दीपावलीचे श्रीमहालक्ष्मी पूजन : एक विचार
दीपावली हा आपल्या भारतीय संस्कृतीच्या सर्व उत्सवांपैकी सर्वात महत्वाचा उत्सव. या उत्सवामध्ये सर्वात महत्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन.
दीपावली हा दिव्यांचा, प्रकाषाचा उत्सव आहे. पितृपक्षामध्ये आलेले आपले पूर्वज आपल्या स्थानाला परत जाण्याचा हा कालावधी. त्यांना परतीचा मार्ग योग्य प्रकारे दिसावा यासाठी आपण आकाशदिवा लावतो. आपले पूर्वज आशीर्वाद देऊन स्वस्थानाला निघून गेल्यावर आपल्याला लक्ष्मीपूजन करण्यास सांगितले जाते. याचा कालावधी अमावस्या ते पंचमीपर्यंत असतो. आपापल्या परंपरेनुसार आपण हे लक्ष्मीपूजन करतो.
आपला सनातन हिंदू धर्म मूर्तिपूजेचा ठाम पुरस्कर्ता आहे. त्यामुळे जोपर्यंत आपली आध्यात्मिक पातळी उच्चकोटीच्या मानसपूजेपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत मूर्तिपूजा हेच एकमेव साधन आहे. म्हणूनच आपल्या प्रत्येक देवतांची अनेकानेक मंदीरे आपल्याला पाहावयास मिळतात. मूर्ती कुठल्या देवतेची, कुठल्या धातूची किंवा वस्तूची आणि कशी असावी याबद्दल सारासार विचार आपल्या पूर्वजांनी केला आहे. त्यामध्ये देवतेचे तत्व काय आहे, तिच्याजवळ कोणती आयुधे आहेत, त्यांची किती दिवस पूजा करणे अपेक्षित आहे, या सर्व गोष्टींबद्दल विचार केलेला आढळतो. निर्गुण निराकार परमात्मा ज्यावेळी सगुण साकार होतो, त्यावेळी तो एक विशिष्ट रूप धारण करतो. जसे आपण आपल्या रोजच्या जीवनात विविध भूमिकांमध्ये वावरत असतो. उदा. घरी उठल्यावर आपण व्यायामाला किंवा सकाळी फिरायला जातो, त्यावेळी आपण वेगळ्यााच रुपात असतो. त्यावेळी आपल्या मनाची अवस्थासुध्दा वेगळी असते. त्यावेळी कोणी ऑफिसच्या कामाबद्दल विचारले तरी आपल्याला आवडत नाही. ऑफिसमध्ये आपला अवतार वेगळा असतो. कौटुंबिक कार्यक्रम तसेच सामाजिक कार्यात आपण वेगळेच असतो. आपण घरीच मुलांचे वडील आई, माता-पित्यांचे पुत्र, सामाजिक कार्यात कार्यकर्ता, ऑफिसमध्ये कधी बॉस तर कधी कर्मचारी या अनेक भूमिका करीत असतो. आपले हे सर्व फोटो एकत्र बघितले तर असे लक्षात येईल की आपलीच ही सर्व रुपे किती भिन्न आहेत. अगदी असेच देवाचेदेखील आहे. '‘यथा देहे तथा देवे' म्हणजे 'जे पिण्डात आहे, तेच ब्रह्मांडात आहे’,' या महावाक्यानुसार जी देवता ज्या कार्याची आहे, तिचे स्वरुप तसेच अपेक्षित आहे.
आज आपण महालक्ष्मी या देवतेचा विचार करणार आहोत. महालक्ष्मीकडून आपल्याला धनधान्य, ऐश्वर्या देणे हे कार्य अपेक्षित आहे. त्यामुळे तिचे स्वरुपही तसेच असणे गरजेचे आहे. अन्यथा आपण ते कार्य त्या देवतेकडून अपेक्षितच करीत नाही, असा त्याचा अर्थ होतो. कार्य आणि देवतेचे स्वरुप योग्य असेल तरच ती देवता ते कार्य करु शकेल. नाही तर ते पूजन, अर्चन, हवन, अनुष्ठान त्या निर्गुण निराकार परमात्म्याला प्राप्त होईल. मात्र, तुमचे कार्य सिध्द होणार नाही. म्हणून कर्ममार्गामध्ये देवतेचे स्वरुप म्हणजेच विग्रह याला फार महत्व आहे. सप्तषतीच्या मूर्तिरहस्यातील दुसऱ्या श्लोकात,
कनकोत्तमकान्तिः सा सुकान्तिकनकाम्बरा।
देवी कनकवर्णाभा कनकोत्तम भूषणा।।
अर्थात् - भगवती महालक्ष्मीचे सर्वांग सुवर्णकांतीचे आहे. तिने सोन्याचेच वस्त्र परिधान केलेले आहे. सुवर्णाप्रमाणेच तिचे तेज आहे तसेच सुवर्णाचेच अलंकार तिने धारण केलेले आहेत.
असे म्हटले आहे.
महालक्ष्मीच्या पूजेने जर आपल्याला ऐश्वर्य अपेक्षित आहे, तर आपण अशाच प्रकारच्या मूर्तिची पूजा करणे अपेक्षित आहे. अन्यथा सुपारीवरदेखील देवतेचे आवाहन करताच येते, पूजादेखील करता येते. मात्र, त्यामुळे आपल्याला अपेक्षित फलप्राप्ती होणार नाही. ज्यांना माता लक्ष्मीने भरभरुन दिले आहे, त्यांनी सुवर्णमूर्तिची पूजा करावी. ज्यांना हे शक्य नाही, त्यांनी चांदीच्या, पितळीच्या, तांब्याच्या किंवा पंचधातूच्या मूर्तिची स्थापना करुन पूजा करावी. फक्त भगवती लक्ष्मीचीच मूर्ती धातूची असावी. प्रत्येक धातूप्रमाणे त्या मूर्तीचे आयुष्य सांगितले आहे. तांब्याच्या मूर्तिचे आयुष्य एक संवत्सरापर्यंत तर सोन्याच्या मूर्तिचे आयुष्य ती भंग होईपर्यंत असते. त्याप्रमाणे तिची तितके दिवस पूजा करता येते.
महालक्ष्मीची पूजा पूजायंत्रावरसुद्धा केली जाते. हे यंत्र म्हणजेच देवी महालक्ष्मीचा निवास असलेले नगर किंवा तिचा दरबार. या ठिकाणी देवीसह तिच्या सर्व शक्तीदेखील निवास करतात. पण ही पूजा फार शास्त्रोक्त पध्दतीने करावी लागते. त्याकरिता शाक्तमार्गाची दीक्षा घेणे गरजेचे असते. म्हणून सर्वसामान्य भक्तांनी मूर्तिपूजाच करावी, असे संकेत आहेत.
आपण गणेशोत्सव आणि नवरात्रीमध्ये दुर्गा उत्सव साजरे करतो. त्यात मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. दररोज पूजा होते आणि उत्सव संपताच तिचे विसर्जनही केले जाते. मातीतूनच मूर्ति घडवायची व मातीत पुन्हा विसर्जित करायची हा पूजन प्रकारही फार उत्तम आहे. मात्र, या मूर्तीचे आयुष्य उत्सवापर्यंतच अपेक्षित आहे. उत्सव संपल्यानंतर ती मूर्ती थोडा वेळदेखील ठेवू नये.
गणेशोत्सव किंवा नवरात्र हे उत्सव कालमर्यादेत बांधलेले असतात म्हणून त्यात आपण मातीचा वापर करुन मूर्ती घडवतो. पण दीपावलीच्या उत्सवाला अशी कालमर्यादा नाही. दीपावली हा सणांचा समूह आहे. प्रत्येक दिवस हा वेगळा सण आहे. यात आपण रोज महालक्ष्मीचीच पूजा करतो, असे नाही. म्हणून याला कालमर्यादा नाही. आणि कालमर्यादा नाही म्हणजे पुढील वर्षीपर्यंत कमीतकमी कालमर्यादा आहे. त्यामुळे तांबे, सोने किंवा अन्य धातूंच्या मूर्तिचे पूजन याठिकाणी योग्य होईल असे वाटते.
दुसऱ्या पध्दतीने विचार केला तर महालक्ष्मीचे तत्व काय? उत्पत्ती कषी? निवासस्थान कोणते? त्यानुसार तिची मूर्ती कशी असावी, हे आता पाहू. जगदंबा, आदिशक्ती, प्रकृतिरुपा, आदिमाया, जगज्जननी, परमेश्वरी सृष्टीची निर्मिती आणि चलनवलनासाठी स्वतःला महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या रुपांमध्ये रुपांतरीत करते. महालक्ष्मी स्वरुपात ती श्री विष्णुंची पत्नी असते. ती मूळरुपाने जरी रजोगुणांची असली तरी ती सत्वगुणांकडे आकर्षित होते व चंचल स्वभाव असूनही नारायणाजवळ स्थिर राहते. रजोगुणप्रधान लक्ष्मी तेजोगुणाची म्हणजेच अग्नितत्वाची आहे. तिची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली आहे. म्हणजेच घर्षणातून तसेच पाण्यातून. तिचा निवास सदैव क्षीरसागरात असतो. आता विचार करुन बघा की, जलात मंथनातून जिची उत्पत्ती झाली. जिच्यात अग्नितत्व विराजमान आहे आणि जिचा निवास सागरात आहे, अशा महालक्ष्मीची मूर्ती मातीची करावी का? धातूला गरम करुन आकार देऊन मूर्ती घडते. त्यामुळे त्यात ते अग्नितत्व आलेच व तिला पाण्यात ठेवल्यानेही काहीही त्रास नाही. मग तिच्या स्वभावगुणांशी जवळीक असणारी मूर्ती असल्यास त्यात निवास करण्यास महालक्ष्मी अधिक आनंद होणार नाही का?
तिसरा विचार आपणासमोर मांडतो. महालक्ष्मीच्या पूजापध्दतीमध्ये दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे अभिषेक व स्नानविधी. त्यातही दीपावलीच्या उत्सवात अभ्यंगस्नानाला अधिकच महत्व आहे. पण मातीच्या मूर्तीमुळे आपण भगवतीला या अभ्यंगस्नानापासूनच वंचित ठेवत असतो. मातीच्या मूर्तीवर आपण पंचामृत स्नान, पाद्य, अर्घ्य, आचमनीय, स्नान, अंगप्रक्षालन, हे सर्व पूजोपचार करु शकत नाही. त्याचबरोबर अभिषेक देवीला अत्यंत प्रिय आहे. लक्ष्मीसूक्ताने देवीची स्तुती करीत अभिषेक करणे, यासारखे दुसरे पुण्य नाही. तो आपण या मातीच्या मूर्तिमुळे आपण हिरावून घेतो.
हे सर्व विचार सोडून दिले व आमच्या येथे मातीचीच मूर्ती असते. तिची पूजा झालीच पाहिजे, असा अट्टहासच असेल तर तिचे विसर्जनही तितकेच महत्वाचे आहे. ती मूर्ती पूजेचे उत्थापन झाल्यानंतर लगेच योग्य रितीने विसर्जित व्हायला हवी. पूजेनंतर २४ तासांत ती पूर्णपणे पाण्यात विरून जाईल, याची खात्री करुन घेणे गरजेचे आहे.
आपल्या सनातन धर्मात अमुक चुकीचेच आहे व हेच फक्त बरोबर आहे, असे कधीही म्हटले जात नाही. आपली संस्कृती ‘'बहु ऋषिमंत संविज्ञातं’’' अशी आहे. अनेक ऋषी आणि संतांनी भगवत् भक्तीचे अनेक मार्ग सांगून ठेवले आहेत. जशी प्रत्येकाची प्रकृती सारखी नाही, स्वभाव सारखे नाहीत तसेच त्याने केलेली साधनादेखील सारखी राहणार नाही. प्रत्येकाने स्वधर्मानुसार, पूजापध्दतीनुसार महालक्ष्मीची पूजा करावी. मात्र त्यात दोष घडू नये ही काळजी अवश्य घेतली पाहिजे.
- भूषण विनायकशास्त्री आर्वीकर
99701 72695




