समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ज्ञान पोहोचवणे हाच पुरुषार्थ : डॉ. मोहन भागवत
स्वामी कल्याण देवजी यांच्या ‘अभिनंदन’ पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ज्ञान पोहोचवणे हाच पुरुषार्थ: डॉ. मोहन भागवत
स्वामी कल्याण देवजी यांच्या ‘अभिनंदन’ पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन
मेरठ: 'परोपकार, मानवी संवेदना तसेच कुटुंबीय आणि समाजाप्रती करुणाभाव ही आपल्या ऋषिमुनींनी दिलेली ज्ञानशिदोरी आहे. हे ज्ञान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हे आपले ध्येय असले पाहिजे. हाच खरा पुरुषार्थ आहे,' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
शुकतीर्थ येथील महर्षी शुकदेव आश्रमात वीतराग स्वामी कल्याण देवजी यांच्या ‘अभिनंदन’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी, स्वामी ओमानंदजी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पूजनीय सरसंघचालक म्हणाले की, जगातील विविध सभ्यता आणि संस्कृतींनी आपले बहुतांश योगदान दिले आहे. मात्र, भारतीय संस्कृतीकडे जगाला देण्यासाठी अद्यापही बरेच काही आहे. विश्वकल्याणासाठी भारतीय संस्कृतीला आधार मानून जीवन जगण्याची आवश्यकता असल्याचे आता संपूर्ण जगाला जाणवू लागले आहे.
देव आणि राक्षस यांच्या स्वभावातील फरक स्पष्ट करताना ते म्हणाले की, जो केवळ स्वतःच्या हिताचा आणि संरक्षणाचा विचार करतो, त्याची प्रवृत्ती राक्षसी असते. याउलट, जो परोपकारासाठी आणि सर्वांच्या हिताचा विचार करून संपूर्ण समाजाचे रक्षण करतो, तो देवत्वाचे प्रतीक असतो.
भारताच्या ऋषिमुनींनी कठोर तपश्चर्येतून ज्ञान संपादन केले आणि ते समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले. याउलट, पाश्चात्त्य समाजातील ज्ञान बहुतांश वेळा विद्वानांपुरतेच मर्यादित राहते. समाजाच्या कल्याणासाठी ज्ञान मिळवण्याबरोबरच ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, एकांतात साधना आणि समाजात परोपकार हीच भारतीय जीवनपद्धती आहे. आपली तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे साधू-संतांच्या तपश्चर्येतून ऊर्जावान बनतात. वीतराग स्वामी कल्याण देवजी महाराज यांनीही शुकतीर्थ येथे राहून अशीच तपश्चर्या आणि समाजसेवा केली. त्यांनी आपल्या जीवनकाळात सुमारे ३०० शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. १९४५ पासून ते शुकतीर्थ येथे येऊ लागले आणि या परिसराच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
तीर्थयात्रा आणि धार्मिक कार्यांना कालबाह्य समजणाऱ्यांना भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजून घ्यावे लागेल. भारतीय संस्कृती आणि परंपरांचे महत्त्व अधोरेखित करणारा काळ आता येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला शुक्रताल येथील विविध आश्रमांचे अध्यक्ष, साधू-संत, संघाचे स्वयंसेवक व कार्यकर्ते यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.




