संघ प्रचारक- स्व.लक्ष्मणराव इनामदार
जन्म दिन विशेष
*दिनविशेष - 21 सप्टेंबर
१९१७ : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मणराव इनामदार तथा वकील साहेब यांचा जन्म
(भाद्रपद शु. ५, ऋषी पंचमी)
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आयुष्याला आकार, दिशा व अस्तित्व देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे, स्व. लक्ष्मणराव इनामदार.
लक्ष्मणरावांचा जन्म २१ सप्टेंबर १९१७ रोजी खटाव - सातारा येथे झाला. एलएल.बी. करीत असताना हैद्राबादच्या निजामाविरुद्धच्या आंदोलनात १९३९ साली त्यांनी उडी घेतली. १९४३ मध्ये वकील झाल्यावर संघाचा प्रचारक म्हणून नवसारीतून केलेली सुरुवात अखेरच्या श्वासानंतर थांबली. गुजरातमध्ये त्यांना आता वकील साहेब म्हणून ओळखू लागले होते.
१९५२ मध्ये लक्ष्मणराव संघाचे प्रांतप्रचारक झाले. सारा गुजरात त्यांनी पालथा घातला. जन्माने महाराष्ट्रीय असले तरी वेष, भाषा यादृष्टीने ते सर्वार्थाने गुजराती होते.
वडनगरला स्वयंसेवकांना लक्ष्मणराव संबोधित करीत असता किशोर वयाचे नरेंद्र मोदी प्रभावित झाले. लक्ष्मणरावांच्या प्रेरणेने १९७२ मध्ये मोदींनी संघाचे प्रचारक म्हणून सुरुवात केली. कठोर शिस्त, प्रचंड मेहनत आणि लोकांशी संवाद करण्याचे व प्रेरित करण्याचे कौशल्य मोदींनी लक्ष्मणरावांकडून आत्मसात केले. मोदींना ते मुलांसारखे मानत. मोदींच्या आयुष्यावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. राजकारणाबरोबर आसने, योगा, प्राणायाम याचेही धडे मोदींनी त्यांच्याकडून घेतले.
“वाजविली तर बासरी, नाहीतर काठी”, हा दृष्टिकोन लक्ष्मणरावांनी मोदींना शिकविला. लक्ष्मणरावांच्या एका मंत्राचा नरेंद्रजी मोदी आयुष्यभर जागर करत आहेत — “समर्पित होऊन देशाची सेवा करायची.”
राष्ट्र पुनर्निर्माणाच्या प्रयत्नांत सहकाराचे महत्त्व ओळखून सहकारी चळवळीची गुणात्मक वाढ व्हावी आणि या चळवळीत सुसंस्कारित कार्यकर्त्यांची फळी तयार व्हावी म्हणून लक्ष्मणरावांनी १९७८ मध्ये सहकारभारती या संस्थेची स्थापना केली.
सहकारभारतीत आज २०१७ साली, भारतभरातील ४०० जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या २०,००० हून अधिक सहकारी संस्था आहेत.
कै. लक्ष्मणराव इनामदार यांच्याप्रमाणेच त्यांचे एक बंधू देखील संघ कार्यात राहिले.
“राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय, इदं न मम”
- VSK nagpur


