नागपुर संस्करण
समाचार

करुणेचे जागतिकीकरण आजच्या काळाची गरज : डॉ. मोहन भागवत

कैलाश सत्यार्थी यांच्या ‘करुणानायक राम’ पुस्तकाचे लोकार्पण

📅 28 नव॰ 2026 ✍️ Vsk 👁 15 बार देखा
करुणेचे जागतिकीकरण आजच्या काळाची गरज : डॉ. मोहन भागवत

नवी दिल्ली: 'आज देश आणि जगासमोरील अनेक समस्यांचे मूळ कारण ‘मी’ आणि ‘माझे’ हा संकुचित विचार तसेच करुणेचा अभाव हे आहे. त्यामुळे केवळ भगवान श्रीरामांना मानणे पुरेसे नाही, तर त्यांच्या आदर्शांचे आचरण करणेही आवश्यक आहे. आपण मर्यादा, कर्तव्यनिष्ठा आणि करुणा यांचा आपल्या आचरणात समावेश करीत स्वार्थाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सृष्टीशी आपलेपणाचे नाते जोडले पाहिजे. त्यासाठी आजच्या काळात करुणेचे जागतिकीकरण अत्यंत आवश्यक आहे,' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

पूजनीय सरसंघचालकांच्या हस्ते नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या ‘करुणानायक राम’ या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या भीम सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला भूतानच्या राजकुमारी सोनम देचन वांगचुक, केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, पुस्तकाचे लेखक कैलाश सत्यार्थी आणि प्रकाशक प्रभात कुमार उपस्थित होते.

'दुसऱ्याचे दुःख आपले समजून ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे करुणा होय. भगवान श्रीरामांच्या चरित्रात करुणा, मर्यादा आणि लोककल्याणाचा भाव सामावलेला आहे. राम आणि रावण यांच्यातील मूलभूत फरक हाच होता की, रावण ‘मी’ आणि ‘माझे’ या अहंकारात अडकला होता, तर भगवान श्रीरामांनी करुणा आणि धर्माचरणाचा आदर्श घालून दिला. केवळ संवेदना व्यक्त करणे म्हणजे करुणा नव्हे, तर जी सेवा आणि लोककल्याणासाठी कृती करण्याची प्रेरणा देते तिला करुणा म्हटले जाते,' असे डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.

गजेंद्रसिंह शेखावत यांनी शक्तीला करुणेची जोड मिळाली, तरच ती सार्थ ठरते, असे सांगितले. भगवान रामांचे चरित्र कर्तव्य आणि संवेदनशीलतेचा आदर्श असून, रामांना समजून घेणे म्हणजे भारताला समजून घेणे होय, असे ते म्हणाले.

'करुणा ही केवळ भावना किंवा दयेचा भाव नसून समाज आणि शासनव्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडवणारी नैतिक शक्ती आहे. पुस्तकात श्रीरामांच्या जीवनातील करुणेचे स्वरूप कुटुंब, समाज, व्यवस्था आणि व्यक्ती अशा चार स्तरांवर मांडण्यात आले आहे,' असे कैलाश सत्यार्थी यांनी सांगितले.

डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी संस्कृती आणि करुणा यांचा समावेश झाल्याशिवाय माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रभात कुमार यांनी आभार मानले.

संबंधित लेख