प्रभाव ते परिवर्तनापर्यंत : राष्ट्र सेविका समितीची ९० वर्षे
*प्रभाव ते परिवर्तनापर्यंत : राष्ट्र सेविका समितीची ९० वर्षे*
राष्ट्र सेविका समिती या महिला संघटनेला यावर्षी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. वंदनीय लक्ष्मीबाई केळकर अर्थात मावशी यांनी १९३६ मध्ये विजयादशमीच्या दिवशी वर्धा येथे समितीची स्थापना केली. हा ९० वर्षांचा प्रवास अथक संघर्षाचा, समर्पणाचा आणि व्यक्तिनिर्माणाचा आहे. समाजासाठीच नव्हे, तर अखिल राष्ट्रासाठी प्रेरणादायी असलेला हा प्रवास म्हणजे स्त्रीशक्तीच्या जागरणाची गाथा आहे.
समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी केळकर यांचा जन्म ६ जुलै १९०५ रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव कमलताई दाते होते. देशभक्तीचे संस्कार लाभलेल्या मावशींना स्त्रियांवरील अत्याचार आणि त्यांची परावलंबिता अस्वस्थ करीत असे. स्त्रिया स्वावलंबी व स्वसंरक्षणक्षम व्हाव्यात, या विचारातून त्यांनी स्त्रीसंघटनेची आवश्यकता जाणली. स्वामी विवेकानंदांच्या स्त्री-पुरुष हे समाजरूपी गरुडाचे समान सामर्थ्यवान पंख आहेत, या विचाराने त्यांना प्रेरणा दिली.
१९२५ मध्ये पूजनीय डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. वर्ध्यातील संघशाखेत मुलांना मिळणारे शारीरिक व बौद्धिक प्रशिक्षण पाहून स्त्रियांनाही अशा प्रशिक्षणाची गरज मावशींना जाणवली. त्यांनी डॉ. हेडगेवार यांची भेट घेऊन स्त्रियांसाठी स्वतंत्र संघटनेची आवश्यकता मांडली. त्यांच्या चर्चेतून स्त्रीसंघटनेचे महत्त्व अधोरेखित झाले आणि डॉक्टरजींनी सहकार्याचे आश्वासन दिले. त्यातूनच विजयादशमी, १९३६ रोजी राष्ट्र सेविका समितीची स्थापना झाली.
समितीचे ध्येय ‘तेजस्वी हिंदुराष्ट्राचे पुनर्निर्माण’ हे ठरले. महिलांना संघटित करून त्यांना सुशीला, सुधीरा आणि समर्था बनविणे व त्यांच्यात राष्ट्रभाव जागृत करणे, हा समितीचा उद्देश निश्चित झाला. शाखा हे व्यक्तिनिर्माणाचे केंद्र बनले. शिस्त, नेतृत्व, देशभक्ती, सामूहिकता आणि हिंदू जीवनमूल्यांचे संस्कार देण्याचे कार्य सुरू झाले. देवी अष्टभुजा हे समितीचे आराध्य दैवत ठरले. वर्षप्रतिपदा, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, विजयादशमी आणि मकरसंक्रांत हे पाच उत्सव, तसेच संकल्प दिन, संपर्क दिन आणि सेवा दिन असे विशेष दिवस साजरे होऊ लागले. मातृत्वासाठी राजमाता जिजाबाई, नेतृत्वासाठी राणी लक्ष्मीबाई आणि कर्तृत्वासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे तीन आदर्श मावशींनी सेविकांसमोर ठेवले.
वर्ध्यानंतर नागपूरसह विविध ठिकाणी शाखा सुरू झाल्या. पुणे, सातारा, भंडारा आदी ठिकाणी सुरू असलेले स्त्रीसंघटनेचे कार्यही पुढे समितीच्या प्रवाहात सामावले. शाखेच्या गुरुस्थानी भगवा ध्वज स्वीकारण्यात आला. संस्कृत प्रार्थनेतून मातृभूमीविषयीची निष्ठा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा दृढ झाली. मावशींची शिस्त, सेविकांविषयीची आत्मीयता आणि कार्यावरील निष्ठा यांमुळे समितीचा विस्तार झाला. सिंध प्रांतातही शाखा सुरू झाली.
१९४७ च्या फाळणीमुळे देशात दंगली आणि अस्थिरता निर्माण झाली. १९४८ मध्ये गांधीजींच्या हत्येनंतर संघकार्यावर बंदी आली आणि समितीच्या कार्यावरही परिणाम झाला. या काळात भजन, कीर्तन आणि रामायण प्रवचनांच्या माध्यमातून कार्याचा संपर्क टिकवून ठेवण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीतही मावशींनी राष्ट्रकार्याची ज्योत तेवत ठेवली. २७ नोव्हेंबर १९७८ रोजी त्यांचे निधन झाले; मात्र त्यांनी रुजवलेले विचार आणि कार्याची दिशा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहिली.
मावशींनी समर्थ कार्यकर्त्यांच्या हाती सोपवलेले कार्य आज भारतभर आणि भारताबाहेर ‘हिंदू सेविका समिती’ या नावानेही विस्तारले आहे. आज देशभरात समितीच्या ४,८८६ शाखा आणि १,१७३ मिलन कार्यरत आहेत. व्यक्तिनिर्माणाबरोबरच समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचणारे २,८६६ सेवाप्रकल्प समितीच्या वतीने चालवले जातात. यामध्ये २७ निःशुल्क छात्रावास आणि ९ सशुल्क छात्रावासांचा समावेश आहे. अभ्यासवर्ग, प्रशिक्षण शिबिरे, एकत्रीकरणे आणि संमेलने यांद्वारे सेविकांमध्ये नेतृत्वगुण, राष्ट्रभाव आणि सामाजिक उत्तरदायित्व विकसित केले जाते. शिक्षण, संस्कार, स्वावलंबन आणि सेवाकार्याच्या माध्यमातून समिती समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘सेविका प्रकाशन’च्या माध्यमातून सेविका वार्षिकांक आणि दिनदर्शिकाही प्रकाशित केली जाते. नागपूर येथील ‘देवी अहल्या मंदिर’ हे समितीचे प्रमुख केंद्र कार्यालय आहे.
एक सुशिक्षित, संस्कारित स्त्री सशक्त परिवार घडवते; सशक्त परिवार संघटित समाज निर्माण करतो आणि संघटित, संस्कारित समाज समर्थ राष्ट्र उभारतो. म्हणूनच समितीचा प्रवास केवळ संघटनेच्या विस्ताराचा नसून स्त्रीशक्तीच्या जागरणातून समाजपरिवर्तन आणि राष्ट्रनिर्मितीकडे वाटचाल करणारा आहे.
प्रा. अनुपमा खवसे
9420235506
वर्धा विभाग बौद्धिक प्रमुख
राष्ट्र सेविका समिति




