नागपुर संस्करण
विचार वेध

स्त्री शक्तीचा आविष्कार - यशश्री तापस

📅 11 अक्टू॰ 2026 ✍️ यशश्री तापस 👁 45 बार देखा
स्त्री शक्तीचा आविष्कार - यशश्री तापस
*स्त्रीशक्तीचा आविष्कार*

©️ यशःश्री तापस

*या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।* *नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः॥*

निसर्गाने निर्माण केलेला कलेचा सर्वोत्तम नमुना म्हणजे स्त्री आणि पुरुष !  हे दोन केवळ भिन्न देहच नव्हे तर संपूर्णतः भिन्न प्रकृतीही आहेत. स्त्री ही कोमल तर पुरुष दणकट ! स्त्री सहिष्णू तर पुरुष असहिष्णू ! पुरुषाला मोहाचा शाप तर स्त्रीला संयमाचे वरदान ! परंतु स्त्री ही एका बाबतीत पुरुषाहून वरचढ ठरते आणि ते म्हणजे खंबीरपणा आणि संतुलन !

परिस्थिती कशीही असो स्त्री त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देते.  अतिशय आनंदात किंवा पराकोटीच्या दुःखातही ती आपले मानसिक संतुलन ढळू देत नाही. स्त्री ही प्रसंगी मेणाहून मऊ तर प्रसंगी वज्राहूनही कठोर होऊ शकते. ती मनाने कोमल असली तरी विचारांनी कणखर असते. तिच्यात उपजतच शक्तीचा वास असतो. तिच्यातील sixth sense हा सदैव जागृत असतो.

समोरच्या व्यक्तीची पारख करण्याचे उत्तम कसब तिच्यात असते. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललेय हे ओळखणारी जणू ती एक जादूगार असते. अशा अनेक गुणांनी युक्त असणारी स्त्री मात्र कायमच समाजपुरुषाने दुर्लक्षित केली आहे. अगदी अनादी काळापासून चालत आलेली ही अनिष्ट परंपराच म्हटली पाहिजे आणि आजही हे चित्र फारसे बदललेले दिसत नाही. अगदी सुरुवातीपासून स्त्रीला समाजात दुय्यम स्थान देण्यात आले आहे आणि आजही काही सन्माननीय अपवाद वगळता स्थिती काही फारशी उत्साहवर्धक नाही . 

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने वावरते आहे . किंबहुना शिक्षणक्षेत्रात तर मुलीच बाजी मारत असल्याचे आपण गेल्या काही वर्षांपासून पाहातो आहे. संरक्षण आणि राजकारणात स्त्रिया आपले सक्रीय योगदान देत आहेत. तेच क्रीडाक्षेत्राबाबत पाहायला मिळते, तिथेही मुलीच अग्रेसर आहेत. कलाक्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या स्त्रियांचे योगदानही अतिशय महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय असेच आहे. असे असूनही मानधानच्या बाबतीत मात्र तिच्याबाबतीत दुजाभाव केला जातो हे नक्कीच अन्यायकारक आहे.

आपल्याकडे मात्र ह्या सगळ्या प्रकारावर मखलाशी करण्यात येते, ती अशी की स्त्रीला देवीची उपमा देऊन तिचे पूजन केले जाते. अश्याने होते काय की तिचा माणूस म्हणून जगण्याचा हक्कच डावलल्या जातो आहे. समाजपुरुषाला वाटते की स्त्री ही एकतर देवी असावी नाहीतर गुलाम! पण तिने माणूस म्हणून जगूच नये. हे विधान मी मोठ्या धाडसाने करते आहे कारण सध्या बलात्कार , स्त्रीभ्रूण हत्या आणि घरगुती हिंसेच्या ज्या बातम्या रोजच्या रोज ऐकतो आहे आणि त्यांचे प्रमाण वाढताना बघतो आहे, त्याने मी वरील विधान करण्याची हिंमत केली आहे.

आजपासून देवीचे नवरात्र सुरू होते आहे. घरोघरी देवीची स्थापना होणार, तिचे गोडवे गायले जाणार, तिची स्तोत्रे व आरत्या ह्यांनी आसमंत दुमदुमणार आणि प्रत्यक्षात मात्र स्त्रीला अपमानाचे कटू घोट प्यावे लागणार, किती हा विरोधाभास! ज्या सुशिक्षित म्हणा की अशिक्षित म्हणा, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी म्हणा की परावलंबी म्हणा, त्या लेकीसुनांना माताभगिनींना आजच्या पुढारलेल्या आधुनिक जगातही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपमान सहन करावे लागतात आणि हिणकस वागणूक सहन करावी लागते, त्यांचे काय ? हा विचार जरी मनात आला तरी मनाचा थरकाप उडतो. ह्याला काही सन्माननीय अपवाद आहेत पण अगदी बोटावर मोजण्याइतकेच!

विचार करताना असे वाटते की स्त्री ही स्वतःच तर अशा अवस्थेला कारणीभूत नाही ? आजकाल काही स्त्रिया व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली जे काही वागत आहेत, फॅशनच्या नावाखाली जो काही पेहराव करत आहेत, आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ज्या थराला जात आहेत, त्याने तर समस्त स्त्री जातीला अपमानास्पद वागणूक दिली जात नाही ना ? त्यामुळे तर तिचे शोषण होत नसेल ना ? काही विशिष्ट स्त्रियांच्या वागणुकीमुळे तर सर्व स्तरातील स्त्रियांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन दूषित होत नाही ना?  नाइलाजाने का होईना पण उत्तर हो असेच येते. काही मोजक्या स्त्रियांमुळे संपूर्ण स्त्रीजातीला हा त्रास सहन करावा लागतोय ह्याचे वाईट वाटते.

ह्यावरचा उपाय मला वाटतो की स्त्रीने तिच्यात असलेल्या शक्तीला जाणून घेतले पाहिजे. तिला तिच्यात असलेल्या बलस्थानांची प्रचिती आली पाहिजे. संयमी असलेली स्त्री प्रसंगी किती बळकट होऊ शकते ह्याची प्रचिती सगळ्यांना आली पाहिजे. स्त्रित्वाच्या सीमेत राहूनही ती आकाशाला गवसणी घालू शकते हे तिचे तिलाच समजले पाहिजे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी  कोणत्याही खालच्या थराला जावे लागत नाही, आपली बुद्धिमत्ता, शिक्षण आणि भावनिक खंबीरपणा हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे , हे स्त्रीला समजू दे ! हे तिला समजले की अधिकाधिक प्रश्न सुटतील. तिला अपमानजनक जीवन जगावे लागणार नाही.
हेच त्या जगत् जननी शक्तिदेवतेला साकडे घालते.

यशःश्री तापस नागपूर 9423597688

संबंधित लेख