नागपुर संस्करण
समाचार

विकसित भारतासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

📅 26 नव॰ 2026 ✍️ Vsk 👁 13 बार देखा
विकसित भारतासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

छत्रपती संभाजीनगर: विकसित भारताची निर्मिती करायची असेल, तर त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. देशात राष्ट्रहितासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणारे असंख्य लोक आहेत. त्यामुळेच देश वेगाने प्रगती करीत आहे. २०४७ मधील समर्थ भारत संपूर्ण जगाला दिशा देणारा असेल. भारत दुर्बलांना आपल्या अधीन ठेवण्यासाठी सामर्थ्यवान होणार नाही, तर त्यांचे संरक्षण करण्यासाठी शक्तिशाली बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पाचव्या पद्म फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त सीडीएस जनरल अनिल चौहान, पद्म फेस्टिव्हलचे अध्यक्ष मिलिंद केळकर, स्वागताध्यक्ष उन्मेष टाकळकर आणि मंगला केंडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दोन दिवसीय पद्म फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले.

या पाचव्या पद्म फेस्टिव्हलमध्ये एअर मार्शल पद्मा बंदोपाध्याय (निवृत्त), रमेश पतंगे, डॉ. शुभा व्ही. अय्यंगार, डॉ. बी. एन. गंगाधर, देवेंद्र झाझरिया, भिकल्या लाडक्या धिंडा, श्रीरंग (दादा) लाड, पद्मजा फेणाजी जोगळेकर, डॉ. एन. राजम, फैसल अली डार, चामी मुर्मू, जार्देन लेपचा यांच्यासह पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवर दोन दिवसीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

डॉ. मोहन भागवत म्हणाले, कोणताही चांगला बदल घडवून आणायचा असेल, तर त्यासाठी आत्मविश्वास आवश्यक असतो. हा आत्मविश्वास उदाहरणांमधून निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीच्या प्रयत्नांतून लगेच परिवर्तन दिसून येत नाही; मात्र सामूहिक प्रयत्नांतून बदल घडवून आणणे शक्य होते. आपल्या महापुरुषांनीही हेच करून दाखविले आहे. त्यांनी स्वतःपासूनच सुरुवात केली.

संघाचा स्वयंसेवक समाजातील दुःख आणि समस्या पाहतो, तेव्हा त्यांच्या निराकरणासाठी केवळ विचार करीत बसत नाही, तर प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करतो. त्यानंतर समाजातून आपोआप सहकार्य मिळू लागते. देशात चुकीची कामे करणाऱ्यांच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक लोक निःस्वार्थ भावनेने चांगल्या उद्देशासाठी कार्य करीत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. देशभरातील प्रवासादरम्यान याचा अनुभव येतो. त्यामुळे चांगले कार्य करणाऱ्या लोकांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. प्रत्येकाच्या कार्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहणे योग्य नाही. अशी सवय असल्यास ती सोडली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

‘भारत’ हे केवळ नाव नाही, तर आपली ओळख: जनरल अनिल चौहान

निवृत्त जनरल अनिल चौहान म्हणाले, आज ‘भारत’ या शब्दाचा वापर सर्वत्र मोठ्या अभिमानाने केला जात आहे. पूर्वी भारताकडे जुन्या संदर्भांच्या आधारे पाहिले जात होते; मात्र आज जग नव्या भारताचे स्वरूप अनुभवत आहे. भारत हीच आपली ओळख आहे. हा शब्द आपली परंपरा, संस्कृती आणि सामायिक इतिहासाचे दर्शन घडवितो.

२०४७ पर्यंत विकसित, सामर्थ्यवान आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी आपण कार्य केले पाहिजे. आपल्याकडे युवा शक्ती आहे आणि तिच्यावर मोठी जबाबदारी आहे. बाह्य धोक्यांपेक्षा अंतर्गत धोके अधिक घातक असतात. त्यामुळे आपण सदैव सतर्क राहिले पाहिजे. आभासी माध्यमांच्या माध्यमातून भारतीय एकता आणि अखंडता भंग करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

आपला समाज जेव्हा जेव्हा परस्परांतील वादांमुळे विभागला गेला, तेव्हा तेव्हा परकीय आक्रमणे झाली आणि आपल्याला गुलामगिरीचा सामना करावा लागला, याची जाणीव आपण नेहमी ठेवली पाहिजे. त्यामुळे आपली एकता आणि अखंडताच ही आपली सर्वांत मोठी शक्ती आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

संबंधित लेख