Breaking
Loading latest news...
News

तरुणांच्या ‘डेमोक्रॅटिक डिव्हिडंड’मधूनच भारत बनू शकतो विश्वगुरू प.पू.सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत

📅 16 Aug 2026 ✍️ Shri Prasad Barve 👁 108 views
तरुणांच्या ‘डेमोक्रॅटिक डिव्हिडंड’मधूनच भारत बनू शकतो विश्वगुरू प.पू.सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत
नागपूर : भारताकडे असलेली तरुणांची प्रचंड लोकसंख्या ही केवळ लोकसंख्येची आकडेवारी नसून देशाची सर्वात मोठी ताकद आहे. या ‘डेमोक्रॅटिक डिव्हिडंड’चा योग्य उपयोग केला तर भारत विश्वगुरू होऊ शकतो. त्यासाठी तरुण शक्तीला योग्य दिशा, कौशल्य आणि संधी देण्याची आवश्यक आहे. तरुणांनी केवळ स्वतःच्या भविष्याचा विचार न करता देश आणि पुढील पिढीच्या भवितव्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शनिवारी केले. 

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नागपुरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानावर नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने उभारलेल्या २०० फूट उंच राष्ट्रध्वजाचे डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आयोजित विशेष कार्यक्रमात ‘भारताच्या उज्ज्वल भविष्यात युवकांचे योगदान’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी राज्यसभा खासदार डॉ. विजय दर्डा व महापौर नीता ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

भारत स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षात प्रवेश करत असताना देशापुढे असलेली सर्वात मोठी संधी म्हणजे तरुण लोकसंख्या. अनेक पिढ्यांनी देशासाठी त्याग केला म्हणून आजची पिढी स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहे. आता पुढील पिढीसाठी काहीतरी करण्याची जबाबदारी वर्तमान पिढीची आहे. तरुणाईमध्ये ऊर्जा, स्वप्ने आणि काहीतरी वेगळे करण्याची धडपड असते. जगातील संघर्षांचा पुरेसा अनुभव नसल्याने त्यांच्यात आशावादही अधिक असतो. या ऊर्जेला योग्य दिशा देणे आणि तिचा देशाच्या उभारणीसाठी उपयोग करणे आवश्यक आहे. तरुणांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे. तरुण लोकसंख्या ही भारतासाठी मोठी संधी आहे. मात्र ही संधी आपोआप विकासात रूपांतरित होणार नाही. कौशल्य, शिक्षण, उद्योजकता, रोजगारनिर्मिती आणि राष्ट्रहिताची जाणीव या माध्यमातूनच या ‘डेमोक्रॅटिक डिव्हिडंड’चे राष्ट्रीय शक्तीत रूपांतर होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. रोजगाराचा अर्थ केवळ नोकरी मिळणे एवढाच मर्यादित नाही. उद्योग-व्यवसायात धोके असतात आणि ते स्वीकारण्याची हिंमत तरुणांनी ठेवली पाहिजे. स्वतः रोजगार मिळविण्याबरोबरच इतरांसाठी रोजगार निर्माण करण्याची मानसिकता विकसित झाली पाहिजे. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात तरुणांनी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे, असे प.पू.सरसंघचालकांनी म्हटले. 

भारताने इतरांशी स्वत:ची तुलना करू नये
भारताने अमेरिका, चीन किंवा ऑस्ट्रेलियाशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा आपल्या संस्कृती, मूल्ये आणि गरजांच्या आधारे विकासाची दिशा ठरवावी. जग आज अपूर्ण दृष्टीमुळे धडपडत आहे. त्यामुळे जगाला पुढील मार्ग दाखविण्याची जबाबदारी भारताची आहे. त्यासाठी तरुण पिढीने साहस, कर्मशीलता, त्याग आणि शौर्याच्या बळावर स्वतःला तयार करावे, असे आवाहन प.पू.सरसंघचालकांनी केले. 

विरोध करा; पण संविधानाचे भान ठेवा
लोकशाहीमध्ये वेगवेगळे विचार आणि विरोधी दृष्टिकोन असणे स्वाभाविक आहे. प्रश्न जोरकसपणे मांडणे, आंदोलन करणे आणि विरोध करणे हा लोकशाहीचा भाग आहे. मात्र हे करताना संविधान आणि त्याच्या चौकटीचे भान ठेवले पाहिजे. आपले कायदे, संविधान, प्राचीन संस्कृती, संस्कार आणि शील यांची हानी होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मतभेद असले तरी मनात वितुष्ट निर्माण होऊ नये. विविधतेतून एकता आणि सहचित्त निर्माण करणे हाच तिरंग्यातील धम्मचक्राचा संदेश असल्याचेही प.पू.सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

Related Articles