नवरात्री - नवी पिढी नवे विचार - सौ मंजुषा आठल्ये
नऊ दिवसांच्या नऊ ओट्या, आदिशक्तीच्या दिव्य स्वरूपा"
------------------------------
"अगं अनिका,हे गहू, तांदूळ, सगळ्या डाळी, कडधान्य कशाला आणलसं एवढं? उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे. माझे उपास असतात, मान्य की तू उपास करत नाहीस.पण एवढ्या सगळ्याचे किती पदार्थ करून खाणार आहेस? "कुसूमताई थोड्या नाराजीनेच बोलल्या.
"अहो आई, मी उपास करत नाही म्हणून काय दिवसभर खातच राहते का? आपल्या घरची नवरात्रीची आरती करून मी ऑफिस मधे जाते नं? "
अनिका हसत पुढे म्हणाली, हे सगळं साहित्य मी आज कशासाठी आणलं सांगू?
मी उद्यापासून रोज देवीपुढे वेगवेगळ्या रंगाच्या धान्याची, वेगवेगळ्या डिझाइनची ओटी भरणार आहे. नवरात्रात नऊ रंगाच्या साड्या नेसतात नं? तसच मी रोज वेगवेगळी ओटी भरणार आहे. आणि शेवटी नऊ सवष्णींची ह्याच ओट्यांनी ओटी भरणार आहे. "
" अं...., कल्पना चांगली आहे, पण हे सगळं कशासाठी? ह्यानी काय साध्य होणार आहे? ", कुसुम ताई खुर्चीवर बसत म्हणाल्या. कपाळावर मोठी टिकली लाव म्हटलं तर ऐकत नाही. छोटी टिकली लावते. हे मात्र मनात म्हणाल्या. तिची छोटी टिकली त्यांना खटकायची.
" सगळं सविस्तर सांगते आई, पण पहिले आपल्या दोघींसाठी फक्कड चहा करते", असं म्हणत अनिका चहा करायला गेली.
पोरीच्या डोक्यात काहीतरी शिजतय, असा विचार करत कुसूमताई बसल्या होत्या. तेवढ्यात गरमागरम चहा घ्या आणि सोबत बिस्किटं पण खा, असं म्हणत अनिका दोघींसाठी चहा बिस्किटं घेऊन आली.
चहाचा एक घोट घेत अनिका म्हणाली, "वा छान झालाय नं आई चहा? "
"ते सोड, आधी ह्या नऊ ओट्यांचं काय प्रकरण आहे ते सांग आधी? "
"आई, कोणी नवरात्रीचे उपास करतात, कोणी धान्यफराळ करतात, नवरात्रात कोणाकडे नऊ दिवस सवाष्ण कुमारिका जेवायला असते, तर कोणाकडे नवमीला असते. आपापल्या घरच्या रितीप्रमाणे सर्वजण देवीची भक्ती करतात. थोडक्यात काय तर देवीची उपासना करतात. आजकाल नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसायचा ट्रेंड आहे. काही लोकं ह्याला नावं ठेवतात, पण माझं म्हणणं काय हरकत आहे? घरची सगळी कामं करून बायका छान तयार होतात, तर आपला सण आहे म्हणूनच नं? नऊ दिवसाच्या वेगवेगळ्या रांगोळ्या काढतात. मग मी ठरवलं यावर्षी आपण नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या धान्य आणि कडधान्यानी ओटी भरू. बघा मी तर खणाचे वेगवेगळ्या रंगांचे ब्लाऊजपीस पण आणले आहेत. तशाच मॅचिंग बांगड्या पण आणल्या. टिकल्या मात्र लाल रंगाच्याच मोठ्या आकाराच्या आणल्या आहेत हं. तुम्हाला अशाच आवडतात म्हणून.
आणि हे बघा आर्टिफिशियल गजरे, हे पण मला रंगीबेरंगी मिळाले. आणि आई ह्या ओट्या भरल्यावर त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी जुन्या साडीच्या पिशव्या पण शिवून घेतल्या. प्लॅस्टिकच्या पिशव्या नाही द्यायच्या बरं.
आता उद्यापासून नऊ दिवस मी रोज छान तयार होऊन देवीसमोर ओटी भरणार म्हणजे ह्या साहित्यानी सजावट करणार. त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करणार. माझं कौतुक व्हायला पाहिजे म्हणून नव्हे, तर हे पाहून दुस-यांना पण प्रेरणा मिळायला पाहिजे. शेवटी काय हा शक्तीचा जागर वाढता राहिला पाहिजे. आता नवमीला संध्याकाळी आपण सवाष्णींना आपल्या घरी आमंत्रित करणार आहोत. ह्या सवाष्णी राहतील आपल्याकडे पोळ्या करणा-या मावशी, भांडी घासणारी ताई आणि तिची सासू,आपल्या घरासमोरचा रस्ता झाडणा-या तिघी भगिनी, आपले कपडे इस्त्री करणा-याची बायको आणि सून, कार वॉश करणा-याची बायको. अजून तुम्हाला कोणी आठवत असेल तर सांगा हं. आणि मुख्य म्हणजे त्यादिवशीचा आपला मेनू राहील श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, मसालेभात आणि कोशिंबीर.
मसालेभात आणि श्रीखंड मात्र तुमच्याच हातचं पाहिजे हं आई. कारण तुमच्यासारखं टेस्टी माझं नाही होत. "
तिचं बोलणं मधेच थांबवत कुसुम ताई म्हणाल्या, अगं माझ्या हातचं सवष्णींना कसं चालेल? मी ही अशी.... हे असते तर मी नक्की केलं असतं. "
"आई, तुमच्या हातचं चालेल नाही धावेल. अहो काहीच विचार करू नका, कारण ती देवी पण एक स्त्री आहे आणि तुम्ही पण एक स्त्रीच आहात. देवीला आपण माता म्हणतो आणि तुम्ही पण तुमच्या मुलाची माता आहात. खरं ना? "
कुसूमताईंचा हात हातात घेऊन अनिका विश्वासानी बोलत होती. "आता हे सगळं सामान आत नेऊन ठेवते, उद्यापासून मिशन ओटी सुरू. " अनिका सगळं सामान घेऊन आत निघून गेली आणि इकडे
अनिकाच्या कपाळावरच्या छोट्या टिकलीच्या मागचं मोठं मन कुसुमताई समाधानानी अनुभवत राहील्या.
सौ. मंजुषा श्रीहरी आठल्ये.
9665405482




