संकुचित राष्ट्रवादावर सांस्कृतिक राष्ट्रविचारांचा उतारा
संकुचित राष्ट्रवादावर सांस्कृतिक राष्ट्रविचारांचा उतारा
संकुचित राष्ट्रवादावर सांस्कृतिक राष्ट्रविचारांचा उतारा
मॅडिसन स्क्वेअरवरून नवा जागतिक संदेश
=============================
२९ ऑगस्ट २०२६ ला न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे 'अमेरिकन हिंदुज फॉर एन्गेजमेन्ट अँड डायलॉग' (AHEAD forum) द्वारे आयोजित 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन' या जागतिक संमेलनाच्या व्यासपीठावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेल्या भाषणासंदर्भात आता विविधांगी चर्चा सुरू आहेत. त्यानिमित्ताने ...
=============================
भारतीय सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन भारतातील सद्य परिस्थिती आणि गेल्या अनेक दशकांच्या राजकीय इतिहासावरून तयार झाला आहे. स्वतंत्र भारतात 'सहिष्णुता' आणि 'धर्मनिरपेक्षता' या पवित्र शब्दांचा वापर करून विशिष्ट समुदायाचे जे लांगुलचालन (Appeasement पॉलिटिक्स) करण्यात आले, त्याने भारतीय समाजमनात एक खोल अस्वस्थता निर्माण केली आहे. मतपेढीच्या राजकारणासाठी बहुसंख्याकांना गुन्हेगार ठरवणे आणि अल्पसंख्याकांना कुरवळणे, या छद्म-धर्मनिरपेक्षतेमुळे (Pseudo-secularism) देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आणि ऐक्याला नेहमीच तडे गेले.
कदाचित त्या परिप्रेक्षातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी २९ ऑगस्ट २०२६ ला न्यूयॉर्कमध्ये झालेल्या ‘One World, One Humanity’ या आंतरधर्मीय परिषदेत आणि त्यानंतर ऐतिहासिक मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे 'अमेरिकन हिंदुज फॉर एन्गेजमेन्ट अँड डायलॉग' (AHEAD forum) द्वारे आयोजित 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन' या जागतिक संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेले भाषण या दोन्हींच्या निमित्ताने मांडलेल्या विचारांकडे बघितले जात आहे. यानिमित्ताने आलेले "भारतामध्ये मुस्लिम नसावेत असे मानणारा हिंदू खरा हिंदू नाही" , अशा आशयाचे मोहनजींचे हे विधान चर्चेत आले आहे. काहीना हे विधान भारतीय राजकीय आणि सामाजिक संदर्भात वरकरणी विसंगत वाटते आहे.
वास्तविक पाहता डॉ. मोहन भागवत यांच्या या अमेरिका दौऱ्याला आणि वक्तव्यांना अमेरिकेतील बहुविधतावाद, भारतीय एकात्मता आणि त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील भारतीयांना दिलेला संदेश अशा परिप्रेक्षातून बघितले गेले पाहिजे. कारण हे केवळ एका सांस्कृतिक संघटनेच्या प्रमुखाचे सदिच्छापर वक्तव्य नव्हते. आंतरराष्ट्रीय भू-राजकीय (Geo-political) संदर्भ, अमेरिकेची बदलती अंतर्गत राजकीय परिस्थिती आणि तेथे राहणाऱ्या लाखो भारतीयांची सुरक्षा या सर्व बाबींचा विचार केला, तर हे भाषण अत्यंत धोरणात्मक आणि दूरगामी परिणाम करणारे होते.
त्यांनी हिंदुत्वाच्या संदर्भात मुस्लिमांच्या भारतातील अस्तित्वाला नाकारण्याची भूमिका हिंदुत्वाशी विसंगत असल्याचे सांगितले. तसेच सर्व मानवांना समान प्रतिष्ठा असल्याचे आणि विविध धार्मिक मार्ग अंतिमतः एकाच सत्याकडे नेत असल्याचे सांगितले.
गेली अनेक वर्षे भारताला पाश्चात्य जगाकडून, विशेषतः अमेरिकेतून, सहिष्णुता आणि मानवाधिकारांचे जे डोस पाजले जात होते. मात्र म्हणून भारताला अमेरिकेकडून सहिष्णुतेचे कोणतेही प्रमाणपत्र हवे होते म्हणून हा खटाटोप नव्हता. डॉ. भागवतांनी अमेरिकेच्या बहुलतावाद ‘pluralism’ आणि भारताच्या विविधतेतील एकता ‘unity in diversity’ यांची तुलना करत भारतीय सांस्कृतिक दृष्टिकोन जगासमोर मांडला. याला भारताने पाश्चात्य जगताला त्याच्याच भूमीवर दिलेले हे एक वैचारिक उत्तर म्हणून या कडे बघता येईल.
मोहनजींनी ज्या भारतीय संस्कृतीचा हवाला अमेरिकेत दिला, ती ही लांगुलचालनाची विकृत व्यवस्था नसून भारताची मूळ, सनातन जीवनपद्धती आहे. भारतीय संस्कृतीच्या मूलभूत तत्त्वज्ञानात कोणालाही केवळ त्याच्या उपासना-पद्धतीमुळे वगळण्याची भूमिका नाही. 'वसुधैव कुटुंबकम्' (संपूर्ण जग हेच माझे कुटुंब आहे) आणि 'एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति' (सत्य एकच आहे, ज्ञानी लोक ते वेगवेगळ्या प्रकारे सांगतात) ही मूल्ये आपल्या मातीत हजारो वर्षांपासून रुजलेली आहेत. भारताची ही 'विविधतेत एकता' (Unity in Diversity) कोणत्याही राजकीय तडजोडीतून किंवा राज्यघटनेच्या निर्मितीनंतर आलेली नाही, तर ती इथल्या समाजाच्या 'डीएनए' (DNA) मध्ये आहे. त्यामुळे अंतर्गत राजकारणातील लांगुलचालनाचा विरोध करतानाच, जागतिक व्यासपीठावर भारताच्या या खऱ्या आणि सशक्त बहुसांस्कृतिक ओळखीचे समर्थन करणे अत्यंत आवश्यक होते, जे या भाषणातून साध्य झाले.
अमेरिकेतील बहुविधतावाद आणि भारतीय एकात्मता
अमेरिकेच्या बहुलतावादाचा (Pluralism) इतिहास आणि भारताची 'विविधतेत एकता' यामध्ये मूलभूत फरक आहे. अमेरिका हा प्रामुख्याने जगभरातून आलेल्या स्थलांतरितांचा (Immigrants) देश आहे. अमेरिकेतील बहुसांस्कृतिकतेवरील टीकाकारांच्या मते तेथील बहुलतावाद हा 'सॅलड बाऊल' (Salad Bowl) सारखा आहे, जिथे वेगवेगळे घटक एकत्र एका पात्रात राहतात, पण त्यांची ओळख केवळ कायद्याच्या चौकटीपुरती एकत्र जोडलेली असते. जेव्हा देशात आर्थिक किंवा राजकीय संकट येते, तेव्हा हा बहुलतावाद लगेच विरघळून जातो आणि स्थलांतरितांबद्दल द्वेष निर्माण होतो. याउलट, भारताची विविधता ही आयात केलेली नाही, ती मूळची आहे. भारतात शेकडो भाषा, संस्कृती आणि जीवनपद्धती एका अखंड प्रवाहासारख्या पिढ्यानपिढ्या एकत्र वाहत आहेत. अमेरिकेला नेमका हाच फरक दाखवून दिला गेला.
विविधतेला केवळ कायदेशीररित्या 'सहन' (Tolerate) करू नये, तर भारताप्रमाणे ती स्वीकारणे, गौरवान्वित करणे, आणि साजरी करणे' (“diversity has to be celebrated, respected, accepted”) शिकले पाहिजे. असा संदेश दिला. भारताच्या ‘विविधतेतील एकता’च्या संदर्भात मांडलेला हा विचार अमेरिकेच्या बहुविधतावादासमोर एक वेगळा सांस्कृतिक दृष्टिकोन ठेवणारा ठरतो. या परिप्रेक्षातून बघितले तर हा कार्यक्रम भारतीय विश्वबंधुत्वाचे दर्शन घडवणारा आणि पाश्चात्य विचारसरणीला अंतर्मुख व्हायला लावणारा आहे.
ट्रम्प राजवट, भारतीय समुदाय आणि कर्मभूमीचा संदेश
मोहनजी ज्या व्यासपीठावर बोलत होते, तिथले संदर्भ भारतापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. सध्या अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाच्या राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर अतिरेक करणाऱ्या 'अमेरिका फर्स्ट' (America First) या संरक्षणवादी धोरणांची हवा आहे. या धोरणामुळे अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांमध्ये, विशेषतः जे तात्पुरत्या 'H1B' व्हिसावर नोकरी निमित्ताने तिथे स्थायिक आहेत, त्यांच्या मनात चिंता आहे. त्यामुळे अनिश्चितता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून वारंवार व्हिसाचे नियम कडक करणे, टॅरिफ (Tariffs) वाढवणे आणि स्थलांतरितांना अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या हिरावून घेणारे असे म्हणून हिणवणे, अशा प्रकारची विधाने सातत्याने होत आहेत.
अशा अत्यंत संवेदनशील वातावरणात सरसंघचालकांनी तिथल्या भारतीय समुदायाला उद्देशून सांगितले की, "तुम्ही अमेरिकेत आहात, अमेरिका तुमची कर्मभूमी आहे. आपल्या कर्मभूमीशी तुम्ही नेहमी निष्ठावान राहिले पाहिजे. तेथील तुमचे कर्तव्य तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. तुमची जन्मभूमी तुमच्याकडून तिने दिलेल्या मूल्यांवर जगण्याची अपेक्षा करते." हे विधान वरवर पाहता अमेरिकेला सुखावणारे वाटले, तरी त्यामागे एक अत्यंत खोल गर्भितार्थ होता. आपण थोडा साकल्याने विचार केला तर या विधानाच्या माध्यमातून अमेरिकन प्रशासनाला आणि तेथील भारतीय नागरिकांना अप्रत्यक्षपणे दिले गेलेले संदेश आपल्याला लक्षात येतील.
१. आम्ही ओझे नाही, प्रगतीचे भागीदार आहोत:
भारतीय लोक जिथे जातात, तिथे ते त्या भूमीला आपली 'कर्मभूमी' मानून प्रामाणिकपणे काम करतात. अमेरिकेतील भारतीय समुदायाचा मोठा भाग शिक्षण, तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा, उद्योग आणि इतर क्षेत्रांत योगदान देत आहेत. ते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर किंवा संसाधनांवर आलेले ओझे नाहीत, तर ते त्यांच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या जोरावर अमेरिकेला समृद्ध करत आहेत. त्यामुळे H1B व्हिसाधारकांवर आणि भारतीय समुदायावर संशयाची किंवा हकालपट्टीची टांगती तलवार ठेवणे हे स्वतः अमेरिकेच्या आर्थिक हिताला नख लावणारे ठरेल. भागवतांनी केलेल्या आवाहनातून भारतीय अमेरिकन समुदाय हा अमेरिकन समाजाचा जबाबदार आणि योगदान देणारा घटक आहे, असा अप्रत्यक्ष संदेश अधोरेखित होतो
२. "मी" कडून "आम्ही" कडे :
डॉ. मोहन भागवतांच्या 'We and ours' या व्यापक विचारांचा अर्थ संकुचित राष्ट्रहिताच्या राजकारणाच्या पलीकडे जाणारा असा आहे. पाश्चात्य जगातील अति-राष्ट्रवाद (Aggressive Nationalism) हा बऱ्याचदा स्वतःला श्रेष्ठ मानून इतरांचा द्वेष करण्यावर आधारित असतो. या पार्श्वभूमीवर मोहनजींचा ‘मी’पासून ‘आम्ही’कडे जाण्याचा विचार संकुचित राष्ट्रहिताच्या राजकारणाला एक वैचारिक पर्याय सुचवतो. मोहनजींनी मॅडिसन स्क्वेअरवरून जागतिक एकात्मतेचा (Universal Oneness) विचार मांडून अमेरिकेला त्यांच्याच भूमीवर आठवण करून दिली की, स्वतःभोवती स्वार्थाच्या आणि संरक्षणाच्या भिंती उभी करून जगातील समस्या सुटणार नाहीत. जेव्हा एखादा देश 'मी' कडून 'आम्ही' कडे प्रवासाची तयारी दाखवतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने जागतिक शांतता निर्माण होऊ शकते.
सध्या अमेरिका आणि भारताच्या आर्थिक संबंधांमध्ये व्यापारी शुल्काचा (Tariffs) मुद्दा कळीचा ठरत आहे. ट्रम्प प्रशासन भारतावर टॅरिफ वाढवण्यासाठी दबाव आणत आहे. जेव्हा एखादा देश स्वावलंबी आणि मोठा होऊ लागतो, तेव्हा इतरांच्या मनात भीती निर्माण होते आणि मग टॅरिफसारखे अडथळे निर्माण केले जातात.
या पार्श्वभूमीवर मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील डॉ. मोहन भागवत यांचे हे भाषण म्हणजे भारताच्या बदललेल्या जागतिक आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. हा भारत पाश्चात्य जगाकडून मानवी मूल्यांचे धडे घेणारा विद्यार्थी नाही; उलट, आपल्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक अनुभवातून जगासमोर एक वेगळा मानवी आणि सामाजिक दृष्टिकोन मांडणारा देश म्हणून उभा राहत आहे. हा भारत संकुचित धोरणांचे निःसंकोचपणे कान टोचणारा आणि जागतिक कल्याणाचा मार्ग दाखवणारा 'विश्वबंधू' आहे. हेच यातून प्रतित होत नाही काय !
भारताच्या अंतर्गत राजकारणात झालेल्या लांगुलचालनाच्या कटू अनुभवांचा विचार करत असतानाच, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या या सांस्कृतिक ताकदीचा (Soft Power) वापर करून, ट्रम्प राजवटीच्या छायेत जगणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांना एक प्रकारे आश्वस्तता देण्याचा आणि नैतिक बळ देण्याचा हा अत्यंत यशस्वी धोरणात्मक प्रयत्न होता. डॉ.भागवतांनी अमेरिकेच्या ‘pluralism’ आणि भारताच्या ‘unity in diversity’ यांची तुलना करत भारतीय सांस्कृतिक दृष्टिकोन जगासमोर मांडला. अमेरिकेने आपल्या अंतर्गत राजकीय फायद्यासाठी जगाला संकुचित करू नये, तर भारताच्या 'विविधतेत एकता' या चिरंतन मूल्याचा अंगीकार करून खऱ्या अर्थाने जागतिक एकात्मतेकडे पाऊल टाकावे, हाच या भाषणाचा मुख्य गाभा होता. यादृष्टीने बघितल्यास हा संकुचित राष्ट्रवादावर सांस्कृतिक राष्ट्रविचारांचा उतारा होता असे म्हणणेच योग्य होईल.
प्रसाद दत्तात्रेय पोफळी
नागपूर




