नागपुर संस्करण
समाचार

स्वयंसेवक हीच संघाची खरी ओळख

परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

📅 10 नव॰ 2026 ✍️ Ratnesh buradkar 👁 48 बार देखा
स्वयंसेवक हीच संघाची खरी ओळख

नागपूर: 'स्वयंसेवक हेच संघाचे खरे वैशिष्ट्य आणि ओळख आहे. समाजासाठी आपण किती चांगले कार्य करू शकतो, हाच त्याचा एकमेव विचार असतो,' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी केले.

नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेडच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या मुख्यालयातील नवनिर्मित सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर नागरिक बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, उपाध्यक्ष अशोक गोयल, रिझर्व्ह बँक ऑफ़ इंडियाचे क्षेत्रीय संचालक सचिन शेंडे आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. याच कार्यक्रमात संघाचे प्रचारक श्यामजी हरकरे लिखित 'विदर्भातील संघकार्याचे सप्तर्षी' या पुस्तकाचे विमोचन डॉ. मोहनजी भागवत आणि इतर अतिथींच्या हस्ते करण्यात आले.

'स्वयंसेवकाचे जीवन हे प्रवाहाच्या विरोधात पोहण्यासारखे असते. समाजासाठी आपण किती चांगले कार्य करू शकतो, हाच त्याचा एकमेव विचार असतो. प्रत्येक स्वयंसेवक या आदर्शापर्यंत पूर्णपणे पोहोचेलच असे नाही. मात्र, स्वयंसेवकांची वाटचाल एकाच दिशेने सुरू असते. प्रत्येकाच्या कार्याची पातळी आणि स्वरूप वेगवेगळे असू शकते; मात्र सर्वांची दिशा एकच असते,’ असे डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले.

संघाच्या सुरुवातीच्या काळातील एका घटनेचा संदर्भ देताना त्यांनी इब्राहिम नावाच्या व्यक्तीने संघावर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला केलेल्या विरोधाची आठवण सांगितली. '१९३०च्या दशकात तत्कालीन मध्य प्रांताच्या विधानसभेत संघावर बंदी घालण्याचा प्रस्ताव चर्चेला आला होता. त्या वेळी संघाच्या बाजूने कोणताही स्वयंसेवक पुढे आला नाही; मात्र इब्राहिम यांनी एकट्याने संघाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. संघ जातीयवादी नसल्यामुळे त्यावर बंदी घालू नये, असा युक्तिवाद इब्राहिम यांनी त्यावेळी केला होता. तसेच संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याविषयीही त्यांनी सकारात्मक मत व्यक्त केले होते,' असे प. पू. सरसंघचालक म्हणाले.

‘हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, असे म्हणणाऱ्यांना मनोरुग्णालयात पाठवायला हवे, असे मला वाटते. मात्र, मी डॉ. हेडगेवार यांना ओळखतो. ते मनोरुग्ण नाहीत. तर एक चांगले व्यक्ती आहेत. त्यामुळे संघ जातीयवादी असू शकत नाही,’ असे इब्राहिम यांनी म्हटल्याचे डो. मोहनजी भागवत यांनी सांगितले.

'त्या काळात संघाची स्थापना होऊन काही वर्षेच झाली होती. संघाची फारशी ओळख समाजात निर्माण झालेली नव्हती; मात्र डॉ. हेडगेवार यांना अनेक जण ओळखत होते. संघाच्या स्थापनेपासूनच स्वयंसेवक ही संघाची ओळख बनली. आज शंभर वर्षांनंतरही स्वयंसेवक हीच संघाची खरी ओळख कायम आहे,' असे डॉ. भागवत यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर नागरिक बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी केले. तर आभार तुषारकांती डबले यांनी मानले.

'नागपूर नागरिक बँक ही प्रचारकांच्या मोठ्या कामाचे मूर्त रूप'

यावेळी बोलताना केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन यांनी नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या आजवरच्या यशामध्ये संघ प्रचारकांचा मोलाचा वाटा आहे. 'बँकेची स्थापना झाली त्यावेळी प्रभाकरराव फैझपूरकर नागपुरात प्रचारक होते आणि त्यांनी घरोघरी जाऊन बँकेच्या भाग भांडवलासाठी पैसे गोळा केले होते. फैझपूरकर यांच्या प्रमाणेच अनेक स्वयंसेवक आणि प्रचाराकांचे बँकेच्या वाटचालीत योगदान आहे. नागपूर नागरिक बँक ही या प्रचारकांच्या कामाची सक्सेस स्टोरी आहे,' असे गडकरी म्हणाले.

'प्रचारकांचे जीवन हे समर्पणाचे उदाहरण'

संघ प्रचारक श्यामजी हरकरे लिखित 'विदर्भातील संघकार्याचे सप्तर्षी' या पुस्तकाचे विमोचन डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याबद्दल बोलताना त्यांनी प्रचारकांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. 'प्रचारकांच्या जीवनावर कोणत्याही भौतिक लाभाच्या अपेक्षेने साहित्य लिहिले जात नाही. तर त्यांच्याप्रती असलेल्या कृतज्ञतेतून आणि आत्मीयतेतून लिहिले जाते. कोणत्याही प्रचारकाने आपल्या कार्याच्या मोबदल्यात काही मिळावे, अशी अपेक्षा कधीही ठेवलेली नाही आणि भविष्यातही ठेवणार नाही. कारण त्यांच्या जीवनात वैयक्तिक लाभाला कोणतेही स्थान नसते. प्रचारकासाठी संघ हेच सर्वस्व असते. संघ सांगेल ते काम आणि ज्या ठिकाणी करण्यास सांगितले जाईल तिथे तो कोणतीही तक्रार न करता कार्यरत राहतो. स्वतःच्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षांचाही त्याग करून तो संघकार्याला जीवन समर्पित करतो. अशा व्यक्तींच्या जीवनातून स्वाभाविकपणे आदर आणि श्रद्धेची भावना निर्माण होते,' असे डॉ. भागवत म्हणाले. 'प्रचारकांचे समर्पण आणि निष्ठा शब्दांत पूर्णपणे व्यक्त करता येत नाहीत. ती प्रत्यक्ष अनुभवातूनच समजते. त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनाच त्यांच्या जीवनातील त्याग आणि समर्पणाची खरी जाणीव होऊ शकते,' असेही त्यांनी नमूद केले.

संबंधित लेख