Breaking
Loading latest news...
Views

धर्मसंस्थापनार्थाय योगेश्वर श्रीकृष्ण

धर्मसंस्थापनार्थाय योगेश्वर श्रीकृष्ण

📅 3 Sept 2026 ✍️ Shri Amol Tapase 👁 53 views
धर्मसंस्थापनार्थाय योगेश्वर श्रीकृष्ण

धर्मसंस्थापनार्थाय योगेश्वर श्रीकृष्ण

              भगवान योगेश्वर श्रीकृष्णाची जन्माष्टमी विश्वाच्या कल्याणासाठी अद्भूत क्षण आहे. कृष्ण जन्माच्या वेळी धर्म लयास जात होता, अधर्माचे थैमान माजले होते. आसुरी शक्ती बलाढ्य झाली होती. भगवान श्रीकृष्णाने धर्माच्या रक्षणासाठी, अधर्माच्या विनाशासाठी बलाढ्य असुरांचा विनाश करून कुरूक्षेत्रावर झालेल्या महासंग्रामात पांडवांना विजयी करून धर्माची स्थापना केली. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मावेळी विदारक परिस्थिती होती त्यांची सात भावंड पूर्वी क्रूरपणे मारली गेली होती. कारगृहाच्या अत्यंत भितीदायक वातावरणात श्रावणात वद्य अष्टमीच्या दिवशी रात्री बाराच्या सुमारास भगवान योगेश्वर श्रीकृष्ण देवकीच्या पोटी जन्माला आले.

           पवित्र जन्माष्टमीने समस्त संसाराचे जीवन चक्र बदलून गेलेले आहे. जन्माष्टमीच्या पवित्र क्षणाने विश्वाला माणुसकीचा कर्तव्याचा धर्म दिला. मनुष्य जगतामध्ये मायावी अधर्म गाजविणा-या शक्ती परास्त करण्याचे सामर्थ्य भगवान योगेश्वर श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्यशाली वाणीतून व कृतीतून केवळ अर्जुनालाच नव्हे तर समस्त जगाला मार्गदर्शक ठरलेले आहे. भगवान श्रीकृष्ण केवळ दैवतच नाही आधुनिक भारताचा पवित्र स्वधर्म आहे. भारतीय राज्यघटनेच्या पृष्ठावरील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भारताचा धर्म काय आहेॽ हे सांगणारे चित्राचे दर्शन आपल्याला होते.

         महाभारताचे युध्द कुरूक्षेत्रावर झुंजले गेले. कौरव व पांडव युध्दामध्ये स्वत्त्वाचा विसर पडलेल्या महारथी अर्जुन शस्त्रे टाकून रणभूमी सोडण्यास प्रवृत्त झाला. आपल्या वरीष्ठां विरूध्द, आपल्या बंधू विरूध्द आपण का लढावे, त्यांना मरणाच्या दाढेत का ढकलावेॽ अशा प्रश्नाने ग्रस्त झालेल्या अर्जुनाला आपल्या धर्माचे विस्मरण झाले होते. अशावेळी भगवान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला युध्दभूमीवर धर्म कर्तव्याची जाणीव करून देतात व धर्माकरीता लढण्यास प्रवृत्त करतात. भगवान श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेमध्ये धर्म काय आहे, धर्माचा शास्त्रशुध्द अभ्यास किंवा चिकित्सा ग्रंथात केली आहे तशी चिकित्सा पाश्चात्य अन्यत्र कुठेही झालेली असेल असे वाटत नाही. धर्माचा शास्त्रशुध्द अर्थ हाच आहे की, कर्तव्य नियमाचे पालन किंवा विविध क्षेत्रात उत्तम यश मिळविण्यासाठी कर्मकर्त्याने धारण केलेले बंधने होय. मनुष्य ज्या क्षेत्रात कर्म हे कर्तव्य म्हणून करतो त्यालाच धर्म असे म्हणतात. शिक्षकधर्म, कृषकधर्म, व्यक्तीधर्म, समाजधर्म, राष्ट्रधर्म असे विविध स्वरूपात कर्म हे धर्म या शब्दाने जोडले गेलेले आहे. अश्या विविध कर्म म्हणजेच धर्म महाभारताच्या अभ्यास करतांना वर्णिलेले असल्याचे दिसून येईल.

                    श्रीमद्भगवत् गीतेत धर्म हा शब्द आठ दहा ठिकाणी आला आहे. चौथ्या अध्यायातील सातवा व आठवा हे दोन श्लोक परीचितच आहे.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम ।।

जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचा उदो उदो होतो, तेव्हा तेव्हा, हे भारत अर्जुना, मी अवतार घेत असतो.

परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।

साधुंच्या संरक्षणासाठी, दुष्ट लोकांच्या नाशासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगायुगात अवतार घेत असतो.

                         या ठिकाणी श्लोकात धर्म हा शब्द विशिष्ठ पुजा पध्दती, उपासना मार्ग या अर्थाने मुळीच वापरला नाही. महाभारत पर्वात भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून हे श्लोक प्रगट झाले त्या पर्वात विविध संप्रदाय जसे शैव, वैष्णव, शाक्त, जैन, शिख, बौध्द, मुस्लीम, ख्रिश्चन हे नव्हते. फक्त धर्म म्हणजे मानवाचे मानवत्त्व, चरितार्थ करणारा धर्म. तो म्हणजेच सर्वाना श्रेयस्कर असलेला आणि सर्वाचे कल्याण करणारा धर्म हा आहे तो धर्माचा मुळ गाभाआहे.

            मनुष्य जन्माला आल्याबरोबर धर्माचे अधिराज्य चालु होते. धर्माचा अव्हेर करणे म्हणजे माणुसकीचा त्याग करून पशुत्वाला मान्यता देण्यासारखे आहे. परोपकार, परस्पर सहकार्य, सहसंवेदना, सहजीवन हा धर्माचा गाभा आहे. हाच धर्माचा हेतू आणि खरा अर्थ आहे. धर्माने जे वागतात ते सूर, आणि अधर्माने जे वागतात ते असूर, असे हेच भगवद्गीतेचे सार आहे. म्हणुनच धर्माचे रक्षण झाले पाहिजे. "धर्मो रक्षति रक्षित:" जो धर्माचे रक्षण करतो धर्म त्याचे रक्षण करतो. वैयक्तिक आणि सामाजिक उन्नती घडवून आणणारा विशाल आणि व्यापक असा खरा धर्म आहे. भारताला प्राणस्वरूप असलेला विश्वात्मक धर्म आहे. मानवाला अलौकिक प्रेरणा देण्याचे सामर्थ्य केवळ त्याच्याच ठायी आहे. ज्या महान मानवधर्मामुळे नीतियुक्त जीवनाचा आदर्शपाठ भारताने सगळया जगाला दिला तो आमचा विश्वधर्म आहे. ईर्षा. व्देष, मत्सर, अहंकार आणि संकुचितता यांनी पिडित असलेलेल्या जगाला प्रेम, शांती, उदारता, समता आणि विश्वबंधुत्व देणारा, विविधतेत एकत्व पहाणारा आणि मानवाचा महामानव आणि नराचा नारायण करण्याची शक्ती धर्मा मध्ये आहे. धर्म विश्वाचे अधिष्ठान आहे. नाना रूपाने व विविध भावाने तयार झालेला नर-नारी मानवी समाज सुध्दा धर्माच्या अधिष्ठानावर जीवंत आहे. धर्म व्यक्ती पुरता मर्यादित नाही, पारस्पारीक आहे, सामुहिक आहे, तो संग्राहक व समावेशक आहे, वैयक्तीक नाही. धर्म स्वयंप्रेरीत आहे आणि संस्कृतीच्या दिशेने पुढे घेऊन जातो. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला धर्म संपूर्ण विश्वाला भारताने दिलेला एक अव्दितीय व अमूल्य उपहार आहे. भगवान योगेश्वर श्रीकृष्ण आपल्याला भगवदगीते मध्ये सांगतात "अहिंसा परमो धर्म: धर्म हिंसा तथैव च:" अर्थात अहिंसा मनुष्याचा परम धर्म असुन धर्म रक्षणाकरीता हिंसा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

           भगवान योगेश्वर श्रीकृष्णने सांगितलेला धर्मासाठी भारतवर्षातील अनेक साधुसंतानी भगवान श्रीकृष्णाची उपासना केली. भारताच्या स्वधर्म रक्षणाकरीता प्राण दिलेत. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रांमधून छत्रपती शिवरायांनी आपला राष्ट्रधर्म ओळखून स्वधर्म मावळयांच्या रोमरोमात बिंबविला. राष्ट्रधर्माच्या रक्षणाकरीता महाशक्ती उभी केली. जेव्हा जेव्हा यवनांनी धर्माची हानी केली तेव्हा तेव्हा भारत भूमी भगवान कृष्णाच्या रूपात धर्मरक्षणाकरीता धर्मवीर जन्माला आले आहे.

            भगवान श्रीकृष्णाचे जीवन चारित्र मनुष्य जीवनाला रोमांचित करणारे आहे. कृष्ण ही भारताची भक्ती तर आहेच आणि महत्वाचे म्हणजे आपल्या प्राचीन राष्ट्राची अस्मिता आहे. भगवान श्रीकृष्णाचे दर्शनशास्त्र आम्हाला युगानुयुगे चिरंतन प्रेरणा देत आहे.

॥ श्रीकृष्णापर्णमस्तु॥

अमोल तपासे, नागपूर

Related Articles