Breaking
Loading latest news...
Views

Vidarbhatil asht ganesh - sarvesh

📅 14 Sept 2026 ✍️ Shri Sarvesh Fadnavis 👁 47 views
विदर्भातील अष्टगणेश !! 

थंडीची चाहूल लागली की आपल्यापैकी बरेच लोकं फिरायला निघतात. कित्येकांची बकेट लिस्टही असतेच तशी काही स्थाने बघण्याची इच्छा आहे त्यातीलच एक म्हणजे विदर्भातील अष्टविनायक. एकाचवेळी ही आठही स्थाने करण्याची इच्छा नुकतीच पूर्ण झाली. विदर्भ समृद्ध आहे. आणि याचे सौंदर्य आनंददायी आहे. अशाच विदर्भातील अष्टविनायक स्थानांचे दोन दिवसात दर्शन झाले. गणपती हे भारतीय संस्कृतीत पंचपंच उषःकाली पडलेले, एक पावन आणि नितांत सुंदर स्वप्न आहे. त्या स्वप्नातच ही गणपतीची मंगलमूर्ती साकारलेली आहे. भक्ताच्या अंतचक्षुपुढे उभे होणारे त्या गणेशमूर्तीचे ध्यान वर्णन करायला शब्द कमी पडतात. संकटांचे निवारण करण्यास सदैव सिद्ध असलेल्या गजाननाचा तो विशाल भालप्रदेश (कपाळ), गंडस्थळ, आगामी आपत्तींना अचूक हेरणारे त्याचे नेत्र, सूक्ष्म दृष्टी, मदोन्मत्त राक्षसाला लीलया उखडून फेकणारी, खडकावर आदळणारी ती सामर्थ्यशाली देवता आहे. गणपती अथर्वशिर्षात गणेश स्तवनात त्या देवतेस बुद्धीची देवता (सा. एषाः गणेशविद्या) असण्याचा मान आहे. थोडक्यात श्रीगणेश ही देवता सुखकर्ता दुःखहर्ता आहे. भारतात कुठल्याही खेड्यात, जंगल-कपारीत जा, वनवासी क्षेत्रात जा, तेथे हमखासपणे दोन देवळे आढळतात. त्यातील एक गणेशाचे देऊळ असतेच. 

आज महाराष्ट्र आणि अष्टविनायक हे समीकरण दृढ झाले आहे. असेच काही विदर्भ आणि या भागातील अष्टविनायक आजही सुस्थितीत आहेत. विदर्भात गणेशाची अनेक प्राचीन देवालये आहेत. विदर्भातील भाविक आजही या अष्टगणेशाची यात्रा आवर्जून करतात. विदर्भातील अष्टगणेशाचे दर्शन एका क्रमाने घ्यावे,असे काही संकेत आढळत नाहीत; परंतु शक्यतो नागपूरच्या टेकडी गणपतीपासून अष्टगणेशाच्या दर्शनाला सुरुवात करतात. खालील क्रमाने आपण दर्शन करत गेलात तर दोन दिवसांत आपली सव्य प्रदक्षिणा यात्रा पूर्ण होईल. पहिला मुक्काम आपण पवनी या गावी करू शकता. नागपूर शहर मध्यवर्ती ठेवून या सर्व ठिकाणाची यात्रा सहज घडून येते. 

श्री वरदविनायक- टेकडी गणपती - श्री क्षेत्र नागपूर

विदर्भ अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा श्री वरदविनायक टेकडी गणपती. नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेले हे प्रसिद्ध देवस्थान आहे. पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची स्वयंभू शेंदूरचर्चित मूर्तीचे दर्शन आहे. नागपूर हे ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत. ऐतिहासिक भोसले-इंग्रज लढाई ज्या सीताबर्डी परिसरात झाली तिथेच हे गणपतीचे मंदिर आज उभे आहे. 

सुरुवातीला इथे अगदी साधेसुधे मंदिर होते. नुकताच मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. आता हे एक भव्य देवस्थान झालेले आहे. मंदिराचा गाभारा म्हणजे एक मोठा हॉल असून त्यात मध्यावर झाड आणि त्याखाली चांदीच्या मेघडंबरीत गणपतीची मूर्ती आहे. मुख्य गणपती जवळजवळ पाच फूट रुंद आणि तीन फूट उंच असून इथे फक्त गणेशाचे तोंडच दिसते. त्यालाच डोळे आणि गंध लावून पूजा केली जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले तरी मूर्ती मात्र उत्तराभिमुख आहे. 

श्री शमीविघ्नेश -श्री क्षेत्र आदासा

विदर्भातील सर्वात प्राचीन श्री गणेशाचे स्थान म्हणून आदासा ओळखले जाते. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र आदासा हे स्थान आहे. येथील प्रतिमा १५०० वर्ष प्राचीन आहे. वामन,पुराण,मुद्गल पुराणात या तीर्थक्षेत्राचा उल्लेख येतो. याबद्दलची कथा अशी की महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी देवांनी शंकर-पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थान केली. तेच हे अदोष अर्थात आदासा क्षेत्र आहे. 

श्री शमीविघ्नेश देवालय उत्तरमुखी आहे. गर्भगृहातील भीमकाय श्री गणेश प्रतिमा नजरेत भरते. मुळात प्रतिमा १३ फूट ७ इंच असून ती नृत्यमुद्रेत आहे. श्री प्रतिमेस तीन ठिकाणी वाक असल्याने तिला त्रिभंग प्रतिमा म्हणतात. प्रतिमेचे भाव शांत-सौम्य असून नेत्र बारीक आहे. चतुरहस्त प्रतिमा नृत्यमुद्रेत असून कपाळावर चंद्रकोर आहे. अंकुश मोदक आणि वरदामय मुद्रेतील प्रतिमा बघताच आपण नतमस्तक होतो. पण सध्या शेंदूराच्या लेपनामुळे मूळ स्वरूप आकळता येत नाही. भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं असं ठिकाण कायम गजबजलेलं दिसतं. 
एकमेव अठरा भुज श्री गणेश मंदिर - श्री क्षेत्र रामटेक
रामटेक तसे प्राचीन स्थान आणि आता मनसरच्या जागतिक दर्जाच्या उत्खननाने या रामटेकच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. विदर्भातील अष्टविनायकांपकी एक असलेल्या रामटेकच्या अष्टादशभुज गणपतीचे वर्णन अनेक पुराणात केलेले आहे. मुळात रामटेक हे स्थान अनेकार्थानी प्रसिद्ध आहे. असेच एक अठरा भुजा गणपतीचे मंदिर आहे. मंदिराला तीन उत्तराभिमुख गाभारे असून तीनही गाभाऱ्यात गणपतीच्याच मूर्ती स्थापित केलेल्या दिसतात. या तीनही गाभाऱ्यांवर गणेशपट्टीच्या ठिकाणी कीर्तिमुखे कोरलेली आहेत.

नावाप्रमाणेच इथली मूर्ती अत्यंत वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण अशी आहे. अठरा हातांची गणपतीची मूर्ती काहीशी दुर्मीळच म्हणायला पाहिजे. अंदाजे पाच फूट उंचीची, पद्मासनात बसलेल्या गणपतीची ही देखणी मूर्ती अठरा हातांची आहे. देवाच्या अठरा हातात पाश, अंकुश, खट्वांग, त्रिशूल अशी विविध आयुधे दाखवली आहेत. एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात मोरपंखाची लेखणी दिसते. अठरा विद्यांचे ज्ञान असलेला हा गणपती असल्यामुळे याला अठरा हात दाखवले आहेत, असे वर्णन वाचनात येते. तर अठरा सिद्धींमुळे या गणपतीचे पूजन विघ्नेश्वर म्हणून करतात,असे पुराणात सांगितले आहे. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे याला सिद्धिविनायक असेही म्हटले जाते. या प्राचीन मंदिराचा आता जीर्णोद्धार केलेला असल्यामुळे नवीन बांधकाम केलेले मंदिर आपल्याला दिसते. अठरा हातांची ही मूर्ती इथून जवळच असलेल्या रामसागर अर्थात खिंडसी तलावात रघुजी भोसल्यांच्या काळात सापडली, असे इथे सांगितले जाते. मंदिरात महागणपती आणि त्यांच्या बाजूला रिद्धी-सिद्धींच्या मूर्ती आहेत.

श्री भृशुंड गणेश - श्री क्षेत्र भंडारा

भंडारा गावाजवळ वैनगंगा नदीच्या काठावर मेंढा नावाचे एक गाव होते. आता वस्ती वाढल्याने मेंढा भंडारा गावातच विलीन झाले आहे. विदर्भातील अष्टविनायकांपकी हा एक गणपती आहे. मुदगल ऋषींनी येथे तप केले आणि त्यानंतर त्यांना श्री गणेशाचे दर्शन झाले. भृशुंड ऋषी जप करता प्रत्यक्ष गणेशरूप झाले. त्याला दाढी-मिश्या होत्या हा भृशुंडी मानवी रूपाने असल्याने त्याचे नामकरण भृशुंड ऋषी असे केले. या भृशुंड ऋषींनीच इथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. मुदगल ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की आणि जो कोणी या ठिकाणी दर्शनाला येईल त्याला सर्व शक्ती प्राप्त होतील असे सांगितले. 

मंदिरातील गणेशाची मूर्ती आठ फूट उंचीची मोठी भव्य असून ती सव्यललितासनात बसलेली आहे. पायाशी नागाचे वेटोळे, त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर हा गणपती विराजमान झालेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून एक हात वरद मुद्रेत तर इतर हातात अंकुश, पाश आणि मोदकांनी भरलेले पात्र आहे. मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग शिल्पित केलेला आहे. सतीशीळा असल्याने भृशुंड गणेश मंदिर साधारणपणे ७००-७५० वर्षे प्राचीन ठरते. या भृशुंड गणेशाची प्रतिमा भारतात एकमेवाद्वितीय अशी आहे. 

श्री सर्वतोभद्र गणेश – श्री क्षेत्र पवनी 

प्राचीन देवालयांची नगरी म्हणून पवनी या गावाचा उल्लेख होतो. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या पवनी गावात विदर्भातील अष्टविनायकांपकी एक आगळावेगळा गणपती बघायला मिळतो. इथे गणपतीची मूर्ती नसून त्याऐवजी मंदिरात एक उभा पाषाण आहे आणि त्याला पाच बाजूंनी पाच तोंडे आहेत. त्यामुळे याला सर्वतोभद्र गणपती, भद्रा गणपती, पंचानन, विघ्नराज अशा विविध नावांनी संबोधले जाते. याच्या सर्व बाजूंनी गणपतीची तोंडे असल्यामुळे कोणत्याही बाजूने याचे दर्शन घेता येते. सर्व दिशांनी किंवा सर्व बाजूंनी ज्याचे दर्शन घेता येते तो सर्वतोभद्र किंवा अशा मूर्तीला सर्वतोभद्र मूर्ती असे म्हटले जाते.

गावाच्या मध्यवर्ती भागात एक छोटेखानी मंदिर असून त्यात ही गणपतीची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. मंदिराच्या समोर एक गरुडखांब आहे. बांधकामात कोकणातल्यासारखे इथे चिरे वापरलेले दिसतात. हे मंदिर पालांदूर गावच्या श्रीहरिस्वामी जोशी यांनी बांधल्याचे सांगतात. या मंदिराची मालकी गेल्या १३ पिढय़ांपासून भट कुटुंबाकडे आहे.

श्री वरदविनायक गणेश - श्री क्षेत्र भद्रावती

नागपूर-चंद्रपूर मार्गावरील भद्रावती गाव पण इंग्रजांनी त्यांना भद्रावती हा शब्द उच्चारता येत नसल्याने भद्रावतीचे अप्रभंशित रूप म्हणजे भांदक झाले आहे. मात्र आज वैदर्भीय जनता पुन्हा भद्रावती म्हणू लागली आहे. या ठिकाणी विदर्भातल्या अष्टविनायकांपकी एक असलेला वरदविनायक एका टेकडीवर वसलेला आहे. या संपूर्ण परिसराला प्राचीनतेचा स्पर्श लाभलेला आहे. वाकाटक या बलाढय़ राजवटीखाली असलेला हा प्रदेश मोठा समृद्ध होता. तत्कालीन स्थापत्याचे जे काही अवशेष आज पाहायला मिळतात त्यात या ठिकाणाचा समावेश होतो. 

गणपती मंदिराला १६ खांब असलेला भव्य सभामंडप आहे. गणपती मंदिर आणि मूर्ती दोन्ही उत्तराभिमुख आहेत. अंदाजे आठ फूट उंचीची गणेशाची बसलेल्या स्थितीतली प्रतिमा आहे. उजवा पाय जमिनीवर आहे तर डावा पाय दुमडून शेजारी उभ्या स्थितीत आहे. देवाला दोनच हात असून दोनही हातात मोदकपात्र आहे. गणपतीच्या मस्तकाभोवती प्रभामंडळ कोरले असून त्यावर मुकुट कोरलेला दिसतो. प्रसन्न अशी गणपतीची मूर्ती आणि हा सगळाच परिसर आवर्जून पाहावा असा आहे.

श्री चिंतामणी गणेश - श्री क्षेत्र कळंब

भक्तांच्या सर्व चिंतांचे हरण करणारा असा श्री चिंतामणी कळंब या स्थानी आहे नागपूर-यवतमाळ मार्गावरील कळंब या गावी हे देवालय आहे. प्रसिद्ध एकवीस गणपती क्षेत्रांपकी एक पीठ असलेले प्राचीन कदंबपूर म्हणजेच आजचे कळंब आहे. येथील गणपती मंदिर काहीसे वेगळे आहे. अंदाजे १५ फूट जमिनीखाली ही मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. त्यासाठी जिना उतरून आपल्याला तिथे जावे लागते. मूर्तीवर खूप मोठय़ा प्रमाणात शेंदूर लेपन असल्यामुळे मूर्तीची वैशिष्टय़े समजत नाहीत. या ठिकाणी एक निसर्गनवल पाहायला मिळते.

येथे जमिनीखाली पाण्याचे प्रवाह आहेत. त्या पाण्याची पातळी वाढायला लागून या गाभाऱ्यात पाणी साठू लागते आणि गणेशमूर्तीच्या पायाला पाणी लागले की पुन्हा ते ओसरते. गंगा गणपतीला भेटीला येते असा ही भाविकांचा विश्वास आहे आणि असा प्रसंग बारा वर्षांतून येथे एकदा घडतो आणि त्यावेळी मंदिर परिसरात यात्रा देखील भरते. कळंब गावाचे प्राचीन नाव कदंबसारक किंवा कदंबगिरिग्राम असल्याचे उल्लेख वाकाटक नृपती प्रवरसेन दुसरा याच्या ताम्रपटात आलेले आहेत. बरेचदा कदंब ऋषींचा सुद्धा या स्थानाशी संबंध जोडला जातो.

श्रीसिद्धिविनायक - एकचक्रागणेश- श्री क्षेत्र केळझर 

नागपूर-वर्धा रस्त्यावर वर्ध्यापूर्वी अंदाजे १५-२० कि.मी. अंतरावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक लोक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुर वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रानगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रागणेश असे म्हणतात. 

मंदिराच्या मागच्या बाजूला एक पुष्कर्णी आहे. गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असल्यामुळे याला श्री सिद्धिविनायक असे म्हणतात. भाद्रपद आणि माघी चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. एकचक्रा नावाचे अजून एक गाव पश्चिम बंगालमध्ये असून पांडवांनी बकासुराचा वध त्याच एकचक्रानगरीमध्ये केला असेही सांगितले जाते.

सर्वेश फडणवीस
8668541181

Related Articles