संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या इतर २८३ मान्यवर सदस्यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान देशाला अर्पण केले. त्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने गुरुवारी नागपूरच्या संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया आणि महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
समरसता सहसंयोजक शंकरराव वानखेडे, बिनाकी भाग संघचालक डॉ. सत्यप्रकाश मंगतानी, अयोध्या भाग संघचालक मनोहर सपकाळ, सोमलवार भाग संघचालक श्रीकांत चितळे, धरमपेठ भाग संघचालक शाम पत्तरकिने, भारतीय विचार मंचचे मुकुंदराव खळतकर, ॲड. भाग्यश्री दिवाण, विवेक विचार मंचचे राजू साळवे, सचिन जांभुळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी ॲड. भाग्यश्री दिवाण म्हणाल्या की, संविधानातील मूल्ये प्रत्येक नागरिकांच्या मनात रुजावीत आणि लोकशाहीप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संविधान आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा असून जीवन जगण्याचा मंत्र आहे. संवैधानिक मुल्ये आपणास आचारणात आणायची आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता न्याय राष्ट्रीय एकात्मता या साठी आपणास सदैव कार्यरत राहायचे आहे.
तत्पूर्वी, शहराच्या विविध भागांतून 'संविधान जनजागृती बाइक रॅली' काढण्यात आल्या. या सर्वांचे संविधान चौकात एकत्रीकरण झाले. यावेळी 'संविधानाने दिले काय,स्वातंत्र्य -समता- बंधुता -न्याय,' 'भारत माता की जय', 'बाबासाहेब आंबेडकर अमर रहे'. 'संविधान अमर रहे' आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. नागपूरच्या सर्व वस्त्यांमध्ये असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमांना मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.




