नागपुर संस्करण
विचार वेध

शक्तीचा एक जागर असाही - सौ.राधिका पांडे

📅 12 अक्टू॰ 2026 ✍️ Admin Editor 👁 125 बार देखा
शक्तीचा एक जागर असाही - सौ.राधिका पांडे
शक्तीचा एक जागर असाही*

भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला शक्तीचे रूप मानले गेले आहे. आपण दरवर्षी नवरात्रीत किंवा विविध सणांच्या माध्यमातून देवीची पूजा करतो, स्त्री शक्तीचा जागर करतो. शक्ती म्हणजे मी. माझ्यासोबत तुम्ही किंवा स्त्री असे एव्हढेच नाही तर पुरुषही, आपल्या सगळ्या मध्ये जे एक तेजःपुंज निरंतर तेवत आहे तीच खरी शक्ती अणि त्याचीच ही उपासना...
दुसरोके जय से जय से पहिले खुद की जय करे...म्हणजेच स्वतः मधील तेजःपुंज चा सर्वप्रथम जागर करूया अणि त्या जागरात ईतर सर्व शक्तींना आवाहन करू या. 
स्त्री शक्ती चा जागर म्हणजे त्या आदिमायेची उपासना. यात देवीची पूजा,  व्रत वैकल्य,  नटून-थटून फोटो काढणे, गरबा सोबतच जेव्हा आपण आपल्या अवतीभवतीच्या स्त्री शक्तींच जागर करू तेव्हा ती  या देवी सर्व भूतेशु होईल.

यंदाच्या उत्सवात फक्त एका व्यक्तीने नव्हे, तर आपण सगळ्या जणींनी मिळून आई, सासूबाई, बहीण, नणंद आणि आपल्या मैत्रिणी केवळ बोलत न बसता प्रत्यक्ष काहीतरी चांगलं करूया. शेवटी खऱ्या स्त्री शक्तीची सुरुवात ही आपल्या घरापासूनच होते. जेव्हा आपण घरात एकमेकींशी सलोख्याचे, प्रेमाचे नाते जपून एकत्र येऊ, तेव्हाच आपल्याला समाजातील इतर भगिनींना मदत करण्याची मोठी ऊर्जा मिळेल.
घरापासून सुरवात म्हणजे कित्येक वर्षापासुन, म्हणजेच ओळखीची घरकाम करायला येणारी मावशी किंवा काकू, आपल्या परिसरातील सफाई कामगार, भाजी विक्रेत्या शिवणकाम करणार्‍या, आर्थिकदृष्ट्या वंचित भगिनी, ज्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रामाणिकपणे कष्ट करत आहेत, या महिलांना केवळ सहानुभूतीची नाही, तर प्रत्यक्ष कृतीची आणि हक्काच्या पाठबळाची गरज आहे, अशा विविध क्षेत्रात काम करणार्‍या या शक्तीचा जागर करूया.

 आपल्या घराची काळजी घेणाऱ्या मावश्यांना योग्य आदर देणे, ही आपली जबाबदारी आहे. तिच्या तब्येतीची, घरगुती समस्यांची, कौटुंबिक हिंसाचाराची, आर्थिक विवंचनेची चौकशी करत राहूया.  तिला तिच्या हक्काच्या सुट्या देऊ या अणि अवेळी सुट्टी घेतल्यास विचारपूस करूया. तेव्हा त्यांच्या समस्या अणि अडचणींचे दृश्य आपल्या समोर येइल. या अडचणी आर्थिक सामाजिक  व्यावहारिक अणि कित्येक रुपाच्या असू शकतील.  आर्थिक अडचणीत सगळ्या मैत्रिणी मिळून या कष्टकरी महिलांच्या लहान मुलांचे शिक्षण पैशांअभावी सुटू नये, म्हणून त्यांना वह्या, पुस्तके घेऊन देऊया आणि अभ्यासात मदत करूया. आपण एकत्र येऊन या कष्टकरी भगिनींना मासिक पाळीच्या वेळची स्वच्छता, चांगला आहार आणि आरोग्याचे महत्त्व पटवून देऊया आणि त्यांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करूया. मोफत आरोग्य तपासण्या केंद्रा बद्दल, आरोग्य शिबिरांबद्दल माहिती देऊ या.
कित्येक महिलांना आर्थिक व्यवहार जमत नाहीत. बँक - पोस्टाची बचत खाती वापरता येत नाहीत. किंवा त्या द्वारे होणारे गैर वापर माहिती नाहीत, या बाबत त्यांना जागरूक करून त्यांना सक्षम करूया. डिजिटल बॅंकिंग ची तोंड ओळख करून देऊ या जेणेकरून OTP ने होणारे fraud संबंधी सतर्क करूया कारण आजकाल त्यांच्या पेक्षा जास्त त्यांची अपत्यच् मोबाईल चा वापर जास्त करतात जेणेकरून महिलांचे यावर लक्ष राहील.
आपल्या घरातील तरुण मुलींच्या मदतीने या मावश्यांना आणि त्यांच्या मुलींना गुगल पे, फोन पे वापरणे आणि ऑनलाईन बँकिंग शिकवूया. 
 ज्या महिलांचे यजमान (पती) हयात नाहीत, त्यांना घराचा टॅक्स, पाण्याचा टॅक्स कसा भरायचा हे अनेकदा माहिती नसतं. आपण त्यांना स्वतःची बिले दाखवून ती कशी वाचायची ते सोप्या भाषेत सांगूया. पतीच्या निधनानंतर घर स्वतःच्या नावावर कसं करायचं, कागदपत्रांची फाईल कशी सांभाळायची, हे त्यांना शिकवूया आणि गरज पडल्यास आपण स्वतः त्यांच्यासोबत सरकारी कार्यालयात जाऊन सरकारी योजनांचे फॉर्म भरण्यास मदत करूया जसे लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना यांसारख्या चांगल्या योजनांची माहिती क्लिष्ट नियमांमुळे या महिलांपर्यंत पोहोचत नाही. आपण त्यांना गोष्टीच्या स्वरूपात ही माहिती समजावून सांगूया आणि आपल्या घरीच एकत्र जमून त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून द्यायला मदत करूया.
 सोबतच, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वेळेचा कसा अपव्यय होतो आणि सायबर धोके काय असतात, हे समजावून सांगून सोशल मीडियाचा वापर कमी करायला जागरूक करूया.
सध्या सोशल मीडिया चे गारूड प्रत्येक स्तरावर अणि पिढी वर आहे त्यातून कोणीही सुटले नाही. आणि खासकरून तरुण तरुणी अणि विद्यार्थी. मावशीना याच्या गांभीर्यची जाणीव करून देऊ या..अभ्यासाच्या नावाखाली तासनतास सोशल media वर मुले  वेळ घालवतात त्यांना यापासून कसे कार्यमान अणि कृतिशील करायचे याबद्दल धडे देऊ या. 
मी कित्येक मुलींना social मीडिया ने वाहावत जाऊन धर्मांतरण पर्यंत पोहोचले पाहिले आहे. आणि त्यातून त्या मुलीला धोपट मार्गाकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. अणि हा प्रयत्न आजपासून तुम्हा आम्हा सर्वाना - आबालवृद्ध स्त्री पुरुषांना करायचा आहे अणि त्या स्त्री तत्त्वाचा जागर वर्षभर सुरू ठेवायचा आहे. असे केल्याने आपल्यातल्या शक्तीचा होणारा जागर आपण स्वतः अंतर्मुख होऊन अनुभवत असतो. तो निर्मळ आनंद काही औरच असतो. या प्रयत्नांनी ती आदिशक्ती जागृत राहिली तर समाजात फोफावणार्‍या कुमार्ग, व्यसन, गुन्हेगारी, पाश्चिमात्य अंधानुकरण, निष्क्रीयता, बेरोजगारी, निर्ढावलेपणा अश्या मनुष्य निर्मित असुरांचा ती नाश करू शकेल, अणि आपसूकच समजाच्या मुलभूत घटकाला म्हणजेच स्वतःच्या कुटुंबाला स्थैर्यता अणि प्रगल्भता देऊ शकेल. बरे हा जागर काही स्तरातील घटकां पुरता मर्यादित न ठेवता घर शाळा कॉलेज ऑफिस ते कॉर्पोरेट पर्यंत विस्तारला जायला हवा तर तो खर्या अर्थाने या देवी सर्वभूतेषु असा होईल. 

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

 सौ. राधिका पांडे,नागपूर  
9907801771

संबंधित लेख