अशी दिवाळी साजिरी; अशी करावी साजरी
दीपावली हा भारतात साजरा केला जाणारा सर्वांत मोठा आणि अद्वितीय उत्सव आहे. रमा एकादशी ते भाऊबीज असे सलग सहा दिवस चालणारे हे पर्व! प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आणि प्रत्येक दिवसाचे प्रयोजनही निराळे.
गेल्या किमान दोन हजार वर्षांपासून दिवाळी साजरी केली जात असल्याचे पुरावे प्राचीन साहित्यात आढळतात. त्यांपैकी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे महाराष्ट्री प्राकृत भाषेत सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी संपादित केलेला, जवळपास ७०० गाथांचा संग्रह असलेला ‘गाहा सत्तसई’ अर्थात ‘गाथा सप्तशती’ हा ग्रंथ. त्यात दिवाळीची लगबग, उत्सवाची तयारी आणि या सणाचा स्पष्ट उल्लेख आढळतो. काही हस्तलिखितांमध्ये दिवाळीला ‘दीवाळिओ’, तर काहींमध्ये ‘दिवाबळी’ असे म्हटले आहे. यावरून ही परंपरा या कालखंडाच्या कितीतरी आधीपासून प्रस्थापित होती, हे दिसून येते.
चातुर्मास संपण्यापूर्वीची शेवटची एकादशी म्हणजे अश्विन कृष्ण एकादशी. या दिवसाला रमा एकादशी म्हणतात. या दिवशी लक्ष्मीसह श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. त्यांच्या समोर पहिला दिवा लावूनच दीपावलीची सुरुवात होते.
त्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे गोवत्स द्वादशी. मानवाने प्राणिजगतापासून वेगळी वाट चोखाळली, त्या विकासाच्या प्राथमिक कालखंडात रानगायी माणसाळवणे हा एक महत्त्वाचा टप्पा होता. गाय हा उपयुक्त पशू माणसाच्या हाती लागल्यानंतर मिळालेल्या अनेक लाभांपैकी सर्वांत लक्षणीय लाभ म्हणजे इंधनाची सोय. घरच्या गोठ्यात मिळणाऱ्या गोमयापासून शोभण्या (शुभा) आणि गोवऱ्या थापणे हा इंधन मिळवण्याचा सोपा उपाय होता. शुभकार्यात वापरल्या जाणाऱ्या शोभण्या आणि मर्तिकासाठी वापरल्या जाणाऱ्या गोवऱ्या यांतील सूक्ष्म शाब्दिक फरकदेखील आपण लक्षात घ्यायला हवा.
त्या काळी गायीच्या दुधापेक्षा तिच्या शेणाचे महत्त्व अधिक होते. कृषी जमिनीची सुपीकता वाढवणारी आणि पिकांवरील घातक कीड नष्ट करणारी द्रव्येही गोमय आणि गोमूत्रात असतात. शिवाय, शेतीशी संबंधित बहुतांश कामांसाठी आणि वाहतुकीसाठी उपयोगी पडणारा बैल हासुद्धा गायीच्या महत्त्वाचा पुरावा आहे. त्यामुळे मानवाच्या अनेक गरजा पूर्ण करणारी गाय गोमाता म्हणून लोकमान्य झाली. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
दीपावलीतील तिसरा दिवस म्हणजे अश्विन कृष्ण त्रयोदशी अर्थात धनत्रयोदशी. या दिवशी वरच्या उजव्या हातात चक्र, वरच्या डाव्या हातात शंख, खालच्या उजव्या हातात जलुका म्हणजे जळू आणि खालच्या डाव्या हातात अमृतपात्र धारण करून धन्वंतरी प्रकट झाले. म्हणून या दिवशी धन्वंतरीचे पूजन केले जाते.
प्राग्ज्योतिषपूरच्या (गुवाहाटी) घनघोर युद्धात भगवान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामेने नरकासुराचा वध केला आणि सोळा हजार एकशे स्त्रियांना मुक्त करून श्रीकृष्णाच्या छत्रछायेखाली आश्रय दिला. द्वारकेत त्यांना प्रतिष्ठा आणि सन्मानाची जीवनशैली देत त्यांचे पुनर्वसन केले. या प्रसंगाच्या स्मरणार्थ नरकचतुर्दशी साजरी केली जाते.
आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक नरकचतुर्दशीचा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू केली. स्त्रीवर अत्याचार करणाऱ्याचा एका सामर्थ्यवान स्त्रीने केलेला प्रतिकार यातून अधोरेखित करण्यात आला आहे. स्त्रीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचे समूळ उच्चाटन करण्यात आले. स्त्रीसन्मान प्रस्थापित केल्याखेरीज लक्ष्मीपूजन संपन्न होत नाही, हे सूत्रच आपल्या पूर्वजांनी यातून सांगितले आहे.
लक्ष्मीपूजन करताना ऋग्वेदाच्या ‘खिल’ पर्वात समाविष्ट असलेल्या श्रीसूक्तातील १५ ऋचा आणि त्यांच्या फलश्रुतीचा विनियोग केला जातो. हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केले जाणारे अनुष्ठान आहे. देवी लक्ष्मीकडे केलेली प्रार्थना अशी की, ज्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला ईश्वराच्या कृपेने ऐश्वर्य, तेज, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते, ती व्यक्ती समाजात सन्मानाने आणि गौरवाने प्रकाशमान होते. म्हणून हे लक्ष्मीमाते,
श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते।
धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः॥
आमच्या सर्व प्रियजनांना उत्तम वैभव (वर्चस्व), दीर्घायुष्य आणि निरोगी आरोग्य लाभो. तसेच त्यांना धान्य, धन, वाहन-पशुधन आणि उत्तम संतती लाभून शंभर वर्षांचे दीर्घायुष्य प्राप्त होवो.
ऋणरोगादिदारिद्र्यपापक्षुदपमृत्यवः।
भयशोकमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा॥
माझ्या आयुष्यातील कर्ज, आजारपण, गरिबी, पाप, उपासमार, अकाली मृत्यू, भीती, दुःख आणि मानसिक त्रास या सर्व बाधा व संकटे कायमची नष्ट होऊ देत.
संपन्न जीवनशैली लाभावी, यासाठी केलेली ही प्रार्थना फलद्रूप व्हावी म्हणून अश्विन अमावास्येला, म्हणजे सूर्य आणि चंद्र एकत्र असताना, स्वाती नक्षत्रातून चंद्राचे भ्रमण होत असताना पूजा करावी. त्यावेळी वृषभ, सिंह, वृश्चिक किंवा कुंभ या चार स्थिर राशींपैकी एका राशीला प्राधान्य द्यावे. त्यातही वृषभ राशीला विशेष महत्त्व आहे. कारण ती स्थिर राशींमधील पहिली रास असून सदा हसरी आणि प्रसन्न राहणारी मानली जाते. लक्ष्मी या देवतेची संकल्पना भूदेवी आणि श्रीदेवी या दोन देवतांच्या मिलाफातून साकार झाली आहे. भूदेवीचे प्रतीक म्हणून स्थावर संपत्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धान्याचे, तर श्रीदेवीचे प्रतीक म्हणून जंगम संपत्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धातूच्या प्रतिमा किंवा नाण्यांचे पूजन करण्याची प्रथा गेल्या किमान दोन हजार आठशे वर्षांपासून आहे. यापैकी पूजन केलेले धान्य आपल्या कोठारातील धान्याच्या कणगीत टाकायचे आणि धातूची प्रतिमा किंवा नाणे नित्यपूजेच्या देवांमध्ये ठेवायचे, म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच हिंदू धर्मशास्त्राच्या कोणत्याही ग्रंथपोथीत लक्ष्मीच्या पार्थिव मूर्तीची, म्हणजे मातीच्या प्रतिमेची पूजा सांगितलेली नाही.
त्यानंतरचा दिवस म्हणजे भारतीय परंपरेतील आर्थिक नववर्षाची सुरुवात. विक्रम संवत ही कालगणनादेखील याच दिवसापासून सुरू होते. हा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवसाविषयी गेल्या काही वर्षांपासून अतिशय चुकीची माहिती जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. त्यातील पहिले कथन म्हणजे आजचे शेतकरी हे बळीराजाचे वंशज आहेत आणि ब्राह्मण वामनाने कपटाने त्याचा वध केला. दुसरा गैरसमज असा की, बळीराजा अत्यंत लोकप्रिय होता आणि त्याने शेतीविषयक अनेक सुधारणा केल्या. प्रत्यक्षात राजा बळीने शेती आणि शेतकऱ्यांसाठी काय केले, याची कोणतीही माहिती पौराणिक ग्रंथांमध्ये मिळत नाही.
बलिप्रतिपदा आणि बळीराजाविषयीची कथा अशी सांगितली जाते. कश्यप ऋषींच्या १७ पत्नींपैकी अदितीला १२ आदित्य, ११ रुद्र आणि ८ वसू असे ३१ देव, तसेच विष्णूंचा पाचवा अवतार असलेले वामन हे पुत्र होते. तर दितीला हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोन पुत्र होते. हिरण्याक्षाने पृथ्वी रसातळाला नेली म्हणून वराह अवतार धारण करून भगवान विष्णूंनी त्याचा वध केला. त्यानंतर हिरण्यकशिपूचा पुत्र प्रह्लाद याच्या आर्त हाकेला धावून जात नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकशिपूचा वध केला. याच प्रह्लादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र म्हणजे राजा बळी. त्याला आपल्या दातृत्वाचा दुराभिमान झाला होता. शिवाय, त्याने ९९ अश्वमेध यज्ञ करून इंद्राला आव्हान देत शंभरावा अश्वमेध यज्ञ सुरू केला होता. त्यावेळी श्रीविष्णूंनी वामन अवतार धारण करून त्याला पाताळात पाठवले. त्याला अमरत्व प्रदान करून त्याचे अंगरक्षक आणि द्वारपाल म्हणून राहण्याचे दायित्वही स्वीकारले.
या सगळ्या कथानकात ब्राह्मण वामनाने बहुजन समाजातील बळीराजाला पाताळात धाडले, या विधानाला काहीही अर्थ नाही. कश्यप गोत्रात जन्मलेले दोन पुरुष म्हणजे एक अत्यंत पराक्रमी आणि दानशूर राजा, तर दुसरा एक बुटका, निर्धन सामान्य माणूस म्हणजेच याचक. त्यामुळे हा काही वर्गसंघर्ष किंवा शोषित विरुद्ध शोषक असा सामना नव्हता. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास, ‘डोन्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन’ असेच म्हणावे लागेल.
पाताळात पाठवलेल्या बळीराजाच्या संरक्षणाची जबाबदारी श्रीविष्णूंनी स्वीकारली आणि ते त्याच्यासह पाताळात राहू लागले. धन्याशिवाय वैकुंठ ओस पडले. त्यांना शोधत महालक्ष्मी पाताळात पोहोचली. राजा बळीचा अंगरक्षक झालेल्या आपल्या पतीला पाहून तिचे अंतःकरण पिळवटून निघाले. तिने पतीला वचनमुक्त करण्यासाठी राजा बळीला विनंती केली. त्याचे संरक्षण करण्यासाठी त्याच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले. तो दिवस म्हणजे रक्षाबंधन. कर्तव्यपालन करताना येणाऱ्या संकटांपासून आणि शत्रूपासून भावाचे संरक्षण व्हावे म्हणून बहिणीने भावाला बांधायच्या रक्षासूत्राचे रूपांतर दुबळ्या बहिणीचे रक्षण करावे म्हणून भावाला बांधल्या जाणाऱ्या राखीत कसे झाले असावे, हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.
खरे म्हणजे प्राचीन भारतातील कृषिप्रधान समाज आणि अर्थव्यवस्थेत शेतकरी आपल्या उत्पन्नाचा एकषष्ठांश भाग राज्याच्या खजिन्यात शेतसारा म्हणून जमा करायचे. त्या कराला ‘बली’ म्हटले जाई. हा ‘बली’ देणारा तो बळीराजा. भारतीय इतिहासात शेतकऱ्यांचा संबंध असलाच, तर तो श्रीकृष्णाचे बंधू बलराम यांच्याशी आहे. कारण संपूर्ण शेती ज्या नांगरावर आधारलेली आहे, त्या नांगराचा शोध बलरामांनी लावला. त्यामुळे शेतकरी हा बलरामाचा उत्तराधिकारी असला पाहिजे; बळीराजाचा नव्हे!
दिवाळीतील शेवटचा दिवस असतो यमद्वितीया. या दिवशी यम आपल्या जुळ्या बहिणीला, यमीला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील दहावे सूक्त ‘यम-यमी संवाद सूक्त’ म्हणून ओळखले जाते. यमी आपल्या जुळ्या भावाच्या शरीरसौष्ठवामुळे, सौंदर्यामुळे आणि पराक्रमामुळे मोहित होऊन त्याच्यापासून त्याच्यासारखीच संतती व्हावी, म्हणून त्याच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करते. त्यावर यम तिला ठाम नकार देतो आणि सख्ख्या भावा-बहिणीत असे संबंध तसेच त्यातून निर्माण होणारी संतती निषिद्ध असल्याचे प्रतिपादन करतो. त्यामुळेच सपिंड (आईकडून तीन पिढ्या आणि वडिलांकडून पाच पिढ्यांपर्यंतचे रक्ताचे नातेवाईक) आणि सगोत्री (एकाच गोत्राचे वंशज) यांच्यातील विवाहसंबंध निषिद्ध मानले गेले आहेत.
या सर्व दिवसांची गोळाबेरीज म्हणजे एका प्रगल्भ, वैभवशाली आणि संपन्न संस्कृतीचा आविष्कार करणारी ही तेजतत्त्वाची दीपावली! म्हणूनच अशी दिवाळी साजिरी करावी आणि अशीच साजरी करावी!




