राष्ट्रीय एकात्मता आणि कर्तव्याचा अमर धागा: रक्षाबंधन
राष्ट्रीय एकात्मता आणि कर्तव्याचा अमर धागा: रक्षाबंधन
राष्ट्रीय
एकात्मता आणि कर्तव्याचा अमर धागा: रक्षाबंधन
रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून तो पवित्रता, कर्तव्य
आणि संरक्षणाच्या अमर्त्य संकल्पाचा सजीव संदेश आहे. इतिहास साक्षी आहे की, रजपुतांच्या
पराक्रमी परंपरेत या रेशमी धाग्याला अलौकिक महत्त्व प्राप्त झाले. जेव्हा एखादी भगिनी
एखाद्या वीराला राखी बांधते, तेव्हा तो रेशमी धागा केवळ प्रेमाचे प्रतीक राहत नाही,
तर तो एका भीषण संकल्पाचे रूप धारण करतो. वेळ प्रसंगी प्राणांची आहुती द्यावी लागली
तरीही राखी बांधणाऱ्याचे रक्षण करणे, हे त्या वीराचे परम कर्तव्य बनते. हाच त्यागाचा
आणि रक्षणाचा पवित्र भाव आपल्या संपूर्ण संस्कृतीचा मुख्य आधार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व स्वयंसेवक याच भावनेने
आपल्या परम पवित्र भगव्या ध्वजाला राखी बांधतात. हा भगवा ध्वज म्हणजे केवळ कपड्याचा
तुकडा नसून आपल्या राष्ट्राची, संस्कृतीची आणि गौरवाची जिवंत प्रतिमा आहे. या ध्वजाचे
तेज आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी इतिहासात हजारो वीरांनी आपल्या रक्ताचे पाणी
केले. त्याच वैभवाला साऱ्या जगात सर्वोच्च स्थानी फडकवत ठेवण्याचा दृढ संकल्प स्वयंसेवक
च्या दिवशी करतात.
आपल्या देशावर जेव्हा जेव्हा परकीय आक्रमकांची संकटे
आली, तेव्हा आपण कधीही मनापासून गुलामी स्वीकारली नाही. ग्रीक, मोगल, तुर्क, पोर्तुगीज,
फ्रेंच आणि इंग्रजांसारख्या महासत्तांशी या देशातील वीरांनी अविरत संघर्ष केला. महाराणा
प्रतापांनी अकबराविरुद्ध अंतिम श्वासापर्यंत लढा दिला, तर गुरू गोविंदसिंहांनी क्षात्रधर्माची
मशाल पेटवत संघर्ष जिवंत ठेवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मराठ्यांनी दक्षिणेत
म्हैसूरपासून उत्तरेत कटकपर्यंत आणि कराचीपासून कलकत्त्यापर्यंत परकीय सत्तांना सळो
की पळो करून सोडले.
सन १८५७ चा स्वातंत्र्यलढा, आद्यक्रांतिवीर वासुदेव
बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव आणि बंगालच्या क्रांतिकारकांचा त्याग या सर्वांनी हेच
सिद्ध केले की, भारत कधीही पारतंत्र्यात समाधानी राहिला नाही. विजय आणि पराभवाच्या
या एक हजार वर्षांच्या संघर्षात आज आपण पुन्हा एकदा नव्या शक्तीचा संचय करत आहोत.
आजच्या काळात आपल्यासमोरील संकटांवर मात करण्याचा मार्ग
अत्यंत सोपा आणि स्पष्ट आहे. आपण कुठलीही भाषा बोलत असू किंवा आपली शैक्षणिक पार्श्वभूमी
काहीही असो, आपण सर्वजण एकाच विशाल हिंदू समाजाचे घटक आहोत, ही सुप्त भावना जागी करणे
ही काळाची गरज आहे. मात्र, ही भावना केवळ शब्दांत राहून चालणार नाही, तर ती आपल्या
दैनंदिन आचरणात आणि व्यवहारात उतरायला हवी.
विशेषतः डोंगरदऱ्यांत आणि वनवासी क्षेत्रांत राहणाऱ्या
आपल्या धर्मबांधवांपर्यंत आपल्याला पोहोचले पाहिजे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी
त्यांना आवश्यक शिक्षण, संसाधने आणि प्रशिक्षण पुरवले पाहिजे. प्रत्येकाच्या मनात बंधुभाव
असला पाहिजे. तेव्हा कुठे राष्ट्रभक्तीच्या आधारावर त्यांच्या अंतःकरणात स्वाभिमान
आणि एकात्मतेचा भाव जागृत करण्यासाठी आपला मार्ग सुकर होईल. तेव्हा कितीही प्रतिकूल
परिस्थिती असली तरी ती बदलून एक अतिशय शक्तिसंपन्न समाज निर्माण होईल. हाच संघटित समाज
भारतमातेला पुन्हा एकदा जगात सर्वश्रेष्ठ आणि वैभवसंपन्न राष्ट्राच्या रूपात प्रस्थापित
करेल.
अमोल
तपासे, नागपूर



