नागपुर संस्करण
विचार वेध

ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती

ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती

📅 26 सित॰ 2026 ✍️ राजेंद्र बेनोडकर 👁 132 बार देखा
ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती

ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती

                                                  -राजेंद्र बेनोडेकर


वयाच्या अठराव्या वर्षी इ,स, १२९०च्या दरम्यान माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी हा ग्रंथ  भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी सांगुन पूर्ण केला. सच्चिदानंद बाबा यांनी माऊलीच्या सांगण्याप्रमाणे लिखाण केले. पुढील काळात या ग्रंथाची अनेक हस्तलिखीत प्रति लिहिल्या गेल्या. त्यात बऱ्याच चुका राहून गेल्यात. पाठभेद निर्माण झाले.

श्री संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची मूळ शुद्ध प्रत तयार करण्याचे कार्य हाती घेतले. त्यांनी सर्व प्रति गोळा केल्या व ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण केले. संत एकनाथांनी हा ग्रंथशुद्धीचा किवा परिष्करणाचा संस्कार शके १५०६ म्हणजेच इ. स. १५८४, (२ ऑक्टोबर १५८४) पूर्ण केला. माऊलीच्या ठायी असलेली भक्ति, श्रद्धा यामुळेच हे महत्कार्य मोठ्या काळजीने आणि सचोटीने संत एकनाथांनी पार पाडले.

याच कारणामुळे वारकरी संप्रदायात दरवर्षी “भागवत वद्य षष्ठी” हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती किवा ज्ञानेश्वरी परिष्करण दिवस म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा केल्या जातो.

ज्ञानेश्वर माऊलीनी  ज्ञानेश्वरी कथन केली. ती लिहीण्यात पण आली आणि तत्कालीन रिवाजाप्रमाणे त्याच्या अनेक प्रती लिहिल्या गेल्या. लोक मोठ्या श्रद्धेने ज्ञानेश्वरी पठण करीत, करतात आहे. सुमारे ३०० वर्षानंतर श्री संत एकनाथ महाराजांना स्वप्नात दृष्टान्त झाला. साक्षातमाऊलीचा संदेश! एकनाथांनी आळंदी गाठली. समाधी शोधली आणि मग ज्ञानेश्वरी परिष्करणाचा संस्कार पूर्ण झाला.

अठरा अध्याय, सातशे आठ श्लोक आणि नऊ हजार ओव्या असलेले हे भाष्य, म्हणजे श्री ज्ञानेश्वरी.

ज्ञानेश्वरी सांगतांना सुरवातीलाच माऊली म्हणतात, “संस्कृतचे दुर्लघ्य झालेले तट तोडून माझ्या श्री गुरुनी मराठी शब्दांचा सोपा दादर तयार केला आहे.”

तीरे संस्कृताची गहने | तोडोणी मऱ्हाठी शब्दसोंपाणे |

                        रचिली धर्मनिधाने | श्री निवृत्तीदेवे |

ज्ञानेश्वरी बहुत काळ नुसतीच पोथीत राहिली. हरिपाठ, अभंग मात्र लोकांच्या तोंडी राहिलते. आजही ज्ञानेश्वरी बऱ्याच घरी पोथीप्रमाणे ठेवल्या आणि पूजल्या जाते. खरे तर ती वाचायला हवी.

           एकनाथांनी ही ज्ञानेश्वरी संशोधित केली आणि पैठण येथे ज्ञानेश्वरी पुराण सांगण्याचा प्रघात पाडला. ज्ञानेश्वरी पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवायचे महत्वाचे कार्य एकनाथांनी केले. ज्ञानेश्वरीची महत्ता आणि योग्यता एकनाथांनी लोकांना पुन्हा पटवून सांगितली, तिची गोडी लाऊन दिली.

           विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर | ते या भूमीवर अलंकापूर असे लोकांस सांगुन आळंदीचे महत्व वाढविले. नाथ महाराजांनी सिद्धबेट येथील ज्ञानदेवांची समाधी शोधून काढली. शके १५१६ च्या सुमारास आळंदी येथे आंबेकर देशपांड्याने मंदिर बांधले आणि तुकारामांनी स्वत्: एक भिंत बांधली असे म्हणतात. तर शके १६८२ मध्ये शिंद्यांचे कारभारी रामचंद्र मल्हार यांनी सभामंडप बांधला. ज्ञानेश्वरी पुनः लोकांना सांगण्याचा प्रघात पडून तसेच आळंदीच्या यात्रेचा पायंडा घालून एकनाथांनी स्वत:ला ज्ञानदेवांच्या ऋणातून मुक्त केले. त्यांनी ज्ञानेश्वरीचे केलेले संकलन व सुधारणा विश्ववंद्य झाली आहे. मूळ ओव्यात त्यांनी फेरफार केले  असे म्हणायला अथवा मानायला कोठलाही आधार नाही. ज्ञानेश्वरीच्या पाठात पदरची ओवी घालून त्याने अमृताच्या ताटात नरोटी ठेवल्यासारखे होईल असं शेरा मारून ठेवणारे एकनाथ स्वत्:च्या पदरचे त्यात काही घालतील हे शक्य नाही. ज्ञानेश्वरीच्या पाठांत पदरचे काही घालू नये हा नियमच नाथांनी घालून दिला आहे.

                                    जे अपेक्षिजे विरक्ति | सदा अनुभविजे संती |

                        सोहंभावे पारंगती | रमिजे येथ ||५३||

अशी ही गीता सामान्य ग्रंथासारखी ओरबाडून टाकायची नाही तर शरदऋतुतल्या चंद्रकळेचे कोवळे अमृतकण चकोरतलगे (चकोराची पिल्ले) जशी मवाळ ( कोवळ्या) मनाने घेतात, त्याप्रमाणे हे गीतामृत श्रोत्यांनी “अति हळुवारपण चित्ता” आणूनिया प्राशन केले पाहिजे.

                                    हे शब्देवीण संवादिजे | इंद्रिया नेणता भोगीजे |

                        बोलाआधी झोंबीजे | प्रमेयासी ||५८||

चंचलपणा सोडून गंभीरपणे आणि स्थिरावलेनि अंत:करणे, जो गीतेकडे पाहील त्यालाच गीताशास्त्र पाहण्याचा अधिकार आहे. गीताशास्त्र हे संसार जिंकण्याचे शास्त्र आहे किंवा गीतेची अक्षरे ही आत्मा अवतरविणारे म्हणजे जीवपानाचे दारिद्र्य घालवून आत्मभाव उद्दिपीत करणारे मंत्र आहेत. गीता आणि ज्ञानेश्वरी समस्त मोह घालविणारी ज्ञानवल्लि आहे.

मंगलाचरणा पासून सुरू झालेल्या एक एक ओव्या म्हणजे ज्ञानदेववांनी समस्त मानवजातीवर अमृतकण शिंपडून उपकारच केले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा वाचण्याचा, समजावून घेण्याचा जाणण्याचा आणि जगण्याचा सोहळा आहे.

ज्ञानेश्वर माऊलीनी ज्ञानेश्वरी सांगताना स्वधर्म काय, राष्ट्रकार्य काय, कर्म कसे असावे, विचार कसे असावे हे सगळे इतक्या सहजतेने उलगडून सांगितले आहे की ते आजही अनुकरणीय वाटावे.

                         ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणे प्रमत्तु ।

 केवळ भोगासक्तु । होईल जो॥१०७ 

असा जो स्वधर्माचे आचरण न करणारा, श्रीमंतीचा ज्याला ताठा भरला आहे, आणि जो द्रव्य

मदाने उन्मत्त होऊन केवळ भोग लोलुप, विषयासक्त होईल. 

तया मग अपावो थोरु आहे । जेणें तें हातीचे सकळ जाये ।

देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥१०८॥

त्याला महत्संकटे येण्याचा थोर धोका आहे, त्याच्या जवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल, आणि प्राप्त असलेले भोग सुद्धा भोगावयास मिळणार नाहीत, अगदी सुरवातीलाच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात

हे पार्था, दुबळेपणाचा त्याग कर. हा तुला शोभत नाही. असा हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा टाक

तेच पुढे म्हणतात

 तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु । म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥११८॥

कडू व गोड  दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे.

     देखें इंद्रियां आधीन होईजे । तें शीतोष्णांते पाविजे ।

     आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥

जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वत: सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो.

 या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।

 ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥

 या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड लागत नाही.

हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।

कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥

हे विषय आहेत तरी कसे ? मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो.

माऊली म्हणतात “जसे पाण्याने भरलेल्या माठात सूर्यबिंब दिसते, परंतु तो माठ पालथा केला की  नाहीसे होते. आपण सूर्यच नाहीसा झाला असे समजतो, ते भासमय आहे. सूर्य आहेच फक्तप्रतिबिंब गेले. तद्वत शरीर पडले म्हणजे आत्मा मेला असे नाही. आत्मा नीत्य आहे, अविनाशी आहे. आत्म्याचे अविनाशी स्वरूप सांगितल्यावर श्री ज्ञानदेव सांगतात

                                    परि संतासावे वसंता | योगज्ञानी पैसता ||

                        गुरुचरण उपसितां | वैराग्येंसी || १५- ४२२

                        येणेच सत्कर्मे | अशेषही अज्ञान विरमे |

                        तयांचे अहं विश्रामें | आत्मरूपी || १५ -४२३

संतांच्या, सज्जनांच्या  संगतीत रहावे व वैराग्यासह श्रीकृष्णाची उपासना करावी. कर्मयोगादिकांचे ज्ञान घ्यावे, यामुळे साधकाचा “अहं” विश्रांती पावतो.

ज्या ज्ञानाने ज्ञानी पुरुष परस्पर भिन्न असणाऱ्या सर्व प्राणिमात्रांमध्ये एक अविनाशी, भेदशून्य परमात्माभाव भरून राहिला आहे असे पाहतो ते ज्ञान सात्विक आहे.  परंतु तत्व न जाणता देहालाच सर्वस्व समजतो ते तामस ज्ञान. तमोगुणामुळे बुद्धी फक्त शरीर, मी असाच स्वकेंद्रित विचार करतो. तर रजोगुणामुळे दृष्टीला सर्वत्र भेद दिसतो. या बुद्धिमध्ये स्वार्थासाठी व सुखासाठी अन्य माणसाचा विचार करण्याची प्रवृत्ती असते.

सात्विक कर्ता हाती घेतलेल कर्म परिपूर्ण उत्साहाने, ज्ञानपूर्वक व धैर्याने करतो.  पण आसक्त नसतो. यशाने हर्ष अथवा अपयशाने शोक होत नाही.

रजोगुणी कर्ता कर्म आणि कर्मफळ याविषयी अत्यंत आसक्त असतो. लोभ ही प्रेरणा असते. आपले कर्म तडीला जावे म्हणून तो अनेकांना दावणीला बांधतो.

तमोगुणाचा कर्ता कोणतेही काम मनापासून करत नाही. तो असंस्कृत, घमेंडखोर व कावेबाज असतो. आपल्या कामासाठी दुसऱ्याच्या उपजीविकेचे साधनही नष्ट करायला मागेपुढे पहात नाही.

म्हणून सात्विक ज्ञानाची कास धरणे उत्तम.

पसायदान हे ज्ञानेश्वरीच्या विवेचनाला आलेले अमृतमाधुर फळ आहे. विश्वातील ही एकमेव प्रार्थना आहे ज्यात सगळ्यांच्या सुखाची कामना आहे.

         जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रति वाढो म्हणजे खळांच्या तिरक्या चाली जाऊन, त्यांना सत्कर्माची आवड निर्माण होऊन माणसे सलोख्याने राहावी. परंतु माणसे अशी  राहिली असती तर गेल्या सातशे वर्षातील चित्र एकदम पालटलेले दिसले असते. म्हणून याकडे  वेगळ्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. श्री ज्ञानेश्वरीचे धर्मकीर्तन समाजासाठी केले असल्यामुळे समाजाकडून प्रसाद मागणे अधिक तर्कसंगत वाटते. म्हणून श्रीगुरुकडे प्रसाद मागण्याचे निमित्त करून बरीचशी जबाबदारी वाचकांवर, समाजावर आणि काही जबाबदारी ईश्वरावर सोडली आहे. वाचकाने(समाजाने) आपले खळत्व सांडावे, व त्याला मदत करण्यासाठी ईश्वराने कल्पतरूरूप संतांचे समुदाय या जगताला उपलब्ध करून द्यावे. आपले खळत्व ओळखून, कुकर्माकडील प्रवृत्ती लक्ष्यात घेऊन, आपल्यातील वैराच्या उर्मी शोधून काढून त्या नष्ट करण्याचे काम ज्याचे त्यानेच करायला नको का? स्वत्:च्या दुर्वासना ओळखून व त्या आहेत हे मान्य करून दुर्जनाची संगत टाळावी. पापांचा अंधकार हा स्वत्: केलेल्या पुण्याच्या प्रकाशानेच जाईल.

व्ययसायकर्माला सत्कर्माचा दर्जा देणे महाकठीण आहे. अप्रामाणिकपणा हा जर व्यवसायाचा पाया असेल तर तो कधीच “सत्” कडे नेणार नाही. तसेच नौकरीचे पण आहे.

धर्मकर्म हल्ली हे उपेक्षित असून यांत्रिक झाले आहे. विज्ञान युगाची नशा, चंगळवाद, अहंकार , राजकीय व सामाजीक उलाढाली, भ्रष्टाचार, दुसऱ्याचा उपमर्द, अशाश्वत जीवन, ह्या सगळ्या कारणामुळे प्रामाणिक व्यक्तीलाही धर्मकार्याबद्दल शंका येते. तर अश्या सगळ्यात “सत्कर्मी रती वाढो” म्हंणजे सत्कर्माची आवड निर्माण होवो अशी प्रार्थना माऊली करतात. नीती शतका मध्ये

भर्तृहरी म्हणतात सत्कर्मात फार मोठे सामर्थ्य आहे. सत्कर्म हे खलत्वरूपी रोगावरील रामबाण औषधच आहे.

              भुता परसपरे पडो मैत्र जीवांचे. दुष्टपणा गेला की जीवमात्रात मैत्र जडो. हेही मागणे आहे. आज माणूसच माणसाचा वैरी असल्यागत झाले आहे. भारताच्या बाबतीत हा विषय फार गंभीर बनला आहे. धर्म, जात, पक्ष, युनियन, गट , फेडरेशन, चेंबर, धनको, ऋणको, शासन व प्रजा सर्वच स्तरावर पराकोटीचा संघर्ष आढळतो.जीवाभावाची मैत्री आणि हे वातावरण! काहीच मेळ बसंत नाही. अश्या अवस्थेत केवळ ज्ञानेश्वरीच्या अभ्यासपूर्ण आंचरणाने माणूस पशू, पक्षी, वृक्षादि अन्य भूतांशी सुद्धा मैत्रीने वागू शकेल. म्हणूनच म्हणतात “एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेशाची”   

            जो पापकर्मापासून परावृत्त करतो, हितकारक कर्मामध्ये प्रवृत्त करतो. गोपनीय गोष्ट गुप्त राखतो, सद्गुण प्रकट करतो, संकटग्रस्त असलेल्या मित्रालाही सोडत नाही व काही काम पडले तर वाट्टेल ते देतो, तोच सन्मित्र होय, असे सन्मित्रत्व सर्व भूतमात्रामध्ये निर्माण व्हावे, तेहि जीवाभावाचे. निरपेक्षबुद्धीने ते मित्रत्व असावे. असा यात आशय आहे.  

एकंदरीत ज्ञानेश्वरी म्हणजे अमृतकणांनी भरलेली मोठी ओंजळ आहे. त्यातून पाझरणारे अमृतकण वेचणारा खरा भाग्यवान. ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, दासबोध हे ग्रंथ महाराष्ट्राला लाभलेले दैवी ग्रंथ आहेत. हे पोथी म्हणून देवघरात पूजण्यासाठी नाहीत. ते  श्रद्धेने, भक्तिभावाने, आपल्या ज्ञानाची कवाडे उघडून त्या ग्रंथातील आशय आपल्या अंत:चक्षु मध्ये साठवून ठेवण्यासाठी आहे.

ज्ञानेश्वरीतील उपदेश हे एक सुसंकृत, सशक्त, सत्शील, ज्ञानी समाज आणि पर्यायाने एक सुदृढ राष्ट्र उभे करण्यासाठी प्रेरक आहेत.

संपूर्ण ज्ञानेश्वरीवर टिप्पण्णी देणे शक्य नाही. प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचावीच आणि ज्ञानदेवांना अपेक्षित अमृतमयी आनंद प्रत्येकाने उपभोगायलाच हवी.

                            हे विश्वची माझे घर | ऐसी मती जयाची स्थिर ||

मती स्थिर झाली की प्रत्येकाच्या अंत:करणात माऊलीच असते. विश्वकल्याणाची प्रार्थना करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या परिष्करण म्हणजे अर्थातच ज्ञानेश्वरी जयंती निमित्त माऊलीच्या चरणी नमन आणि सगळ्यांना शुभेच्छा.

कैवल्याचा पुतळा | प्रगटला भूतळा ||

                                चैतन्याचा जिव्हाळा | ज्ञानोबा माझा ||

                                साधकाचा मायबाप | दरुशने हरी ताप ||

                                सर्वाभूती सुखरूप | ज्ञानोबा माझा ||         

संबंधित लेख