अंत्योदयाचे प्रणेते, पंडित दीनदयाल उपाध्याय
अंत्योदयाचे प्रणेते, पंडित दीनदयाल उपाध्याय
-अंत्योदयाचे प्रणेते, पंडित दीनदयाल उपाध्याय-
समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या माणसापर्यंत विकासाचा प्रकाश पोहोचला नाही, तर त्या विकासाला पूर्णत्व आले असे म्हणता येणार नाही—या विचाराला भारतीय सामाजिक-आर्थिक चिंतनाच्या केंद्रस्थानी आणणारे नाव म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय.
२५ सप्टेंबर १९१६ रोजी जन्मलेले पंडित दीनदयाल उपाध्याय हे राजकीय नेते, संघटक तसेच भारतीय जीवनदृष्टीच्या आधारे राष्ट्राच्या विकासाचा स्वतंत्र मार्ग शोधणारे चिंतक होते. राजकारण हे केवळ सत्ताप्राप्तीचे साधन न राहता मूल्य, नीती आणि समाजकल्याण यांवर अधिष्ठित असावे, असा त्यांचा आग्रह होता. म्हणूनच त्यांच्या विचारांचा मागोवा घेताना ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ या दोन संकल्पना केंद्रस्थानी येतात.
पंडित दीनदयालजींच्या चिंतनाचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाच्या संपूर्ण अस्तित्वाचा विचार करणे. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांचा समन्वित विकास झाला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. व्यक्ती आणि समाज हे एकमेकांपासून अलग नसून परस्परपूरक आहेत. व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्या हितामध्ये संघर्ष नव्हे, तर समन्वय शोधला पाहिजे.
याच चिंतनातून ‘एकात्म मानववाद’ आकाराला आला.
भांडवलशाहीत व्यक्तिस्वातंत्र्य आणि आर्थिक स्पर्धेला महत्त्व मिळाले, तर समाजवादी-साम्यवादी विचारांत सामूहिक व्यवस्थेला अधिक प्राधान्य मिळाले. दीनदयालजींना मात्र भारतीय परिस्थितीला अनुरूप असा स्वतंत्र विकासमार्ग अपेक्षित होता. माणूस केवळ उत्पादनाचे साधन किंवा बाजारातील ग्राहक नाही; त्याला भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्तित्वही आहे. म्हणून विकासाच्या केंद्रस्थानी व्यवस्थे सोबतच समग्र मनुष्य असला पाहिजे, हा त्यांच्या विचाराचा गाभा होता.
‘अंत्योदय’ या शब्दाचा साधा अर्थ आहे—अंतिम व्यक्तीचा उदय.
परंतु दीनदयालजींच्या विचारविश्वात ही गरीब व्यक्तीला मदत करण्याची कल्याणकारी संकल्पना तर आहेच, सोबतच विकासाचे नियोजन करतानाच दुर्बल, वंचित आणि शेवटच्या पायरीवरील व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवण्याची ती भूमिका आहे.
देशाची प्रगती मोजायची असेल तर समाजातील सर्वांत संपन्न व्यक्तीकडे पाहून नव्हे, तर सर्वांत खालच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीची अवस्था पाहून ती मोजली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांपासून समाजातील एखादा वर्ग वंचित राहत असेल तर त्या समाजाचा विकास अपूर्ण आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते.
त्यामुळे अंत्योदय म्हणजे विकास झाल्यानंतर त्यातील काही लाभ गरिबांपर्यंत पोहोचविणे नाही तर विकासाची दिशा ठरवितानाच शेवटचा माणूस आपल्या विचाराच्या केंद्रस्थानी आहे का, हा प्रश्न विचारणे होय.
दीनदयालजींच्या चिंतनातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘संवेदना’.
त्यांच्या मते समाजातील संस्था आणि व्यवस्था संवेदनशील असल्या पाहिजेत. माणसाच्या वेदना जाणून न घेणारी, त्याच्या गरजा न समजणारी व्यवस्था कितीही कार्यक्षम असली तरी ती मानवी कल्याण साधू शकत नाही.
अंत्योदयाच्या विचाराचे मूळ याच संवेदनेत आहे.
गरिबाकडे केवळ सरकारी योजनेचा ‘लाभार्थी’ म्हणून न पाहता त्याच्यातील माणूस, त्याची प्रतिष्ठा आणि त्याच्यातील क्षमता ओळखली पाहिजे. समाजातील दीन, वंचित आणि निरक्षर माणसाची सेवा ही केवळ दया नसून सामाजिक कर्तव्य आहे, अशी दीनदयालजींची धारणा होती.
भारताच्या आर्थिक नियोजनाबाबत दीनदयालजींची भूमिका विशेष विचार करण्यासारखी आहे. योजना वरच्या स्तरावर तयार करून त्या गावांवर आणि सामान्य जनतेवर लादण्याऐवजी नियोजनात स्थानिक लोकांचा सहभाग असावा, असे ते सांगत.
त्यांच्या मते देशातील गरीब, ग्रामीण किंवा अशिक्षित जनता विकासातील अडथळा नसून विकासाची सक्रिय भागीदार आहे. गावातील माणसाच्या ज्ञानावर, अनुभवावर आणि श्रमशक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे.
आज आपण ज्याला लोकसहभाग, विकेंद्रित नियोजन किंवा तळागाळातून विकास म्हणतो, त्या भूमिकेचा स्पष्ट आग्रह त्यांच्या चिंतनात दिसतो.
त्यामुळे ग्रामविकास हा अंत्योदयाचा स्वाभाविक आधार ठरतो. गाव आत्मनिर्भर झाले, स्थानिक रोजगार निर्माण झाला आणि ग्रामीण माणूस आपल्या पायावर उभा राहिला तरच देशाच्या आर्थिक विकासाला व्यापक सामाजिक आधार मिळू शकतो.
दीनदयालजींच्या आर्थिक विचारात ‘स्वदेशी’ला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र त्यांच्यासाठी स्वदेशी म्हणजे विदेशी वस्तूंचा बहिष्कार नव्हता. स्वदेशी ही राष्ट्रीय स्वाभिमान, स्थानिक उत्पादनक्षमता आणि आर्थिक स्वावलंबनाशी जोडलेली व्यापक संकल्पना होती.
आपल्या गरजा, आपली साधनसंपत्ती, आपली जनशक्ती आणि आपली परिस्थिती लक्षात घेऊन अर्थव्यवस्थेची दिशा निश्चित केली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.
परकीय मदतीवरील अतिअवलंबित्व राष्ट्राच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम करू शकते, असे त्यांचे मत होते. त्यामुळे उपलब्ध देशांतर्गत संसाधनांचा अधिकाधिक उपयोग, स्थानिक उत्पादन आणि आयातीला देशांतर्गत पर्याय निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात कुटीर आणि लघुउद्योगांचे महत्त्व दीनदयालजींनी अधोरेखित केले. मोठे उद्योग आवश्यक असले तरी विकासाची सारी शक्ती काही मोठ्या औद्योगिक केंद्रांत एकवटणे त्यांना मान्य नव्हते.
गावागावांत लघुउद्योग आणि कुटीर उद्योग उभे राहिले तर स्थानिक जनशक्तीला रोजगार मिळेल, आर्थिक विकेंद्रीकरण होईल आणि संपत्तीचे केंद्रीकरण कमी होण्यास मदत होईल, अशी त्यांची भूमिका होती.
महत्त्वाचे म्हणजे ते जुन्या तंत्रज्ञानाला चिकटून राहण्याचा आग्रह करीत नव्हते. वैज्ञानिक प्रगती लक्षात घेऊन कुटीर उद्योगांचे स्वरूप बदलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
म्हणजेच परंपरेतील सामर्थ्य आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय त्यांच्या स्वावलंबनाच्या संकल्पनेत अभिप्रेत होता.
दीनदयालजींच्या सामाजिक चिंतनात महिलांच्या शिक्षणाला, आर्थिक संधींना आणि सामाजिक प्रतिष्ठेलाही स्थान होते. स्त्री-पुरुषांना समान संधी मिळाव्यात; पडदा, हुंडा, बालविवाह आणि विषमविवाह यांसारख्या कुप्रथांविरुद्ध सामाजिक सुधारणा व्हाव्यात, अशी त्यांची भूमिका होती.
मातृत्वाचे संरक्षण आणि मातृकल्याण हा सामाजिक सुरक्षेचा महत्त्वाचा भाग असावा, असेही त्यांनी मांडले.
अर्थात अंत्योदयाचा विचार केवळ आर्थिक दारिद्र्यापुरता मर्यादित राहत नाही; सामाजिक विषमता आणि संधींच्या अभावावर मात करणेही त्यात अंतर्भूत होते.
लोकशाहीविषयी दीनदयालजींचा विचारही वैशिष्ट्यपूर्ण होता. लोकशाहीतील संस्था, निवडणुका आणि प्रशासकीय रचना महत्त्वाच्या आहेतच; परंतु या बाह्य ‘तंत्रा’पेक्षा जागरूक, सुशिक्षित आणि संस्कारित नागरिक अधिक महत्त्वाचा आहे, असे ते मानत.
लोकशाहीचे खरे सामर्थ्य ‘लोकां’मध्ये असते. म्हणूनच लोकशिक्षणातून सजग लोकशक्ती निर्माण झाली पाहिजे.
याच विचाराची आर्थिक क्षेत्रातील अभिव्यक्ती म्हणजे जनसहभाग आणि सामाजिक क्षेत्रातील अभिव्यक्ती म्हणजे अंत्योदय असे म्हणता येईल.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे निधन ११ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले. परंतु ‘शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे’ ही त्यांची संकल्पना त्यानंतरही भारतीय सार्वजनिक धोरणांच्या चर्चेत वारंवार पुढे येत राहिली आहे.
आजच्या संदर्भात अंत्योदयाचा विचार करताना एखादी योजना किंवा अनुदान यापुरते त्याचे स्वरूप मर्यादित ठेवता येणार नाही. दुर्गम गावातील कुटुंबापर्यंत शिक्षण आणि आरोग्य पोहोचणे, ग्रामीण युवकाला रोजगाराची संधी मिळणे, महिलेला आर्थिक स्वावलंबनाची वाट मिळणे, छोट्या उत्पादकाला बाजारपेठ मिळणे आणि विकासाच्या निर्णयप्रक्रियेत सामान्य माणसाचा सहभाग वाढणे—ही अंत्योदयाची विविध रूपे मानता येतील.
अंत्योदय आपल्याला एक मूलभूत प्रश्न विचारतो,
विकास झाला हे आपण कोणाच्या नजरेतून ठरवणार?
देशाच्या एकूण संपत्तीत किती वाढ झाली यावरून? मोठ्या शहरांच्या वैभवावरून? उद्योगांच्या विस्तारावरून? की समाजाच्या शेवटच्या टोकावर उभ्या असलेल्या माणसाच्या जीवनात किती परिवर्तन झाले यावरून?
दीनदयालजींचे उत्तर दुसऱ्या दिशेने निर्देश करते.
आजच्या सरकारच्या विविध कल्याणकारी योजना, सामाजिक सुरक्षा उपक्रम, ग्रामीण विकास कार्यक्रम, महिला सक्षमीकरण, डिजिटल सेवा, पायाभूत सुविधा आणि आर्थिक समावेशनाच्या प्रयत्नांकडे पाहिले तर त्यामध्ये समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याची दिशा दिसून येते. घरकुल, स्वच्छता, वीज, पाणी, बँकिंग सुविधा, आरोग्यविमा, कौशल्यविकास आणि स्वयंरोजगाराच्या संधी यांसारख्या उपक्रमांमुळे वंचित घटकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रयत्नांचे मूल्यमापन योजनांची संख्या किंवा निधीच्या आकारावरून न करता, त्यांचा प्रत्यक्ष लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत किती पारदर्शकपणे आणि सन्मानपूर्वक पोहोचतो यावर केले पाहिजे. दीनदयालजींच्या अंत्योदयाच्या विचाराशी आजच्या शासनव्यवस्थेचा खरा संबंध तेव्हाच दृढ होईल, जेव्हा विकासाच्या प्रक्रियेत लोकसहभाग, उत्तरदायित्व, सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठा यांना समान महत्त्व दिले जाईल. सरकारच्या योजना आणि समाजाची संवेदनशीलता यांचा संगम झाला, तर अंत्योदय हे घोषवाक्य, प्रत्यक्ष परिवर्तनाचा मार्ग ठरू शकते.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचे महत्त्व येथेच आहे. त्यांनी गरीब माणसाला व्यवस्थेच्या काठावरचा घटक न मानता विकासाच्या केंद्रस्थानी आणण्याचा आग्रह धरला. अर्थव्यवस्था माणसासाठी आहे; माणूस अर्थव्यवस्थेसाठी नाही. विकासाचा अंतिम हेतू उत्पादन आणि संपत्ती वाढविणे यासोबतच मानवी प्रतिष्ठा उंचावणे हेही आहे.
एकात्म मानववादाने त्यांनी माणसाच्या समग्र विकासाची चौकट मांडली; स्वदेशी आणि स्वावलंबनातून आर्थिक दिशेचा विचार केला; ग्रामप्रधान आणि विकेंद्रित अर्थव्यवस्थेतून जनसहभागाचा मार्ग सुचविला; आणि या सर्व विचारांना मानवी संवेदनेचा स्पर्श देऊन ‘अंत्योदय’चे ध्येय समोर ठेवले.
म्हणूनच पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे स्मरण करताना अंत्योदयाला एक राजकीय विचारधारेची संज्ञा म्हणून पाहणे अपुरे ठरेल. तो समाजासमोर ठेवलेला एक प्रश्न आहे.
आजचे सरकार, प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांनी हा प्रश्न सातत्याने स्वतःला विचारला, तर विकास अधिक समावेशक, संवेदनशील आणि लोकाभिमुख होईल. प्रत्येक वंचित व्यक्तीला संधी, सन्मान आणि स्वावलंबन मिळवून देण्याच्या सामूहिक प्रयत्नांतूनच अंत्योदयाचे स्वप्न साकार होईल. आशावादी आणि सक्षम भारताची निर्मिती ही शासनाच्या जबाबदारी सोबतच प्रत्येक नागरिकाचीही सामूहिक बांधिलकी आहे.
आणि त्याच सकारात्मक विश्वासात दीनदयालजींच्या विचारांचा गाभा सामावलेला आहे.
शेवटच्या माणसाचा उदय झाला, तरच विकासाचा खरा अर्थ साकार झाला; आणि त्या दिशेने प्रत्येक प्रामाणिक पाऊल भारताच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरेल.
श्रीकांत भास्कर तिजारे.
९४२३३८३९६६

