Breaking
Loading latest news...
Views

विभाजनाच्या कालखंडातील रा.स्व. संघाचे योगदान

📅 14 Aug 2026 ✍️ Shri Prasad Barve 👁 112 views
विभाजनाच्या कालखंडातील  रा.स्व. संघाचे  योगदान
स्मरण बलिदान आणि सेवेचे ऑगस्ट 1947 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेल्या राजकीय आंदोलनांचा इतिहास नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या प्रक्रियेत समाजाचे संघटन, राष्ट्रीय आत्मविश्वास जागृत करणे आणि संकटसमयी समाजाच्या पाठीशी उभे राहणे यांनाही महत्त्वाचे स्थान आहे. या व्यापक संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर अर्थात ‘गुरुजी’ यांचे स्वातंत्र्यपूर्व आणि फाळणीच्या काळातील कार्य लक्षात घेणे आवश्यक ठरते. विशेषतः पंजाब, सिंध आणि उत्तर-पश्चिम सीमावर्ती प्रदेशांत संघटन उभारणी आणि समाजजीवनाला आधार देण्याचे कार्य गुरुजींनी केले.

१९३०च्या दशकात मुस्लिम लीगकडून पाकिस्तानची मागणी पुढे येत असताना पंजाब आणि सिंध या प्रदेशांचे महत्त्व वाढले होते. डॉ. हेडगेवार यांनी या भागांत संघकार्य सुरू करून हिंदू समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला. १९३२ मध्ये कराची येथे त्यांनी ‘अखिल भारतीय हिंदू युवा संमेलनात’ सहभाग घेतला आणि तेथे संघाची पहिली शाखाही सुरू झाली. पुढे संघकार्य वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना सिंध आणि पंजाबमध्ये पाठविण्यात आले. लाहोरमध्येही संघाची पायाभरणी झाली.

या कार्यात  गुरुजींचा सहभाग प्रारंभापासून दिसतो. ऑगस्ट १९३८ मध्ये लाहोर येथे आयोजित अधिकारी शिक्षणवर्गात डॉ. हेडगेवार, बाबासाहेब आपटे यांच्या सोबत गुरुजी सुद्धा सहभागी झाले होते.  डॉ. हेडगेवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे एका दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत, तेव्हा गुरुजींनी त्यांच्या जागी स्वयंसेवकांना संबोधित केले आणि स्वयंसेवकांचे मार्गदर्शन केले.

१९४१ मध्ये सरसंघचालक झाल्यानंतर गुरुजींचा पहिला लाहोर दौरा झाला. त्यांनी स्वयंसेवकांना संघकार्य वाढविण्याचा निर्धार करण्यास प्रेरित केले. मुंबईत दादा नाईक यांनी २० स्वयंसेवकांपासून सुरू केलेले कार्य सहा वर्षांत १५०० स्वयंसेवकांपर्यंत पोहोचल्याचे उदाहरण देत, पंजाबमध्येही सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. या प्रेरणेतून १९४२ मध्ये पंजाबमध्ये ४० प्रचारकांची टीम तयार झाली आणि संघकार्य तहसील स्तरापर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला. १९४३ मध्ये लाहोरमध्ये संघाचे पहिले कार्यालय ‘डॉ. हेडगेवार भवन’ उभारण्यात आले आणि त्याचे उद्घाटन गुरुजींच्या हस्ते झाले.

१९४३ पासून गुरुजींचा सिंधमधील वार्षिक प्रवासही सुरू झाला. हैदराबाद (सिंध), कराची, शुकर, शिकारपूर आणि मीरपूर खास अशा शहरांना त्यांनी भेटी दिल्या. संघकार्यकर्त्यांबरोबरच विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि व्यावसायिक घटकांशी त्यांनी संवाद साधला.

या काळात गुरुजींनी हैदराबाद येथे सुद्धा प्रवास केला. तेथे नॅशनल कॉलेज च्या मैदानात स्वयंसेवक आणि सामान्य नागरिकांच्या एका विशाल समूहाला त्यांनी संबोधित केले. मुस्लिम लीग ने ही सभा होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले. पण संघाचे अनुशासन आणि प्रतिबद्धता या बळावर अशा सर्व प्रयत्नांवर, सर्व अडचणींवर मात केली गेली. आणि जवळपास ३५,००० लोकांनी अत्यंत शिस्तीत आणि शांततेने  गुरुजींचे हे संबोधन ऐकले.

पंजाबातील परिस्थिती १९४६ मध्ये अधिक गंभीर होत असताना गुरुजींनी तेथे दौरा केला. त्यांनी हिंदू समाजाला आत्मविश्वास आणि आत्मरक्षणाचा संदेश दिला. पेशावरच्या वार्षिक उत्सवातील भाषणात सीमावर्ती प्रदेशातील समाजाने परस्पर संपर्क कायम ठेवावा, जेणेकरून संकटाच्या वेळी सर्वजण एकमेकांच्या मदतीला धावून येऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. सरदार हरिसिंह नलवा यांच्या उदाहरणातून त्यांनी सीमावर्ती भागातील समाजाच्या संघटित शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले.

१९४७ हे निर्णायक वर्ष ठरले. ऑगस्ट १९४७ मध्ये कराची येथे त्यांनी एका विराट सार्वजनिक सभेचे नेतृत्व केले. दस्तऐवजानुसार, या सभेला एक लाखांहून अधिक लोक उपस्थित होते आणि त्यापूर्वी सुमारे दहा हजार स्वयंसेवकांचा पथसंचलनही झाले. फाळणीच्या काही दिवस आधी फगवाडा येथे झालेल्या शिक्षण शिबिरात गुरुजींनी कार्यकर्त्यांना संघटितपणे आणि आत्मविश्वासाने उभे राहण्याचे आवाहन केले. परिस्थितीसमोर भीतीपोटी जन्मभूमी सोडल्यास समाजात कायमची मानसिक दुर्बलता निर्माण होईल, असा त्यांनी इशारा दिला. संकटाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक साधने उभी करण्याचे आणि आपल्या ठिकाणी अविचलपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

फगवाड्यातील प्रशिक्षणशिबिर नियोजित वेळेच्या दहा दिवस आधी संपविण्यात आले, जेणेकरून प्रशिक्षित स्वयंसेवकांना मुलतान, रावळपिंडी यांसारख्या भागांत सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी पाठवता येईल. हिंसाचाराच्या काळात स्वयंसेवकांनी ‘सेफ पॉकेट्स’ तयार करून असहाय कुटुंबांना आश्रय दिला. या काळात अनेक स्वयंसेवकांनी समाजरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. यात ८७ स्वयंसेवकांच्या बलिदानाचा समावेश आहे.

गुरुजींच्या कार्यातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सेवा. मार्च १९४६ मध्ये त्यांच्या पुढाकाराने ‘पंजाब रिलीफ कमिटी’ स्थापन झाली. पंजाबातील दंगली आणि मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या संकटात या समितीने निर्वासितांना आर्थिक व सामाजिक मदत केली. रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न, नुकसानभरपाईसाठी अर्ज, हरवलेल्या पुरुष-महिला-मुलांचा शोध, वैद्यकीय सेवा आणि न्यायालयीन मार्गदर्शन अशी विविध कामे समितीने केली. प्रमुख शहरांत तिच्या शाखा उघडण्यात आल्या आणि स्वयंसेवकांनी दिवस-रात्र मदतकार्य केले.

या मदतकार्यात केवळ जिवंत व्यक्तींना आश्रय देणे एवढेच काम नव्हते. दंगलीत मृत्यू पावलेल्या आणि रस्त्यांवर बेवारस पडलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्थाही स्वयंसेवकांनी केली.

दिल्लीमध्येही एप्रिल १९४७ मध्ये ‘हिंदू सहायता समिती’ स्थापन करून दररोज येणाऱ्या हजारो निर्वासितांसाठी निवारा, भोजन, वस्त्र आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. रेल्वे स्थानकांवर सकाळपासून रात्रीपर्यंत स्वयंसेवक उपस्थित राहत आणि तेथून निर्वासितांना मदत छावण्यांमध्ये नेले जात असे. दिल्लीबरोबरच लखनऊ, कानपूर, प्रयाग, एटा, फर्रुखाबाद, म्हैसूर, बंगळुरू, बेळगाव, चुरू, जयपूर आणि पुणे आदी शहरांतही पुनर्वसनकार्य करण्यात आले.

फाळणीनंतर पूर्व बंगालमधील विस्थापितांसाठीही गुरुजींनी मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनानंतर ‘वास्तुहारा सहायता’ कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाला. अन्न, वस्त्र, औषधे आणि निवारा यांची व्यवस्था करण्यात आली.

आसाम-बंगालमधील मदत केंद्रांतून ८० हजारांहून अधिक व्यक्तींना भोजन देण्यात आले; एक लाखांहून अधिक विस्थापितांना अल्पाहार आणि दीड लाखांहून अधिकांना वस्त्रांची मदत मिळाली. या कार्यात पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले.

केवळ उपलब्ध दस्तऐवजाच्या आधारे श्री गुरुजींचे स्वातंत्र्यचळवळीतील योगदान हे केवळ एका राजकीय आंदोलनातील सहभागाच्या चौकटीत मोजता येत नाही. पंजाब आणि सिंधसारख्या संवेदनशील प्रदेशांत संघटन उभारणे, समाजात आत्मविश्वास निर्माण करणे, कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करणे, फाळणीच्या संकटाचा सामना करण्यासाठी समाजाला तयार करणे आणि त्यानंतर निर्वासितांच्या मदत व पुनर्वसनासाठी व्यापक सेवा उभारणे, हे त्यांच्या कार्याचे प्रमुख पैलू होते. स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्याच वेळी देशाने फाळणीची अमानुष किंमतही मोजली. त्या संक्रमणकाळात समाजाची सुरक्षितता, आत्मविश्वास आणि पुनर्वसन यांसाठी रा.स्व.संघाने उभे केलेले हे कार्य अभूतपूर्व असे म्हणावे लागेल. ह्या कार्यात गुरुजींचे मार्गदर्शन आणि अखंड प्रवास यांचे योगदान व त्याचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे. 

एकीकडे हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी हजारो स्वयंसेवकांनी केलेले  बलिदान आणि त्याच बरोबर लाखो विस्थापित लोकांची  सेवा यांचा अभूतपूर्व आदर्श संघाने निर्माण केलेला आहे. इतिहासाने नोंद न घेतलेला हा कालखंड उघड झाला पाहिजे .

रा स्व संघाचे हे कार्य त्याचे स्मरण या देश विभाजन समयी करणे उचित ठरेल. 

- विश्व संवाद केंद्र, नागपूर

Related Articles