नागपुर संस्करण
समाचार

तमिळनाडू सरकारकडून न्यायव्यवस्था आणि हिंदू श्रद्धेचा अपमान

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांची टीका

📅 25 नव॰ 2026 ✍️ Vsk 👁 4 बार देखा
तमिळनाडू सरकारकडून न्यायव्यवस्था आणि हिंदू श्रद्धेचा अपमान

तमिळनाडू सरकारकडून न्यायव्यवस्था आणि हिंदू श्रद्धेचा अपमान

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांची टीका

नवी दिल्ली: तमिळनाडू सरकारने 'कार्तिगई दीपम' महोत्सवानिमित्त भगवान मुरुगन यांच्या पवित्र टेकडीवर महादीप प्रज्वलित करण्यास मज्जाव केला होता. राज्य सरकारच्या या कृतीवर विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी तीव्र निषेध केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शतकानुशतके चालत आलेली ही महान धार्मिक परंपरा रोखणे म्हणजे तमिळनाडू सरकारचा हिंदूविरोधी हट्टाग्रह असून, भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेचा घोर अपमान असल्याचे आलोक कुमार यांनी म्हटले आहे.

'भगवान मुरुगन यांच्या कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेशी आणि विश्वासाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या आणि न्यायालयाचा अवमान करणाऱ्या या मानसिकतेला हिंदू समाज योग्य वेळी लोकशाही मार्गाने उत्तर देईलच. तसेच सर्वोच्च न्यायालयही आपल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करून कठोर शिक्षा सुनिश्चित करेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आलोक कुमार म्हणाले की, तमिळनाडू ही भगवान मुरुगन यांची पवित्र भूमी आहे. त्यांना तमिळ भाषा आणि संस्कृतीचे शिल्पकारही मानले जाते. अशा आराध्य दैवताच्या पवित्र टेकडीवर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रज्वलित होणारा महादीप रोखण्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.

'तिरुपरंकुंद्रमची टेकडी ही भगवान मुरुगन यांची पवित्र भूमी आहे. तिचा संबंध हिंदूंच्या मारेकऱ्यांशी आणि जिहादी तत्त्वांशी जोडून तिची धार्मिक ओळख बदलण्याचे कारस्थान कधीही यशस्वी होऊ दिल जाणार नाही. भगवान मुरुगन यांच्या पवित्र भूमीवर महादीप प्रज्वलित होऊ नये, यासाठी तमिळनाडू सरकार ज्या प्रकारे आडमुठी भूमिका घेत आहे, त्यावरून सरकारने भगवान मुरुगन यांच्या भक्तांशीही वैर ओढवून घेतल्याचे स्पष्ट होते. याची मोठी किंमत सरकारला मोजावी लागेल,' असेही आलोक कुमार यांनी म्हटले आहे.

तामिळनाडू सरकारने या प्रकरणात केवळ हिंदूंच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा अपमान केलेला नाही, तर सर्वोच्च न्यायालय आणि भगवान मुरुगन यांच्याशीही थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचीही अवहेलना करणे म्हणजे न्यायमंदिर, न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च स्थान आणि देशाच्या संविधानाला आव्हान देण्यासारखे आहे. कोणत्याही लोकनियुक्त सरकारला राजकीय हट्टापोटी न्यायालयाचे आदेश धुडकावण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हिंदूविरोधी राजकारण आणि अशा मानसिकतेचा देशाच्या राजकारणातून आता अंत होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, तमिळनाडूतूनही अशा राजकारणाची लवकरच हकालपट्टी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख