समाज संवेदनशीलतेवर टिकून राहतो
पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
नागपूर: ‘सेवा हा व्यवसाय नसून समाजाप्रती असलेले कर्तव्य आहे. केवळ पैसे कमावणे हा कामाचा मुख्य उद्देश नसून उदरनिर्वाह हा त्याचा केवळ एक भाग आहे. समाज केवळ आर्थिक समृद्धीवर नाही तर करुणा आणि संवेदनशीलता या मूल्यांवर टिकून राहतो,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शुक्रवारी केले.
कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटर येथे दुबईतील कामगारांसाठी सेवा देणारे मुळचे नागपूर येथील डॉ. संजय पैठणकर यांना 'विदर्भ गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृष्णा अभिमत वैद्यकीय विद्यापीठाचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, सत्कारमूर्ती डॉ. संजय पैठणकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, श्रीराम काळे यांची उपस्थिती होती.
'समाजसेवेला प्रवृत्त करण्याकरिता पुरस्कार दिले जात नाहीत. ज्यांचा सन्मान होतो, त्यांनी कधीही अपेक्षेने काम केलेले नसते. ज्याला उर्वरित जग 'प्रोफेशन' म्हणते त्याला आपल्या देशात 'सर्व्हिस' म्हटले जाते. कारण आपल्याकडे धारणा अशी आहे की, जे आपण करतो, ते स्वतःचे पोट भरण्यासाठी करत नाही तर सृष्टीचे अस्तित्व कायम राहावे म्हणून ते करायचे असते. आपले जगणे त्यासाठी असले पाहिजे. ‘पुरस्कार’ या शब्दाचा एक अर्थ बक्षीस असा आहे. दुसरा अर्थ प्रोत्साहन आहे. त्यामुळे असे पुरस्कार दिले पाहिजेत. पुरस्कार शब्दाचा शब्दशः अर्थ आहे पुढे नेणे. आपण समाजाचे काही देणे लागतो, ही भावना घेऊन त्यासाठी जगणाऱ्या लोकांचा हा सत्कार आहे. ही एक संवेदना आहे. ही संवेदना हेच माणुसकीचे लक्षण आहे,' असे डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
'जगात जे दु:ख आहे ते दूर करण्यासाठी मी जे करू शकतो, ते मी करतो. हे करताना मी खूप काही मोठे करतो, अशी भावना न ठेवणे म्हणजे माणुसकी आणि त्याचा सहज अविष्कार सेवा आहे. आपल्याला सेवेचा मोबदला अपेक्षित नसतो. ही सेवा एकतर्फी नसून कळवळ्यामुळे असते. हा कळवळा आतून उत्पन्न होतो आणि त्यातून सेवा घडते. समाज या संवेदनेपोटी चालतो. ही संवेदना टिकली पाहिजे. ही संवेदना प्रत्येकामध्ये असते. परंतु, विपरीत परिस्थितीमुळे ती भावना झाकली जाते. ही संवेदना कायम राहणे, याला मनुष्य म्हणून जगणे म्हणतात. जगणे गरीबीचे आहे की श्रीमंतीचे, हा प्रश्न नसतो. जगताना त्याने काय जपून ठेवले आहे, हे महत्त्वाचे असते. जीवन कठीण असले तरी आम्ही त्यावर मात करू आणि असे ज्यांना करावे लागते, त्यांची मदत करू, ही वृत्ती समाजात टिकली पाहिजे,' असे त्यांनी सांगितले.
'केवळ पैशांसाठी व्यवसाय करणे ही आपली संस्कृती नाही. लोकांनी आपापले व्यवसाय व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत समाजासाठीही योगदान दिले पाहिजे; कारण समाजाची सेवा करणे हाच कामाचा खरा उद्देश आहे. धर्म ही संकल्पना मानवता आणि बंधुभावाशी जोडलेली आहे. सत्य, करुणा, शुचिता आणि तपश्चर्या हे धर्माचे चार पाय आहेत. आपल्यात आणि इतरांमध्ये ईश्वर वास करतो, ही जाणीव असली की आपुलकी व निस्वार्थ सेवा करण्याची भावना निर्माण होते,’ असे पूजनीय सरसंघचालकजी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘नागपूरच्या मेडिकल कॉलेजने अनेक नामवंत डॉक्टर जगाला दिले आहेत. यातील एक असलेल्या डॉ. संजय पैठणकर यांनी नागपूरचा लौकिक दुबईत वाढविला आहे. त्यांनी दुबईमध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम केले असून मातृभूमीशी असलेली नाळ कधीही तोडलेली नाही.'
सत्काराला उत्तर देताना पैठणकर म्हणाले,‘आपल्या लोकांनी दिलेला हा पुरस्कार भारतरत्नपेक्षाही मोठा आहे. ज्यांनी मला बालपणापासून पाहीले त्या सरसंघचालकांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त होणे हे दिल्लीतील व्यक्तींनी दिलेल्या पुरस्कारापेक्षा अनेक पटींनी मोठा बहुमान आहे.
'डॉ. मोहनजी भागवत यांच्यामुळे संघाविषयी समाजात असलेले बरेचसे गैरसमज दूर झाले,’ असे प्रास्ताविकपर भाषणात गिरीश गांधी म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन शुभदा फडणवीस यांनी केले. आभार श्रीराम काळे यांनी मानले.




