नागपुर संस्करण
विचार वेध

जगज्जननी आई जगदंबे! महाकालीके! महिषासुरमर्दिनी, तुळजापूरवासिनी भवानी माते!

📅 30 सित॰ 2026 ✍️ Shri Amol Tapase 👁 106 बार देखा
जगज्जननी आई जगदंबे! महाकालीके! महिषासुरमर्दिनी, तुळजापूरवासिनी भवानी माते!
जगज्जननी आई जगदंबे! महाकालीके! महिषासुरमर्दिनी, तुळजापूरवासिनी भवानी माते! 
नवरात्रीचे पावन पर्व सुरु होतेय. ​तुझ्या असीम पराक्रमाची, अतुलनीय शक्तीची आणि अनंत कारुण्याची गाथा युगायुगांपासून या चराचर सृष्टीला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा अखंड जीवनदीप ठरली आहे. जेव्हा जेव्हा अधर्माचा माज वाढला, नीतिमत्तेचा संकोच झाला आणि असुरी प्रवृत्तींनी उच्छाद मांडला, तेव्हा तुझ्या एका हुंकाराने ब्रह्मांड थरथरले. महिषासुर, चंड-मुंड, शुंभ-निशुंभ, रक्तबीजासारख्या महाभयंकर दैत्यांचा संहार करून तू देव, मानव आणि समस्त सृष्टीला भयमुक्त केलेस. तुझ्या हातातील त्रिशूळ, खड्ग आणि चक्र केवळ शस्त्रांचे प्रतीक नाहीत, तर ते अन्यायाचा समूळ उच्चाटन करणाऱ्या अंतिम सत्याचा हुंकार आहेत! तुझ्याच असीम आशीर्वादाने, दिव्य प्रेरणेने आणि भवानी तलवारीच्या प्रखर तेजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी परकीय सत्तांचे साम्राज्य पाडून या भूमीवर न्याय, नीती आणि स्वातंत्र्याचे 'हिंदवी स्वराज्य' स्थापन केले.
​आई भवानी, आज पुन्हा एकदा हे राष्ट्र, तुझी ही पवित्र भारतभूमी एका अत्यंत निर्णायक आणि ऐतिहासिक वळणावर उभी आहे. आजचे असुर केवळ सीमेवरच चालून येत नाहीत, तर ते छुप्या विचारांच्या रूपात, देशांतर्गत कट-कारस्थानांच्या रूपात, सांस्कृतिक आक्रमणांच्या रूपात आणि राष्ट्रविरोधी षड्यंत्रांच्या जाळ्यात वावरत आहेत. बाहेरून होणारे आघात पचवणे सोपे असते, पण आतून राष्ट्राची मूळे खोदणाऱ्या या अदृश्य असुरांचा नायनाट करणे हे आजच्या काळातील सर्वात मोठे धर्मयुद्ध आहे. अशा या कठीण आणि कसोटीच्या समयी तुझ्या लेकरांना तुझ्याच दिव्य तेजाची, प्रखर वज्रशक्तीची आणि अजिंक्य पराक्रमाची नितांत गरज आहे.
 हे महिषासुरमर्दिनी! बर्फाच्छादित शिखरांवर, धगधगत्या वाळवंटात आणि अथांग सागरावर अहोरात्र राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या आपल्या वीर सैनिकांना आणि प्रत्येक राष्ट्रभक्ताला शत्रूचा निर्दयीपणे अन् समूळ नायनाट करण्याचे अफाट सामर्थ्य दे. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाविरुद्ध उठणारा प्रत्येक असुरी हात छाटण्याची, प्रत्येक वाकडी नजर जाळून भस्म करण्याची ताकद आपल्या सेनेला लाभो. त्यांच्या दमादमात प्रखर शौर्य आणि रगेरगात अजिंक्य ताकद भर!
 हे माता महाकालीके! जे देशद्रोही, स्वार्थी आणि परकीय विचारांचे गुलाम आपल्याच बलिदानी सैनिकांच्या त्यागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, जे या राष्ट्राची अखंडता, एकात्मता आणि बंधुभाव तोडण्याचा कुटील प्रयत्न करतात; त्यांच्या वाईट कृत्यांचा, विषारी विचारांचा आणि कारस्थानांचा समूळ उच्चाटन करण्याची बुद्धी अन् शक्ती प्रत्येक भारतीय नागरिकाला दे. राष्ट्राला आतून पोखरणारी सर्व षड्यंत्रे उधळून लावणारे 'ज्वालामुखी रूप' आमच्यात जागृत कर!
 हे माते चामुंडे! संपूर्ण जगात सत्याचा, नीतीचा आणि धर्माचाच विजय होवो. अन्यायाविरुद्ध मूठ आवळून ठामपणे उभे राहण्याची, राष्ट्रहिताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आणि कठीण प्रसंगीही न डगमगता कटू सत्याचा स्वीकार करण्याची प्रखर प्रेरणा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अखंड तेवत ठेव.
 आई भवानी ! केवळ बाह्य शत्रूंचा विनाशच नव्हे, तर एकसंध, अखंड, स्वाभिमानी, आर्थिक-सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि जगाला मार्ग दाखवणाऱ्या 'विश्वगुरू' भारतवर्षाच्या निर्मितीसाठी आम्हास उर्जा दे. जात-पात, पंथ, प्रांतीयता, वैयक्तिक स्वार्थ आणि भेदाभेदाच्या असुरी वृत्ती या राष्ट्रयज्ञाच्या अग्नीत जळून खाक होऊ देत! प्रत्येक भारतीयाच्या मनात 'राष्ट्र प्रथम' ही एकच भावना अमर राहू दे.
 ​हे माते! तुझ्या प्रत्येक भक्ताला धर्मरक्षणासाठी आणि राष्ट्ररक्षणासाठी अर्जुनासारखा एकाग्र ध्यास, भीमासारखी ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराज अन् धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखा अढळ, अतुलनीय पराक्रम लाभो!
 अमोल तपासे, नागपूर 
९९६०६७३७८९

संबंधित लेख