडवावे आणि स्वाभिमानपूर्ण आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीच्या या यात्रेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा या राष्ट्राची आम्हांसर्वांकडून आहे.