'धर्मकोषस्य गुप्तये'. - श्रीपाद कोठे
कोलंबो ते अल्मोडा - स्वामी विवेकानंदांचे भाषण
आपले थोर आणि अजोड स्मृतिकार महर्षी मनू यांनी आपल्या मनुस्मृतीत असा दंडक घालून दिला आहे की,
श्रद्धधान: शुभां विद्याम् आददीतावरादपि
अंत्यादपि पर धर्मं स्त्रीरत्नं दुष्कुलादपि
कल्याणकारी, शुभ आणि चांगली विद्या अगदी हीन, अगदी खालच्या जातीच्या व्यक्तीकडूनही श्रद्धापूर्वक ग्रहण करावी. अंत्यजाकडूनदेखील श्रेष्ठ धर्म म्हणजेच मुक्तीचा मार्ग शिकावा. एखादी स्त्री जर खरोखर उत्तम असेल तर ती अत्यंत अधम व नीच कुळातली असली तरी तिचे पाणीग्रहण करावे.
दिव्यदृष्टीच्या मनूंनी जे म्हटले आहे ते अगदी बरोबर आहे. आधी स्वतःच्या पायांवर उभे रहा. त्यानंतर मग इतर सर्व देशांकडून व जातींकडून शिका. जेवढे शक्य आहे तेवढे आत्मसात करा. जे काही तुमच्या कामी पडू शकण्यासारखे आहे त्याचे ग्रहण करा पण एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या आणि ती हीच की तुम्ही हिंदू आहात. तुमच्या जातीच्या जीवनाचा आदर्श, तुमच्या जातीच्या जीवनाचा मूलमंत्र आहे धर्म. आणि म्हणून तुम्ही दुसऱ्याकडून जे काही शिकाल, जे काही घ्याल, त्या साऱ्यांचे स्थान धर्माच्या खालचेच राहिले पाहिजे. धर्म प्रधान व ते सारे गौण व दुय्यम असेच झाले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचाच एकेक जीवित हेतू असतो. प्रत्येक व्यक्तीच जणू एक एक विशिष्ट कार्य करण्यासाठी जन्मास येत असते. तिच्या अनंत पूर्वजन्मीच्या क्रमानेच तिच्या या जीवनाला हे विशिष्ट वळण लागलेले असते. त्याला ही विशिष्ट गती आलेली असते. हे तिच्या त्या अनंत पूर्वकर्मांचेच फळ असते. माझ्या स्वदेश बंधूंनो तुमच्यातील प्रत्येक जण एक गौरवशाली वारसा घेऊन जन्माला आला आहे आणि म्हणून तुमच्यातील प्रत्येकालाच स्वतःच्या जीवनात एक विशिष्ट कार्य करावयाचे आहे. एक विशिष्ट व्रत घ्यावयाचे आहे. महामहिमाशाली हिंदू जातीच्या अनंत गतजीवनाच्या कर्मसमष्टीने तुमचे हे जीवनव्रत ठरवले गेले आहे. बंधूंनो सावध रहा. तुमचे लक्षावधी पूर्वज तुमचे प्रत्येक कर्म अगदी डोळ्यात तेल घालून बघत आहेत. तुमच्या प्रत्येक कार्यावर जणू त्यांची निगराणी आहे. म्हणून खूप सावध रहा. जे व्रत पूर्ण करण्यासाठी प्रत्येक हिंदू बालकाचा जन्म असतो ते व्रत कोणते? महर्षी मनूंनी ब्राह्मणांच्या जीवित हेतूविषयी जी साभिमान घोषणा केली आहे ती तुम्ही वाचलेली नाही काय? मनू म्हणतात की, ब्राह्मणाचा जन्म असतो 'धर्मकोषस्य गुप्तये'. धर्मरूपी खजिन्याच्या संरक्षणासाठी. माझ्या मते केवळ ब्राह्मणाचाच नव्हे तर आपल्या या पवित्र भारतभूमीत जन्मास येणाऱ्या प्रत्येक पुरुषाचा आणि प्रत्येक स्त्रीचा जन्म असतो 'धर्मकोषस्य गुप्तये'. धर्मरूपी खजिन्याच्या संरक्षणासाठीच. तेच भारतात जन्म घेणाऱ्या प्रत्येक बालकाचे आणि प्रत्येक बालिकेचे जीवितकार्य होय. आपल्या जीवनातील इतर सर्व बाबी आपल्या जीवनाच्या या मूळ उद्देशाच्या अधीन असावयास हव्यात. संगीतात एक प्रधान सूर असतो आणि इतर सर्व सूर त्याच्याच अधीन असतात. त्याचेच अनुवर्तन करीत असतात आणि त्यामुळेच त्या संगीतात नीट लय साधत असते. असेच याही बाबतीत व्हावयास हवे. असेही एखादे राष्ट्र असणे शक्य आहे की, ज्याचा जीवनाचा मूलमंत्र, मूळ उद्देश राजनीतिक श्रेष्ठत्व आहे. त्या राष्ट्राच्या जीवनात धर्माला व इतर सर्व बाबींना अर्थातच त्याच्या त्या मूळ जीवनध्येयाच्या खाली दुय्यम असेच स्थान लाभणार. परंतु हा एक असा देश आहे की ज्याच्या जीवनाचा प्रधान उद्देश आहे धर्म. वैराग्य ज्याचे ब्रीदवाक्य आहे. हे जग असार आहे, मिथ्या आहे, दोन दिवसांचा भ्रम आहे आणि धर्माखेरीज जे काही आहे ते सारे ज्ञानविज्ञान भोगैश्वर्य धनदौलत नाम यश कीर्ती वगैरे सारे काही त्या धर्माच्या तुलनेने दुय्यम व गौण होय. धर्म, आध्यात्मिकता, पावित्र्य ही हिंदूंचा; प्रत्येक हिंदू बालकाचा जन्मसिद्ध व स्वभावसिद्ध संस्कार होत. आपले पाश्चात्य विज्ञानांचे ज्ञान, आपली विद्वत्ता, आपली संपत्ती, आपली प्रतिष्ठा, आपली कीर्ती; सारांश आपले सारेच काही आपल्या त्या ब्रीदाच्या, आपल्या धर्माच्या अधीन ठेवणे, त्यांना धर्माचे सहाय्यक बनविणे हेच खऱ्या हिंदूंच्या चारित्र्याचे वैशिष्ट्य होय. म्हणून ज्याच्या ठायी हिंदू जातीच्या जीवनाचा झराच अशी आध्यात्मिकता पुरेपूर विद्यमान आहे असा सनातनी माणूस आणि जो केवळ पाश्चात्य सभ्यतेचे कित्येक नकली हिरेच कवटाळून बसला आहे परंतु ज्याच्या ठायी ती जीवनदायी आध्यात्मिकता नाही असा पाश्चात्याळलेला माणूस; या दोघांची तुलना केल्यास माझी खात्री आहे की, येथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती प्रथमोक्त सनातन्याचीच निवड करावयास तयार होईल. कारण त्या सनातन्याच्या बाबतीत आशा करायला थोडी जागा असते. आसरा घ्यायला त्याच्याजवळ काहीतरी असते. स्वजातीचे ब्रीद, स्वजातीचा मूलमंत्र त्याच्या ठायी स्फुरत असतो. म्हणून तो वाचण्याची आशा आहे. परंतु त्या दुसऱ्या राजेश्रींचा मृत्यू अगदी अटळ आहे. ज्याप्रमाणे कोण्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत तिच्या मर्मावर जर घाव बसला नसेल, तिचे मर्मस्थान जर सुरक्षित असेल तर मग तिच्या इतर कोणत्याही अवयवावर कितीही घाव बसले तरी त्यांना घातक म्हणता यावयाचे नाही. कारण इतर अवयव व त्यांच्या क्रिया या ती व्यक्ती जिवंत राहण्याच्या दृष्टीने तितक्याशा आवश्यक नसतात. त्याचप्रमाणे आमच्या जातीच्या मर्मस्थानी वार न झाल्यास तिच्या विनाशाची मुळीच भीती नाही. म्हणून हे नीट लक्षात ठेवा की, तुम्ही जर धर्म सोडून देऊन जडालाच सर्वस्व मानणाऱ्या पाश्चात्य सभ्यतेच्या मागे धावाल तर तीन पिढ्यातच तुम्ही नष्ट होऊन जाल. हिंदूंनी धर्म सोडला की हिंदू जातीच्या जीवनाचा कणाच मोडला म्हणून समजा. ज्या पायावर या जातीचा सुविशाल प्रासाद उभारला गेला आहे तो पायाच भग्न झाला असे समजा आणि याचा परिणाम ठेवलेलाच आहे. तो म्हणजे संपूर्ण सर्वांगीण ध्वंस.
म्हणून मित्रहो, आपल्या जातीच्या उन्नतीचा हाच मार्ग आहे. जे अमूल्य धर्मधन आपल्याला आपल्या प्राचीन पूर्वजांकडून वारसा म्हणून लाभले आहे ते प्राण पणास लावून पक्के धरून ठेवणे हेच आपले पहिले आणि मुख्य कर्तव्य होय. तुम्ही अशा देशाविषयी कधी ऐकले आहे काय की, ज्या देशातील चक्रवर्ती सम्राट स्वतःला प्राचीन राजेरजवाड्यांचे व जुनाट किल्ल्यात राहून वाटसरूंचे सर्वस्व लुबाडणाऱ्या डाकू बॅरनांचे वंशज म्हणविण्यात भूषण न मानता; अरण्यवासी अर्धनग्न ऋषिमुनींचे वंशज म्हणवून घेण्यात भूषण मानत असतात. अशा देशाविषयी तुम्ही कधी ऐकले आहे काय? जर ऐकले नसेल तर ऐका. आपली ही मातृभूमीच तो देश होय. इतर देशात मोठमोठे धर्माचार्य हे आपण कुण्या प्राचीन राज्याचे वंशज आहोत असे सिद्ध करण्याचा आटापिटा करीत असतात तर येथे या भारतात मोठमोठे राजे हे आपण कुण्या प्राचीन ऋषींचे वंशज आहोत हे अटीतटीने सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून माझे तुम्हाला सांगणे आहे की, तुमचा धर्मावर विश्वास असो की नसो, पण आपल्या जातीचे जीवन जर तुम्ही टिकवू इच्छित असाल तर तुम्ही या धर्माला चिकटून राहिले पाहिजे. या धर्माच्या रक्षणाचे व्रत घेतले पाहिजे. एका हाताने दृढपणे धर्माला धरून ठेवून दुसऱ्या हाताने इतर जातींकडून जे काय घ्यावयाचे ते घ्या. परंतु लक्षात ठेवा की, त्या साऱ्याला हिंदू जीवनाच्या या मूळ आदर्शांच्या खालचे स्थान दिले गेले पाहिजे. हिंदू जीवनाच्या या मूळ आदर्शाच्या तुलनेने ते गौण व दुय्यमच ठरले पाहिजे तरच अपूर्व महिमाशाली स्वरूपाचा भावी भारत उदयास येईल. माझी खात्री आहे की, लवकरच तो शुभ दिवस उगवावयाचा आहे. माझी पक्की खात्री आहे की, भारत यापूर्वी कधी नव्हता इतका श्रेष्ठ लवकरच होणार आहे. प्राचीन ऋषींपेक्षा श्रेष्ठ अशा ऋषींचा उदय होईल आणि तुमचे पूर्वज हे आपल्या वंशाच्या या अभूतपूर्व उत्थानाने केवळ संतुष्टच होतील असे नव्हे तर मी अगदी ठासून सांगतो की, परलोकातील आपापल्या स्थानांवरून स्वतःच्या वंशाचा हा एवढा महिमा, ही एवढी थोरवी बघून त्यांना अतोनात गर्व वाटू लागेल. धन्य धन्य वाटू लागेल.
बंधूंनो, आपल्याला सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागतील. खूप खूप झटावे लागेल. आता झोपायला वेळ नाही. आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे. आपली ही भारतमाता हळूहळू नेत्र उघडीत आहे. ती काही काळ अंमळ निद्रिस्त झाली होती इतकेच. उठा. तिला जागे करा आणि या नवजागृतीच्या संजीवनीने तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करून भक्तीभावाने तिची तिच्या चिरंतन सिंहासनावर स्थापना करा. बंधूंनो, ईश्वरविषयक खरे खरे ज्ञान या आपल्या भारतालाच प्राप्त झाले आहे. आणखी कोणत्याही जातीला खरे खरे ईश्वरज्ञान होऊ शकले नाही. माझ्या या विधानाचे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. परंतु इतर कोणत्याही शास्त्रात खरे खरे ईश्वरस्वरूप दाखवून द्या बघू. इतर जातींचा 'येहुद्यांचा ईश्वर' 'अरबांचा ईश्वर' वगैरेंप्रमाणे एक एक जातीय ईश्वर होता आणि तो ईश्वर परत इतर जातींच्या ईश्वरांशी युद्ध करण्यात गढलेला असे. परंतु ईश्वराचे दयामयत्व, तो परमदयाळू आहे, तो म्हणजे आपला पिता आपली माता आपला सखा आपल्या प्राणांचा प्राण आपल्या आत्म्याचा अंतरात्मा आहे, हे तत्त्व फक्त भारतालाच अवगत होते. बंधूंनो याप्रमाणे ज्याचा पूर्ण महिमा केवळ भारतानेच जाणला होता; जो शैवांचा शिव आहे, वैष्णवांचा विष्णू आहे, कर्मी जनांचे कर्म आहे, बौद्धांचा बुद्ध आहे, जैनांचा जीन आहे, ख्रिस्त्यांचा व यहुद्यांचा जिहोवा आहे, मुसलमानांचा अल्ला आहे, वेदांत्यांचे ब्रह्म आहे, सर्व धर्मातील सर्व पंथांचा व संप्रदायांचा ईश्वर आहे; तो सर्वव्यापी पुरुष आपल्याला आशीर्वाद देवो. आपला पाठीराखा म्हणून आपल्याला साहाय्य करो. आपल्याला शक्ती देवो की जेणेकरून आपण आपले उद्दिष्ट कार्यात उतरवू शकू.
ॐ सह नाववतु, सह नौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै
तेजस्वि नावधितमस्तु, मा विद्विषावहै
ॐ शांति: शांति: शांति:
जे आपण श्रवण केले ते जणू खाल्लेल्या अन्नाप्रमाणे आपल्याला पुष्टी देवो. ते आपले बल होवो. त्याच्यामुळे आमच्या ठायी असे वीर्य उत्पन्न होवो की, त्याद्वारा आपण एकमेकांना साहाय्य करू शकू. आपल्यात, गुरु आणि शिष्यात कदापि एकमेकांविषयी ईर्षा असूयेचा शिरकाव न होवो. हरीच्या, त्या प्रभूच्या नावाने सर्वत्र सर्व प्रकारे शांतीच शांती विराजो.
(रामनद येथील मानपत्रास दिलेल्या उत्तरातील अंश.)




