श्रीनगरमध्ये ३७ वर्षांनंतर उघडले मंदिराचे दरवाजे
दुर्गेश्वरी माता मंदिरात पुन्हा घंटानाद
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असून, प्रदेश आपल्या सांस्कृतिक मुळांकडे परतत असल्याचे आणखी एक चित्र राजधानी श्रीनगरमध्ये दिसून आले आहे. तब्बल ३७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर येथील ऐतिहासिक श्री दुर्गेश्वरी माता मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले झाले आहे.
कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर श्रीनगरच्या फतेह कदल परिसरातील या मंदिरात पुन्हा पूजाअर्चा सुरू झाली.
काश्मीरमध्ये पाकिस्तानसमर्थित फुटीरतावाद आणि दहशतवादाचा उदय झाल्यानंतर १९८९-९० मध्ये परिस्थिती झपाट्याने बदलली. हिंदूंच्या लक्ष्यित हत्या करण्यात आल्या. 'रलिव, गलिव या चलिव' अर्थात इस्लाम स्वीकारा, काश्मीर सोडून जा किंवा मृत्यूला सामोरे जा, अशा धमक्या उघडपणे दिल्या जाऊ लागल्या. परिणामी, पाच लाखांहून अधिक हिंदूंना आपली वडिलोपार्जित जमीन, घरे आणि व्यवसाय सोडून पलायन करावे लागले. या विस्थापनाच्या वेदना केवळ हिंदूंनीच नव्हे, तर त्यांच्या मंदिरांनीही सोसल्या.
काश्मीरमधील अनेक मंदिरे जाळण्यात आली, पाडण्यात आली किंवा त्यांच्यावर अतिक्रमणे करण्यात आली. काही मंदिरांचा अन्य कामांसाठी वापर सुरू झाला, तर अनेक मंदिरे देखभालीअभावी हळूहळू भग्नावस्थेत गेली. श्री दुर्गेश्वरी माता मंदिराचाही त्यात समावेश होता.
स्थानिक मान्यतेनुसार, या मंदिराचा इतिहास सुमारे ७०० वर्षे जुना आहे. १४व्या ते १५व्या शतकाच्या आसपास या मंदिराची उभारणी झाल्याचे मानले जाते. अष्टकोनी स्थापत्यशैली हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिरात माता दुर्गेच्या मूर्तीसोबतच प्राचीन शिवलिंगही स्थापित आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य केवळ त्याच्या धार्मिक ओळखीपुरते मर्यादित नव्हते, तर स्वातंत्र्यपूर्व काळात ते श्रीनगरमधील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्रही होते. १९१० च्या सुमारास मंदिर परिसरात 'दुर्गा पाठशाला' नावाची प्राथमिक शाळा सुरू झाली. येथे कोणताही धार्मिक भेदभाव न करता विविध समुदायांतील मुलांना मोफत शिक्षण दिले जात असे. याच पाठशाळेच्या नावावरून या मंदिराला 'श्री दुर्गेश्वरी पाठशाला मंदिर' असेही ओळखले जाऊ लागले.
दरम्यान, ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० च्या तरतुदी निष्प्रभ करण्यात आल्या. त्यानंतर प्रदेशात विकासाची नवी वाटचाल सुरू झाली. सांस्कृतिक वारशाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्नही सुरू झाले.
इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा पूजाअर्चा सुरू झालेले हे एकमेव मंदिर नाही. अलीकडच्या काळात काश्मीरमधील अन्य काही मंदिरांचाही जीर्णोद्धार करून ती भाविकांसाठी पुन्हा खुली करण्यात आली आहेत.




