नरकचतुर्दशी
दीपावलीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. या दिवसाला काली चतुर्दशी, रूप चतुर्दशी, नरक निवारण चतुर्दशी तसेच छोटी दिवाळी या विविध नावांनी ओळखले जाते.
ग्रामीण भागात नरक चतुर्दशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकरी बांधव नरक चतुर्दशीच्या दिवशी हंगामातील पहिल्या पिकाची पूजा करतात. धान्याची पूजा करतात. सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून तो प्रज्वलित केला जातो.
एका पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून त्याच्या तावडीतून १६ हजार महिलांची सुटका केली होती. या पराक्रमाचा आनंदोत्सव म्हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते. नरकचतुर्दशीच्या संबंधी आणखी एक पौराणिक कथा सांगितली जाते. रंतीदेव नावाचा एक राजा होता. तो त्याच्या कर्तव्यदक्ष कार्यशैलीमुळे प्रजेमध्ये लोकप्रिय होता. संपूर्ण आयुष्यात आपल्याकडून कोणतेच पाप झाले नाही, अशी त्याला खात्री होती. कालांतराने त्याचा मृत्यू झाला आणि यमदूत त्याला नरकात घेऊन गेला. नरकात नेण्यात आल्याने राजा विचार करू लागला. त्याने याबाबत यमदुताला विचारले. त्यावर यमदूत म्हणाला, 'हे राजा एक दिवस एक गरीब याचक तुझ्याकडे आला होता. मात्र त्याला तुझ्या राजवाड्याच्या दारावरून काहीही न घेता उपाशीपोटी परत जावे लागले. त्या पापाचे फळ म्हणून तुला नरकात आणले आहे.' यमदूताचे हे बोलणे ऐकून राजाने त्याला एक वर्षाचा अवधी मागितला. यमदूताने राजाला परवानगी दिली. राजा नरकातून एका साधूपुरुषाकडे गेला. आपली कथा सांगितली आणि नरकात न जाण्यासाठी उपाय विचारला. त्या सत्पुरुषाने राजाला कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले. 'गरीब आणि पीडितांना अन्नदान केले तरच नरकात जाणे टळू शकते,' असे स्पष्ट केले. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने आचरण केले आणि पापमुक्त होऊन तो स्वर्गात गेला. त्या दिवसापासून मनुष्याला पाप आणि नरकापासून मुक्ती मिळावी यासाठी पृथ्वीतलावर कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी व्रत ठेवण्याची पद्धत सुरू झाली.
आपल्या सर्वांना दिवाळीचा दुसरा दिवस नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा.
रवींद्र गोविंद पांडे
- ९३२५४५७०५२




