गुजरातमध्ये गोहत्या प्रकरणी तिघांना जन्मठेप
गांधीनगर: गुजरातमधील गांधीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने गोहत्येच्या प्रकरणात तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बृजेशकुमारी रामेश्वर सिंह राजपूत यांनी हा निकाल देताना मनुस्मृती, वेद तसेच अन्य हिंदू धर्मग्रंथांचा संदर्भ दिला. गायीला ‘विश्वाची माता’ असे संबोधत न्यायालयाने दोषींना प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
कलोल तालुक्यातील जामला गावात २२ ऑगस्ट २०२४ रोजी एका घरावर छापा टाकून पोलिसांनी २७७ किलो मांस, जनावरांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे आणि एक वाहन जप्त केले होते. प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर जप्त करण्यात आलेले मांस म्हणजे गोमांस असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला. न्यायालयाने ५४ साक्षीदार आणि १८ दस्तऐवजी पुराव्यांच्या आधारे वसीम कुरेशी, मोहम्मद रफीक कुरेशी आणि अशफाक बहलीम या तिघांना दोषी ठरवले.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक रहिवासी लालभाई सेनमा आणि त्यांचा मुलगा अशक्त किंवा दूध न देणाऱ्या गायी-म्हशी खरेदी करीत. त्यानंतर अहमदाबाद येथून वसीम कुरेशी, मोहम्मद रफीक कुरेशी आणि अशफाक बहलीम यांना बोलावून जनावरांची कत्तल करवून घेत. या प्रकरणी पोलिसांनी गुजरात पशुसंरक्षण अधिनियम, १९५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या कायद्यात गोहत्येच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.
न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, कायद्याचे पालन आणि जीवसृष्टीचे संरक्षण झाले तरच धर्म आणि न्यायाची स्थापना होऊ शकते. ब्रह्मदेवाच्या मुखातून अमृताचे थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून 'सुरभी' नावाच्या गायीचा जन्म झाला, अशी धार्मिक मान्यता असल्याचे न्यायालयाने नमूद केले. गायीला पृथ्वीवरील सर्व गोवंशाची माता मानले जाते. तिला ‘विश्वाची माता’ असा दर्जा असून तिच्यात ३३ कोटी देवी-देवतांचा वास आहे, तर तिचे चार पाय चार वेदांचे प्रतीक आहेत, असा उल्लेखही निकालात करण्यात आला आहे.



