रा. स्व. संघ आणि दीक्षाभूमी दोन्हींचे कार्य व्यापक
‘संघभूमी आणि दीक्षाभूमी’ विषयावर नागपुरात परिसंवाद
नागपूर: 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दीक्षाभूमी यांचा इतिहास वेगवेगळा असला, तरी दोन्हींचे कार्य व्यापक आहे. संघ समरसतेचा पुरस्कर्ता आहे, तर आंबेडकरवादी विचारधाराही सर्वव्यापक होत आहे. विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन एकाच दिवशी शांततेत साजरे होणे हे त्याचेच उदाहरण आहे,' असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि. स. जोग यांनी नुकतेच व्यक्त केले.
१००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘नांदी संमेलना’त रविवारी ‘संघभूमी आणि दीक्षाभूमी’ या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. जोग बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे नियोजित, विदर्भ साहित्य संघ, नागपूर आयोजित आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी दीक्षाभूमीचे महत्त्व अधोरेखित केले. 'स्वातंत्र्य दिन, भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि धम्मचक्र प्रवर्तन या तीन महत्त्वपूर्ण घटनांनी आधुनिक भारताचा इतिहास घडविला आहे. मानव, समाज, देश आणि पर्यावरणाचा समतोल विकास साधायचा असेल, तर धर्मापेक्षा धम्माची आवश्यकता आहे. धम्माचा हाच मार्ग दीक्षाभूमीने दाखविला आहे,' असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश एदलाबादकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसतेच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. 'डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनीही आपल्या कार्यासाठी नागपूरची निवड केली. त्यामुळे संघभूमी आणि दीक्षाभूमी ही दोन्ही स्थळे महत्त्वाची आहेत. या भूमीचे महत्त्व लक्षात घेऊन समरसता आणि सामंजस्याच्या भावनेतून त्यांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे,' असे ते म्हणाले.
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले.




