Breaking
Loading latest news...
News

श्रध्देय अनंतराव भिडे यांचे जीवन प्रेरणादायी : सुनील देशपांडे

📅 25 Oct 2026 ✍️ Shri Amol Tapase 👁 70 views
श्रध्देय अनंतराव भिडे यांचे जीवन प्रेरणादायी : सुनील देशपांडे
श्रध्देय अनंतराव भिडे यांचे जीवन प्रेरणादायी : सुनील देशपांडे 
नागपूर, २४ ऑक्टोबर :
समर्पित वृत्ती, मजबूत दूरदृष्टी, कमालीची शिस्त, सेवाभाव आणि सातत्य ही अनंतराव भिडे यांची वैशिष्ट्ये होती. रा. स्व. संघ लोककल्याण समिती ही त्यांचीच देण असून, सफल जीवनाकडून सार्थक जीवनाकडे झालेला त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांनी केले. अनंतराव भिडे जन्मशताब्दी समारोह समिती व डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र यांच्या संयुक्त वतीने शनिवारी २४ ऑक्टोबर रोजी डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र येथे आयोजित रक्तदान शिबिर आयोजक व दानदाते सत्कार समारंभात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर डॉ. दिलीप गुप्ता, घनश्याम कुकरेजा व वीणा काळे आदी मान्यवर उपस्थित होते. सुनील देशपांडे यांनी अनंतराव भिडे यांच्या व्यक्तीमत्त्वाचा गौरव करताना हिंगणा येथील पूरपीडितांसाठी घरे उभारण्यातील त्यांचे योगदान आणि निधी संकलनाच्या कौशल्याचा विशेष उल्लेख केला.
त्याग व समर्पण भावनेतून केलेले रक्तदान हा एक मोठा यज्ञ असून, त्याग करून उपभोग कसा घ्यायचा याचे उत्तम उदाहरण रक्तदान असल्याचे अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी सांगितले.
डॉ. हेडगेवार रक्तपेढीने कायम सेवाभाव जपला असून अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात अशोक पत्की यांच्या प्रास्ताविकाने झाली. याप्रसंगी मिलिंद रहाटगावकर निर्मित आणि सुधीर पाठक लिखित अनंतराव भिडे यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमात अजय कनोरिया, अलका कनोरिया, राजेश त्रिपाठी, राहुल त्रिपाठी, समीर सालोडकर, प्रवीण करनकाळ, प्रफुल्ल जामदार, भालचंद्र पटवर्धन, प्रज्ज्वल गणोरकर, स्वाती पौनीकर व स्वर्णिमा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Related Articles