एकल शेतकरी महिलांनी अनुभवली 'चैतन्याची दिवाळी'
दीनदयाल सेवा प्रतिष्ठान आणि श्रीवेद फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम
यवतमाळ: 'कर्जाचा भार आणि मानसिक तणावामुळे पतीने आमची साथ सोडली. पण मला तसं करण शक्य नव्हतं. कारण मी आई होती. भाऊबिजेला सख्या भावानेही ओवाळून घेण्यास नकार दिला. सगळ्या आशा संपल्या असं वाटत असताना एक दिवस दीनदयाल संस्थेचे कार्यकर्ते घरी आले. त्यांनी धीर दिला. भाऊ म्हणून ओवाळणी करून घेतली. तेव्हापासून या संस्थेशी संबंध जुळले. आज मी आणि माझी मुलं स्वतःच्या पायावर उभी आहोत. दीनदयाल संस्था आता माझ्या कुटुंबाचा भाग झाली आहे,' या सामुहिक भावना आहेत, पतीने आत्महत्या केल्यानंतर परिस्थितीला धैर्याने तोंड देत समाजापुढे आदर्श ठेवणाऱ्या 'स्वयंसिद्धा' अर्थात शेतकरी महिलांच्या.
निमित्त होते यवतमाळ येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठान आणि नागपूर येथील श्रीवेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'चैतन्याची दिवाळी' या कार्यक्रमाचे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी यवतमाळ येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करीत आहे. याच सातत्यपूर्ण कामाचा एक भाग म्हणून दरवर्षी या एकल शेतकरी महिला आणि त्यांच्या मुलांसोबत सामुहिक भाऊबीज साजरी केली जाते. त्या कार्यक्रमात या महिला बोलत होत्या.
'कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे पतीने आत्महत्या केली. लग्नानंतर काही वर्षांतच पोटच्या लहान मुलांची, म्हाताऱ्या सासू- सासऱ्यांची आणि शेतजमिनीची जबाबदारी अंगावर पडली. कर्जाचा भार आणि मानसिक तणावामुळे पतीने आमची साथ सोडली. पण मला तसं करण शक्य नव्हतं. कारण मी आई होती. आता सगळ्या गोष्टी आपल्यालाच सांभाळायच्या आहेत याची जाणीव होती. पण काय करायचं सुचत नव्हतं. पतीच्या आत्महत्येला जणू काही मीच जबाबदार आहे, अशा पद्धतीने सगळे नातेवाईक माझ्याशी वागत होते. भाऊबिजेला सख्या भावानेही ओवाळून घेण्यास नकार दिला. सगळ्या आशा संपल्या असं वाटत असताना एक दिवस दीनदयाल संस्थेचे कार्यकर्ते घरी आले. त्यांनी धीर दिला. भाऊ म्हणून ओवाळणी करून घेतली. तेव्हापासून या संस्थेशी संबंध जुळले. संस्थेनी केवळ आर्थिक मदत न करता मानसिक आधार दिला. आत्मविश्वास वाढवला आज मी आणि माझी मुलं स्वतःच्या पायावर उभी आहोत. दीनदयाल संस्था आता माझ्या कुटुंबाचा भाग झाली आहे,' अशा शब्दांत निर्मला कोयचाडे, जयश्री सावकार, भारती पवार, रेखा गुरनुले या शेतकरी भगिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यवतमाळच्या निळोणा परिसरातील दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या सभागृहात 'चैतन्याची दिवाळी' हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी अर्बन बँकेचेचे उपमहाव्यवस्थापक रवी इंगळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, ’श्रीवेद फाउंडेशन’चे अध्यक्ष प्रसाद फडणवीस उपस्थित होते. दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे सचिव विजय कद्रे, उपाध्यक्ष ज्योती चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. मनोज पांडे, पद्मश्री सुभाष शर्मा, स्वयंसिद्ध प्रकल्पाच्या सचिव नीलिमा मंत्री आदी व्यासपीठावर होते.
शालिनी निखाडे यांनी गीत सादर केले. प्रास्ताविक नीलिमा मंत्री यांनी केले. प्रकल्प समन्वयक भूषण ढोबळे यांनी संचालन केले. शोभा दोडेवार यांनी आभार मानले. प्रकल्प समिती सदस्य विना देशपांडे, साधना देव, उज्ज्वला भाविक, किरण ठाकरे यांनी पसायदान म्हटले. यावेळी शहरातील गणमान्य नागरिक तसेच स्वयंसिद्धा प्रकल्पातील समाविष्ट भगिनी उपस्थित होत्या.
एक हजारावर कुटुंबाना दिवाळी भेट
श्री वेद फाउंडेशनच्यावतीने यावर्षी विदर्भातील सुमारे एक हजार वंचित, आदिवासी आणि आर्थिक दुर्बल कुटुंबांना दिवाळी निमित्त भेटवस्तू प्रदान केल्या. निळोणा येथील कार्याक्रमाप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्याने तर यवतमाळ जिल्ह्यातील शिपला येथे किसान बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 'चैतन्याची दिवाळी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




