नागपुर संस्करण
समाचार

छत्तीसगडमध्ये ५०० जणांची सनातन धर्मात घरवापसी

कोरबा येथे हिंदुत्व रक्षक सन्मान सोहळा

📅 24 नव॰ 2026 ✍️ Vsk 👁 40 बार देखा
छत्तीसगडमध्ये ५०० जणांची सनातन धर्मात घरवापसी

कोरबा: छत्तीसगडमधील कोरबा येथे आयोजित हिंदुत्व रक्षक सन्मान सोहळ्यात सुमारे १०० कुटुंबांतील ५०० व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून सनातन धर्मात घरवापसी केली. वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींसह हा कार्यक्रम पार पडला. यावेळी घरवापसी केलेल्या व्यक्तींचे पादप्रक्षालन करून स्वागत करण्यात आले.

कोरबा शहरातील घंटाघर ओपन थिएटर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अखिल भारतीय घरवापसी अभियानाचे प्रमुख प्रबल प्रतापसिंह जुदेव आणि महामंडलेश्वर स्वामी अनिलानंद महाराज यांच्यासह अनेक संत-महंत यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात काही महिलांनी धर्मांतर करण्यामागील कारणे आणि त्यानंतरचे अनुभव सांगितले. कुटुंबातील सदस्यांचे आजार बरे होतील, या आशेने काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मात्र, अपेक्षित परिणाम न मिळाल्याने पुन्हा आपल्या मूळ धर्मात परतण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रबल प्रतापसिंह जूदेव यांनी त्यांचे वडील दिवंगत दिलीपसिंह जूदेव यांनी सुरू केलेले घरवापसी अभियान पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. धर्मांतरित झालेल्या प्रत्येक कुटुंब पुन्हा हिंदू धर्मात परतेपर्यंत माझे काम सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.

महामंडलेश्वर स्वामी अनिलानंद महाराज यांनी धार्मिक परंपरा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी समाजाने संघटित राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला धर्मसेनेचे कार्यकर्ते, संत-महंत आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख