नवरंगोत्सव: जाणीवेचे लेणे-प्रा.डॉ.अनघा नासेरी.
नवरंगोत्सव: जाणीवेचे लेणे
"अगं आई! वर बघ, किती सुरेख इंद्रधनुष्य दिसतंय." आईबरोबर बागेत फिरायला आलेल्या मुग्धाने उत्साहाने आईला ते सुरेख इंद्रधनुष्य दाखविले. नुकत्याच आलेल्या श्रावणसरीनंतर पडलेल्या उन्हाची ती किमया पाहून आई म्हणाली "खरंच की, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे" मुग्धा म्हणाली, "आई, मला तर वाटतंय की -
इंद्रधनुचा मऊ सोनेरी हिरवा रंग करावा मी परिधान
पण त्याच्या मऊपणाची असावी मला सुखद जाण."
आई म्हणाली "खरंय गं! निसर्गाची ही जाणच तर महत्वाची. ती असली तरच आपण निसर्ग सौंदर्य अनुभवू शकतो. निसर्गाचे संवर्धन करू शकतो.बघ हे इंद्रधनुष्याचे सुरेख रंग, ही फुललेली रंगीत फुलं, त्यावर भिरभिरणारी ही रंगीबेरंगी फुलपाखरं. किती सुरेख रंगभरी दुनिया आहे नं आपली!
कवयित्री डाॅ. वृंदा जोगळेकर म्हणतात ...
चटकदार रंग, हवेत थिरकणं
फुलपाखरं आसपास भिरभिरणं,
फुलांचे रंग-गंध-स्पर्श अनुभवणं.
नऊ दिवस, नऊ रस, नऊ रंगात न्हाणं
नवरात्र उत्सव रोज आनंदगाणं.
सगळ्या रंगांचं चवदार मिसळणं
जीवन तुमचं-आमचं मधुर पक्वान्नं.
नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस नऊ रात्री देवीची पुजा. या काळात सृष्टीतील पावसाचा जोर संपून वातावरण आल्हाददायक झालेले असते. तेव्हा
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।
म्हणत देवीसमोर शेतातील माती ठेवून मध्यभागी मातीचा घट जल भरून ठेवतात व भवताली नऊ धान्य पेरतात. वर रोज एक फुलांची माळ अडकवतात. अखंड दिवा लावतात. धूप लावून वातावरण सुगंधित करतात. हे सर्व पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या पंचमहाभूतांचे प्रतिक. घट म्हणजे पृथ्वी तत्व, त्यात जल म्हणजे आप. वर ऊरलेली पोकळी म्हणजे आकाश, अखंड दिवा तेजाचे प्रतिक व आजूबाजूची हवा आणि धूपाचा सुगंध म्हणजेच वायू तत्व. माठातून झिरपत राहणाऱ्या पाण्याने नऊ धान्यांची वाढ होते. नऊ दिवसानंतर ज्या धान्याची सर्वात जास्त वाढ होते ते पुढील वर्षीच्या पेरणीसाठी योग्य समजतात. म्हणजेच हा उत्सव शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा पण आहे.
देवी म्हणजे शक्ती, बुद्धि, विद्या, दया वगैरे सर्व भावनांचे प्रगट रूप. देवी म्हणजे मातृरूप. आपण प्रार्थना करतो की -
या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥"
मातृरूप म्हणजेच सृजनशक्ती, तिची पुजा आपण आपल्या सृजनशीलतेचे संवर्धन करण्यासाठी करायची. मूर्तिकार कुशलतेने तिची सुंदर मुर्ती बनवतात; मंडपवाले सुरेख सजावट करतात; ढोल, ताशेवाले ताल-वाद्य वाजवतात; मुलं लेझिमच्या तालावर नाचतात. भक्तिमय वातावरणात स्त्री-पुरूष रंगीबेरंगी वस्त्र परिधान करून गरबा खेळतात. देवीच्या आराधनेत तल्लीन होवून संगीताच्या तालावर थिरकणा-या पावलांचा हा नृत्याविष्कार म्हणजेच हा गरबा. अष्टमीच्या रात्री महिला भक्तीने देवीच्या प्रतिमेसमोर एकाग्रतेने ताल धरून धुपावलेल्या घागरी फुंकतात.
स्त्रिया रोज नैवेद्यासाठी निरनिराळे पक्वान्न करतात, सुरेख रांगोळ्या काढतात. म्हणजेच नवरात्रीच्या उल्हसित वातावरणात सर्व प्रकारच्या कलागुणांना वाव मिळतो. प्रत्येकाच्या सर्जनशीलतेचा आविष्कार होतो. जीवन एक मधुर पक्वान्न होतं.
नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचा ऊत्सवच असतो. ह्या नऊ दिवसांमध्ये दररोज एका विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करण्याची परंपरा आहे, ज्याचा संबंध विविध ऊर्जा आणि प्रतीकात्मक अर्थांशी जोडलेला आहे. नवरात्रीचे नऊ रंग उत्साह, शांतता, शक्ती आणि समृद्धी यांसारख्या विविध मूल्यांचे प्रतीक आहेत आणि रंगांचा आपल्या आरोग्याशी व आपल्या मनाच्या भावनिक स्थितीशी संबंध असतो. म्हणून ह्या वेगवेगळ्या रंगांना आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान आहे.
भावनेशी संबंध: आपले प्रत्येक विचार आणि भावना रंगांशी जोडलेले असतात, ज्यामुळे मूड चांगला किंवा वाईट होऊ शकतो.
शारीरिक स्वास्थ्य: रंगांच्या ऊर्जेमुळे आपल्या हृदयाचे ठोके आणि संप्रेरके (hormones) यांवरही प्रभाव पडतो. लाल, हिरवा, निळा, पिवळा वगैरे सर्वच रंग आपल्या व्यवहारासोबतच आपल्या आरोग्यावरही प्रभाव टाकतात.
२०२६ या वर्षाच्या नवरात्रीचे नऊ रंग दिवसानुसार असे आहेत:
दिवस १ (११ ऑक्टोबर): नारिंगी (Orange) - ऊर्जा आणि आनंद ह्यांचे प्रतिक असलेला हा नारिंगी, केशरी रंग. तसेच हा रंग रूची वाढवतो. मानसिक क्षमता आणि मानसिक हालचालींचा वेग वाढवतो. केशरी रंग त्यागाचे, वैराग्याचे प्रतिक समजला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचा, समर्थ रामदास स्वामींच्या छाटीचा हा रंग. "विक्रम, वैराग्य एक जागी नांदती" ह्याची ग्वाही देणारा हा रंग.
दिवस २ (१२ ऑक्टोबर): पांढरा रंग : (White) - स्वच्छता, शुद्धता, पावित्र्य, शांतीचे आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानला जातो. यामुळे हा रंग आपल्या मनावर प्रभाव टाकतो. हा रंग एका यशस्वी सुरुवातीचं प्रतिनिधीत्व करतो. पांढऱ्या रंगाची तर कितीतरी फुलं आपल्या भवताल सापडतात. जाई, जुई, चमेली, शेवंती, पारिजातक, अनंत ही सर्व शुभ्र, सुगंधी फुलं. जसे म्हणतात ना की ‘सर्वे देवं नमस्कार:। केशवं प्रति गच्छति॥’ त्याप्रमाणेच सर्व रंग समप्रमाणात मिसळले तर आत्मतत्त्व, ब्रह्मतत्वाचे प्रतीक असणारा पांढरा रंग तयार होतो.
दिवस ३ (१३ ऑक्टोबर): लाल रंग: (Red) - हा रंग शक्ती आणि धैर्य, उत्कटता आणि उत्साह वाढवतो, लाल रंग हा ऊर्जेशी संबंधित मानला जातो. याच्या जास्त वापरामुळे क्रोध, राग किंवा चिडचिडही वाढू शकते. पण दुर्जनांचा नाश करण्यासाठी क्रोध देखील आवश्यक आहे. क्रोधायमान होवूनच कालीमातेने महिषासुराचा वध केला. लाल रंग अधिक पाहिल्याने तणाव जाणवतो. श्वास आणि हृदयाचे ठोके, राग आणि फ्रस्ट्रेशन, मेटाबॉलिज्म, ब्लड प्रेशर वाढतात. म्हणूनच प्रत्येक रंगाचा प्रमाणात वापर करावा. जास्वंद, गुलाब, कण्हेर ही लाल रंगांची फुलं आपण पुजेत वापरतो.
दिवस ४ (१४ ऑक्टोबर): शाही निळा रंग : रॉयल ब्लू (Royal Blue) - हा रंग संतुलन, शांतता आणि आत्मविश्वास, स्थैर्य देतो. हा रंग परिपक्वता आणि शहाणपणाचे प्रतीक मानला जातो. हा मन शांत करतो, ताणतणाव कमी करतो आणि एकाग्रता वाढवतो. निळा रंग मनुष्याच्या मेंदुवर आरामदायक प्रभाव करतो. शरीरातील मेटाबॉलिज्मची गती कमी करतो. निळा रंग जास्त वेळ पाहिल्याने डिप्रेशन येतं असं मानलं जातं. गोकर्ण, कृष्णकमळ ही निळ्या रंगांची फुलं देवाला प्रिय आहेत.
दिवस ५ (१५ ऑक्टोबर): पिवळा रंग : (Yellow) - हा ज्ञान आणि सकारात्मकता, आनंद आणि आशावाद देतो, पिवळ्या रंगाने शरीरात सेरोटॉनिन स्त्राव अधिक होतो. त्यामुळे याने मन आनंदी होतं. तसेच या रंगाने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं आणि आनंदी भावना जागवतं. परंतु अतिप्रमाणात पिवळा रंग डोळ्यांना थकवा देऊ शकतो. कर्दळ, गुलाब, झेंडू, जास्वंद ही फुलं पिवळ्या रंगांसाठी वापरण्यात येतात.
दिवस ६ (१६ ऑक्टोबर): हिरवा रंग : (Green) - नवीन सुरुवात आणि समृद्धी चे प्रतिक मानलेला हा रंग निसर्ग, विश्रांती, व सृजनशीलतेशी जोडलेला असून डोळ्यांना शांतवणारा, सुखावणारा, शरीराला आरामदायी व मानसिक तणाव कमी करणारा आहे. ह्या रंगाच्या अगणित छटा निसर्गात दिसतात. डोहाळतुलीला सृजनशीलतेचे प्रतिक म्हणून हिरवी साडी नेसवण्याची व सुगंधी फुलांचे दागिने घालण्याची प्रथा आहे.
दिवस ७ (१७ ऑक्टोबर): राखाडी / करडा (Grey) रंग संतुलन, स्थैर्य, परिपक्वता आणि शहाणपणाचे प्रतीक मानला जातो.
दिवस ८ (१८ ऑक्टोबर): जांभळा (Purple) रंग सामर्थ्य आणि महत्त्वाकांक्षा व आध्यात्मिक प्रगती चे प्रतिक असणारा मानतात. जांभळा म्हणजेच पर्पल रंग सेक्शुअल ॲक्टिव्हिटी वाढवतो. तसेच जास्त प्रमाणात वापरल्यास हा रंग निराशेची भावना अधिक वाढवतो.
दिवस ९ (१९ ऑक्टोबर): मोरपंखी हिरवा (Peacock Green) - हा रंग समृद्धी आणि परिपूर्णतेचं प्रतिक आहे. हा ताजेतवानेपणा, शांतता प्रदान करणारा मानला जातो.
हे झाले यावर्षीचे नऊ दिवसांचे रंग. आणखी पण महत्वाचे रंग आहेत: सर्वांच्याच आवडीचा गुलाबी रंग नेहमी चांगलाच प्रभाव करतो, राग आणि तणाव कमी करतो व स्त्रियांचे गुणही दर्शवतो. काळा रंग सामर्थ्य, गांभीर्य, आणि आधुनिकाचे प्रतीक मानला जातो, आत्मविश्वास आणि धैर्याची भावना वाढवतो. फॅशन जगतात काळ्या रंगाला विशेष स्थान आहे. यामुळे व्यक्ती अधिक आकर्षक आणि शिस्तप्रिय दिसते. इतकेच नाही तर काळा रंगाचे कपडे परिधान केल्याने लोक बारीक दिसतात.
"पण मग आई!" मुग्धा आईला अडवत म्हणाली " ह्या रंगांचे फक्त कपडेच घालायचे का?" "नाही गं!" आई म्हणाली "ह्या रंगांची विशेषता लक्षात घेवून आपण त्या त्या रंगांची पानं फुलं वापरून पुष्परचना करून, पुष्प-पर्ण- रंगावली काढून, घरातील छान सजावट करून, घरातील पडदे त्या त्या रंगांचे लावून त्या रंगाची परिणामकारकता वाढवू शकतो." ते कशासाठी?" इति मुग्धा.
आई- " ह्यामुळे तो तो रंग जास्त वेळ दृष्टिस पडून त्याचा आपल्या मनावर त्याचा जास्त परिणाम होईल. अगं! रंगांचा आपल्या मानवी जीवनावर, भावनांवर आणि मानसिक आरोग्यावर थेट व खोल परिणाम होतो. म्हणूनच निसर्गोपचारात रंग-जल चिकित्सा सांगितली आहे. ह्यात रूग्णांना त्यांच्या प्रकृतीनुसार विविध रंगांचे पाणी पिण्यास देणे, विविध रंगांच्या प्रकाशात बसविणे असे ऊपचार करतात.
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक वाराचा ग्रहाप्रमाणे रंग सांगितला आहे. पत्रिकेप्रमाणे योग्य रंगांचे रत्न परिधान केले तर त्याचा पण सकारात्मक फायदा होवू शकतो असे मानतात.
शब्दावाचून पटकन उमगत जाणारी अशी ही रंगांची भाषा आहे. वेगवेगळ्या देशांचे, खेळांच्या स्पर्धांचे चटकदार, रंगीबेरंगी ध्वज दुरूनही आपली ओळख देणारे असतात. रेडक्रॉसचे चिन्ह लाल रंगातले, हे रणांगणावर दूरूनही दिसते. रूग्णवाहिका (अँब्युलन्स) वरचा लाल दिवा, मंत्री, सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरचा लाल दिवा लवकर लक्ष वेधून घेतो. सिग्नलचे रंग, लाल, पिवळा, हिरवा आपल्याला "थांबा, वाट पहा, चालू लागा...” अशी शब्दांशिवाय सूचना देतात. वास्तुशास्त्रानुसार जर घराच्या किंवा खोल्यांच्या भिंतींसाठी, पडद्यांसाठी योग्य रंगांची निवड केली तर त्याचे पण उत्तम परिणाम मिळतात.
रंग आपल्या सृष्टीचा अविभाज्य घटक आहे. रंगच नसते तर ही सृष्टी अगदी रुक्ष वाटली असती. दृष्टिबाधित मात्र रूप, रंगाच्या अनुभवाला मुकतात. शब्द, स्पर्श, रूप, रंग, रस, गंध ह्यांच्या सहाय्याने आपण जग अनुभवू शकतो. हे देवाचे आपल्यावर केवढे उपकार आहेत ह्याची आपण जाणीव ठेवायला हवीच. म्हणूनच देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्व सण, उत्सव साजरे करतो. भारतीय संस्कृतीतील सणात ऋतूकालाप्रमाणे अनुकूल असा आहार- विहार सांगीतला आहे. हे सण आपल्या आयुष्यात उत्साह, आनंद आणतात. तसंच दुःखातून बाहेर येण्यास मदत पण करतात. देवपूजा, सण, उत्सव हे सर्व मनाला प्रसन्न करण्यासाठीच आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात की,
"मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण".
या प्रसिद्ध अभंगाचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की, माणसाचे मनच सर्व प्रकारच्या यशाचे, सुखाचे आणि सिद्धींचे मूळ कारण आहे. तुमचे मन नेहमी आनंदी, निर्मळ आणि प्रसन्न ठेवा. कारण जगात मिळणारी प्रत्येक सिद्धी, यश, सुख, समाधान, तसेच मोक्ष किंवा बंधन या सर्वांचे मूळ कारण आपले मनच आहे. देवाच्या पुजेत आपण पत्र, पुष्प, फल, तोय म्हणजे पाणी अर्पण करतो.
श्रीमद्भगवद्गीतेतल्या प्रसिद्ध श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात की,
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्युपहृतभक्तिमश्नामि प्रयतात्मनः॥
जो भक्त मला प्रेम आणि भक्तीसह पत्री- पान-तुळस, पुष्प -फूल, फल वा तोय (जल) जे काही अर्पित करतो त्याचा मी प्रेमपूर्वक स्वीकार करतो. ही पूजेतील पत्री, फुलंसुद्धा औषधी गुणांनी युक्त आहेत. व त्यांची ओळख, माहिती पिढी दर पिढी संक्रमित होण्यासाठी पुर्वसुरींनी त्यांचा पुजासामग्री म्हणून वापर करायला सांगीतला आहे.
म्हणजेच भगवंताला कुठल्याही महागड्या वस्तू नाही तर सहजपणे आपल्या परिसरातूनच मिळतील अशाच गोष्टी अर्पण करायच्या. ज्या मिळवताना आपण निसर्गाजवळ जातो, तिथे रमतो, पानं, फुलं, फळांचा रंग, स्पर्श, गंध अनुभवतो. आनंदित होतो आणि 'ज्योतीने तेजाची आरती' करावी तसे 'तेरा तुझको अर्पण' या भावनेने देवाने जे आपल्याला दिले तेच त्याला अर्पण करतो. मन प्रसन्न होते. म्हणून मग देव प्रसन्न होतो.
तर असे हे पुजेमागचे, उत्सवामागचे सृष्टीतील सौंदर्याचा आस्वाद घेत शब्द, रूप, रंग, स्पर्श, गंध ह्या सर्व संवेदनांना, पंचेंद्रियांना तृप्त करणारे मन प्रसन्न करण्याचे तत्व आहे आणि ते आपण जाणीवपूर्वक जोपासले पाहिजे.
"सारे सृष्टीसौंदर्य हे तो ईश्वराचे देणे।
भोगावे ते आपण लेवून जाणीवेचे लेणे॥"
प्रा .डॉ.अनघा नासेरी.
9823424271




