परंपरेची ओढ, आधुनिकतेची वाट!
दिवाळीची धामधूम संपली आणि शिल्लक असलेल्या सुट्ट्यांमध्ये पचमढी आणि नर्मदापूरमला जाण्याचा योग जुळून आला. आम्ही यापूर्वी अनेकदा पचमढीला गेलो आलो आहोत. परंतु, यंदा मुद्दाम नर्मदा नदीचे दर्शन आणि तिची आरती अनुभवण्याचे निश्चित केले.
नर्मदापूरम म्हणजे पूर्वीचे होशंगाबाद. नर्मदा नदी ही भगवान शंकराची कन्या आहे, अशी मान्यता आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे होतो. आपल्या भारतात गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांना जसे पवित्र स्थान आहे, तसेच नर्मदेलाही आहे. नर्मदा नदीला 'रेवा' असेही म्हणतात. जी आनंद देते ती नर्मदा. म्हणूनच, 'नर्मं ददाति इति नर्मदा' असे म्हटले जाते.
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती।
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु॥
या श्लोकामध्ये नर्मदेला भारतातील सात पवित्र नद्यांमध्ये स्थान दिले आहे. संघाच्या शाखेत म्हटल्या जाणाऱ्या एकात्मता स्तोत्राच्या आठव्या श्लोकात गंगा, सरस्वती, सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंडकी, कावेरी, यमुना, रेवा, कृष्णा, गोदा आणि महानदी अशा भारतातील पवित्र नद्यांचा उल्लेख येतो.
नर्मदा दर्शनात् पुण्यं, स्नानात् कोटिगुणं भवेत्।
तस्याः स्मरणमात्रेण, सर्वपापैः प्रमुच्यते॥
पवित्र गंगा नदीमध्ये स्नान केल्याने पाप धुतले जाते आणि नर्मदेच्या केवळ दर्शनानेही पापनाश होतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. नर्मदेच्या दर्शनाने आणि स्नानाने कोटीपट पुण्य मिळते, तर तिचे केवळ स्मरण केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.
भारतात हरिद्वार आणि कशी येथील गंगा आरती, उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातील भस्म आरती आणि वृंदावनातील बांके बिहारी मंदिरातील आरती प्रसिद्ध आहे. नर्मदापुरम येथील सेठानी घाटावर होणारी नर्मदेची आरतीसुद्धा प्रेक्षणीय असते. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिवे, शंखनाद, घंटानाद आणि मंत्रघोषात ही आरती होते. पुजारी हातात मोठे दिवे घेऊन नर्मदा मातेला ओवाळतात. भक्त नर्मदेच्या पाण्यात दिवे सोडतात. ते दृश्य पाहून आकाशातील तारे पाण्यात उतरले आहेत, असेचं वाटते. आरतीच्या वेळी सामुहिकपणे 'नर्मदाष्टकम्' म्हटले जाते.
तसे पहिले तर, सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्यासाठी आमच्या घरातील युवा पिढी, म्हणजेच आजची GenZ नेहमीच उत्साहात असते. नर्मदेच्या आरतीमध्ये या तरुणांना किती रस असेल, याबाबत आम्हाला शंका होती. मात्र, आरतीसाठी घाटावर उपस्थित असलेली GenZ पिढी पाहून छान वाटले. त्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे ही GenZ मंडळी Traditional By Soul and Modern By Style अशी आहेत. या पिढीचा देव किंवा धर्माकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आहे. हे तरुण अध्यात्म आणि धर्मापासून दूर गेलेले नाहीत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने धर्म आणि अध्यात्माला आणखी व्यापक आणि आकर्षक स्वरूप दिल आहे. हे तरुण आपल्या मनातील भक्ती केवळ स्वतःपुरती मर्यादित ठेवत नाहीत. इन्स्टाग्राम आणि इतर समाजमाध्यमांचा उपयोग करून त्याद्वारे ते आपल्या भावना सहज व्यक्त करतात. त्यात त्यांना काहीही वावगे वाटत नाही आणि आपल्यालाही वाटायला नको.
नर्मदा ही केवळ नदी नाही, तर ती एक संस्कृती आहे, जी आजी-माजी पिढ्यांना एकत्र बांधून ठेवते. तिच्या घाटावरील आरती हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर निसर्गावरील श्रद्धा, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीचे जिवंत दर्शन आहे.
पहिल्यांदाच अनुभवलेली सेठानी घाटावरची नर्मदेची आरती आणि तिथला 'नर्मदे हर!' हा जयघोष आमच्या दीर्घकाल स्मरणात राहणार आहे.




