Breaking
Loading latest news...
Views

विभाजनाची वेदना, अखंडतेचा संकल्प आणि डॉ. हेडगेवारांची दूरदृष्टी

📅 14 Aug 2026 ✍️ Priya Desai 👁 83 views
विभाजनाची वेदना, अखंडतेचा संकल्प आणि डॉ. हेडगेवारांची दूरदृष्टी
१४ ऑगस्ट हा भारताच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी दिवस. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या भारताच्या विभाजनाने भूभागाच्या विभागणी सोबतच असंख्य कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले, लाखो लोकांना विस्थापित केले आणि समाजाच्या सामूहिक स्मृतीवर खोल जखम करून ठेवली. म्हणूनच हा दिवस भूतकाळ आठवण्याचा नसून; तर त्या इतिहासातून वर्तमान आणि भविष्य यांच्यासाठी धडा घेण्याचा दिवस आहे.
विभाजनाच्या पार्श्वभूमीचा विचार करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांच्या दूरदृष्टीचा विशेष उल्लेख करावा लागतो.

 १९२५ मध्ये संघाची स्थापना झाल्यानंतर त्यांचे कार्य केवळ नागपूर किंवा मध्य भारतापुरते मर्यादित न ठेवता, बदलत्या राजकीय परिस्थितीचे संकेत ओळखून त्यांनी सिंध आणि पंजाबसारख्या सीमावर्ती प्रदेशांकडे लक्ष दिले. कराची येथे १९३२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदू युवा संमेलनात ते बाबाराव सावरकर यांच्या सोबत सहभागी झाले. तेथे त्यांनी सिंध व पंजाबमधून आलेल्या कार्यकर्त्यांना संघाची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती समजावून सांगितली आणि याच प्रवासात कराचीतील पहिल्या संघशाखेचा प्रारंभ झाला. 

संभाव्य संकटांची चाहूल ओळखून समाजाला वेळेत संघटित करणे आवश्यक आहे, अशी डॉ. हेडगेवारांची भूमिका होती. पुढे १९३७ मध्ये विविध कार्यकर्त्यांना लाहोर, सियालकोट आणि रावळपिंडी येथे पाठविण्यात आले. त्यांनी शिक्षण घेत असतानाच तेथे संघकार्याची पायाभरणी केली. डॉ. हेडगेवार त्यांच्याशी पत्रव्यवहार करून मार्गदर्शन व उत्साहवर्धन करीत असत.

 ऑगस्ट १९३८ मध्ये डॉक्टर हेडगेवार यांनी गुरुजी सोबत दिल्ली, लाहोर भागात प्रवास केला. यातून त्यांच्या प्रचारक-योजनेची खरी ताकद दिसते. विचार स्वतःपुरता न ठेवता तो समर्पित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविणे, ही त्यांची कार्यपद्धती होती. वेगळ्या मुस्लिम देशाची मागणीचे भूत अवतरले होते. देशाचे तुकडे करण्याचा जिहादी डाव समजू लागला होता. संकटाच्या वेळी समाजाला आधार देणारी शक्ती अचानक निर्माण होत नाही; तिची तयारी वर्षानुवर्षे करावी लागते, हा या कार्यामागचा महत्त्वाचा संदेश आहे.
१९४७ मध्ये विभाजनाची परिस्थिती अत्यंत भीषण झाली तेव्हा पंजाब, सिंध आणि उत्तर-पश्चिम भागात आधीपासून उभे राहिलेले संघटन अस्तित्वात होते. लाहोर, रावळपिंडी, पेशावर, अमृतसर, जालंधर यांसारख्या शहरांमध्ये संघकार्य पोहोचले होते. 

1946/47 विभाजनाच्या या वेदनादायी  काळात स्वयंसेवकांनी सुरक्षा, मदत, विस्थापितांना आश्रय आणि पुनर्वसन यांसारख्या कार्यात सहभाग घेतला आहे. समाजाच्या रक्षणासाठी  असंख्य स्वयंसेवक हुतात्मे झाले .

आज १४ ऑगस्टला या इतिहासाकडे पाहताना आपला दृष्टिकोन द्वेषाचा न राहता आत्मपरीक्षणाचा असायला हवा. विभाजनाची वेदना विसरायची नाही; पण ती पुढील पिढ्यांमध्ये वैमनस्य निर्माण करण्यासाठीही वापरायची नाही. त्यातून सामाजिक एकात्मता, राष्ट्रीय जागरूकता, परस्पर विश्वास आणि संकटाच्या वेळी समाजासाठी उभे राहण्याची वृत्ती दृढ करायची आहे.
विभाजनाचा इतिहास आपल्याला सांगतो—भूभागाचे विभाजन एका क्षणात होते; परंतु राष्ट्राची अखंडता टिकविण्यासाठी पिढ्यान्‌पिढ्या समाजमन घडवावे लागते.
हीच डॉ. हेडगेवारांच्या कार्याची आणि १४ ऑगस्टच्या स्मृतीची आजच्या भारतासाठी सर्वांत महत्त्वाची शिकवण आहे.

 -श्रीकांत भास्कर तिजारे. भंडारा

Related Articles